आपण काही करू शकतो?

आपण काही करू शकतो?

Anyone who doesn’t take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either.
– Albert Einstein

बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ्यावर फिदायीन म्हणजे आत्मघाती जिहादीने स्फोटकाने भरलेली गाडी आदळून 40 जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता उठलो, तेव्हा चहा घेताना हाती दैनिक ‘लोकसता’ होता. पुलवाम्यात घडलेल्या भयंकर घटनेची बातमी वाचली आणि सकाळचे विधी उरकले. अंधोळ नाश्ता झाल्यावर त्या कुटुंबाशी बोलत होतो आणि पाटील यांना कार्यक्रम होणार की रद्द झाला, याविषयी फोन येत होते. इतक्यात तिथेच टेबलावर पडलेल्या ‘दिव्य मराठी’ दैनिकाच्या स्थानिक आवृत्तीकडे लक्ष गेले. सगळ्याच वर्तमानपत्रात मथळा त्याच घटनेचा होता पण दिव्य मराठीच्या या आवृत्तीत तुलनेने छोट्या टायपातील पोटमथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले. लष्कराच्या ताफ़्यात स्फ़ोटकांनी भरलेली कार घुसवून स्फोट घडवल्याचे त्यात म्हटलेले होते. मी चकीत झालो कारण लोकसत्ताच्या बातमीत स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा उल्लेख वाचला होता. पुन्हा एकदा दिव्य मराठी बाजूला ठेवून लोकसत्ता हाती घेतला. काळजीपूर्वक बातमी वाचली. मी थक्क झालो. कारण त्यात ट्रकच लिहिलेले होते आणि दिव्य मराठीत कारचा उल्लेखच होता. घटना एकच व एकाच स्थानी झालेली असेल, तर दोन बातम्यांमध्ये इतकी तफावत कशाला असायला हवी? अशा बातम्या आता इतक्या नगण्य झाल्यात, की आपल्या शहीद जवानांचे जीव आपल्यासाठी इतके क:पदार्थ झालेत काय? नसेल तर अशा बातम्या लिहिणारे व छापणारे काय दर्जाचे पत्रकार म्हणावेत? ते भारतीय संवेदनशील नागरिक म्हणवून घ्यायच्या तरी लायकीचे उरलेत काय, अशी शंका मला आली कारण हा कुठल्या गावातला वा हमरस्त्यावरचा एक मोठा अपघात नव्हता तर देशावरचा सर्वात मोठा घातपाती हल्ला असे प्रत्येक बातमीत म्हटलेले होते. त्यातली ही बेफिकीरी वा बेछूटपणा घातपातापेक्षा किंचीत वेगळा आहे काय?

ही घटना राजकीय लाभासाठी वापरणार नाही असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वच्छ सांगून टाकलेले होते पण त्यांच्याच पक्षाचे पंजाबातील एक नामवंत मंत्री नवज्योत सिद्धू यांनी तात्काळ प्रतिक्रिया देताना निषेध वा बदल्याची बाब बाजूला ठेवून पाकिस्तानशी संवाद करूनच संघर्ष रोखता येईल, अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत. दुसरीकडे राहुलच्याच सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्य स्पंदना यांनी अगत्याने त्याच राष्ट्रीय भावनांना पायदळी तुडवित प्रशांत भूषण यांच्या सिद्धूसारख्याच प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या कॉंग्रेस खात्यावर पुनर्मुद्रीत केल्या होत्या. आद्लि अहमद दार नावाच्या काश्मीरी तरूणाने केलेला हल्ला आहे आणि काश्मीरातील तरूण अशाप्रकारे दहशतवादाकडे वळत असल्याला भारत सरकारचे धोरण व तिथली लष्करी कारवाईच जबाबदार असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केलेला आहे. त्यांनी काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावे, अशी सूचना यापूर्वी अनेकदा मांडलेली आहे आणि अशा जिहादी दहशतवादी घातपातानंतर त्यातल्या संशयीतांना वाचवण्यासाठी भूषण यांच्यासारखे वकील नेहमीच पुढे आलेले आहेत. अशाचप्रकारे भारतीय संसद भवनावरच्या हल्ल्यात अफजल गुरू दोषी ठरलेला असताना त्याच्याही समर्थनाला भूषण व तत्सम अनेकजण समोर आलेले आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या फाशीचा निषेध करणार्‍या सोहळ्यात या लोकांनी वारंवार सहभाग घेतलेला आहे. अशा एका सोहळ्याचे आयोजन नेहरू विद्यापीठात झाले, तेव्हा अफजल गुरूचे समर्थन व भारताचे तुकडे करण्याच्या डरकाळ्या फोडल्या गेल्यावर काहूर माजले; तर घोषणा देणार्‍यांच्या समर्थनाला राहुल गांधींसह केजरीवालही जाऊन पोहोचले होते. असे लोक आणि दोन वृत्तपत्रात अशा घटनेची बातमी देताना होणार्‍या बेजबाबदारपणात नेमका किती फरक असू शकतो? आपल्या जागी आपले काम वा कर्तव्यही ज्यांना धड बजावता येत नाही, ते आज शिरजोर झालेत. ही आपल्याला घातपातापेक्षाही अधिक भेडसावणारी समस्या झालेली आहे.

संपूर्ण देश ज्यामुळे हळहळला ती 40 भारतीय जवानांना एकाच स्फोटात ठार मारणार्‍या घटनेची बातमी देताना मुंबई महाराष्ट्रातले पत्रकार, संपादक इतके गाफील असू शकतात? एका जागी कार आणि दुसर्‍या जागी ट्रक असल्या बातम्या बेछूट छापणारे कोण असतात? हेच लोक मग अग्रलेख लिहितात आणि गुप्तचर खाते झोपलेले होते काय? असलेही सवाल सरकारला विचारत असतात. बंगालमध्ये सीबीआयला आपली कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अधिकार्‍यांना अटक करण्यापर्यंत मजल मारणार्‍या ममता आता त्याच थाटात गुप्तचर व सुरक्षा सल्लागार काय करीत होते; असा सवाल करीत आहेत. त्यांच्या बातम्या व आरोप अगत्याने व ठळक छापणारे उद्या त्यावरच अग्रलेखही लिहित असतात. मात्र आपल्या हाती जो छोटा अधिकार वा स्वातंत्र्य आलेले आहे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे सौजन्यही त्यांच्यापाशी कधी आढळून येत नाही. आपल्या कर्तव्यात लहानसहान बाबतीत कसुर करणारेच; सरकार, गुप्तचर, सुरक्षा दलांना नित्यनेमाने सवाल विचारू लागतात, तेव्हा आधीच जीव धोक्यात घालून राखण करणार्‍यांचे लक्ष किती विचलीत होत असेल? त्यांचे विचलीत लक्ष वा गोंधळलेपणा आदिल दार वा पाकिस्तानच्या दहशतवादी संस्था संघटनांसाठी सर्वात मोठी मदत असते. चकमकीत गुंतलेल्या लष्कराच्या जवानांना मागून धोंडे मारून विचलीत करणारे हुर्रीयतचे भाडोत्री निदर्शक आणि उठल्यासुटल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्‍नांचा भडीमार करणार्‍यांमध्ये नेमका कोणता गुणात्मक फरक असतो? पाकिस्तान कुणा काश्मीरी वा भारतीय बहकल्या मुस्लिम तरूणाला केवळ घातपाताचे प्रशिक्षण व हत्यारे पुरवित असते पण त्यांनी तशी हिंसा वा घातपात घडवण्यासाठी पोषक गोंधळाची परिस्थिती पाकिस्तान निर्माण करू शकत नाही. तशी स्थिती इथेच कोणी तरी निर्माण करावी लागते, जिचा लाभ आदिल दार उठवू शकत असतो. असे गद्दार आपल्यातच उजळ माथ्याने वावरणारे नाहीत काय?

अशा सिद्धू वा प्रशांत भूषणवर आता टीकेची झोड उठलेली आहे पण 40 जवानांचा मारेकरी आदिल दारला अशी परिस्थिती निर्माण करून देणार्‍यांना प्रतिष्ठेने आपण वागवत आहोत, त्याचे काय? आदिल दार कुठून पैदा होत असतो? तो आईच्या उदरातून थेट जिहादी म्हणून जन्म घेत नसतो तर आसपासच्या वातावरणातून त्याची जडणघडण होत असते. काश्मीरात हजारो मुस्लिम तरूण आहेत. त्या प्रत्येकाने हाती बंदुक घेतलेली नाही की स्फोटकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानला प्रयाण केलेले नाही. जे मूठभर त्या दिशेला वळतात, त्यांना तिकडे ढकलण्याचे काम फक्त हुर्रीयतवाले करीत नाहीत तर त्यांच्या अशा उचापतींना राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा व मुभा देण्याचे पाप करणारे जथ्थे इथेच बोकाळलेले आहेत. त्यातून आदिल दार उपजत असतात. अरुंधती रॉय, प्रशांत भूषण, केजरीवाल किंवा राहुल गांधी कन्हैय्याकुमार यांच्या समर्थनाला जातात तेव्हा प्रत्यक्षात संसदेवरील घातपाती हल्ल्यला प्रतिष्ठा मिळवून देत असतात. कोणी अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात मानवाधिकाराचा गळा काढणारा अग्रलेख लिहितो, तेव्हा आदिल दारला अफजल गुरू आदर्श वाटत असतो आणि त्याला पाकिस्तानात जाऊन जिहादी फिदायीन होण्याचे डोहाळे लागत असतात.

थोडक्यात पाकिस्तानला भारताच्या विरोधात हिंसाचार घडवण्यासाठी जी तरूणांची भरती करायची असते, तिला प्रोत्साहन देणारे आपल्यातच दबा धरून बसले आहेत. कधी ते नयनताराच्या नावाने आक्रोश करताना दिसतील तर कधी भारताचे तुकडे पाडण्याच्या डरकाळ्यांना आविष्कार स्वातंत्र्य ठरवण्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावताना दिसतील. त्यांचा बंदोबस्त सुरक्षा सैनिक, गुप्तचर वा पोलीस, सरकार करू शकत नाही. ती जबाबदारी आपण सामान्य नागरिकांची असते. आज टाहो फोडणारे आपण ती कितीशी पार पाडत असतो? आपण काय करू शकतो? हाच प्रश्‍न मनात आला ना?

आईनस्टाईन त्यालाच किरकोळ लहानसहान गोष्टीतले सत्य म्हणतो. जो समाज वा नागरिक अशा बारीकसारीक गोष्टीतले सत्य गंभीरपणे लक्षात घेत नाही, त्याच्यावर मोठ्या बाबतीत विश्‍वासही ठेवता येत नसतो. त्याचा अर्थ इतकाच, की आपल्यातच उजळमाथ्याने वावरणार्‍या अशा गद्दार फितूर लोकांविषयी आपण गंभीर नसू; तर आपण देशाच्या सुरक्षेविषयी उगाच आक्रोश करण्यात काहीही अर्थ नसतो. त्यालाही देखावाच म्हणावे लागेल. तुम्हाला कोणी काश्मीरात जाऊन आदिल दार किंवा बुर्हान वाणीचा बंदोबस्त करायला सांगितलेले नाही पण त्यांच्यासारख्या जिहादींना भारतीय सेनादलाच्या विरोधात हिंसा माजवायला प्रोत्साहन व हिंमत देणार्‍या कन्हैय्याकुमार किंवा उममर खालीद यांच्या पाठीशी उभे राहणार्‍यांचा बंदोबस्त तुम्ही आम्ही नित्य जीवनात करू शकतो ना? त्यासाठी आपल्यालाही हाती बंदुक वा बॉम्ब घेण्याची काही गरज नाही. आपल्या साध्यासरळ वागण्यातून वा कृतीतून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे शक्य आहे. अगदी छोट्या छोट्या कृतीतून अशा देशद्रोह्यांचा बंदोबस्त आपण करू शकतो. आज जो उठतो, तो भारत सरकारला वा भारतीय लष्कराला पाकिस्तानला धडा शिकवा, म्हणून घोषणा देत रस्तोरस्ती फिरताना दिसतो आहे पण दुसर्‍याने काय करावे हे सांगताना आपल्याला काय करणे शक्य आहे, त्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही. सैनिकांनी वा सरकारने काय करावे याची माहिती आपल्याला पक्की आहे पण आपल्या जागी आपण खूप काही करू शकतो, कुठलाही कायदा न मोडता खूप काही करू शकतो, त्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडला आहे. आपल्याला बंदुक, बॉम्ब ही हत्यारे वाटू लागली आहेत पण आपल्यापाशी असलेले स्वातंत्र्य व अधिकार देखील अधिक भेदक हत्यारे असल्याचे भान सुद्धा आपल्याला राहू शकलेले नाही. म्हणून आपण पटकन म्हणतो, आम्ही सामान्य माणसे काय करू शकतो? मित्रांनो, करायचे असेल तर आपण खूप काही करू शकतो.

चकीत झालात ना? आपण सामान्य नागरिक वा माणसे काय करू शकतो? जे सैनिकाला वा भारत सरकारला शक्य नाही, त्यापेक्षाही मोठा पराक्रम आपण नागरिक करू शकतो. फक्त आपल्याला आपल्यात दडलेली भेदक शक्ती व आपले हत्यार ओळखता आले पाहिजे. एक बोनसाय जपानी पद्धत आहे. कुंडीतल्या मोठ्या झाडाची मूळ खालच्या खाली सतत छाटत राहिले मग त्या झाडाची जात कुठलीही असो, त्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर होऊ शकत नाही. इवल्या कुंडीत विशाल वड पिंपळही खेळण्यासारखे इवले होऊन जातात. आपण आपल्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात घुसून बसलेल्या असल्या देशद्रोही प्रवृत्तीची आपल्या आसपास दिसणारी पाळेमुळे अखंड व नित्यनेमाने छाटत राहिलो, तरी काश्मीरातला दहशतवाद आटोक्यात येऊ शकतो. जे कोणी आपल्या आसपास कन्हैय्याकुमार वा अफजल गुरूचे उदात्तीकरण करतात, तेच जवानांचे जीव धोक्यात आणत असतात. आपण त्यांना आपल्या जगण्यातून बहिष्कृत करू शकतो ना? त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, की कुठलेही व्यवहारही करायचे नाहीत. पर्यायाने आपल्या भागात, परिसरात व गावात अशा लोकांचे जगणेच अशक्य करून टाकले तर कन्हैय्या, अफजल गुरू पैदा होत नसतात, की त्यांना प्रोत्साहन मिळू शकत नसते. अशा लोकांचे प्रोत्साहन मिळाले नाही, तर काश्मीर वा अन्यत्रच्या मुस्लिम तरूणांची माथी भडकवण्याचे काम पाकिस्तानला शक्य नाही कारण त्यांना असे माथेफिरू तरूणच उपलब्ध होणार नाहीत. असे निराश, वैफल्यग्रस्त मुस्लिम तरूण घडवण्याचे काम सिद्धू-भूषण वा कन्हैयाचे समर्थ राहुल-केजरीवाल करीत असतील तर त्यांचा बंदोबस्त कायदा व सरकार करू शकत नाही पण आपण नक्की करू शकतो. दिसायला किरकोळ गोष्ट आहे. आपल्याला जमणार आहे का? अशांना बहिष्कृत करणे शक्य नसेल तर उगाच धडा शिकवण्याच्या डरकाळ्या नकोत आणि सरकारला कारवाई करण्याचे सल्लेही द्यायला नकोत. रोजच्या जगण्यात कोंबडी-बकरीसारखे जगावे आणि आपला नंबर लागला की निमूट मरावे.

भाऊ तोरसेकर

सुप्रसिद्ध पत्रकार
चलभाष – ९७०२१३४६२४

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा