वेश्यामंदिरातील एक तास

वेश्यामंदिरातील एक तास

1980 चा तो काळ. तेव्हा मी अवघा 17 वर्षांचा होतो. त्यावेळेस मी आमच्या ओळखीच्यांच्या, डेक्कन बस स्थानकाच्या पाठीमागील एका फोटो स्टुडिओत अर्धवेळ काम करायचो. तिथेच माझी आणि हर्षदची ओळख झाली. एक दिवस संध्याकाळी आमचे काम संपल्यावर हर्षद मला म्हणाला; ‘‘रव्या, चल तुला एक गंमत दाखवतो,’’ असे म्हणून तो मला समाधान हॉटेलच्या मागच्या एका गल्लीत घेवून गेला. आजवर मी ह्या बाजूला कधी फिरकलोच नव्हतो त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत हे मला कळतच नव्हते. पूर्ण अनभिज्ञ होतो मी ह्या सगळ्यापासून आणि ते समजून घेण्याचे माझे वयही नव्हते हो!

रस्त्याच्या दुतर्फा दोन मजली घरे होती आणि जिकडे पहावे तिकडे खिडक्यांतून परकर पोलकं घातलेल्या, भडक मेकअप केलेल्या पोरीच पोरी उभ्या होत्या. काही घरांच्या खाली पुरुषांशी म्हणजे त्यांच्या ग्राहकांशी बोलत उभ्या होत्या. देहविक्री करण्यार्‍या त्या पोरी आलेल्या गिर्‍हाईकाला पटवण्याचा अगदी कौशल्याने प्रयत्न करत होत्या. माझ्या तरी हे सगळे आकलनशक्ती पलीकडले होते. मनातल्या मनात हर्षदला एकसारख्या शिव्या हासडत होतो; की अरे कुठल्या नरकात घेवून चालला आहेस रे मित्रा मला!

एक दोन गल्ल्या पार करून शेवटी हर्षद एका घराचा जिना चढू लागला. दुसर्‍या मजल्यावरच्या एका मोठ्ठ्या खोलीत मला हर्षदने बसवले आणि तो ‘‘मी आलोच 15-20 मिनिटांत’’ असे सांगून आत कुठे तरी निघून गेला. मी बसलो होतो त्या खोलीत 10-12 पोरी विचित्र (हिडीस) हावभाव करत इकडून तिकडे फिरत होत्या. अजून दोघे जण त्या खोलीत बसलेले होते. ह्या पोरी त्यांच्याकडे पाहून; ‘‘ऐ चल ना ! आज मेरे साथ बैठ ना! एक बार बैठ मेरे साथ, जिंदगी भर याद रखेगा!’’ पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या देहविक्रीसाठीची ह्या पोरींची चाललेली ही जीवघेणी तडफड पाहून मला मनातल्या मनात खूप गलबलून येत होते व माझ्या अंगावर काटा उभा राहत होता.

15-20 मिनिटांत आलो म्हणून सांगून गेलेला हर्षद आत जावून 40 मिनिटे होऊन गेली होती तरी परत आला नव्हता; त्यामुळे माझा जीव नुसता वर खाली होत होता. त्यात तो आत कुठे गेला आहे हे समजायलाही मार्ग नव्हता. का कोण जाणे, इतक्यावेळात ह्या मुलींबद्दल माझ्या मनात एक प्रकराची सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती. देहविक्री हा त्यांचा धंदा होता व तो त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि निघुतीने करत होत्या, त्यात त्यांचे काहीच चुकत नव्हते. मीच चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. असतील त्यांच्या काही कथा, व्यथा असे मनातल्या मनात म्हणत मी आहे तिथेच बसून हर्षदची वाट बघत होतो.

एकदाचा हर्षद आला आणि माझ्या हाताला धरून मला आत घेवून जायला लागला. मला त्याची शंका आली. मी त्याला म्हणालो; ‘‘हर्षद, माझा हात सोड! मला हे असले घाणेरडे उद्योग अजिबात करायचे नाहीत! तुझे तुलाच लखलाभ! मला इथे आणून तू आज फार मोठी चूक केली आहेस. मी तुझे हे सगळे उपद्व्याप तुझ्या घरी सांगणार आहे! मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. आजपासून आपली मैत्री संपली…’’

हर्षदवर माझ्या बोलण्याचा काही एक परिणाम होत नव्हता. तो माझे काही एक न ऐकता मला आत कुठेतरी घेवून चालला होता. माझ्यासमोर ह्या दिव्यातून बाहेर पडण्यासाठी, त्याच्या बरोबर जाण्याशिवाय काही पर्यायही शिल्लक राहिला नव्हता. अरुंद अशा, एका मोठ्या चिंचोळ्या खोलीत हर्षद मला घेवून चालला होता. त्यातच एका बाजूला साधारण 5 फुट रुंद व 8 फुट लांब अशा निमुळत्या खोल्या होत्या आणि त्यांना सरकती दारे होती. एक-एक खोली ओलांडताना आतून नको नको ते आवाज आणि संवाद कानावर पडत होते. एक प्रकारचा कोंदट आणि कुबट वास सगळीकडून येत होता. मी तर जीव मुठीत धरूनच हर्षदच्या बरोबर चाललो होतो, नव्हे फरफटत जात होतो. मला कुठल्याही क्षणी उलटी होईल असे वाटत होते.

सरतेशेवटी हर्षदच्या त्या पोरीची ती खोली आली. जेमतेम एक खाट मावेल एवढी ती खोली होती. त्यावर गलिच्छ गादी होती व त्यावर कळकटलेली, मळकटलेली, कसले तरी प्रंचड डाग पडलेली एक चादर घातलेली होती. भिंतीला गडद निळा रंग होता. काही भागाचे पोपडे उडालेले होते आणि वर एक पंखा जीवावर आल्यासारखा फिरत होता. अशा खोलीत हर्षद इतका वेळ काय करत होता हेच मला समजत नव्हते? मी सुन्न होऊन त्याच्या बाजूला उभा होतो. हर्षदने मला आत घेतले आणि खोलीचा सरकता दरवाजा बंद केला. त्या क्षणाला मी मात्र पुरता घाबरून गेलो होतो. मला तर दरदरून घामच फुटला होता. माझी तत-पपच झाली होती. माझी ही अवस्था बघून हर्षदने फार वेळ न दवडता माझी त्या मुलीबरोबर म्हणजे त्या रूपाबरोबर; त्याची ‘बहीण’ म्हणून ओळख करून दिली आणि क्षणार्धात माझी बोलतीच बंद झाली.

नाकीडोळी नीटस, सर्वसामान्य घरातली वाटणारी 25वर्षांचीच असावी ती! अवघ्या 20 व्या वर्षीच तिच्या आयुष्याची नियतीने ह्या धंद्याला लावून राखरांगोळी करून 5 वर्षे लोटली होती. चांगले चारचौघीसारखे कपडे घालून जर का ही रूपाताई बाहेर पडली असती तर ती एक वेश्या आहे हे सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावेल ह्याचे रूपाताई हे एक ज्वलंत उदाहरणच होती. त्या रुपाकडे पाहून माझे तर काळीजच हळहळले आणि डोळेच भरून आले.

एकतर मी इतक्यावेळ हर्षदला त्याने मला ह्या नरकात आणल्याबद्दल घाल घाल शिव्या घातल्या होत्या पण त्याच नरकात एक रूपा नामक मायेने ओथंबून वाहणारी त्याची ही ताई होती जीने हर्षदला ह्या नरकात पहिल्यांदा आल्यावर पुढे जाण्यास नकार देवून; त्याच्या आयुष्याची होणारी विल्हेवाट वाचवली होती! आज म्हणूनच तर तीच ती रूपाबाई हर्षदची सर्वात लाडकी ताई झाली होती आणि तिलाच भेटायला हा पठ्ठ्या ह्या सगळ्या नरकात नियमितपणे येत होता! हे कोडं उलगडल्यावर माझे दोन्ही हात आपसूकच जोडले गेले होते आणि त्या दोघांपुढे मी नतमस्तक झालो होतो.

हर्षदचे हे रूप पाहून मला त्याचे पाय धरून त्याची माफी मागावीशी वाटत होती. गेले एक वर्ष हर्षद महिन्यातून एकदातरी आपल्या ह्या रूपाताईला भेटायला ह्या नरकात येत होता. ते ही आज नाही तर उद्या रूपाताई ह्या व्यवसायाला रामराम म्हणेल व एखाद्या चांगल्या मार्गाला लागेल ह्या आशेने…

हर्षद तिला ह्या नरकातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता, पण रूपा मात्र त्याची समजूत काढत होती कारण तिची ह्या नरकातून बाहेर पडून आगीतून फुफाट्यात जायची मनाची तयारी होत नव्हती!

गेले तास भर माझ्या मनावर आलेला तो प्रंचड मोठ्ठा ताण, एकदम हलका झाला होता. ज्या वातावरणाची इतका वेळ मला किळस आली होती, ज्या पोरींची भीती वाटत होती, त्यांची घृणा वाटत होती, ती सगळी एकदम नाहीशी होऊन मला त्यांची सहानुभूती वाटायला लागून त्यांच्याबद्दल एक आस्था आणि आदराचीच भावना निर्माण झाली होती.

मी विचारत पडलो होतो की, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जर का ह्या देहविक्री करणार्‍या (वेश्या) नसत्या तर आपल्या आया-बहिणी, सुरक्षित राहिल्या असत्या का?

ह्या विचारात गढून जात मी, माझ्याही नकळत ह्या वेश्यामंदिराच्या पायर्‍या उतरत होतो आणि ह्या मंदिरात घालवलेल्या त्या एक तासाचे व हर्षदचे अंतर्मुख होऊन मनोमन उपकारच मानत होतो…

– रविंद्र कामठे
पुणे
9822404330

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “वेश्यामंदिरातील एक तास”

  1. Ravindra Kamthe

    नमस्कार घनश्याम सर. तुमचे खूप खूप आभार. अनुभवाच्या शिदोरीतून मला व्यक्त होण्याची तुम्हीं दिलेली संधी म्हणजे माझ्या लेखणीचा तुम्हीं केलेला आदर वाटतो. धन्यवाद सर.
    रविंद्र कामठे

    1. MAYUR DURYODHAN DEHARI

      उत्तम सर लेख?

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा