आई मला पंख आहेत पण… (कथा)

एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्‍याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते.

आता पिल्लाला उडण्याचे वेध लागले. निळसर आकाश त्याला खुणावत होतं. काही दिवसांनी आई-बाबांनी सांगितल्याप्रमाणे पिलानं एक-दोन वेळा आकाशात झेप घेतली. सुरूवातीला त्याचा तोल गेला. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर शेवटी त्यानं झेप घेतलीच. उंच आकाशात. तो उडत राहिला. त्याला स्वत:चेही भान राहिले नाही. खूप दूरपर्यंत पोचला. मात्र, काही वेळातच नाजूक पंखातील त्राण संपले. भूक लागली. तेवढ्यात त्याला काहीतरी खायला दिसले. त्याने कोणताही विचार न करता थेट झेप घेतली. तिथं त्याला भरपूर खायला मिळालं. खाल्ल्यानंतर थकल्यानं पिलू तिथंच निजलं. काही वेळाने त्याने डोळे उघडले. आजूबाजूला केवळ लोखंडाची जाळी होती. बाहेर आकाश दिसत होतं. पण बाहेर जाण्याचा रस्ता बंद होता. त्यानं जाळीवर खूप धडक दिली. इवल्याशा पंखातून रक्त आलं. तो पिंजरा होता. स्वातंत्र्य संपलं होतं. पारतंत्र्य सुरू झालं होतं. पिंजर्‍यात आणखी काही पिलं होती. तीही अशीच पिंजर्‍यात अडकली होती. पण त्यांना आता सवय झाली होती. पिंजरा हेच त्यांचं विश्‍व होतं. शेवटी बाहेर उडून कष्ट करून पोट भरण्यापेक्षा इथं फुकटच त्यांचं पोट भरत होतं. त्यातच ते आनंद मानत होते. पिलाला हे पटलं नाही. तो आणखी त्रस्त झाला. पण आता पर्याय नव्हता. दार बंद होतं. आत खायला होतं. पुढे 1-2 दिवस त्रागा करून ते थकून गेलं. त्यानंही हेच आपलं विश्‍व मानायला सुरूवात केली. असेच काही दिवस गेले.

इकडे पिलाचे आई-बाबा अजूनही पिल्लाला शोधत होते. दूरपर्यंत जाऊन रोज त्याचा शोध घेत होते. पण पिलू सापडत नव्हतं. आई-बाबा थकून जात होते, पण शोध थांबवत नव्हते. अशातच काही दिवस गेले. आता पिलू थोडं मोठं झालं होतं. पिंजर्‍यात चांगलच रूळलं होतं. पिंजर्‍यात अन्न होतं, पाणी होतं, छोटासा झोपाळाही होता. सोबतचे मित्र बनले होते. दिवसभराचा कार्यक्रमही ठरला. सुरूवातीला पिंजर्‍यातच उडणारं पिलू आता उडणंच विसरून गेलं. पिंजराच खोपा अन् पिंजराच कुटुंब बनलं.

एकेदिवशी आई-बाबांना शोध घेताना पिलाचा पिंजरा दिसला. त्यांनी दुरूनच पिलाला पाहिलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून ते पिंजर्‍याजवळ आले. पिल्लाला हाक मारली. पिंजर्‍यातील सारे जण त्यांच्यासमोर आले. मात्र, आई-बाबा आणि त्यांच्यामध्ये लोखंडी जाळी होती. आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. पिलाची तब्येत सुधारली होती, पण चेहर्‍यावर तेज उरलं नव्हतं. पिलाची अवस्था पाहून बाबाही हळहळले. जाळी तोडण्याचा आई-बाबांनी खूप प्रयत्न केला, पण चोचीलाच त्रास झाला. आईच्या डोळ्यातून पाणी अन् चोचीतून रक्त वाहू लागलं. मग बाबांनी सर्वांना सांगितलं, ‘संध्याकाळी पिंजरा उघडा ठेवला जातो. तुम्ही बाहेर या अन् उंच आकाशात झेप घ्या. आम्ही समोर झाडावर आहोत. सर्वांना ते पटलं. बाबांनी अनेकदा पक्षी असलेले उघडे पिंजरे पाहिले होते. आई दूर व्हायला तयार नव्हती, पण बाबांनी पटवून सांगितलं.
संध्याकाळी पिंजर्‍याजवळ एक माणूस आला. त्यानं पिंजर्‍याचे दार उघडं ठेवलं. आई-बाबांनी इशारा केला. पिलू दाराशी आलं. बाहेर झेप घेऊ लागलं. पण आश्‍चर्य? त्याला उडताच येत नव्हतं. एवढ्या दिवसात उडण्याची कलाच पक्षी विसरून गेला होता. आपल्याला पंख आहेत याचीही त्याला आताच आठवण झाली होती. तरीही धडपड करताना पिलू पिंजर्‍याबाहेर जमिनीवर कोसळलं. तिकडून माणूस आला. त्यानं पिलाला उचललं अन् पुन्हा पिंजर्‍यात टाकून दार बंद केलं. ही सारी शोकांतिका दूरवरून आई-बाबा पाहत होते.

पिंजर्‍यातून पिलू ओरडून म्हणत होतं, ‘आई मला पंख आहेत, पण… आईच्या डोळ्यांतून पाणी आणि चोचीतून रक्त अद्यापही सुरूच होतं.

■ व्यंकटेश कल्याणकर
9404251751

 

 

 

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा