वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात आयुष्याचं मार्गक्रमण असताना वाटेत दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही तुकोबा-माऊलींच्या रूपात पाहणे आणि त्यांच्यातला अंतर्रुपी विठ्ठल शोधणे यात जे आध्यात्मिक, आत्मिक समाधान मिळते, त्याची तुलना जगात कुणासोबतही होऊ शकत नाही. या आनंदातून मिळणारी विठ्ठलाच्या सहवासाची एकरूपता ही जगण्याच्या वास्तवाचं भान मिळवून देते. शेवटी वारी म्हणजे काय तर तुम्हाला मिळालेला सर्वसामान्यांच्या आध्यात्मिकतेचा आत्मिक साक्षात्कारी आनंद… आणि त्यातून विठ्ठलाचं देखणेपण रामरूपी चंद्राच्या शीतलतेतून शोधून, आपल्याला त्याचा परिसस्पर्श घडवणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे…
शिरूर तालुक्यातल्या कारेगावातून त्यांची ज्ञानसागराकडे वाटचाल सुरु झाली. घरातच वारकरी संप्रदायाचा वसा जपणारी माणसं आणि आध्यात्माचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती असल्याने देखणे सरांकडे चालून आलेला हा वारसा तुमच्या आमच्या भुकेजलेल्या शिदोरीमध्ये ज्ञानाचं दान टाकून जातो. त्यांच्याकडून मिळणारं हे आध्यात्माचं दान इतकं असतं की, ते घेताना आपल्याला असं वाटतं की, त्यांच्या या ज्ञानाच्या ओझ्यानं माझ्या झोळीतलं अज्ञान कधीच संपून गेलंय. ‘शहाणे करून सोडावे सकळजण’ याचसाठी जणू देखणे सरांनी त्यांचं आतापर्यंत आयुष्य वेचलंय. नुकतीच एकसष्ठी साजरी करणार्या देखणे सरांच्या चेहर्यावरचं स्मितहास्यच मुळातच आध्यात्माच्या ज्ञानशक्तीतल्या तारूण्याचं लक्षण असल्याचं दाखवून देतं.
संत एकनाथांनी भारुडाच्या रूपकातून जे समाजप्रबोधन केलं, लोकशिक्षण केलं त्याला खर्याअर्थानं लौकिक रूप देणारे व्यासंगी म्हणजे डॉ रामचंद्र देखणे. आध्यात्मिक, सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण हे बदलत्या सामाजिक काळातील स्थित्यंतरानुसार त्यांनी लोककलेचा हा वारसा जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम अहोरात्र केलंय. इतकंच नाही, तर लोकशिक्षणातून प्रबोधन करत असताना, त्यातला माणूस शोधून, त्यातल्या विठ्ठलाचं अर्थात लोकदेवाचं दर्शन देखणे सर त्यांच्या कार्यक्रमातून नेहमीच घडवत असतात. यातच पुढे भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान यावर त्यांनी पीएचडी केलीय. भारुडाच्या निमित्तानं पडलेल्या असंख्य प्रश्नांना या शोधनिबंधातून त्यांनी समर्पक उत्तरे देत ज्ञानभांडार जगासमोर उभं केलं आहे. जनमानसात रुजलेले लोकाचार याला रंजकतेने नटवीत लोकसंस्कृतीचा एक सहजसुंदर आविष्काराचं दर्शन बहुरुपी भारुडातून त्यांनी घडवलंय.
आपल्याजवळचं ज्ञान इतरांनाही मिळावं, या विचारानं जगणारी माणसं तशी फारच कमी असतात. त्यातलं पहिलं नाव म्हणजे डॉ रामचंद्र देखणे. मी केलेली वाटचाल समाजाभिमुख होतेय, त्याला चांगलं यश मिळतंय, तर त्यासोबतच या वाटचालीत माझ्यासोबत ज्यांनी-ज्यांनी साथ केली, तेही तितकेच पुढे गेले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारी माणसं फारच कमी असतात! पण झालं, माझ्यासोबतच्या माणसांनाही तेच स्थान मिळालं पाहिजे यासाठी डॉ. देखणे यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. म्हणूनच ‘विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा॥ ही ओवी आपल्या जगण्यातून त्यांनी सार्थ ठरवलीय. म्हणून तर विठ्ठलाचं देखणं स्वरूप त्यांना त्यांच्या आडनावाप्रमाणे पाहता आलंय.
वडिलांकडून मिळालेली कीर्तनाची परंपरा त्यांनी जनमानसात रुजवली. कीर्तन हे लोकजागृतीचं उत्तम साधन आहे. लोकशिक्षण देणारी ही कीर्तन परंपरा त्यामुळेच लोकाभिमुख ठरली. शब्द हे साहित्याचे शरीर आहे. भाव हे त्याचे सौंदर्य आहे, चिंतन हा त्याचा आत्मा आहे, असं लिहिणार्या डॉ. रामचंद्र देखणे यांच्यातला माणूस त्यांची जगण्याकडे बघण्याची सौंदर्यदृष्टी दर्शवितो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या अभंग रचनेतून समाजप्रबोधनाचा जो विडा उचलला होता त्याचंच पुढचं काम देखणे सर त्यांच्या सहजसोप्या लेखनातून आणि बहुरूपी भारूडातून करताना दिसतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवींमधूनच सांगायचं झालं –
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात तेच चिंतनाच्या पातळीवर अविनाशी आनंद देतात. चिंतन नेमकं कसं असावं, विचार मनाच्या कानाने ऐकावं म्हणजे नेमकं कसं… अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देखणे सरांचं कीर्तन किंवा प्रवचन ऐकली की, आपल्याला मिळतात. लोकजागृतीसाठी कीर्तनासारखे साधन नाही. त्याबद्दलच बोलताना एकदा लोकमान्य टिळक म्हणाले होते,
‘‘मी पत्रकार झालो नसतो, तर कीर्तनकार नक्की झालो असतो.’’
म्हणजे लोकमनाचा वेध घेत असताना कीर्तनाने मनोरंजन तर घडविलेच पण त्याचबरोबर कीर्तनाने उद्बोधन आणि लोकप्रबोधनही केले.
कधीही, कोणत्याही वेळी देखणे सरांकडे तुम्ही गेलात, तर तुमच्या पदरात अक्षरांचं लेणं पडतंच. इतकंच नाही तर आध्यात्मिक प्रासादिकता काय असते हेही तुम्हाला अनुभवायला मिळते. मला आठवतंय, आम्ही एकदा आषाढी वारीच्या पूर्वी देखणे सरांच्या घरी, वारीच्या निमित्ताने काही एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी गेलो होतो, पुण्याला. त्यावेळी माझी सहकारी प्रियंका देसाई आषाढी वारी सोहळ्याच्या वृत्तांकनासाठी जाणार होती. मुंबईकर प्रियंका पहिल्यांदाच वारी सोहळ्याच्या वृत्तांकनासाठी निघाली होती. ती म्हणाली, ‘‘आपण देखणे सरांचे जे काही एपिसोड रेकॉर्ड करणार आहोत, त्यासाठी मीही येते पुण्याला. त्यातून त्यांच्याकडून मला वारी समजून घेता येईल.’’ आम्ही दोघेही त्यांच्या घरी पोहोचलो. दुपारनंतर रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. चार पाच एपिसोड रेकॉर्ड झाल्यानंतर देखणे काकूंनी आमच्यासाठी छान उपमा बनवला. अगदीच भुकेची वेळ झाल्याने उपमा पाहून प्रत्येकाच्या चेहर्यावर एक आनंद दिसला. त्याहुनी पुढे महत्त्वाचे म्हणजे, उपम्याचा पहिला घास घेतल्यानंतर त्याची चव अशी काही अफलातून की बस्स….! पहिल्या फटक्यात सगळ्यांनी उपमा संपवला होता. माझ्या एका सहकार्याने हळूच माझ्या कानात विचारलं, ‘‘सर, अजून थोडा उपमा मिळू शकेल का…? फारच सुंदर झालाय…’’ त्यावर काकू म्हणाल्या… ‘‘अरे, सगळेजण पोटभर खा…’’ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना उपमा वाढला. ही गोष्ट सांगण्यामागचा हेतू इतकाच होता की, ज्या घरी संतांच्या ओवीतले शब्द वास करतात, तिथे तुमच्या पदरात अक्षरांच्या लेण्याबरोबरच ही प्रासादिकताही पडते. किंबहुना ही प्रासादिकता वारकरी संप्रदायातल्या संस्काराचाच एक भाग असते. ती तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना समर्पणाची शिकवण देऊन जाते. दातृत्वाची ओळख देऊन जाते. दानाची परंपरा शिकवून जाते आणि ज्ञानाचा प्रसार करण्याची आठवण करून जाते.
संतांनी आपल्या अभंगांमधून रचलेली ही ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून देखणे सरांनी टाकलेली पावलं ही तुम्हा-आम्हा सगळ्यांना उद्बोधित करतात. ज्ञानेश्वरांनी जी समतेची, एकात्मतेची शिकवण आपल्याला दिली त्यातूनच समाजाची होणारी जडणघडण आणि तुकोबारायांच्या वैश्विक विचार सामर्थ्यातून समाजातल्या अनिष्ठ रूढींवर त्यांनी त्यांच्या अभंगवाणीतून केलेला प्रहार, नाथांच्या भारूडांनी समाजाच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजन… गोंधळ, वाघ्या-मुरळी, वासुदेव, पिंगळा यासारख्या लोककलेतल्या वारशाला देखणे सरांनी त्यांच्या बहुरूपी भारूडातून अक्षरशः जिवंत ठेवलं. दररोजचं धकाधकीचं जीवन, नोकरी, संसार आणि व्यावहारिकता यापलीकडे जाऊन, त्यांनीच नाही तर त्यांचं सारं कुटुंब या आध्यात्मिक आविष्काराचा साक्षीदार आहे. त्यांच्या सान्निध्यात जाण्याची माझ्यासारख्या पामराला संधी मिळाली, त्यांच्यातला माणूस समजून घेण्याचा वाव मिळाला, त्यांच्याकडून झालेले आध्यात्माचे संस्कार, वास्तववादी जगण्याला फार मोठा आधार देऊन गेले.
देखणे सरांनी नुकतीच एकसष्ठी पूर्ण केलीय पण त्यांचा उत्साह पाहिला, आध्यात्माच्या भांडारातून ज्ञानदानाची तळमळ पाहिली तर एकसष्ठाव्या वर्षीही ते अजून तरूणच वाटतात. हेच खरं आध्यात्माच्या प्रासादिकतेचं फळ आहे. वारकरी संप्रदाय, लोककला, लोकप्रबोधन, लोकजागृती या सगळ्या परंपरा टिकवून ठेवून त्याच्या स्वरूपाचा प्रसार करत असताना मिळणार्या आविष्काराची अनुभूती म्हणजे डॉ. रामचंद्र देखणे… .म्हणूनच लोकदेव असलेल्या विठ्ठलाचे ते देखणे स्वरूप ठरतात. संत साहित्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं की, संतांची भूमिका ही तत्त्वचिंतकाबरोबरच जागल्याचीही राहिली आहे. लोकशिक्षकाचीही आहे. परस्सर बंधुभाव, एकात्मता सतत नांदावी ही भावना, तळमळ संतांच्या अभंगांमधून सतत पहायला मिळते. देखणे सरांबद्दल लिहू तेवढं कमी आहे! पण संत तुकारामांच्या अभंगवाणीतल्या ओवीतच सांगायचं झालं तर –
उपकारासाठी बोलो हे उपाय ।
येणेविण काय चाड आम्हा ॥
बुडते हे जन न देखवे डोळा ।
येतो कळवळा म्हणोनि ॥
राजेंद्र हुंजे
सुप्रसिद्ध पत्रकार
9930461337