ही तर मराठी प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!

प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!

मराठी वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र त्या काही खर्‍या नाहीत. आजही चांगले वाचक चांगल्या साहित्यकृतीच्या प्रतीक्षेत असतात. ते नेहमी इंटरनेट, ग्रंथालये आदी ठिकाणी दर्जेदार आणि वाचनीय साहित्य शोधत असतात. वाचकांची ही आवड लक्षात घेऊन पुण्यातील ‘चपराक’ प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील यांनी वर्षभरात तब्ब्ल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला असून, या संकल्पनेला मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मराठी साहित्याला विशेषतः नवोदित लेखकांच्या साहित्याला लागलेलं प्रतिसादशून्यतेचं ग्रहण संपविण्यासाठीच ‘ग्रंथ निर्मितीचे’ शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. मात्र या संकल्पनेचा मूळ उद्देश काय? मराठी वाचकांना कोणते साहित्य वाचायला मिळणार? याचं गुपित त्यांनी यावेळी उघड केलं. मराठी साहित्य, प्रकाशनविश्‍वात होऊ घातलेल्या या भव्य-दिव्य संकल्पनेचा प्रवास खास तुमच्यासाठी!!

मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेत दहाव्या क्रमांकावर आहे. असे असतानाही भाषा संपत चालल्याची आवई सातत्याने उठवण्यात येते. त्यातून नवे लेखक तयार होत नाहीत, दर्जेदार साहित्याला व्यासपीठ मिळत नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तरूणाई साहित्यापासून दुरावली जातेय असे अनेक आक्षेप घेतले जातात. या सर्वांना उत्तर म्हणून ‘चपराक’ने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला आहे. यामुळे मराठी भाषेला आलेले औदासिन्य आणि भाषेविषयी असलेली नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे. आम्ही ‘चपराक प्रकाशन’तर्फे येत्या वर्षभरात वैविध्यपूर्ण विषयांवरील तब्बल 365 पुस्तके प्रकाशित करीत आहोत. ललित आणि वैचारिक साहित्याबरोबरच ऐतिहासिक, क्रीडाविषयक, शेतीविषयक, शिक्षणविषयक, आरोग्यविषयक, सहकार, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, चित्रपट, युद्ध कथा, पत्रकारिता, पर्यावरण, अन्नसंस्कृती, बालसंगोपन, मानसशास्त्र, समीक्षा, ग्रामीण विकास अशा वैविध्यपूर्ण प्रकारातील पुस्तकांचा यात समावेश असेल, अशी माहिती ‘चपराक’चे संपादक, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दैनिक ‘पुण्यनगरी’ सोबत बोलताना दिली.
एप्रिल 2019 ते मार्च 2020 असे संपूर्ण एक वर्ष हा साहित्याचा ‘न भूतो, न भविष्यती’ महामेळा मराठी वाचकांना अनुभवता, पाहता येणार आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्य, प्रकाशनाच्या इतिहासामध्ये प्रथमच साहित्याच्या तब्बल 25 साहित्य प्रकारातील पुस्तके एकाच वर्षात, एकाच प्रकाशन संस्थेमार्फत एवढ्या मोठ्या संख्येने प्रकाशित होणार असून त्याची सुरुवात येत्या 17 एप्रिल रोजी 51 पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याने होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये साठ टक्के पुस्तके ही सुप्रसिद्ध साहित्यिकांची असणार असून चाळीस टक्के पुस्तके ही लिहित्या हातांची म्हणजे नवोदित लेखकांची असणार आहेत. या अभूतपूर्व आणि नवीन लेखकांच्या लेखणीला चालना देणारा निर्णय घेत सुरेख मिलाफ साधला आहे. त्याबद्दल घनश्याम पाटील यांचे अभिनंदन! लिहित्या हातांना बळ देण्याचं, साहित्य क्षेत्रातील मक्तेदारीमुळे त्यांची झाकोळलेली प्रतिभा लख्ख उजेडात आणण्याचं ‘पुण्यकर्म’ त्याच्या हातून घडतंय. हे सर्व पाहिल्यावर मराठी साहित्याला खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
घनश्याम पाटील यांनी हाती घेतलेल्या या संकल्पनेच्या पहिल्या भागात डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी लिहिलेलं महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनावरील ‘राजमान्य राजश्री’ हे पुस्तक, सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा ‘झुंडीतली माणसं’ हा लेखसंग्रह, वाचकप्रिय लेखक सदानंद भणगे यांची ‘अमानवी विनवणी’ ही रहस्य कादंबरी, सुप्रसिद्ध लेखक डॉ. द. ता. भोसले यांच्या तीन दीर्घकथा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या जडणघडणीच्या प्रवासाविषयी लिहिलेले ‘उभारणीचे दिवस’ हे प्रेरणादायी पुस्तक, सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक संजय सोनवणी यांची अखेरचा हिंदू सम्राट कुमारपाल यांच्या जीवनावर आधारित ‘अखेरचा सम्राट’ ही चरित्र कादंबरी, चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्याभास’ हा गूढ कथासंग्रह, शंकर पांडे यांचे ‘जागल्या’ हे ललित लेखांचे पुस्तक, कृपेश महाजन यांचा ‘अनिमा अनिमस’ हा वेगळ्या धाटणीचा कवितासंग्रह, रविंद्र कामठे यांचे ‘प्रवास कवितेचा’हे पुस्तक, प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांनी ज्या कादंबर्‍यांचा चित्रपटाकडे प्रवास झालाय त्या प्रक्रियेचा केलेला उलगडा असणारे ‘कुुंकू ते दुनियादारी’ हे पुस्तक, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी आणीबाणीच्या जागवलेल्या आठवणींचे पुस्तक, संजय वाघ यांचे ‘उन सावल्या’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक, सुभाषचंद्र वैष्णव यांचा ‘मज्जाच मज्जा’ हा बहुरंगी बालकथासंग्रह, रविराज सोनार यांचा ‘आळीमिळी गुपचिळी’ हा बालकवितासंग्रह, करमाळा येथील प्रा. दादासाहेब मारकड यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांचे लिहिलेले ओवीबद्ध चरित्र, निखिल भोसकर या तरूण लेखकाची ‘सॅलमन रन’ ही कादंबरी, मुकुंद वेताळ यांचा ‘मास्तरकीतले मुखवटे’ हा कथासंग्रह, गडहिंग्लज येथील पत्रकार सुभाष धुमे यांचा लेखसंग्रह, बा. स. जठार यांचा बालकवितासंग्रह, संजय बांधवकर यांचा ‘आनंद पहाट’ हा कथासंग्रह, ह. भ. प. डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा यांचे ‘आर्यांची दिनचर्या’ हे अनोखे पुस्तक, गोंदिया येथील लेखक लखनसिंह कटरे यांचे ‘औरस चौरस’, विनोद श्रा. पंचभाई यांच्या बालकथा, शिरीष पद्माकर देशमुख यांच्या ‘छोट्या मोठ्या गोष्टी’ अशी एकाहून एक 51 पुस्तके प्रकाशित होणार आहेत. यामधील प्रत्येक पुस्तकात आवृत्यांचे विक्रम करण्याची ताकत आहे. आजवर अशा प्रकारचा उपक्रम मराठी साहित्यविश्वात झालेला नाही.
मराठीत लिहिणारे सशक्त हात दुर्लक्षित राहू नयेत यासाठी घनश्याम पाटील यांनी आजवर दिवाळी महाविशेषांक, चपराक साहित्य महोत्सव, मासिक आणि साप्ताहिकाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले आहे. या उपक्रमातील 200 पुस्तकांची निवड पूर्ण झाली असून 150 पुस्तके छपाईसाठी सज्ज आहेत. आणखी 550 संहिता ‘चपराक’कडे आलेल्या आहेत. त्यातील सर्वोत्तम पुस्तके निवडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे करतानाच मराठीत कोणीही उपेक्षित राहू नये म्हणून ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने नव्याने कसदार लेखन करणार्‍यांना नक्की संधी दिली जाईल, असेही यावेळी प्रकाशक घनश्याम पाटील यांनी सांगितले.

पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ

घनश्याम पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे स्वतंत्र संपादक आहेत. त्यामुळे पत्रकारांविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा आहे. सर्व समाजघटकांशी सुसंवाद राखणार्‍या पत्रकारांच्या लेखणीत शाईबरोबरच ‘घाई’ असते. अनुभवविश्व व्यापक असूनही त्यांचे स्वतंत्र लेखन या घाईमुळे मागे पडते. म्हणूनच पाटील यांनी त्यांच्या कसदार लेखनाला प्राधान्य दिले आहे. सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, श्रीराम पचिंद्रे, संजय वाघ, श्रीपाद ब्रह्मे, सुभाष धुमे, रमेश पडवळ, सुभाषचंद्र वैष्णव, सागर सुरवसे, स्वप्नील कुलकर्णी अशा विविध पत्रकारांची वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली असून सुनील शिनखेडे, ‘पुण्य नगरी’चे किरण लोखंडे, किरण सोनार, उत्तमकुमार इंदोरे, श्रीकांत कुलकर्णी अशा काही पत्रकारांची पुस्तके लवकरच ‘चपराक’तर्फे प्रकाशित होत आहेत.

विक्रीचे ‘विक्रम’ घडवणारे प्रकाशन

विविध समाजमाध्यमांबरोबरच वृत्तपत्रीय लेखनाचा व्यापक अनुभव असणारे घनश्याम पाटील पुस्तकांची जाहिरात आणि वितरण यासाठी सातत्याने नवनवीन कल्पना राबवत असतात. म्हणूनच सागर कळसाईत या युवा लेखकाच्या ’कॉलेज गेट’ या कादंबरीच्या सहा आवृत्त्या त्यांनी प्रकाशित केल्या. इतकेच नाही तर सहावी आवृत्ती तब्बल दहा हजार प्रतींची केली. याच कादंबरीवर लवकरच चित्रपट यतोय. प्रभाकर तुंगार यांच्या ’शांतिदूत लालबहाद्दूर शास्त्री’ या पुस्तकावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने मुलांसाठी स्पर्धा घेतली. राजेंद्र थोरात यांच्या ’कुंकू ते दुनियादारी’ या पुस्तकाच्या वीस दिवसात 840 प्रती विकल्या गेल्या. सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या छोट्या गावातील सुनील जवंजाळ यांच्या ’काळीजकाटा’ कादंबरीची दखल साहित्य परिषदेसह अनेक महत्त्वाच्या संस्थांनी घेतली. प्रकाशनानंतर अवघ्या पंधरा दिवसात ही कादंबरी बेस्ट सेलर ठरली. येत्या 27 तारखेला भाषा दिनानिमित्त या कादंबरीची दुसरी आवृत्ती राजधानी मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाच्या तीन दिवसात 414 प्रतींची पूर्वनोंदणी झाली आहे. विविध माध्यमातून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याची घनश्याम पाटील यांची हातोटी विलक्षण आहे. म्हणूनच ’चपराक’ने पुस्तक विक्रीत आजवर अनेक विक्रम केले आहेत.
– स्वप्नील कुलकर्णी

दैनिक‘पुण्य नगरी’च्या ‘प्रवाह’ पुरवणीत 24 फेब्रुवारी 2019 रोजी ‘सन्डे स्पेशल’मध्ये प्रकाशित झालेली ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांची मुलाखत.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “ही तर मराठी प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!”

  1. Vinod. S. Panchbhai

    अतिशय मुद्देसुद लेख…
    मनःपूर्वक अभिनंदन..।

  2. उद्धव भयवाळ

    कामाचा जबरदस्त आवाका. अनंत शुभेच्छा– उद्धव भयवाळ

  3. लखनसिंह कटरे, बोरकन्हार (जि.गोंदिया)

    घनश्याम भाऊ म्हणजे उत्साहाचा धबधबाच! त्यांच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. त्यांचा हा प्रकल्प शंभर टक्के यशस्वी होणार यात शंकाच नाही. मराठीतील तथाकथित “महामान्य” लेखकू, प्रकाशकू, संपादकू, संचालकू, व्यवस्थापकू, … यांना घनश्याम भाऊची ही चपराकच जणू! नियतकालिके बंद पडण्याची कारणे “वाचक न मिळणे” हे कधीच नव्हते, त्या-त्या संपादकू/प्रकाशकू/संचालकू/व्यवस्थापकू यांना “वाचक-मित्र” नव्हे तर “वाचक-शिष्य” हवे असतात आणि आजच्या या युगात “शिष्य” मिळणे कसे शक्य आहे? म्हणून “शिष्यां”च्या शोधातील ती “महामान्य” नियतकालिके बंद पडतात व त्याचे खापर मात्र वाचकांवर फोडण्यात येते. घनश्याम भाऊ या भोळसट व खोट्या कारणमीमांसेचे भंडाफोडच करताहेत! धन्यवाद घनश्याम भाऊ!!! शुभेच्छा!!!
    @लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
    जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)/25.02.2019

  4. Radhika Kulkarni

    वा ! खूपच मोठा कामाचा झपाटा ! महत्त्वाचं काम करताहात, वाचनसंस्कृती जपण्याचं आणि वाढवण्याचं!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा