बांधवकरांचे भक्कम बांध!

बांधवकरांचे भक्कम बांध!

Share this post on:

संस्कृत काव्यक्षेत्रातील सर्वश्रेष्ठ विद्वानांपैकी एक मानल्या जाणार्‍या आचार्य मम्मटांनी सांगितलं होतं की, लेखन हे स्वान्तसुखाय असावं. असं आनंदासाठी लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. काही प्राध्यापक मंडळी पदोन्नतीसाठी लिहितात, अनेकजण प्रतिष्ठेसाठी लिहितात, काहीजण हौस म्हणूनही लिहितात. कुणी का लिहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. मात्र तरीही या सर्वांत वाचकांच्या मनाचा, त्यांच्या मतांचा विचार करणारे, त्यांना वेगळी दृष्टी देणारे मोजकेच असतात. मम्मटांच्या स्वान्तसुखाय परंपरेचा वारसा चालवणारे एक लेखक म्हणजे संजय बांधवकर! कसलाही अभिनिवेष न आणता साध्या-सोप्या भाषेत लिहिण्याची त्यांची हातोटी आहे. ते गुणग्राहक आहेत. नवोदितांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती त्यांच्या अंगात मुरलीय. म्हणूनच अनेक पुस्तकांवर त्यांनी आजवर आस्वादक लेखन केले आहे. आपली नोकरी सांभाळत जशी जमेल तशी साहित्यसेवा करून लेखनातला आनंद त्यांनी शोधला आहे.

बांधवकर म्हणतात,

जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत हे जीवन व्यापलंय ते शब्दांनी! शब्दच जुळवतात मनं, जुळवतात नाती. शब्दच निर्माण करतात बुद्ध अन् शब्दच जाळतात मनं! क्षणात तोडतात नाती अन् निर्माण करतात हिटलरही! शब्द हे मनाचे सारथी असले तरी मनाच्याही मनात नसताना ते होतात बेफाम अन् घडवितात महायुद्ध! अल्पमतीने याच शब्दांची जमेल तशी उधळण करत आलो. कुणी केले कौतुक… प्रशंसा तर कुणी केला उपहास! ही सारी किमया शब्दांचीच. अनेकांनी या शब्दांना साथ दिलीय. तेच शब्द कथारूपात गुंफलेत प्रामाणिक भावनांसह!

शब्दांशी असं इमान राखणारे चौकीदार आहेत म्हणून हा साहित्याचा डोलारा उभा आहे. संजय बांधवकर यांनी त्यांचा पहिलावहिला ‘आनंदपहाट’ हा संग्रह याच भूमिकेतून वाचकांच्या हाती दिलाय. यातल्या कथासूत्रांवर, त्यांच्या मांडणीवर मतमतांतरं असू शकतात पण त्यांच्या भावना सच्च्या आहेत. त्यांची साहित्यिक तळमळ आणि त्यांचा सर्वोत्तमतेचा ध्यास दाद देण्याजोगा आहे.
या संग्रहात त्यांनी त्यांच्या मनोगताऐवजी ‘आनंदपहाट’ हा जो ललितबंध दिलाय तो प्रत्येकाने वाचायला हवा. यातल्या कथांतून आपले डोळे उघडतील, आपले रंजन होईल पण त्याहून महत्त्वाचे या ‘आनंदपहाट’मुळे आपण स्वतःशी संवाद करू शकू! या संग्रहाची भूमिका मांडताना बांधवकर लिहितात,

तुमच्या-आमच्या जीवनात अनेकदा आनंद पहाट येते. म्हणजे लाडकी मुलगी बोहल्यावर उभी राहते त्यादिवशीची सकाळ म्हणजे आनंद पहाट. पाल्यांचा रिझल्ट कळणार असतो ती आनंद पहाट. लाडकी मुलगी प्रथमच सासरहून माहेरी येते तेव्हा पहाटे तिचा जो आवाज येतो ती आनंद पहाट. घरात नूतन बाळाचं रडणं ऐकू येतं ती सकाळ म्हणजे आनंद पहाट. बराच काळ हॉस्पिटलमध्ये काढून पेशंट घरी परतून येणारी पहाट म्हणजे आनंद पहाट. घरी सणावाराला धावपळीत असणारी पहाट म्हणजे आनंद पहाट. परदेशातून मुलगा घरी आला की, उगवणारी सकाळ म्हणजे आनंद पहाट. ज्यांच्या घरी आजही बागा आहेत तेव्हा रोजच सूर्योदयासोबत सुवासिक रंगीबेरंगी फुलांसोबत असते ती सकाळ म्हणजे आनंद पहाट. दूर शेतात असणार्‍या शेतकर्‍याला जेव्हा कळतं की आपलं जीवघेणं कर्ज माफ झालंय ती पण आनंद पहाटच!

अशी आनंद पहाटची कल्पना घेऊन संजय बांधवकर इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात त्यांचा कसला स्वार्थ नाही. आपण खूप वेगळे आहोत असं दाखविण्याचा अट्टहासही नाही. केवळ आणि केवळ निर्भेळ आनंदासाठी ते जगतात. त्यांच्या आनंदपहाटचे हेच तर सामर्थ्य आहे.

128 पानांच्या या संग्रहात त्यांनी 17 कथा दिल्यात. त्यातल्या काही मनाला स्पर्शून जातात तर काही आपल्याला मनसोक्त हसवतात. पेंडुलम ही यातली कथा आपल्याला अंतर्मुख करते. नाना आणि माई यांच्यासोबत त्यांचा मुलगा जसे वागतो ते पाहून आपण अस्वस्थ होतो. ‘मुलाला मोठं करणं हा म्हणजे व्यवसास आहे?’ असा नानांचा सवाल ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या हृदयात चरर्र होईल. नोकरी गेल्यानं उच्चविद्याविभुषित पोराला ऍटॅक यावा हा नानांना भेकडपणा वाटतो.

‘लीडर’ या कथेतील बेरकी बबन्या वाचताना आपाल्याला हसायला येतं. अनेक गावात, अनेक कंपन्यात असे बबन्या आहेत. कामगार एकजूटीच्या नावावर त्यांनी अनेकांना कसं नको-नकोसं करून ठेवलंय याबाबतचं बांधवकरांचं सूक्ष्म निरीक्षण जबरी आहे. ‘असाही एक चै’मधील चैतन्यची कथा आणि व्यथा वाचताना आपल्या डोळ्यातून पाणी कधी टपकलं हे आपल्यालाही कळत नाही. ही दोन मित्रांची कथा वाचताना आपण अस्वस्थ होतो. ‘गाय वासरू’ या कथेतील दृष्टिहिन राहुलनं गाय वासराचं काढलेलं अप्रतिम निसर्गचित्र पाहून पाहुणे हबकतात. त्यांचा अहंकार गळून पडतो. घरातली मंडळी आपल्यापेक्षा जास्त राहुलविषयीच बोलतात याचा सुरूवातीला त्यांना राग आलेला असतो. नंतर त्यांना कळते की राहुल दृष्टिहिन आहे. राहुलनं काढलेल्या चित्रात पहाटेची सूर्यकिरणं मंदिरावर पडली होती. सारी धरित्री त्या किरणांनी उजळून निघालीय. त्या प्रकाशानं सारे चराचर संतुष्टपणे व्यवहाराला लागलेत. किणकिणणारी घुंगरं बांधलेल्या गायींचा कळप शेतात निघालाय तर फेटेधारी शेतकरीही नांगर घेऊन रानात निघालेत. हे सारं पाहून त्यांना प्रश्‍न पडतो जन्मतःच अंध असलेल्या राहुलनं हे सारं कुठं बघितलं? तो हे सारं कसं अनुभवू शकला? राहुलने न बघता काडलेला सूर्यप्रकाश त्याला एकदा तरी बघू दे, त्यानं काढलेल्या या गायवासरांना त्याला हसता-बागडतांना बघू दे अशी प्रार्थना ते करतात.

‘कजाग’ या कथेतील टेकाडे काकू, बस क्र. 101 कडे डोळे लावून बसलेली विजू, ‘लग्न कर्तव्य’ कथेतील गण्यानं जमवलेलं लग्न, ‘शहरी चकवा’मधील राजा, त्याच्या बायकोला स्वतःची किडनी देणारी त्याची मुलगी हे सारं वाचताना कुणीही हेलावून जाईल. या संग्रहातील ‘मंगळाचा निर्णय’, ‘दे टाळी’, ‘मिस कॉल’, ‘तळ’, ‘कृतघ्न’, ‘भारत माता की जय’, ‘कद्रू असं का वागला?’, ‘बीबीसी लंडनकाकू’, ‘अजाबरावाचं काय होणार?’ या कथाही वाचनीय आहेत. सामान्य माणूस, त्याची सुख-दुःख हे बांधवकरांच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळेच शब्दांचे फुलोरे न देता ते सामान्य माणसाला कळेल, त्याला रूचेल अशी भाषा वापरतात. यातल्या अनेक कथा तर आपल्या आजूबाजूला घडलेल्या आहेत की काय असे वाटावे इतक्या त्या प्रभावी झाल्या आहेत.

‘अजाबरावाचं काय होणार?’ या कथेतील रहस्य उलगडण्यात मुंबईपर्यंत लेखणीचा धाक असणारा पत्रकार श्रीमंत यशस्वी होतो. त्यातील वृत्तपत्राचे कामकाज, ऑपरेटरपासून ते संपादकांपर्यंत सर्वांचे केलेले चित्रण, राजकारणातील बारकावे हे सारंच बांधवकरांनी छान टिपलंय. म्हणूनच ही कथा वाचताना शेवटपर्यंत उत्कंटा वाटते. यातील सर्व कथांचे समानसूत्र म्हणजे त्यात सामान्य माणसाच्या जगण्याचा, त्याच्या अडीअडचणींचा, आलेल्या, येणार्‍या अनुभवांचा सूक्ष्म विचार संजय बांवधकरांनी केलाय. म्हणूनच बांधवकरांचे हे शब्दांचे बांध भक्कम आहेत. हे शाब्दिक बांधकाम सामान्य माणसाच्या मनाचा वेध घेतं. त्याला वाचनात गुंतवून ठेवतं.

सेवानिवृत्तीनंतर संजय बांधवकरांचा हा कथासंग्रह प्रकाशित झालाय. वाचकांना देण्यासारखे त्यांच्याकडे अजून बरेच काही आहे. यथावकाश ते निश्‍चितपणे बाहेर येईल. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचे लेखन स्वान्तसुखाय आहे. त्यामुळे ते ओढून-ताणून काही लिहित नाहीत. जे आतून स्फुरते, जे हृदयापासून लेखणीत येते तेच त्यांच्या कागदावर उतरते. त्यामुळेच ते अस्सल वाटते. त्यांची ही शब्दसाधना अखंडितपणे, अव्याहतपणे सुरू राहील यासाठी त्यांना शुभेच्छा!

– घनश्याम पाटील, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी – दैनिक सुराज्य, सोलापूर २५ मार्च २०१९ )

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

  1. स्वतःशी संवाद साधणारी आनंद पहाट…
    अभिनंदन आणि शुभेच्छा.!

  2. आज आनंद पहाट उगवली ती घनश्याम पाटील यांच्या लेखाने. विनोद पंचभाई आणि घनश्याम यांच्या प्रेरणेनेच पुस्तक अवतरले. घनश्याम पाटील यांचे प्रचंड वाचन..अठरा वर्षे प्रकाशनाचा दांडगा अनुभव यामुळे या समिक्षेला वेगळे महत्त्व आहे. ही एवढी विस्तृत दखल ही पुढील लिखाणाला प्रोत्साहन देणारी. आभार हा शब्द तुम्हाला आवडणार नाही तरी मानतोच. आपल्या सर्वांच्या जीवनात नित्य आनंद पहाट यावी हीच प्रार्थना..
    संजय बांधवकर..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!