कल्पनेच्या जगात वावरत असताना कधीतरी मान वर करून बघावं, नकळत खूप काही दिसतं. नेमकं कुठं अन् कोणाकडं बघावं, कुठं लक्ष केंद्रीत करावं हे आपल्यावर असतं. मी असंच कल्पनेच्या जगात परंतु वास्तवरूपात जगत होते. तहान नाही, भूक नाही, झोप नाही, काही म्हणजे काहीच नाही. मनमुराद चाललं होतं सगळं! आनंदात कसलीच फिकिर नाही, की कसलीच चिंता नाही. अश्या वातावरणात बागडत असताना खर्या जगाची चाहूल लागता कामा नये. जर असं झालंच तर आतडे पिळवटून जातात, हातपाय निकामी होतात; नेमकं काय करावं हेच त्यावेळी सुचत नाही. मग समोर कोणीही येवो, ‘चल रे हो बाजूला, काय चावतोय!’ याहीपेक्षा कठोर शब्द वापरले जातात. मग असं वाटतं, नको कल्पनेतलं वास्तव जगणं… कसं का असेना आपलं जग खूप सुंदर आहे.
हे लिहित असताना मला एका प्रसंगाची आठवण होते. मी इंटिरिअर डिझाईन शिकत असताना दोन अंकी नाटक करायची संधी मिळाली. मी काही बोलू इच्छित नाही, कारण हेच माझं कल्पनारुपी वास्तव होतं. तालीम करत असताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. कॉलेजिशनस, हजेरी युनिव्हर्सिट असल्या कारणामुळे सक्तीचे होते. हे करून कसं सगळं करायची माझं मला माहीत. तालीममध्ये मी मनासारखी सूत्रं हलवण्याचा प्रयत्न केला.. आणि ती माझी चूक होती.
‘हेच पात्र पाहिजे मला’ वगैरे… आता असं वाटतं देतील, आहे ते आपलं मानून खुश व्हायला पाहिजे होतं. चुकच ती. यापुढे असं होणार नाही हे नक्की.
आमचे सर खूप प्रेमळ आणि समजूतदार! त्यांच्या जागी कोणी दुसरं असतं तर मला समोर उभं देखील केलं नसतं; पण त्यांना कळत होती की काय माझी अवस्था कोणास ठाऊक! त्यांनी माझे सगळे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न केला. तेही माझ्या कॉलेजच्या वेळा सांभाळून!
आरश्याचे एक पात्र होते. तेच मला पाहिजे होतं. माझ्या हट्टपायी त्यांनी ते पात्र मला दिलं देखील, परंतु मी मंचासाठी नवीन असल्याने जणू ते मला स्वीकारत नव्हतं की माझे पाय मंचावर स्थिरावत नव्हते कोण जाणे! पण मला एकंदरीत ती साधीशी एक चाल जमत नव्हती. सर मला प्रोत्सहन देत होते. ‘करशील तू, कर कर, जमतंय..!’ जमायचं देखील..! परंतु पुढच्या क्षणी जैसे थे…! त्यावेळी 8.30 झाले होते. रोज मी 8.30 ला डोंबिवलीवरून लोकल पकडायचे आणि दहापर्यंत घरी पोहोचायचे. त्यादिवशी उशीर झालेला. 8.30 झाले तरी मी तालीममध्येच होते.. सर मला म्हणाले, ‘‘जा तू आता घरी दमली आहेस तू, उद्या ये वेळेत, उशीर करू नकोस!’’ तरी मी त्यांना दोनदा विचारलं, ‘‘खरं ना सर, जाऊ मी नक्की?’’
‘‘हो, वेळेत ये उद्या.’’
मग घरी आले. नेहमी घरी आले की जेवायचं आणि 2.30 पर्यंत सबमिशन करायचं असं ठरलेलं. त्याप्रमाणे मी सगळं करत होते. खूप आनंदी होते. स्वप्नाच्या जगात जगात होते ना!
2.30 झाले. मी अंथरुणात पडले. दिवस सिद्धीस लागला. सगळं छान होतं आहे. सरांनी आपलं ऐकलं. ‘थ्यँक्यू’ बोलू त्यांना असा विचार करत मोबाईल हातात घेतला नि मग मेसेज पाठवला. 5 मिनिटांनी त्यांचा रिप्लाय आला. ‘आपण ‘कास्टिंग चेंज’ करतोय, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि अजून आपल्याला बरंच काही बांधायचं आहे. यात आपण वेळ खर्ची करू शकत नाही.’
हे सगळं वाचून मी अक्षरशः गार पडले होते. अंगाखालची जमीन जणू सरांनी खेचून घेतली होती, पण मी पडत नव्हते. कारण मला माहीत होतं सर बरोबर बोलत आहेत. त्यांना एक टेंशन नाही. त्यात मी माझी अजून कुठं भर देऊ? मी रिप्लाय दिलाच नाही. तसंच झोपून घेतलं. परंतु विचार डोक्यात चालूच होते. मी वेळ द्यायला तयार आहे. मी खूप मेहनत करेन वगैरे सांगू सराना उद्या.
उद्या उजाडला. सबमिशन होतं. म्हटलं जाऊ दे सबमिशन. मी तालीमला गेले आणि जी चाल जमत नव्हती ती करायचा प्रयत्न करत होते. मंचाशी ओळख करून घेत होते. सरांचं पूर्ण लक्ष होत माझ्याकडं पण मी हे सगळं सरांच्या नजरेआड करत होते. माझ्या मेहनतीचा काही उपयोग झाला नाही. ‘कास्टिंग चेंज’ झालीच. मग ठरवलं पुढचं काम चोख करायचं. जे देतील ते आनंद मानून जबाबदारीनं करायचं.
