कविता

साप्ताहिक ‘चपराक’साठी आपणही आपल्या रचना अवश्य पाठवा. योग्य त्या कवितांना प्रसिद्धी दिली जाईल. या अंकातील कविता येथे देत आहोत. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

 

बाई माणूस!

मी माझ्या पदरात माझा देह गुंडाळते..
तेव्हा माझं मला बाई असण्याचं
इतकं कौतुक वाटतं की…
मी माणूस असल्याचं स्वतःही
क्षणभर विसरून जाते…
त्या बाईपणाचं गूढ रहस्य..
विधात्यानं मोठ्या कौशल्यानं घडवलंय…
सृष्टीच्या कुशीत निर्मितीचं दान देऊन
बाईमाणूस जन्माला घातलंय पण…
इथं आम्ही फक्त बाई लक्षात ठेवली…
त्यातली माणूस विसरलो…!

पदरावरची संस्कारशीलता विसरून…
जेव्हा.. युद्ध होतात.. तेव्हा…
तोच पदर बिभत्सपणे बाजूला ओढला जातो…
तेव्हा त्याच माझ्या बाई असण्याच्या
कौतुकाचं कोळसं होतात..
मग… तो रावण आठवतो…
एका बाईसाठी रामायण घडवणारा…
दशतोंडानं दंश करणारे त्याच्या तोंडावरचे..
डोळे.. फिरतात माझ्या अंगाअंगावरून…
महाभारतातला.. दुर्योधन आठवतो..
अशा दुष्यकृत्याला चालना देणारा
महान योद्धा कर्ण आठवतो…
सारा महापुरुषांचा बरबटलेला
अविचारी दरबार दिसतो….
माझ्या देहावरून फिरणार्‍या…
वासनांध नजरा अत्याचार करू लागतात..!
आणि स्वतःला माझे पती म्हणवणार्‍या..
पांडवांची घृणा वाटते…

अनसुयेची परीक्षा घेणार्‍या…
देवादिकांचीही.. कमाल वाटते
नल-दमयंतीतल्या, दमयंतीसाठी
पृथ्वीवर येणार्‍या…
देवांना काय म्हणावे?

मनाला शरम वाटते.. चीड येते..
आजच्या युगात सर्वसंचारी…
बलात्कारी वृत्तीच्या नराधमाची!
बाईपणाला लागलेल्या अश्लाघ्यपणाची..
कीड मनाला कुरतडते…

अजून किती किती अरूणाचा…
आपण करूण इतिहास लिहिणार आहोत?
त्याची तरी मोजदाद करा बाबा हो…
आणि किती.. निर्भयांवर…
अत्याचार करीत जगणार आहोत…
किती कोपर्डी घटना रोजरोज
ऐकणार आहोत!!
थोडातरी विचार करा…!
अहो थोडातरी विचार करा…!
– आनंदिता, मुंबई
8689934176

 

अस्तित्व..

सागरात विलीन होऊनही
नदीने आपले अस्तित्व जपायला हवे..
तिच्या दृढ संकल्पाचे पाणी
बारा महिने कायम टिकायला हवे..!!
पण दुर्दैव असे की,
फार मोजक्या नदीच्या नशिबी
असे भाग्य लिहिलेले दिसते..
बाकी चार दिवसाचा पावसाळा वाहतो
नंतर पात्र कोरडे रुक्ष होते!!
आधार घ्यायचाच झाला तर
नदीने तो हिमालयाचा घ्यावा..
पाऊस तसा लहरीच असतो
त्याचा भरवसा कोणी द्यावा!!
शेवटी इतकेच सांगेन
की भावनेत वाहत जाऊन
रिते होण्यापेक्षा
संयत वाहून आपले अस्तित्व
टिकवून ठेव..
ते नाही, तर तू जीवन आहेस
इतके मात्र तू कायम स्मरणात ठेव!!

-सुनिल पवार (काव्यचकोर)
मुंबई 9969350433

 

वादळ वयातले…

पाखरू वनातले
चंचल नभातले
सळसळ पानातली
ऋतू गर्भारलेले
हिरवे डवरलेले
रंगात नहालेले
वादळ वयातले
अत्तर फुलातले…

दिसं मंतरलेले
ऊन श्रावणातले
गुलाबी शिरशिरी
नाविन्य देहातले
चांदण्यांची पौर्णिमा
झोके मनातले
वादळ वयातले
अत्तर फुलातले…

उंच उंच लाटा
तुफान उफाळलेले
खळखळ झर्‍याची
पैंजणी गाण्यातले
केवड्याच्या बनातले
गुलजार गुलमोहरलेले
वादळ वयातले
अत्तर फुलातले…
कधी फेसाळलेले
माधुर्य व्हिस्कीतले
कधी नशिले
पेय प्याल्यातले
कधी धुंद गझल
गंधार मनातले
वादळ वयातले
अत्तर फुलातले…

सूर निरागस
मैफिली रंगलेले
शैशव सरलेले
फुलपाखरु बनलेले
सोनसळी चाफा
यौवन बहरलेले
वादळ मनातले
अत्तर फुलातले…

आत गुदमरलेले
भावनांनी भारलेले
चंद्राची ओढ
चांदण्यात रमलेले
भाव प्राजक्ताचे गाली
केशर मोहरलेले
वादळ वयातले
अत्तर फुलातले…

कधी शांत डोहातले
कमळ फुललेले
फुल जुईचे लाजत
ओंजळी दरवळलेले
चंदेरी मस्तीतले
आठवणीत साठलेले
वादळ मनातले
अत्तर फुलातले…

– प्रज्ञा नरेंद्र करंदीकर
बंगलूरू
7204292063

परिचारिका

आज्ञा पाळून डॉक्टरांची
सोडुन माणसे घरची
सेवा आजारी माणसांची
तगमग होते जीवाची…

यातना कठीण आजारपणात
पाहुन दुःख त्यांचे
होते पाणी काळजाचे
जाणतेही मर्म त्यांचे…

अंध-अपंग, जखमी जळीत
बाधित संसर्गजन्य रोगी
दृष्ट खुळे वेडे
सेवा करून करी निरोगी…

पाळते आदेश भोळी
घरी करी पोळी
जीवनाची करून होळी
देते आजारीस गोळी…

दुःख जाणते रुग्णाचे
शिकार वासनांध नजरेची
दगड काळजावर ठेवून
सेवा करते रुग्णांची…

समजेल कोण यांना
सन्मान हवा त्यांना
सेवेची पावती द्या
आनंदात ठेवा सार्‍यांना…

– प्रदीप मनोहर पाटील
मु. पो. गणपूर, ता. चोपडा,
जि.जळगाव 425108
9922239055

 

आपल्याही कविता पाठवा
साप्ताहिक ‘चपराक’साठी आपणही आपल्या रचना जरूर पाठवा. योग्य त्या कवितांना प्रसिद्धी दिली जाईल.
Email – kavyapushp3@gmail.com

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “कविता”

  1. Sambhaji Watharkar

    परिचारिका ही कविता खूप आवडली कवीने रचना खूप सुंदर केलेली आहे. एकूण अंक खूप सुंदर आहे

    सां.रा.वाठारकर.चिंचवड पुणे.
    मोबाईल फोन ९४०३६०७३३४

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा