‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’

परखड बाण्याचे सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय भाष्यकार भाऊ तोरसेकर यांचे ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक मराठी भाषा दिनानिमित्त (बुधवार, दि. 27 फेब्रुवारी 2019) मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांचे मनोगत खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी!

गेल्या म्हणजे 2014 च्या सोळाव्या लोकसभा मतदानात आधीचा पायंडा मोडून मतदाराने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला एकपक्षीय बहुमत बहाल केले. इतकेच नाहीतर दीर्घकाळ देशात सलग राज्य करणार्‍या कॉग्रेस पक्ष वा त्यावर मालकी हक्क असलेल्या नेहरू गांधी खानदानाला पराभूत केले. त्याचे आकलन आजही बहुतांश राजकीय अभ्यासक, विश्‍लेषकांना होऊ शकलेले नाही; कारण मागल्या अर्धशतकातील अधांतर त्यांना कधी उमगला नाही किंवा समजून घेता आला नाही. पंडित नेहरूंच्या निधनानंतर कॉंग्रेस जवळपास नेतृत्वहीन झाल्यानंतर मतदार खरोखर पर्यायी राष्ट्रीय पक्षाचा शोध घेत होता आणि प्रत्येक निवडणुकीतून पर्याय मिळवण्याचा त्याचा प्रयत्न फसत गेला. त्यामुळे 1964 नंतर देशाच्या राजकारणात जे अराजक माजले होते त्याचे आकलन होणे अगत्याचे आहे. नरेंद्र मोदींच्या यशाचे रहस्य त्यात दडलेले आहे!

पण निदान गेल्या दोन दशकात हा अर्धशतकाचा इतिहास वा अधांतर कोणी समजावून सांगायचा प्रयत्नच करीत नाही. नेहरू-इंदिरा यांच्या निर्वाणानंतर व कॉंग्रेस कालबाह्य झाल्यानंतर खंडप्राय देशाला चालविण्यासाठी कोणी खमक्या नेता व राष्ट्रीय पक्षाची गरज होती. कॉंग्रेसचे नेतृत्व ती वस्तुस्थिती विसरून एका घराण्याच्या गुलामीत गेलेला पक्ष होता आणि पर्याय म्हणून पुढे येऊ शकणारे नेते व पक्षांना ही ऐतिहासिक जबाबदारी ओळखताही आली नाही. त्यातून व्यक्तीकेंद्री राजकारणाचे युग भारतात आले. असे युग वा परिस्थिती चांगली की वाईट, हा वादाचा विषय होऊ शकतो पण ती वस्तुस्थिती असेल तर उपाय वा पर्याय शोधणे भाग असते. त्यातूनच इंदिराजी उदयाला आल्या आणि तब्बल पन्नास वर्षांनी नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. तो काळ 1964 ते 2014 असा आहे. ह्या अर्धशतकाचे भारतीय राजकारण अधांतरी त्रिशंकू अवस्थेत अडकलेले होते.

लोकशाहीत मतभेदांना स्थान असते आणि ते अपरिहार्य असतात पण मतभेद विकोपाला गेले की मग विकृती निर्माण होते. पर्यायाने लोकशाहीतले मतभेदच लोकशाही विकृत करून टाकतात. याचे कारण मतभेद व त्याचे अवडंबर ही मूठभर मोजक्या लोकांची हौस व चैन असते. बाकीच्या लाखो-करोडो लोकांना त्याच्याशी काडीमात्र कर्तव्य नसते. त्यांच्यासाठी सार्वजनिक व खाजगी जीवनातील स्थैर्य व सुरक्षेला प्राधान्य असते. साहजिकच दूर बसून अशीच बहुसंख्य जनता वैचारिक वादविवादांनी आपले मनोरंजन करून घेत असते. जोवर हे मनोरंजन असते, तोपर्यंत सामान्य जनतेला ती मतभेदाची लोकशाही खूप आवडत असते पण जेव्हा अशा मतभेदाची लोकशाही त्यांच्या नित्य जीवनात विकृती होऊन अडथळे आणते वा अस्थिरता निर्माण करते तेव्हा सामान्य माणसाची प्राथमिकता एकदम बदलून जाते. त्याला बोलघेवडे, कर्तृत्वहीन शहाणे नकोसे वाटू लागतात आणि हातात चाबूक घेऊन त्यांना वठणीवर आणू शकेल असा कोणी तरी हुकूमशहा हवासा वाटू लागतो. तो हुकूमशहाच असावा असा काही आग्रह नसतो. त्याने सार्वजनिक जीवनात व समाजात काही किमान शिस्त राखण्याची हमी द्यावी; इतकीच लोकांची अपेक्षा असते; कारण मूठभर सुखवस्तु वा शहाण्यांच्या तथाकथित स्वातंत्र्यापेक्षाही सामान्यजनांना आपल्या जगण्यातल्या किरकोळ समस्या सोडवण्यातले व जगायचे स्वातंत्र्य मोलाचे असते. त्यात अशा कल्पनेतले स्वातंत्र्य व तथाकथित लोकशाही मूल्यांचा अतिरेक आडवा येऊ लागला की मग सामान्य माणसाला लोकशाहीचा तिटकारा येऊ लागतो. त्यातूनच कोणा खंबीर हुकूमत गाजवणार्‍या व्यक्ती वा नेत्याकडे लोक आकर्षित होऊ लागतात.

इंदिराजींचा उदय त्यातून झाला होता आणि नरेंद्र मोदी तशाच परिस्थितीने निर्माण केला. बघायला गेल्यास अशा नेत्यांचा जगात कुठेही उदय झाला, तरी तो तत्कालीन परिस्थितीने घडवून आणला आहे. भारत त्याला अपवाद नव्हता व नाही. ती परिस्थिती कुठली व कशी असते आणि कशी आकाराला येत जाते? काय असते ती राजकीय स्थिती, त्याचा इतिहास म्हणजे हा अर्धशतकाचा कालखंड आहे.
नेहरू राहिले नव्हते आणि त्यानंतरच्या अराजकाने इंदिराजींना नवा अवतार घ्यावा लागला. त्यांच्याही निधनानंतरच्या कालखंडात जे अराजक माजत गेले त्याला आवर घालणारे नेतृत्व आवश्यक होते, ते मोदींच्या रुपाने समोर आले पण या दोन्ही नेत्यांना असा अवतार धारण करायला कुठली परिस्थिती जबाबदार होती? ती राजकीय अस्थिरता वा अराजक कोणी निर्माण केले होते? त्यातून कुठला घटनाक्रम उलगडत गेला? तो इंदिराजींना का सावरता आला नाही? कुठल्याही राजकीय सत्तास्पर्धेत नसलेल्या नरेंद्र मोदींना विसाव्या शतकात अकस्मात आणुन भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी कोणी आणुन ठेवले? ते समजून घ्यायचे तर इंदिराजींचा उदयास्त मार्गदर्शक आहे. कॉंग्रेसच्या अस्तातून भाजपाचा उदयही त्याच घटनाक्रमात दडलेला आहे.

पुस्तकी व्याख्येतले राजकारण आणि व्यवहारात क्रमाक्रमाने बदलणारे, वळणे घेणारे, प्रत्यक्ष जीवनातील राजकारण; यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. पुस्तकाच्या व्याख्यांमध्येच गुरफटलेल्यांना त्या वास्तवातील समस्यांची उत्तरे शोधता येत नाहीत, की उपायही शोधता येत नाहीत. त्यासाठी अशा सर्व व्याख्या, गृहीते व समजुतींना उद्ध्वस्त करू शकणारा कोणी परिघाबाहेरचा पुढे यावा लागतो. तो आल्यावर सामान्य जनता त्याचे बाहू पसरून स्वागत करीत असते.

2014 मध्ये मोदींना लोकांनी भरभरून मते का दिली? आजही पाच वर्षानंतर मोदींची लोकप्रियता का टिकून आहे? इतकी क्रूर, कठोर टीका सतत होऊनही मोदींचे जनमानसातील स्थान का टिकून आहे? बुद्धीमंतांना भेडसावणारा हुकूमशहा सामान्यजनांना उद्धारक, प्रेषित, देवदूत का भासतो? अशा अनेक रहस्यमय प्रश्‍नांची उत्तरे त्या कालखंडात व इतिहासाच्या घटनाक्रमात दडलेली असतात.
मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहानमोठे पक्ष व आघाड्या; यांचे कोडे सोडवायचे तर इंदिराजी समजून घेणे भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम 2014 पूर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसुत्र, संगतवार मांडणी म्हणजे हे पुस्तक. राजकीय घडामोडींच्या चोखंदळ, चिकित्सक वाचकाला त्यातून स्वत:चे आकलन शोधायला हे पुस्तक मदत करू शकेल ही अपेक्षा.

– भाऊ तोरसेकर

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’”

  1. Anant desai

    वाचनीय पुस्तक. मी नोंदणी केली

  2. Shashikant Oak

    भाऊ तोरसेकर यांचे लेखन सडेतोड असते.

  3. Vaishali Yewale

    Pls inform ur contact no of editor. I wud like to send article for your magazine

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा