विषमतेचा पाया समता कशी आणणार?

भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त नेमका कोण होता, हे कष्टाने शोधावे लागते. पण या सार्‍यामुळे सुसंगत इतिहासाची मांडणी कठीण व दुरापास्त झालेली आहे. या गोंधळामुळे एक व्यक्ती दोन वेगळ्या, विभिन्न टोकाच्या विचारधारांची कशी असू शकते हेही हा गोंधळ घालणार्‍यांना उमजलेले नाही. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

मध्ययुगात संतपरंपरा सुरू झाली. तिचाही इतिहास सांप्रदायिकांकडूनच बव्हंशी समजत असल्याने त्यांनी घालून ठेवलेले घोळ, प्रश्‍न सोडवणे तर दूरच पण गोंधळ वाढवतात. मी या लेखात चोखामेळा आणि विसोबा खेचर या अत्यंत भिन्न परंपरेतील पण महनीय व्यक्तींवर काही दृष्टिक्षेप टाकू इच्छितो. चोखामेळांना व त्यांच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे व गोरोबा-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चौदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील व तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचे आराध्य म्हणून स्वीकारले. ही प्रक्रिया कशी नेमकी सुरु झाली, वारी तेव्हा होती काय हे प्रश्‍न सध्या बाजूला ठेवले तरी नेमक्या तेराव्या-चौदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी हा प्रश्‍न पडतो. तत्कालीन महाराष्ट्रात तेव्हा नेमक्या कोणत्या विचारधारा होत्या हेही आपण पाहूयात. पण काही प्रेरणा महाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली हे तर नक्कीच; पण असे करुनही विठ्ठल भावजीवनात त्यांचे सर्वस्व बनला असला तरी लौकीक जगात विठ्ठल मध्यस्थ बडव्यांमुळे दूरच राहिला हेही एक वास्तव आहे. बडवे शिवाशिव पाळतात, विठ्ठलाला थेट भेटू देत नाहीत हे संतांना दिसत असूनही संतांनी त्यांच्याविरुद्ध आवाज मात्र उठवला नाही हे स्पष्ट दिसते.

वैष्णव वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानेश्‍वर की नामदेव हा प्रश्‍न आजकाल चर्चिला जातो. यामागे जातीय दृष्टिकोन आला असल्याने मूळ उत्तर दूरच राहते. पण ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे ही नाथ पंथातील योगी होती, गहिनीनाथांकडून दीक्षा घेतलेली होती, अगदी चांगा वटेश्‍वराला आगमिक अद्वैतवादाचे दर्शन घडवणारे ज्ञानेश्‍वर, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्‍वर आणि अगदी त्याविरुद्ध विचारधारा असलेले वैष्णव तत्त्वज्ञान घेत वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानेश्‍वर याची कशी सांगड घालायची? ज्ञानेश्‍वर व त्यांचे संतमंडळ याबाबत येणार्‍या अनेक कथा विपर्यस्त, अविश्‍वसनीय व तर्काच्या बळावर न टिकणार्‍या आहेत.

उदाहरणार्थ विसोबा खेचर यांच्याबाबतच्या कथाही अशाच आहेत. विसोबांच्या गुरुपरंपरेतील चांगा वटेश्‍वर ज्ञानेश्‍वरभगिनी मुक्ताईचे शिष्य होते अथवा ते ज्ञानेश्‍वरमंडळात सामील झाले होते असे परंपरा मानते. अभ्यासक मात्र चांगा वटेश्‍वराची गुरू असलेली मुक्ताई वेगळीच होती व श्री पर्वतावर राहणारी गोरक्षनाथांची शिष्या होती असे मानतात. विसाजी खेचरांनीही आपल्या गुरु परंपरेत याच मुक्ताईचा उल्लेख केलेला असून तिच्याशी संबंधीत कथाही विसोबा खेचर लिखित षट्स्थलात नोंदवली आहे. पण ती मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्‍वर भगिनी मुक्ताई नव्हे, त्या दोन वेगळ्या व्यक्ती होत. याबाबत विद्वानांत एकमत आहे. किंबहुना विसोबांचा ज्ञानेश्‍वरांशी कसलाही संबंध असल्याचे विसोबांच्या लेखनावरून दिसून येत नाही. त्यात समजा नामदेव निगुरा होते तर ज्ञानेश्‍वर अथवा त्यांच्या भावंडांपैकी कोणीही नामदेवांचे गुरुत्व न घेता त्यांना विसोबांकडे पाठवण्याचे काय कारण असावे? विसोबा आणि ज्ञानेश्‍वर हे दोघेही नाथपंथीय असले तरी विसोबांचा ग्रंथ मात्र लिंगायत (वीरशैव) तत्त्वज्ञानावर आधारीत आहे. म्हणजे विसोबांची तात्त्विक जवळीक वीरशैव तत्त्वज्ञानाशी होती असे दिसते. ज्ञानेश्‍वरांबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. ज्ञानेश्‍वर एकाच वेळीस नाथपंथीय आहेत आणि वैष्णवही. म्हणजेच वर्ण व्यवस्था न मानणारा अवैदिक नाथपंथ आणि वैष्णव तर वेदांना मानणारे व स्वाभाविकच वर्णव्यवस्थाही मानणारे. ज्ञानेश्‍वर आपल्याला एकीकडे नाथपंथाचे उदात्त तत्त्वज्ञान अमृतानुभवमध्ये सांगतांना दिसतात आणि दुसरीकडे आपले व आपल्या भावांचे उपनयन व्हावे यासाठी पार पैठणच्या ब्रह्मवृंदापर्यंत अयशस्वी साकडे घालतानाही दिसतात. ज्ञानेश्‍वरीतले ज्ञानेश्‍वर मात्र नाथपरंपरेच्या विरुद्ध असलेल्या वर्णव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करताना दिसतात, याचे नेमके काय कारण असावे? ही एक मोठी विसंगती आहे.

विसोबांचा वैष्णव पंथाशी संबंध असल्याचे त्यांच्या उपलब्ध साहित्यावरून दूरान्वयानेही दिसत नाही. विसोबा आळंदीचे नसल्यामुळे ज्ञानेश्‍वर व त्यांचा प्रत्यक्ष परिचय असण्याचीही शक्यता नाही. मांड्यांची कथा ही येनकेन प्रकारेन विसोबांना ज्ञानदेवांशी जुळवण्यासाठी बनवली गेली आहे हे तर उघड आहे. विसोबा बार्शीचे होते हे स्पष्ट होण्याइतपत पुरावे उपलब्ध आहेत. ते पांचाळांपैकी कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेले विणकर समाजातील चाटी आडनावाचे होते आणि कपडा व्यापार हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. आता विसोबा जर आळंदीचेच नसतील तर ज्ञानेश्‍वरांनी नामदेवांना विसोबांकडे जायला सांगितले ही कथा विपर्यस्त असण्याचीच अधिक शक्यता आहे.

बरे, ज्ञानेश्‍वरांना चांगा वटेश्‍वरांमुळे विसोबा माहीत झाले असे मानले तरी मुळात चांगदेवाचे कोरे पत्र ही कथाही दंतकथेच्याच सदरात टाकून देता येते. ज्ञानेश्‍वरांची चांगदेव पासष्टी म्हणजे अद्वैती शांकरमताचा काव्यात्मक आविष्कार आहे. ज्ञानेश्‍वरांचे पत्र हे त्या अद्वैततेचे नितांतसुंदर निरुपण आहे. दोन योग्यांमधील आत्मसंवाद या रुपातच त्या लेखनाकडे पहावे लागते कारण ते तसे आहेही. पण दंतकथा बनवणार्‍यांनी चांगा वटेश्‍वरांना कोर्‍या पत्राची कथा बनवून एक प्रकारे हिणवले आहे असे दिसते. विसोबा खेचर हे चांगा वटेश्‍वराच्या गुरु परंपरेतील. आता चांगा कोराच राहिला असे म्हणणारे ज्ञानदेव नामदेवांना त्यांच्याच शिष्यपरंपरेतील विसोबाकडे कसे पाठवतील हा प्रश्‍न निर्माण होतो. फार तर नामदेव स्वत:च विसोबा खेचरांकडे गेले एवढेच म्हणता येईल. त्याच्याशी ज्ञानेश्‍वरांचा संबंध जोडणे गैर आहे. शिवाय विसोबा हे चांगदेवांचे नव्हे तर त्यांचे शिष्य असलेल्या कृष्णनाथांचे शिष्य होते. म्हणजे चांगा वटेश्‍वर व विसोबांत सरळ गुरु-शिष्य संबंध नव्हता हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. तसेच ज्ञानेश्‍वर रागाने विसोबांना खेचरा, दूर हो असे म्हटल्याने विसोबांना खेचर हे नाव पडले हेही खरे नाही. विसोबा योगी होते व षट्स्थळ ग्रंथात त्यांनी त्याचे निरुपण वीरशैव व नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली केलेले आहेच. या ग्रंथात एकही संतमंडळातील व्यक्तीचा उल्लेख येत नाही. विठ्ठलाचाही नाही. चांगा वटेश्‍वराशी संबंध आलेल्या ज्ञानेश्‍वरांचाही नाही. विसोबा जर ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्‍वर मंडळात प्रवेश झाल्यानंतर विसोबा योगनिपुण झाले ही कथा थोडी जरी खरी असती तर षट्स्थळात ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख येणे अनिवार्य होते. पण ते तसे नसल्याने खेचराची वेगळी व्युत्पत्ती असणार हे उघड आहे आणि ते तसेच आहेही.

योगकुंडलिनी उपनिषदात कुंडलिनी विद्येनंतर खेचरी विद्येचे विवेचन येते व ही विद्या अत्यंत अवघड असल्याचे म्हटले आहे. ही असाध्य विद्या साध्य झाल्यानंतर जरा-मृत्यूपासून मुक्ती मिळते असे मानण्यात येते. ही विद्या जपाने प्राप्त करता येते तसेच जिभेला मागे टाळूत नेत नासिका रंध्रात घुसवून जी मुद्रा बनते ती साध्य करुनही प्राप्त करता येते. हठयोग हा नाथपंथीयांच्या साधनेतील एक महत्त्वाचा भाग. विसोबा खेचरी मुद्रेत गेल्याने त्यांना खेचर ही उपाधी चिकटली असल्यास नवल नाही. थोडक्यात सर्वांना एकाच मोटकळीत बांधण्याच्या सांप्रदायिकांच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचाही इतिहास गढुळला आहे हे आपल्या लक्षात येईल.

दुसरी बाब म्हणजे चोखामेळा व त्याचा परिवार ज्या जातीघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. त्याच निमित्ताने महाराष्ट्रात अस्पृश्यतेच्या मानवताविहिन संकल्पनेचे गारुड समाजाला नेमके कधीपासून ग्रासू लागले, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृश्य का ठरवल्या गेल्या ‘याचाही धांडोळा घेणे आवश्यक बनून जाते.

देवगिरीचे यादव
देवगिरीच्या यादवांची सत्ता सन 850 मध्येच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता सन 1317 साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली व इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर 1296 सालीच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरुपात रामचंद्र यादवाची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्याने मलिक काफरने 1307 साली पुन्हा आक्रमण केले होते. 1317 मध्ये खिल्जीने तेव्हाचा शासक तिसर्‍या सिंघनला ठार मारून देवगिरीचे राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतले. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्राने अनेक शतके पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणे व काहीतरी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक समजायला हवे; पण तसे झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

ही राजकीय अंदाधुंदी चालू असतानाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामचंद्र यादवाच्या काळातच नरेंद्र कवीचे रुक्मीणी स्वयंवर व नागदेव चरित, ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेव्हा लेखन चालूच होते. संत नामदेव ते चोखा हे बहुजनीय संत याच काळात बहराला येत होते. खरे तर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणार्‍या राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब ज्ञानेश्‍वर, विसोबा ते चोख्याच्या एकाही अभंगात वा लेखनात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे हे खरे आहे. खेड्यांतील प्रश्‍न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गावचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमणे होतात, भीषण युद्धे होतात आणि प्रदीर्घ काळ राज्य करणारी सत्ता उद्ध्वस्त होते पण त्याचे पडसाद तत्कालीन व नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!

परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्याने यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागेतीरी पूर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंताने यादवांच्या अनुमतीने विठ्ठलाचे पहिले मंदिर बांधले. तत्पूर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर-कुरुब-कोळी होते, हे डा. रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवले आहे तसेच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचे मूळचे रूप शैव होते हेही सिद्ध करुन दाखवले आहे. माझ्या संशोधनानुसार विठ्ठल हे पौंड्र समाजाचे राजे किंवा महान शिवभक्त असावेत असे दिसते. पौड्रिक क्षेत्र, पांडुरंग (पौंड्र समाजाचा म्हणून पौंड्रंकचे सुलभीकरण) हे पुरातन पौंड्र समाजाकडेच निर्देश करतात. किंबहुना पंढरपूर हे मूळच्या पौंड्रपुरचेच सुलभीकरण आहे हेही उघड आहे. शैव असलेल्या एका दैवताच्या मूळ स्वरुपात झालेले हे बदल यादव काळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

तत्कालीन धर्मस्थिती
तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणारे नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भूमी व्यापली असतांनाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयाने वाढत असल्याचे दिसते. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणार्‍या वैदिक धर्माने महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. विसोबा खेचरांचा षट्स्थळ आणि ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव नाथ या शैव धर्मीय पंथाचे उदात्त तत्वज्ञान सांगतात. यात वर्णव्यवस्था व जातीव्यवस्र्थेला स्थान नाही. पण डॉ. सुधाकर देशमुख म्हणतात त्याप्रमाणे वैदिक धर्मीय मूलतत्ववादाने उचल खाल्ल्यामुळे तांत्रिक धर्माने निर्माण केलेले समतेचे वातावरण गढूळ झाले. यादव काळातच मनुस्मृतीच्या धरतीवर देवल स्मृती लिहिली गेली. वैदिक प्रबंध तर एवढे लिहिले गेले की त्याला प्रबंध काळ म्हणतात. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रते सांगणारा चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पूर्वी व्रते नव्हती असे नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या व्रतार्क मध्ये फक्त 113 व्रते दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचे वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झाले. प्रशासनातील वैदिकांचे प्रमाणही याच काळात क्रमश: वाढत गेल्याचे डॉ. मालती महाजन म्हणतात. वैदिक सत्ता अशा रीतिने क्रमश: वरचढ होत गेल्याने अवैदिक व वेदपूर्व धर्म पाळणार्‍यांवरील (म्हणजे शुद्रांवरील) बंधने या साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात वाढतच गेली.

खरे तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकिर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्याने तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचे अनुसरण करत असत. (महाराष्ट्र गॅझेटियर- इतिहास: प्राचीन काळ: सांस्कृतिक इतिहास) पण याच यादवांच्या उत्तरकाळात वैदिक माहात्म्य वाढत जात नाथ-वीरशैव, महानुभाव या समतेच्या पंथांची पीछेहाट सुरु झालेली दिसते. इतके की मूळचे शैव असलेले पंढरपूर वैष्णव या वैदिक स्थानात बदलवले गेले. वैदिक धर्माचा पायाच मुळात विषमतायुक्त उतरंडीच्या वर्णव्यवस्थेवर आधारित असल्याने बडव्यांचे अतिक्रमण व शिवाशिव यांना वरचढ स्थान मिळणे क्रमप्राप्त होते. हा दोन धर्मधारांतील संघर्ष होता हे येथे लक्षात घ्यायला हवे. हे दोन संप्रदाय नव्हते तर सामाजिक तत्वज्ञानच पुर्णतया भिन्न असलेले दोन वेगळे धर्म होते याचे भान अभ्यासकांनी ठेवलेले नाही.

देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेचे व जन्माधारित उच्चनीचतेचे स्तोम महाराष्ट्रात पसरलेले दिसते. बाकी सर्व स्मृतींची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात व यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रम-धर्म, शुद्धी-प्रायश्चिते व धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती असे मानले जाते. त्यामुळे या कालात धर्मांतरांचे प्रमाण वाढले असावे असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानेही त्यांना प्रोत्साहन दिले असेल अशीही शक्यता आहे.

याउलट विसोबांच्या लेखनाकडे आपण पाहिले तर षट्स्थळात वर्ण-जात याचे एकदाही उल्लेख येत नाहीत. आगमांना व शिवाला सर्वोच्च स्थान असून वेद हे अत्यंत दुय्यम आहेत असे दाखवले आहे. इतकेच काय विसोबा इतर संत करतात तसा आपल्या जाती/व्यवसायाचा पुसटसाही उल्लेख करत नाहीत यावरून दोन धर्मांतील विचारधारांतील भेद दिसून येतो. वैष्णव संप्रदायात सामील झालेले चोखामेळा मात्र आपल्या जातीचा उल्लेख तर करतातच पण वेदमाहात्म्यही सांगायला विसरत नाहीत. हा काळ आगमिक धर्माची पिछेहाट व वैदिक धर्माचे वर्चस्व व आकर्षण कसे वाढत गेले असावे याचा आलेख दाखवतो. तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा घट्ट होत गेलेली दिसते.

अर्थात आगमिक धर्मातील समतेचे तत्व संतांच्या मनातून गेलेले दिसत नाही. पण सामाजिक समता आणि व्यक्तीगत पातळीवरची समता यातील द्वंद्व मात्र कायमच राहिले. महाराष्ट्रातील वैष्णव पंथ हा ना पुरेपूर वैदिक ना पुरेपूर आगमिक राहिला. विठ्ठलपूजेत वर्णाधिष्ठित रचनेचा पाया घालणारे ऋग्वेदातील पुरुषसूक्त त्याचा विठ्ठलाशी कसलाही संबंध नसतांना आवर्जून म्हटले जाते आणि याला मात्र वारकर्‍यांचा कसलाही विरोध नाही. मी असा विरोध केला असता मला टीकेला सामोरे जावे लागले. ते तसे असले तरी पुरुषसुक्ताच्या पायावरील वारकरी चळवळ समतेच्या गोष्टी कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारावर करतात हा प्रश्न पडल्यास नवल नाही. आजच्या बडव्यांना पुरुषसूक्ताचा अर्थही माहित नाही हेही वास्तव मी पाहिलेले आहे, आणि सांगितला तरी पण ते आम्ही म्हणणारच असा हट्टही आहे.

पुन्हा मागे जातांना, अद्वैत आगमिक शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथसंप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असे सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसते. विषेष म्हणजे चारही भावंडांची नांवे ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर समाधी या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर समाधी घेऊन चारही भावंडांनी केला.

नाथ संप्रदाय हा समानतेचा (स्त्री-पुरुषही) पंथ. या पंथाने वैदिक उत्थानसमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचे गारुड समाजाला ग्रासू लागले होते. यामुळेच की काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. वेद व वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. विसोबा खेचरांवरचा वीरशैव प्रभाव हा ते कर्नाटकातून आलेले असल्याने होता. महाराष्ट्र निकटचा असल्याने, विशेषत: सोलापूर व नजिकच्या भागात हा पंथ पसरुन ज्ञानेश्वर-चोखा मेळ्यांच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचे दिसते.

चक्रधरांचा महानुभाव पंथ 1267 मद्ध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा व खानदेश ही प्रामुख्याने राहिली. याही पंथाने समतेच्या सिद्धांताला चालना दिली.

वारकरी पंथ
एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्म-संस्कृती संघर्ष यादवकाळात प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो. समतेचे आकर्षण हा मानवी समाजाचा मूलगाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळे वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाणे स्वाभाविक होते. विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही तेव्हाही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मूळचे शैव स्थान होते. पुंडलिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मूळचे शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मूर्ती ही आधी उघड्यावरच होती व यादव काळात पहिले मंदिर झाले हे आपण वर बघितले. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतून सुटलेला महत्वाचा भाग असा की यादवकाळात एकीकडे अवैदिक असलेल्या आगमिक शैव धर्माचा समतेचा बोलबाला चालू असतांना एक दुर्लक्षित शैव स्थानाचे रुपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमके का केले गेले असावे हा. समतेचे पाईक म्हणवणा-यांना नाथ संप्रदाय जवळचा होता. ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे याच समतेच्या पंथाच्या तत्वज्ञानाची पाईक असतांना विषमतेच्या वैदिकतेकडे त्यांनाही का जावे वाटले असेल? की अनेक संशोधक तर्क करतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर एक नसून याच नांवाच्या इतिहासातील दोन व्यक्ती आहेत?

आणि तसे नसले तरी विठ्ठल हा विष्णुच्या सहस्त्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव हे संतांना माहितच आहे. संतांनाही त्याचेच एक आगळे कुतुहल असल्याचे त्यांच्या अभंगांवरून जाणवते. तरीही तो विष्णू अथवा कृष्ण या रुपात पुढे आणला गेला. असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. विष्णूसहित शिव…आणिला पंढरी असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोखा मेळ्यांनी ते स्वीकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे. मग समतेच्या देवाचे हे स्वरुप पालटले याची खंत संतांच्या लेखनात कोठेही का येत नसावी?

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे यादव काळातील जी प्रचंड राजकीय घडामोड घडत होती, साडेतीनशे वर्षाची राजवट कोसळली त्याचे पुसतसेही दर्शन त्यांच्या साहित्यात का येत नाही? त्यापेक्षा ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचेच अनावर आकर्षण संतांना होते असे दिसून येते. त्याचमुळे की काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथी होत असतांना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणे स्वाभाविक आहे. पण त्याचे प्रतिबिंब संतसाहित्यात आढळत नाही हे एक वास्तव आहे.

विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तुल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही… ते वेदांचा अर्थ आम्हासही ठावा… अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हणजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ…परब्रह्म सोज्वळ विटेवरी, ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती…तो हा रमापती पंढरिये.. असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृश्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो…त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्णव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?

येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, आगमिक धर्म वेद मान्य करत नाहीत आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-वीरशैव आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. अमृतानुभव हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.

परंतु संतांच्या समतेच्या चळवळीला अध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीनभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोखामेळ्यांना आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.

विसोबा खेचरांच्या लेखनात मात्र जातीमुळे येणारा हीनभाव वा श्रेष्ठत्वता भाव कोठेही येत नाही. याचे कारण ज्या धर्माचे तत्वज्ञान ते पाळत होते त्यात आहे. या विसोबांनाही ज्ञानेश्वर मंडळात आणण्याचा अनैतिहासिक प्रयोग सांप्रदायिक चरित्रकारांनी मात्र केला. यामुळे ज्या तत्वज्ञानात्मक पातळीवर वारकरी संप्रदायाची चिकित्सा व्हायला हवी होते ती झाली नाही. खुद्द वारकर्‍यांचा पाया हा श्रद्धा असल्याने त्यांनी या विसंगतीकडे लक्ष देण्याचे कारण नव्हते.

अस्पृश्यता
अस्पृश्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु ती नेमकी सुरु कधी झाली आणि का याची कारणे मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ-श्वपच-धिग्वन ई. काही जाती अस्पृश्य मानल्या गेल्याचे दिसत असले तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मूळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करणारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगत अंगरक्षक म्हणून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हिणकस कामांचा, म्हणजे मृत जनावर ओ्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे इ. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृश्य का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृश्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते की सैन्यातील महारांबाबत अस्पृश्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमिनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. गांव पाटीलही होते. आपली समाजाची स्थितीस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृश्यता ही सार्वत्रिक होती काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. असे असले तरी गांवकामगार महार तरी का अस्पृश्य मानला जात होता याचे निराकरण होत नाही.

महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणे, जमिनींच्या सीमा आखणे, सारा मुख्य ठाण्याला पोहोचवणे ई. कामे करावी लागत असल्याने त्यांनी साक्षर असणे क्रमप्राप्त होते. चोखा व त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असे म्हणायला प्रत्यवाय नाही. चोखा व त्याचा परिवार मात्र अस्पृश्य मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृश्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गांवगाड्याचा भारही गेला नाही. हे वैष्णव संप्रदायाचे, म्हणजेच वारकरी परंपरेचे सर्वात मोठे अपयश आहे. विषमतामूलक तत्वज्ञानालाच कवटाळून बसल्याने चोखामेळ्यांना या अस्पृश्यतेची खंत असली तरी ती विद्रोहात बदलणे शक्य नव्हते. ही एक शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

वेठ म्हणजे सरकारी कामे प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणे. मंगळवेढ्याच्या वेशीचे काम वेठीवर करत असतांना भिंत कोसळून चोख्याला मरण आले. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखा विलीन झाला. दुर्दैवाने वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असे आजही म्हणता येणार नाही! विसोबा मात्र समतेचेच तत्वज्ञान जगले, अगदी शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले तरी त्यांना कोणी अडवू शकले नाही. कारण आगमिक धर्म हा नेहमीच समतेचा होता आणि आज समाजाला वारकरी नव्हे तर आगमिक तत्वज्ञानाची गरज आहे. समतेचा पाया असलेले तत्वज्ञान असल्याखेरीज व्यावहारिक समता येणे शक्य नाही. आज सर्व समाज उच्च-नीचता, जातीय अहंकारांनी भरलेला आहे आणि त्यावर मात करायची तर श्री विठ्ठलाला त्याच्या मूळच्याच शैव स्वरुपात पाहिले पाहिजे. एक स्वतंत्र, प्रगल्भ आणि खुले जग निर्माण करण्याची शक्तकी त्याच ठायी आहे हे भारताने दहाव्या शतकापर्यंत पाहिले आहे. आजही त्याचीच गरज आहे!

संजय सोनवणी 98609 91205

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा