‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे । आळविती …’
निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे, लोकाचा, लोकाकरिता, लोकासाठी लिहिणारे संत तुकाराम महाराज हे खरे पर्यावणवादी संतकवी होते.
झाडे, झुडूपांनी बहरलेला निसर्ग पाहिला की किती रम्य वाटते! मन प्रसन्न होते. कोणत्याही मोबदल्याविना हा निसर्ग आपल्याला आनंद देत असतो पण आजकाल हे चित्र नाहीसे झाले आहे. झाडांची विनाकारण तोड होत असते. मॉल्स, बिल्डिंग्ज बांधण्यासाठी जंगलांवर कुर्हाड चालवली जाते. त्यामुळे झाडांची संख्या घटते आहे. झाडे आपल्याला स्वच्छ, मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात पण आपणच निसर्गाच्या कामात अडथळे आणतो. वृक्षांच्या तोडीमुळे जमिनी ओसाड पडतात. पृथ्वीचे तापमान वाढते. ‘पर्यावरण दिन’ असला की आपल्याला एक दिवस झाडे लावण्याची आठवण होते. येता जाता उगाचच झाडांची पाने तोडताना आपण काहींना पाहतो. दसर्याला आपट्याची पाने तोडून आपण ती सोने म्हणून वाटतो. वटपौर्णिमेला सुवासिनी वडाची पूजा करतात पण आजकाल वडाच्या झाडाची फांदीच तोडून आणली जाते. हे कितपत योग्य आहे? झाडांपासून आपल्याला फळे, फुले मिळतात. सावली मिळते आणि आपण झाडे तोडतो पण त्या बदल्यात दोन झाडांची लागवड करत नाही. त्यामुळे निसर्गाचा तोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा हा र्हास रोखण्यासाठी सरकारने 2 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. त्यातून जनतेला वृक्ष लागवडीचा संदेश दिला. बर्याच शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, शिक्षक वृक्ष लागवड करून नवीन पिढीला मोलाचा संदेश देतात.
काही लोक फक्त वृक्ष लागवड करतात पण नंतर त्याकडे लक्ष देत नाहीत. वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धन हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अध्यात्माच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा समूह म्हणजे ‘विश्वात्मके देवे साधक मंडळी…’
अध्यात्माच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या मंडळीनी ‘वृक्ष लागवड आणि संवर्धन’ यासाठी अपार मेहनत घेतली आहे. श्री. पुरुषोत्तम रायजाधव सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा समूह उत्स्फूर्तपणे हे कार्य करीत आहे. 2003 ला ‘विश्वात्मके देवे साधक मंडळी’ या समूहात सुरुवातीला 10-15 माणसे होती. हळूहळू ही संख्या वाढत गेली. आता तब्बल 84 माणसे या उपक्रमात सहभागी आहेत. त्यात लहानापासून ते आबालवृद्धापर्यंत सगळेच आनंदाने या उपक्रमात योगदान देत आहेत. फक्त वृक्ष लागवडच नाही तर त्यांचे संगोपन, संवर्धन सुद्धा ही मंडळी करतात. दर रविवारी ही मंडळी एकत्र जमतात. 6 ते 10 या वेळेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आणि 1 ते 4 आध्यात्मातून निरूपण करणे, आपले विचार मांडणे हा असा या मंडळीचा रविवारचा दिनक्रम असे. यात 10 ते 15 इंजीनिअर्स आणि 7 ते 8 डॉक्टर्स सुद्धा सहभागी आहेत. मुंबईत चेंबूर, नवी मुंबई, डोंबिवली , बदलापूर येथे 100000 झाडे जगविली आहेत तर निपाणी (कर्नाटक) येथे 100000 झाडे जगविली आहेत.
यासाठी जो खर्च येतो तो खर्च ही मंडळी पदरमोड करून करीत आहेत. कुणाचीही मदत न घेता ही मंडळी निःस्वार्थपणे निसर्गाला जपण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. आपापल्या वेळा, नोकर्या, जबाबदार्या सांभाळत प्रत्येक जण जमेल तसे या उपक्रमात योगदान देत आहेत. ‘विश्वात्मके देवे साधक मंडळी’ यांच्या या उपक्रमाची दखल ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतली आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. हा समूह फक्त अध्यात्मात रमत नाही तर अध्यात्मातून जो संदेश गुरुंनी दिला आहे, तो आचरणात आणतात. अध्यात्म आणि वृक्षारोपण यांची गुंफण वैशिष्ट्यपूर्ण आहे.
सध्या या मंडळीचा पांडवकडा येथे 2000 वृक्ष लागवडीचा उपक्रम जोरदार सुरू आहे. या उपक्रमात फक्त आर्थिक मदत केली पाहिजे असे नाही, तर श्रमदान करूनही आपण या उपक्रमाला हातभार लावू शकतो. पुढील येणार्या पिढीसाठी हा निसर्ग जपणे गरजेचे आहे. त्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत. ‘विश्वात्मके देवे साधक मंडळी’ यांचा हा स्तुत्य उपक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या या उपक्रमाला लक्ष लक्ष शुभेच्छा…
अस्मिता येंडे
मुंबई
9619035195