मी गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो! म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले पण साधारण 55% वगैरे असतील. माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो! फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ-जवळ 35 वर्षे होवून गेलीत. आमच्या काळात शिक्षणाला महत्त्व की काय ते नुकतेच कुठे यायला लागले होते एवढेच. आमच्या आख्ख्या खानदानात मी म्हणे पहिला-वहिला पदवीधर होतो, जो की पहिल्या इयत्तेपासून ते पदवीधर होईपर्यंत एकदाही नापास झालेला नव्हता.
नमनाला घडाभर तेल वाया घातले कारण ह्या निकालाच्या आधारावर मला 1 जून 1983 ला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मिळाली होती. त्याचं असं झालं की, महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीच्या काळात, ‘सकाळ’मधील जाहिरात पाहून नोकरीसाठी सहज अर्ज केला होता. नेमका निकाल लागायला आणि त्यांनी मुलाखतीला बोलावण्याचा योगायोग जुळून आला होता. मुलाखत झाल्यावर तासभर बसवून ठेवले आणि नंतर सांगितले की ‘आम्ही तुम्हाला ही नोकरी देत आहोत.’
‘कारकून’ म्हणून माझी निवड झाली होती आणि मला महिना रुपये 350/- पगार ठरवण्यात आला होता. आयुष्यातल्या पहिल्याच लढाईत आम्ही चक्क घोडामैदान मारलेलं होत राव! अजून काय पाहिजे होतं? पुढच्या यशस्वी आयुष्याची ही तर नांदीच होती असे आत्ता म्हणावयास हरकत नाही.
35 वर्षांपूर्वी 350 रुपये महिना पगार, म्हणजे मी तर आनंदाने नाचतच घरी पोचलो होतो; कारण महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे 1980 पासून मी जमेल तसे छोटे मोठे काम करून महिन्याला 50-75 रुपये स्वखर्चासाठी कमावत असे. (महाविद्यालयात जायला लागल्यापासून मी आमच्या एका मेव्हण्यांच्या फोटो स्टुडीओमध्ये सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 9 असे पडेल ते काम करायचो व फोटोग्राफीपण शिकायचो.) म्हणूनच महिन्याला 350 रुपये म्हणजे माझ्यासाठी फारच मोठी व स्वकष्टाची कमाई होती, ह्याचे कोण एक अप्रूप वाटत होते म्हणून सांगू!
ही नोकरी पुण्यातल्या हिंगणे खुर्दमधील विठ्ठलवाडी स्थित एका लहानशा कारखान्यातील होती. ह्या कारखान्यात मोठमोठ्या कंपन्यांना लागणारे इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनेल बनवत असत. माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे सकाळी 7 वाजता कारखान्यातील कामगारांची हजेरी घेणे, रोजचा पत्रव्यवहार तपासणे, त्याची नोंद करणे, मालक, हिशेबनीस आणि इतर अधिकार्यांना त्यांच्या कामात मदत करणे… थोडक्यात काय, ते सांगतील ते काम करणे. हो! पण मी काही सांगकाम्यासारखं काम केलं नाही बरं का! थोडेफार स्वत:चे डोकेही चालवत असे. अर्थात अजिबात आगाऊपणा न करता बरं का! एक सांगतो, पहिलीच नोकरी असल्यामुळे मी मनातल्या मनात ठरवले होते की कुठल्याच कामाला नाही म्हणायचे नाही. जेवढे काय शिकून घेता येईल तेवढे शिकून घ्यायचे. कामाचा अनुभव गाठीशी बांधायचा.
जुलै महिन्याच्या 7 तारखेला माझा पहिला पगार झाला. त्या दिवशी कधी एकदा घरी जातोय आणि आईला वडिलांच्या हातात पगाराचे पाकीट ठेवतोय असे मला झाले होते. ह्यात जो काही आनंद झाला होता तो शब्दामध्ये सांगणे जरा कठीणच आहे हो. स्वाभाविकच आहे हो हे सगळे! म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी कळायला लागल्यापासून ते 23 व्या वर्षापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझे वडील न चुकता माझ्या आईच्या हातात त्यांच्या पगाराचे पाकीट ठेवत असत. (सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी होत असे.) आई ते पाकीट देवापुढे ठेवत असे आणि नंतर पुन्हा वडिलांकडे देत असे. वडील त्यातली त्यांच्या खर्चासाठी ठराविक रक्कम काढून घेत असत आणि उरलेली रक्कम आईला परत त्याच पाकिटात टाकून देत असत. त्यादिवशी संध्याकाळी वडील आमच्या सगळ्यांसाठी म्हैसूरपाक आणि फरसाणही आणत असत. तोच पायंडा मी पुढे चालू ठेवायचे ठरवले होते. बाकी काही नाही. माझ्या ह्या पगारातले 150 रुपये मला आई काढून देई व उरलेले 200 रुपये ती घरखर्चाला ठेवत असे.
मी लहानपणापासून माझ्या वडिलांना काबाडकष्ट करताना पाहिलेलं असल्यामुळे, कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही हे ठरवले होते. काम हेच आपले दैवत आहे असे समजायचे माझ्यावर झालेले हे संस्कार ह्या पहिल्या-वहिल्या नोकरीत खूप कामी आले. तसेच आपल्या सहकार्यांबद्दल कुठलेही मत बनवायचे नाही हे सुद्धा मला समजले. माझ्या अनुभवावरून सांगतो की आपले सहकारी चांगले अथवा वाईट असं काही नसतं. ते आपण त्यांच्याशी कसे वागतो त्यावर अवलंबून असतं!
आम्ही त्याकाळी डेक्कनला पुलाच्या वाडीमध्ये रहायला होतो आणि आमच्या घरापासून विठ्ठलवाडी साधारण 4-5 किलोमीटर लांब होती. तेव्हा पहिले काही महिने मी रोज सायकलवरून कामाला जात असे. सकाळी 6.30 वाजता मी घरून निघत असे आणि बरोबर 6.55 ला कारखान्यात पोहचत असे. बरोबर 7 वाजता सगळे कामगार, बाकीची मंडळी आणि आमचे मालक सुद्धा, कामावर हजर राहत असत. जर का एखाद्याला थोडासा जरी उशीर आठवड्यातून तीन वेळा झाला तर त्याचा अर्धा दिवसाचा पगार कापला जात असे. त्यामुळेच मला त्यांची हजेरी घेण्यासाठी 7 च्या आत हजर राहावे लागत असे. अर्थात ह्या वक्तशीरपणाचा मला माझ्या उर्वरित आयुष्यात खूप म्हणजे खूपच फायदा झाला हे ही तितकंच खरं आहे. ते म्हणतात ना, कुठल्याही चांगल्या सवयी आणि संस्कार हे कधीही वाया जात नाहीत. उशिरा का होईना त्याचे फळ आपल्याला मिळतेच मिळते!
साधारण तीन ते चार महिन्यात माझ्या डोक्यात एक दुचाकी घ्यावी असा विचार डोकावला होता. तो मी माझ्या चुलत्यांना बोलून दाखवला. त्यांचा माझ्यावर खूप जीव असल्यामुळे त्यांनी त्याला लगेच होकार भरला व दुसर्या दिवशी टिळक रोडवरील दुकानात जावून चौकशीही करून आले होते. 4000 रुपये किमतीची टीव्हीएस 50 कर्ज काढून घ्यायचे ठरले पण मला ते दुकानवाले कर्ज देईनात कारण खाजगी नोकरी होती ना माझी. मग काय! काकांनी त्यांच्या नावावर कर्ज काढले आणि पुढे मी महिन्याला 100 रूपये हप्त्याने ते फेडले. माझ्या आयुष्यातील कर्ज आणि हप्ते ह्यांची हीच काय ती मुहूर्तमेढ म्हणावयास हरकत नाही. ह्या हप्त्यांनी आयुष्य मात्र सुखी केले. अर्थात ते वेळेवर भरले म्हणून, हे मात्र तितकेच खरे आहे!
ह्या कारखान्याचे मालक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे होते. त्यांचा सचोटी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, कामाप्रती असलेली निष्ठा, सहकार्याबद्दल असलेला आदर, ग्राहकांच्याप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी, सकारात्मक दृष्टिकोन, उत्कृष्ठ नियोजन आणि तितकेच काटेकोरपणे नियोजनाचं केलेलं पालन, समयसुचकता, आलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता व जोखीम घेण्याची ताकद असे आणि अजून बरेचसे गुण मला त्यांच्याबरोबर काम करताना जवळून न्याहाळता आले आणि माझ्यात त्यातले काही गुण नक्कीच रुजवता आले असं मला आज तरी वाटत आहे.
एक सांगतो, कुठलेही संस्कार हे आपल्याला हाताला धरून कोणीही कधीही शिकवत नाही. ते आपल्याला आपणहून पुढाकार घेऊन आत्मसाद करायचे असतात आणि आचरणात आणायचे असतात हे जेमतेम वर्ष-दीडवर्षाच्या ह्या पहिल्या-वहिल्या नोकरीमुळेच मला उमजले.
ह्या नोकरीनंतर गेल्या 35 वर्षात मी जवळ-जवळ 14 नोकर्या केल्यात परंतु माझ्या ह्या पहिल्या नोकरीचा तो अविस्मरणीय असा काळ आजही माझ्या स्मृतीपटलावर शाबूत आहे.
– रविंद्र कामठे
चलभाष – ९८२२४०४३३०