अश्या या दिवसातल्या एक ना अनेक परीक्षा झाल्या. खूप काही शिकले त्यातून. माणसं चांगली होती म्हणून टिकले, नाहीतर काही खरं नव्हतं.
उद्या प्रयोग! आज दिवसभर तालीम तालीम तालीम… जेवण नाही, पाणी नाही. दुपारी एक वडापाव आणि दिवसभर फ्रेश राहण्यासाठी चहा चालू होता. दोन अंकी नाटक. मला बॅकस्टेजची जवळजवळ पूर्ण जबाबदारीने कामं पार पाडायची होती. शेवटची तालीम 10.30 ला संपली. त्यानंतर करेक्शन्स! कुठं सुधारलं पाहिजे, काय छान दिसत नाही वगैरे… ह्या सगळ्याला जवळजवळ 12 वाजले. आता ‘कल्पनेच्या वास्तवातील’ जगातून वास्तवात जायची वेळ झाली होती. घरून फोनवर फोन येत होते. सर म्हणाले, ‘‘थांब, इथेच माझी आजी राहते. तिच्याकडे सोडतो तुला…’’ पण माझ्या घरी ऐकतील तर शपथ ना! काहीही ऐकायला तयार नाही. ‘‘आता घरी ये, नाहीतर परत घरी यायची गरज नाही.’’
आमचे सर खरंच खूप समजूतदार! रात्रीचे 12 वाजले होते. त्यांना परत डोंबिवलीला यायला लोकल नाही. तरीही ते मला सोडवायला घरापर्यंत आले.
रात्र इतकी शांत, सुंदर असते हे मला तेव्हा कळलं. खरंच स्वप्नातलं जग जगत होते मी वास्तवात! सकाळी जेवढा कल्ला असतो तेवढीच शांत होती ती रात्र… की वादळापूर्वीची शांतता होती माहीत नाही! पण मी एवढं सगळं असताना खूप शांत आणि आनंदी होते. या पिवळ्या प्रकशात आम्ही गप्पा मारत चाललो होतो. आयुष्य कसं असतं, काय असतं त्या सगळ्या माझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. आता कैद केलंय मी त्यांना.
माझी बिल्डींग समोर दिसू लागली. मी सहज बोलून गेले सरांना, ‘‘माझं स्वप्न संपलं, आता इथून खरं जग चालू.’’ मी पावलं टाकत गेले. ठोके जोर घेत होते. बिल्डींगचं गेट आलं. रात्री 10.30 वाजताच गेटला कुलूप लागतं. मी कुलूप बघितलं आणि आईला फोन केला. आईने कुलूप उघडलं आणि सरांशी बोलत होती. ‘या घरी पाणी घ्या, बसा’ वगैरे! बोलणं चालू होतं तेवढ्यात वरच्या मजल्यावर पप्पा आले, आणि म्हणाले, ‘‘तुम्ही दोघींही निघून जा घरातून. आता घरात यायचं नाही.’’ तसंच मी दबक्या पायांनी वर गेले अन् मागे वळून बघितलं. आई गेटला पुन्हा कुलूप लावत होती. सर तिथेच उभे होते. माझ्या डोळ्यात पाणी साचलेलं आणि ओठांवर हसू होतं आणि हे सगळं सरांशी बोलत होते. ‘हे बघा माझं वास्तव. मी पुन्हा कैद झाले.’ एका नजरेत आम्ही एवढं बोललो. सर माझ्याकडं बघतच उभे होते..
मी घरी गेले. घरी काय झालं असेल नव्यानं सांगायला नको.
उद्या प्रयोग.. तो ‘उद्या’ उजाडला होता आणि पप्पा म्हणाले होते, ‘‘बास झालं नाटक बिटक. जायचं नाही कुठेच आता.’’ माझ्या डोक्यात चक्र चालू. मला प्रयोग तर करायचा आहे. रात्री घरी आले, तसंच न खाता पिता! काही फ्रेश देखील झाले नाही. झोपले तशीच.
गेले मी प्रयोगाला! माझं पहिलंं नाटक!! घरातले कोणीही नव्हते. नाटक म्हणजे जणू आमचा सणच! मस्त आनंदात पार पडला आणि पुन्हा 10 वाजता मी माझ्या वास्तवरूपी जगात कैद!
■ प्रियांका ननावरे, बदलापूर
86009 57917
प्रत्येक माणूस सुसंसकारीतच असे नाही.पडीबीचा उपयोग् दारवाजाच्या नावाच्या पाटीवर बारीक अक्षरात लिहण्यापूरताच.तो दरवाजा बंद केला की पदवी बाहेरच राहते. चार भिंतीत ज्यांना सुसंवाद साधता येतो,आनंदाचे मळे पिकवता येतात ती माणसे ह्या जगात येतानाच त्या पदव्या घेऊन येतात,त्या विद्यापीठांना नावं नसतात.पदव्या मिळण्यासाठी त्या विद्यापीठात कसलेही प्रबंधक सादर करावे लागत नाहीत, तिथं बुद्दीची झटपट करावी लागत नाही.पण माणूस तेवढच सोडून इतर गोष्टी आणतो म्हणूनच प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो.