कुणाही व्यक्तीच्या जडणघडणीत वाचनसंस्कृतीचा वाटा मोठा असतो याबद्दल दुमत नसावे. सामान्य माणसाचे एक सुसंस्कृत व्यक्तीत रूपांतर होण्यात चांगल्या, सकस वाचनाचा खूप मोठा उपयोग होतो. मला चांगल्या वाचनाची गोडी लागली ती माझ्या शाळेमुळे. शाळा भलेही तशी फारशी नामांकित नसेल पण शाळेत अतिशय समृद्ध असे ग्रंथालय होते. ग्रंथालयातील पुस्तकांच्या कपाटांना कुलूपे लावण्याची पद्धत अजिबात नव्हती. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे पुस्तके हाताळावीत अशीच जणू शाळा प्रशासनाची इच्छा होती.
अर्थात नुसती पुस्तके असून उपयोग नसतो तर ती वाचण्याची उर्मी मुलांच्या मनात निर्माण करणे ही बाब फारच महत्त्वाची. तर ते वाचन संस्कार आम्हा मुलांच्या मनात रुजवले ते आमचे मराठीचे विद्यार्थिप्रिय शिक्षक कै. शशिकांत ठाकूर यांनी. त्यांच्या प्रेरणेने खूप अवांतर वाचन शाळकरी वयात झाले. वाचण्याचे जणू व्यसनच लागले जे आजतागायत सुटलेच नाही. या चांगल्या व्यसनाबद्दल ठाकूर सरांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. तर अशा या प्रवासात एके दिवशी हाती आले ’मी कसा झालो’. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या बलदंड माणसाचे हे आत्मचरित्र नव्हे तर त्यांच्याच शब्दात ’वाङ्मयीन आत्मशोधन.’ अत्र्यांच्या व्यक्तित्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारं नितांत सुंदर पुस्तक. त्यांचे आयुष्य विविध रंगांनी कसे बहरत गेले याची सुरेख झलकच म्हणा ना! चला तर पाहू या त्यातील काही पैलू.
एकीकडे संगीत रंगभूमी निस्तेज होत असताना आणि दुसरीकडे नाट्यरसिकांची पाऊले चित्रपटगृहांच्या दिशेने वळत असताना आपल्या समर्थ लेखणीने ज्यांनी मराठी रंगभूमी जिवंत ठेवली ते होते आचार्य अत्रेच. बालमोहन नाटक कंपनीचे मालक दामूअण्णा जोशी अगदी खनपटीला बसल्यावर त्यांच्या लेखणीतून उतरले अस्सल विनोदी नाटक ’साष्टांग नमस्कार.’ या नाटकापासून ते शेवटच्या ‘प्रीतिसंगम’पर्यंत अत्र्यांचा नाट्यप्रवास थक्क करणारा आहे. यामध्ये विनोदी नाटकांची संख्या अर्थातच जास्त आहे पण त्याच्याबरोबरीने ’उद्याचा संसार’, ’घराबाहेर’ सारखी गंभीर नाटके आहेत, ’मी उभा आहे’, ’ मी मंत्री झालो’ यासारखी राजकीय प्रहसने आहेत. बुवाबाजीवर प्रहार करणारे ’बुवा तेथे बाया’ आहे, फसवणूक वा गुन्हेगारीवर आधारलेली ’तो मी नव्हेच’, डॉक्टर लागू’ सारखी नाटके आहेत, ’एकच प्याला’ हे गडकर्यांच्या त्याच नावाच्या प्रसिद्ध नाटकाचे विडंबनही आहे, ’प्रीतिसंगम’सारखे भक्तीरसपूर्ण नाटक आहे. विषयांच्या या विविधतेतून मराठी रंगभूमी आपल्या भक्कम खांद्यावर अत्र्यांनी वर्षांनुवर्षे पेलून धरली होती. ’हाऊसफुल्ल’ या पाटीचा जन्म झाला तो त्यांच्याच नाटकामुळे. नाटकातील संवाद लिहिण्याचे त्यांचे कौशल्य केवळ अद्भुत होते. ’स्त्री ही क्षणाची पत्नी अन् अनंतकाळची माता आहे’ हे मराठीतले अजरामर सुभाषित म्हणजे अत्र्यांच्या ’उद्याचा संसार’ या नाटकातील एका पात्राच्या तोंडचा संवाद आहे हे आज किती लोकांना माहीत आहे?
नाटके नुसती लिहूनच ते थांबले नाहीत तर ’अत्रे थिएटर्स’ या आपल्या संस्थेद्वारे स्वतःच्या अनेक नाटकांची समर्थ निर्मितीही त्यांनी केली. मराठी रंगभूमीवर सरकता रंगमंच पहिल्यांदा आणण्याच्या श्रेयाचे मानकरी होते अत्रेच. नाट्यलेखन आणि नाट्यनिर्मिती यामध्ये व्यग्र असतानाच चित्रपट निर्मितीचा विचारही त्यांच्या मनात डोकावू लागला आणि एकदा मनात आले की त्या क्षेत्रात पडायच्या त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे त्यांनी तोही खेळ करून पाहिला! पण त्या ठिकाणी ते फार रमले नाहीत असे दिसते. केवळ दोनच चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. पहिला चित्रपट होता ‘श्यामची आई!’ साने गुरुजींच्या पुस्तकाला त्यांनी पुरेपूर न्याय दिला. पहिलाच चित्रपट राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड करणार्या समितीत एकही मराठी भाषक सदस्य नव्हता हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक सर्वांनीच डोक्यावर घेतला. दुसरा चित्रपट होता ‘महात्मा फुले.’ हा चित्रपट राष्ट्रपती रौप्य पदकाचा मानकरी ठरला. राजमान्यता मिळाली पण लोकमान्यता मात्र मिळाली नाही. चित्रपट उत्तम असूनही. या अपयशाचे अत्र्यांनी केलेले विश्लेषण मजेदार आहे. ‘‘फुल्यांवर सिनेमा काढला म्हणून ब्राह्मणांनी तो पहिला नाही आणि एका ब्राह्मणाने काढलेला सिनेमा म्हणून बहुजनांनी त्याकडे पाठ फिरवली’’ अशी अत्र्यांची टिपण्णी होती. हा काळ साधारण 1955 च्या सुमाराचा. त्यानंतर 1956 साली भाषावार प्रांतनिर्मिती झाली. सर्वच प्रमुख भाषांना आपापली राज्ये मिळाली. फक्त मराठी आणि गुजराती भाषकांना द्वैभाषिकाच्या खोड्यात अडकवले गेले आणि त्यातून उभा राहिला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा लढा. या लढ्यात पूर्णपणे झोकून दिल्यामुळेच बहुधा अत्रे नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रातून बाजूला झाले. 1960 साली हा लढा संपल्यावर त्यांनी ‘तो मी नव्हेच’, ‘डॉ लागू’, ‘प्रीतीसंगम’ यासारखी सरस नाटके लिहून आपली नाटकातली दुसरी इंनिग्ज त्यांनी गाजवली. चित्रपटाच्या फंदात मात्र ते परत पडले नाहीत.
उत्तम विडंबनकार हा अत्र्यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. या माणसात एक खोडकर मूल आयुष्यभर वास करून होते. विडंबन कवितांची सुरुवात त्यांनी जणू शाळकरी वयातच केली. घरी काम करणार्या मोलकरणीचे त्यांनी केलेले ‘सीताबाई वर्णू किती तव गुण, डोळा काणा, नाक वाकडे, बधीर असती तव कर्ण’ हे वर्णन म्हणजे इरसालपणाचा अस्सल नमुनाच म्हणावा लागेल. अर्थात विडंबन कविता करणारा मुळात उत्तम कवी असावा लागतो. आपले कवित्व अत्र्यांनी ‘गीतगंगा’ या कवितासंग्रहाद्वारे सिद्ध केलेच होते. ज्या कवितांचे विडंबन करायचे त्या कविता मुळात दर्जेदार असल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या सर्व विडंबन कविता पुढे ‘झेंडूची फुले’ या काव्यसंग्रहाद्वारे रसिकांच्या भेटीला आल्या. मनाच्या श्लोकांचे विडंबन करताना ते लिहितात, ‘मना सज्जना नीट पंथे न जावे, नशापाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैक येती, कधी सोडीजे ना तरी शांतवृत्ती’. हे वाचल्यावर पुण्यातील पादचारी मंडळींच्या वागण्यात ऐंशी वर्षात काहीच फरक पडला नाही याची प्रचीती येते. ओढूनताणून कविता करणार्या तथाकथित कवींनाही त्यांनी सोडले नाही. ‘ते आम्ही परवाङ्मयातील करू चोरून भाषांतरे’ अशी त्यांची संभावना करताना, ‘आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील साप्ताहिके, आम्हाला वगळा खलास सगळी होतील ना मासिके’ असे म्हणून त्या कवींना योग्य ती जागाही दाखवून देतात.
वक्ता दशसहस्रेषु हे विशेषण ज्या काही थोडक्या लोकांना खरोखर लागू पडते त्यामध्ये आचार्य अत्रे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ‘मी वक्ता कसा झालो?’ हे सांगताना आपल्या वक्तृत्त्वाची सुरुवात शाळेपासूनच कशी झाली याचे खुमासदार वर्णन ते करतात. शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमच भाषण करताना त्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. समोरचा श्रोतृगण पाहून तयार केलेले भाषण विसरल्यासारखे झाले. प्रत्येक वाक्याच्या शेवटी ‘झालं’ असं म्हणत ते पुढले वाक्य आठवू लागले. पुढे पुढे ‘झालं’ या शब्दाचा अतिरेक झाला. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे शेवटी सकाळी विशिष्ट विधी आटोपल्यावर लहान मूल आईला ज्या स्वरात ‘झालंऽ’ म्हणून ओरडून सांगते त्या स्वरात मी झालं म्हणून खाली बसलो. त्यानंतर काही दिवस ‘झालं’ असं माझं टोपणनाव शाळेत पडलं होतं.’
अर्थात पहिला अनुभव असा आला तरी त्यांनी अगदी प्रयत्नपूर्वक आपले वक्तृत्व सुधारले. पुढे पुण्याला आल्यावर वक्त्याला आवश्यक असा भारदस्त आवाज कमावण्यासाठी पर्वती टेकडीवर जाऊन तोंडात गोट्या ठेवून मोठमोठ्याने भाषण करण्याचाही सराव केला. कुणाही प्रसिद्ध व्यक्तीचे निधन झाले की स्मशानभूमीत हजर राहून श्रद्धांजलीचे भाषण ठोकायला त्यांनी सुरुवात केली. त्याचे कारण एकच, तिथे कसेही बोलले तरी ‘खाली बसा’ अशी आरोळी कोणी देत नाही. पुढे शिक्षकी पेशात गेल्यावर बोलणे हा त्यांच्या कामाचाच भाग झाल्यामुळे बोलण्याची कला नक्कीच विकसित झाली असणार. वक्तृत्वाला परत विनोदाची जोड. त्यामुळे भविष्यात अक्षरशः लाखालाखांच्या सभा त्यांनी गाजवल्या. त्यांच्या वक्तृत्वाला खरी धार आली ती संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात. आपली तडफदार लेखणी आणि बुलंद वाणी यांच्या जोरावर त्यांनी राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. आंदोलन यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. शिवाजी पार्कवर राज्य निर्मितीचा सोहळा झाला पण कोत्या वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी अत्र्यांना व्यासपीठावर सन्मानाने बसवणे तर सोडाच पण त्या सोहोळ्याचे साधे आमंत्रण सुद्धा पाठवण्याचे सौजन्य दाखवले नाही! पण अत्र्यांच्या वक्तृत्वाला एक फार मोठी पावती त्यापूर्वी मिळाली होती. 1956 साली भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या वेळी स्मशानभूमीत फक्त एकाच वक्त्याने प्रातिनिधिक भाषण करावे असे ठरले. हा मान मिळाला तो आचार्य अत्रे यांनाच. त्यांच्या वक्तृत्वाला समाजाने दिलेली ही खूप मोठी दाद होती.
आदर्श शिक्षक हा अत्र्यांच्या व्यक्तित्वाचा एक महत्त्वाचा पैलू. बी. टी. परीक्षेत ते मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. नंतर लंडनला जाऊन (टी.डी.) ‘टिचर्स डिप्लोमा’ ही व्यावसायिक पदवी ही त्यांनी प्राप्त केली. शिक्षकी पेशाचा श्रीगणेशा त्यांनी मुंबईत केला पण नंतर मात्र ते पुण्यात स्थिरावले. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक अशी तब्बल अठरा वर्षे कारकीर्द गाजवली. शिक्षण क्षेत्राशी संबंधित अशी एक त्यांच्या हातून अत्यंत मोलाची कामगिरी घडली ती म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती. त्यावेळची अतिशय रुक्ष अशी भाषेची पाठ्यपुस्तके पाहून त्यांना आपण स्वतःच पुस्तकांची निर्मिती करावी असे वाटू लागले. या कल्पनेतून निर्माण झाली ‘नवयुग वाचनमाला’. पहिली ते चौथी पर्यंतची ही पाठ्यपुस्तके खरोखर आदर्शच म्हणावी लागतील. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत अत्र्यांच्या लिखाणाचा वाटा फार मोठा होता. ‘दिनूचे बिल’, ‘हरीण व हरिणी’सारख्या हृदयस्पर्शी कथा असोत वा ‘आजीचे घड्याळ’ सारख्या कविता. संस्कारक्षम वयातील मुलांसाठी शालेय पुस्तके कशी असावीत याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ‘नवयुग वाचनमाला.’ या वाचानमालेचे संस्कार अनेक पिढ्यांवर महाराष्ट्रात झाले. माझी पिढी त्यापैकीच एक.
झुंजार पत्रकार ही अत्र्यांची आणखी एक महत्त्वाची ओळख. 1940 साली सुरु केलेले साप्ताहिक नवयुग आणि त्यानंतर 1956 मध्ये सुरु झालेले दैनिक मराठा यातून त्यांच्या पत्रकारीतेची उत्तुंग झेप जाणवून घेता येते. ’नवयुग’च्या आधी त्यांनी ‘रत्नाकर’, ‘मनोरमा’ इ. मासिकेही चालवली पण ती फार काळ चालली नाहीत. ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ हीच त्यांची खरी ओळख होती. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हे तुकोबांचे वचन मराठाचे ब्रीदवाक्य म्हणून कायम अग्रलेखाशेजारी छापलेले असायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकाळातील एका जाहीर सभेत त्यांनी या आंदोलनाचे मुखपत्र म्हणून वृत्तपत्र काढायचे जाहीर केले. त्यावेळी त्यांच्या खिशात शंभर रुपये सुद्धा नसावेत. सभेतच श्रोत्यांना त्यांनी मदतीचे आवाहन केले. शेकडो हात पुढे झाले आणि दसर्याच्या शुभमुहूर्तावर मराठाचे प्रकाशन झाले. मग मात्र अत्र्यांच्या लेखणीच्या फटकार्याने राजकर्ते घायाळ होऊ लागले. संयुक्तमहाराष्ट्राच्या निर्मितीत मराठाचा वाटा निश्चितच सिंहाचा होता पण केवळ टीका करणे ही त्यांची मानसिकता नव्हतीच. त्या त्या वेळी जी भूमिका घेणे त्यांना योग्य वाटे ती ते घेत असत. मग भले त्यात कोणाला विरोधाभास का दिसेना. ‘ज्ञानोबा ते विनोबा’ असा एका लेखात विनोबांचा गौरव करणारे अत्रे त्यांना भविष्यात ‘वानरोबा’ असेही संबोधताना दिसतात. ‘स्वातंत्र्यवीर’ असा सावरकरांचा उल्लेख सर्वप्रथम करणारे अत्रे, सावरकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात काही वक्तव्य केल्यावर ‘स्वातंत्र्यवीर की संडासवीर’ अशा शीर्षकाचा लेख लिहून मोकळे होतात. पं. नेहरूंची ‘औरंगजेब’ अशी संभावना करणारे अत्रे नेहरुंच्या निधनानंतर सलग चौदा दिवस त्यांच्या गुणांची दखल घेणारे अप्रतिम असे अग्रलेख लिहून नंतर ते ‘सूर्यास्त’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध करू शकतात.
यात कोणाला विरोधाभास दिसेलही पण चांगल्याला चांगले आणि वाईट असेल त्याला वाईटच म्हणणे ही त्यांची प्रकृतीच होती. त्यामुळे आज ज्याला ते चांगले म्हणत असतील त्याने उद्या काही वाईट शब्द उच्चारले तर त्यावर तुटून पडायला ते मागे पुढे पाहत नसत.
अत्र्यांच्या अग्रलेखांची शीर्षकेही नमुनेदार असत. जाता जाता दोन इरसाल शीर्षकांचा उल्लेख करावासा वाटतो. ज्यांचा उल्लेख अत्रे सदैव ‘नरराक्षस’ असा करीत त्या मोरारजी देसाई यांचा जन्मदिन होता 29 फेब्रुवारी. दर चार वर्षांनी येणारी तारीख. हा धागा पकडून अत्र्यांनी मोरारजींच्या बहात्तराव्या वाढदिवशी त्यांना झोडून काढणारा जो अग्रेलेख मराठात लिहिला त्याने शीर्षक होते ‘अठरा वर्षाचा थेरडा’. दुसरे एक शीर्षक असेच अफाट आहे. आचार्य नरेंद्र देव हे त्यावेळच्या मध्य भारतातील एक समाजवादी नेते. अत्र्यांचे घनिष्ट मित्र तर महाराष्ट्रातील एक गांधीवादी कॉंग्रेस नेते शंकरराव देव हे त्यांचे जणू हाडवैरी! कारण एकच, संयुक्त महाराष्ट्राला असलेला शंकरराव देवांचा विरोध. 1956 मध्ये नरेंद्र देवांचे निधन झाले. नवयुगमध्ये श्रद्धांजलीपर अग्रलेख झळकला. शीर्षक होते, ‘शंकर देवा सोडून देवा, नरेंद्र देवा का नेले?’
‘मी कसा झालो’ या पुस्तकातील आचार्यांच्या काही पैलूंची ही धावती झलक. याशिवाय ‘मी समाजवादी कसा झालो’, ‘मी आरोपी कसा झालो’ अशाही लेखांचा पुस्तकात समावेश आहे. विस्तारभयास्तव फार चर्चा करणे शक्य नाही. पुस्तकातले शेवटचे प्रकरण ‘मी कोण आहे’ हे मात्र मुळातूनच वाचावे इतके सुंदर आहे. एक मुक्त चिंतन म्हणावे असे हे प्रकरण आहे. अत्र्यांच्या आयुष्याला इतके पैलू कसे पडले याचे उत्तर तिथे मिळते. अत्रे म्हणतात की ‘जे आयुष्य प्रवाही असते ते जीवन. ते साचून राहिले तर त्याचे डबके बनते. लहान मूल जसे एका खेळण्यात फार काळ रमत नाही तसे मी एका प्रांतात फारसा रमून गेलो नाही. मला सतत नाविन्याची ओढ होती. मी जीवनाचा यात्रेकरू आहे. एके ठिकाणी स्थिर राहणे माझ्या स्वभावातच नाही. इ..’ पण अनेक क्षेत्रात गेलेला हा माणूस प्रत्येक ठिकाणी उत्तुंग यश मिळवून गेला हा अविश्वसनीय चमत्कार म्हणावा लागेल.
हा लेख मी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात बसून लिहितोय. जवळ संदर्भासाठी पुस्तक उपलब्ध नाही. सारी मदार साठी उलटून गेलेल्या स्मरणशक्तीवर आहे. कुठे संदर्भ चुकले असतील तर तो दोष सर्वस्वी माझाच, पण हा लेख वाचून ‘मी कसा झालो’ हे पुस्तक वाचण्याची इच्छा नव्या पिढीला झाली तरी लेखाचे सार्थक झाले असे समजायला हरकत नाही.
– अरुण कमळापूरकर, पुणे
चलभाष – ७९७२५७३८९४