आयुष्यावर बोलतो काही!

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे
कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे
नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल
तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस
दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका
दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे

आपले आयुष्य हे आपणच घडवायचे असते, हे सांगावयास का लागते हे मात्र मलाच काय पण बर्‍याचजणांना कळत नाही. म्हणूनच मला माझ्या ‘जगावे परी कीर्तिरूपे उरावे’ ह्या कवितेच्या ओळी आठवल्या. आयुष्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान ह्यात आहे असेच मला भासायला लागले. जन्मापासून मरणापर्यंत आपली जी काही धडपड, वणवण, तडमड चाललेली असते ती पाहिली की हे सारे आपण कशासाठी करतो आहोत असा एक प्रश्‍न मला तरी नेहमीच पडतो! त्याचे उत्तर त्या प्रश्‍नातच असते आणि ते आपल्याला सापडत नसते. म्हणूनच संपूर्ण आयुष्य आपण ह्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात खर्ची घालतो. शेवटी त्याचे उत्तर मिळते का? तर हो पण आणि नाही पण, असे उत्तर आहे. कारण जिवंतपणी उत्तर सापडले तर आपले हे आयुष्य सार्थकी लागले असे वाटते आणि नाही असे उत्तर असेल तर, हे आयुष्य अपूर्ण राहिले असे म्हणावे लागते.  परंतु हे जो जातो ना त्याला कधीच कळत नाही. त्याच्या मागे राहिलेल्यांना ह्या प्रश्‍नांची उत्तरे शोधावी लागतात आणि तसे करताना तेही त्यांचे आयुष्य त्यात खर्ची घालतात. काही सफल होतात आणि काही असफल!  हा सगळाच खेळ असतो नियतीचा, आपल्या संचिताचा आणि प्रारब्धाचा! आपल्याला आयुष्यात बर्‍याच गोष्टी कळतातच असे नाही.

विणले तर कळतात – कष्ट घरट्याचे ।
पाहिले तर कळते – कारण घडल्याचे ।
लिहिले तर कळतात – अर्थ शब्दांचे ।
वाचलेच तर कळते – मन लिहिणार्‍याचे ।
स्पर्शानेच तर कळते – विश्‍व भावनांचे ।
डोळ्यांनाच तर कळतात – भाव मनाचे ।
कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे ।

आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आपल्याला सगळ्या प्रश्‍नांची सोपी अशी उत्तरे देवू शकतो, असा माझा तरी अनुभव आहे. म्हणूनच, मला आयुष्यावर काहीतरी लिहावे असे वाटले आणि आजवरील माझ्या आयुष्याचा हा प्रवास मला कसा वाटला हे शब्दांकीत करावेसे वाटले. प्रत्येकाचे आयुष्य हे निराळेच असते, ज्याची त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते आणि ते जगण्याची पद्धतही निराळीच असते. तरीही बर्‍याचशा गोष्टींमध्ये काही साम्य तर नक्कीच असते. नेमके तेच टिपून त्यावरून काही उद्बोधक असे विचार जर मांडता आले तर हे एकप्रकारचे समाजप्रबोधन होऊ शकते अशी मला पुसटशी आशा वाटली व मी माझ्या लेखणीला साद घातली की चल मी आज आयुष्यावर बोलतो काही आणि तू ती त्याच उत्कटतेने व्यक्त कर!

माझे बालपण बेताच्या परिस्थितीत परंतु अतिशय सुसंस्कृत वातावरणात गेलेले. माझे वडील तर माणुसकीचे प्रतिष्ठानच नव्हे, तर माणुसकीचे एक अधिष्ठानच होते. आई माझी खूपच सुशील! आमच्या आयुष्याचा ती तर एक कंदील. मला माझ्या आईवडिलांकडून वारसाहक्काने मिळालेली कष्ट, स्वाभिमान, नीतिमत्ता, सचोटी, इमानदारी, प्रामाणिकपणा आणि माणुसकी, हीच काय ती अमुल्य अशी दौलत, जी आज माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन गेली आहे. त्यामुळे आनंदाने आणि स्वाभिमानाने कसे जगता येते ह्याचे उत्तम उदाहरण, जो काही आज मी तुमच्या समोर उभा आहे तो रवी, कवी, लेखक होय. मन लावून प्रामाणिकपणे कष्ट करणे हा तर माझा छंदच आहे म्हणा!  त्यात मला आनंदही खूप मिळतो आणि समाधानही मिळते.

नियतीच्या खेळाचे एक रूप मला माझ्या पन्नाशीलाच जाणवले. आमच्या लहानपणी आम्ही भावंडे नारायण पेठेतील प्रेसमधून छापून झालेले कागद मुडपायला घरी आणायचो व त्याचे आम्हाला 10000 कागदांना एक रुपया असे पैसे मिळायचे. बेताच्या परिस्थितीमुळे आई वडिलांच्या संसाराला, आम्हा भावंडांचाही थोडाफार हातभार लागावा, हेच काय ते आमचे संस्कार आम्हाला सांगत होते. तोच मी जेव्हा नारायण पेठेतल्या एका प्रेसमध्ये माझा ‘प्रतिबिंब’ हा काव्यसंग्रह, वयाच्या पन्नाशीनिमित्त छापण्यासाठी घेऊन गेलो होतो तेव्हा माझे ऊर कसे अभिमानाने भरून आले होते. स्मृती पटलावरून तो सगळा काळ अक्षरशः एका क्षणात आपसूकच तरळून गेला आणि डोळे पाणावले.  त्या अश्रुंमध्ये मला माझ्या आईवडिलांच्या अथक कष्टाचे, त्यांच्या प्रामाणिकतेचे, स्वाभिमानाचे आणि सचोटीचे प्रतिबिंब पडताना पाहून, मन गलबलून गेले होते.  क्षणभर वाटले की, हे स्वप्न तर नाही ना! जेव्हा प्रतिबिंबची पहिली प्रत मी हातात घेतली तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई जशी आपल्या छातीला लावते, कुरवाळते, माया करते, अगदी तीच भावना माझ्या मनात दाटून आली होती. होय आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुमच्यावर झालेल्या संस्काराचे प्रतिक जेव्हा तुमच्या हातात पडते तेव्हा आपल्या ह्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची एक भावना मनात त्याक्षणी येऊन जाते तिला ह्या जगात तोड नाही असेच मला वाटते. म्हणूनच मला ह्या आयुष्यावर बोलावेसे वाटले. मला तुम्हांला सांगावेसे वाटते की, आयुष्यात कुठलीच गोष्ट कठीण नाही हो! आपल्याकडे फक्त महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि इच्छाशक्ती असायला हवी, बाकी काही नाही.

आयुष्य आपल्याला पदोपदी काही ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक घटना अथवा प्रसंग हा वाईटातून काहीतरी चांगले आपल्यासमोर ठेवतच असतो. फक्त आपल्याला संयम राखून, परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा दृष्टिकोन असण्याची गरज मात्र नक्कीच असावी लागते. मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता त्यावेळेस माझ्याकडे एक सायकल होती. अंगावर घालायला जरा बरे परंतु आमच्यापेक्षा बर्‍या परिस्थितीत असलेल्या एका भावाचे वापरून झालेले जुने कपडे होते. ते रफू करून, मापाचे करून, धुऊन, इस्त्री करून वापरायचो. ही परिस्थितीची अथवा काळाची गरज होती आणि मला ह्या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही. उलट अशा परिस्थितीतही आम्ही सर्वांशी मिळून मिसळून व स्वाभिमानाने रहायचो. त्याचं काय आहे!  गरजा आपल्या संपतच नाहीत, आशा माणसांच्या थकतच नाहीत, परिस्थितीचेही भान रहात नाही. महत्त्वाकांक्षांचा हा सागर गरजेतूनच आकार घेतो आणि ह्या गरजा भागविण्यासाठी मग तो एल्गार करतो.
प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे गणित एकदा तरी मांडून पहावे असे मला कायम वाटते. तेव्हाच त्याला कळेल की काहीतरी राहून गेले आहे ते! आयुष्याचे गणित मांडायला आपल्याला जमतच नाही असे वाटू लागते आणि तो किती अवघड प्रकार आहे हे उमजायला लागते. हे गणित मांडायला आपल्याला आपल्या आयुष्याचा, घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा, तसेच आपल्यावर झालेल्या संस्कारांचा खूप अभ्यास असावा लागतो, जो कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही.  ज्याने त्याने हे गणित आपल्या अनुभवातूनच मांडायचे असते. जर का हे गणित मांडायला आपण चुकलो तर आपले आयुष्य मात्र भरकटत जाते. तसेच ते जर जमले तर मात्र आयुष्यच सफल झाल्याचे भाग्य लाभते. आयुष्याच्या गणितात फक्त भावनांनाच फार मोठे आणि मानाचे स्थान असते हे विसरू नका. ह्या भावनांचा संख्याशास्त्राच्या नियमानुसार गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करायची असते आणि त्यातूनच आयुष्याला एक आकार द्यायचा असतो. गणितात शून्याला अनन्यसाधारण किंमत असते बरं का!  कारण जो हे गणित व्यवस्थित मांडू शकतो, तो मात्र नक्कीच शून्यातूनच विश्‍व निर्माण करू शकतो. जरी हा संख्याशास्त्राचा खेळ असला तरी त्यात आपल्या जीवनातील बहुमूल्य अशा भावनांचा सुरेख मेळ घालावा लागतो. म्हणूनच, मला म्हणावेसे वाटते की,

जगण्यासाठी जगायचे नसते,
कारण जगण्याचे गणित निराळेच असते ।
गंमत खरी जीवनात असते,
हसत हसत हे जीवन जगायचे असते ।
हार जीत ही नेहमीच असते,
हारता हारता जिंकायचे असते ।
जिंकण्याचे ध्येय अभेद्य असते,
फिरुनी परत पहायचे असते ।
प्रेम करावे जगण्यावर,
जगण्याच्या प्रत्येक घडीवर,
रचता जीवन पायात येई हो गोळे,
हे तर नियतीचे एक प्रारूप असते ।
तत्त्व हे जीवनाचे मूळ असते,
स्वाभिमानच जीवनाचे तत्त्व असते ।
अभिमान हा जगण्याचे साधन असते,
ज्ञान तर जीवनाचे सत्त्व असते ।
अपमान गिळून जगायचे असते,
स्वार्थातूनच परमार्थ साधायचे असते ।
नीतिमत्ता तर जीवनाचे अंगच असते,
भक्ती हीच जीवनाची शक्ती असते ।
जीवन हे असेच असते,
जगण्यासाठी जगायचे नसते ॥

आयुष्याच्या एका संध्याकाळी मला सहज वाटले की आपण अगदी सहजच आपल्या पन्नास वर्षांच्या ह्या आयुष्यात जरा डोकावून पाहुयात! आणि काय सांगू तुम्हाला, मला माझ्या ह्या फाटक्या आयुष्याला ठिगळे लावावीत की काय असे वाटू लागले. मग काय,

मी घेतली ठिगळे लावायला,
किती लावू,  कशी लावू,
असे मी विचारले ठिगळांनाच।
एक ठिगळ घेतले बालपणाचे,
दुजे ठिगळ लावले तारुण्याचे,
मला जाणवले की संपतच चाललेत,
दिवस आता आयुष्याचे ।
तिजे ठिगळ घेतले कष्टाचे,
चौथे ठिगळ शिवले कर्तृत्वाचे,
मला समजले की
थकत चालले आहे शरीर हे हाडा मासाचे ।
पाचवे ठिगळ विणले स्नेहाचे,
सहावे ठिगळ काही प्रेमाचे,
तेव्हा मला भासले,
जणू रिक्तच होत चाललेत,
मांडवच माणसांचे ।
शेवटी, कंटाळून ठिगळच मला म्हणाले,
कशासाठी हा अट्टाहास चाललाय तुमचा.
अहो विरलय तुमच आयुष्य,
प्रयाण करावे आता वैकुंठास ।

एक नक्की वाटते की आयुष्याच्या प्रत्यके टप्प्यावर माणसाने आत्मपरीक्षण करावे.  आपले कुठे चुकले व कसे चुकले हे समजेल आणि त्यात जर का कोणी दुखावले अथवा दुरावले गेले असेल तर त्यांची माफी मागण्याची एक संधीतरी ह्या जन्मी मिळून जाईल. चुकतो तोच माणूस असतो आणि त्या चुकांमधून शिकून स्वत:ला सुधारतो तोच माणूस आपले आणि आपल्या आप्तेष्टांचे आयुष्य सुखी व समाधानी करू शकतो ह्याचा मला आत्मविश्वास आहे.

आयुष्यात आपण खूप चढ उतार अनुभवतो.  कधी कधी काही घटना आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करून जातात.  अशा घटनांमुळे आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन एकदम नकारात्मक होऊन जातो आणि भावनांच्या हिंदोळ्यावर असे हे झोके खात असतांना, शेवटी वाटायला लागते की कोणासाठी कशासाठी, आजवर उभारले हे इमले ! पडणारच होते सारे, मग उभारलेच कसले ! हे असेच का असते सारे, तंत्र हे मज ना उमगले ! कशासाठी, कोणासाठी, आयुष्यभर हे झमेले. तडफडत, तडमडत केले सारे, का न मज हे आजवर समजले ! अंतरा अंतरावरती, होते किती अडथळे, उभारताना ही मज, नाही कोणी अडवले ! पडतांना पाहत होते सारे, जे कधी उभारतांनाही नाही दिसले.

माणूस ही एक अशी चीज आहे की त्यात हेवे दावे, भांडण तंटे, रुसवे फुगवे, क्रोध, त्रागा, एकमेकांचा दुस्वास, हे मला तर एका माणसाला निसर्गाने दिलेल्या एखाद्या शापा सारखेच वाटतात.  त्यातच मानवाच्या आयुष्यातील बराचसा वेळ हा हे रुसवे फुगवे काढण्यातच जातो असे मला राहून राहून वाटते. रुसवे फुगवे काढण्यातच, आयुष्य जायचं, कोणी किती रुसायचं,  किती फुगायचं, ज्याचं त्यानेच ठरवायचं ! कधी आमचं चुकायचं,  तर कधी तुमचं. चुकण्यातूनच नाही का आपण सुधारायचं, भांडता भांडता ही असत,  थोडंस हसायचं !  मुद्दा कळीचा, अथवा नळीचा, प्रत्येकाने आपलाच घोडं किती दामाटायचं, कधी तरी ऐकून दुसर्‍याच, असत समजून घ्यायचं !

हे सगळे तत्वज्ञान मी का पाजळत आहे हे मलाच अजून तरी समजले नाही बर का !. त्याचे कारण आपल्या आयुष्यात आपल्या कळत नकळत खूप काही घडत असते आणि तर्क वितर्कातच आपले जीवन झुंजत राहते. जगण्याच्या आशेवरच जीवन फुलत जाते.  आशेच्या पंखावर अपेक्षांचे वादळ उठते तर कधी कधी आयुष्याच्या संधेवरतीही मळभ दाटते.  तेंव्हा, पंख असूनही आपले आकाशच हरवते आणि हे जीवनच दिशाहीन भासू लागते.  उगवताच सूर्यास,  मावळून टाकते, आठवणींच्या हिंदोळ्यांवर मन मात्र तरंगत राहते.  आठवणींचे हे ओझे,  मानगुटीवर बसते, वाट फुटेल, तिकडे चालतच राहते. असूनही दृष्टी, अंध ते होते, जन्म-मरण विधी लिखितच असते, मरण्यासाठी जगायचे नसते,  मरण्यासाठी जगायचे नसते. जरी मरण्यासाठी जगायचे नसते हे माहिती असले तरी मनुष्य स्वभावानुसार प्रत्येकजण ह्या चुका आयुष्यभर करतच राहतो आणि जेंव्हा त्याला हे उमजते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो.

आयुष्यात थोडेसे मागे वळून पहिले की वाटते की,  आपल्याला ना ह्या जीवनाचा अर्थच समजत नाही ! कसे जगावे तेच उमजत नाही !  परिस्थितीवर मात होतच नाही ! कळते सारे, पण वळतच नाही !  निष्कलंक जीवन लाभतच नाही आणि हातून एखादे उदात्त कर्म घडतच नाही !  कस्पटा समान हे जगणे वाटू लागते ! स्मशानातही शांतात लाभेल का हो असा एक प्रश्न निर्माण करून कोणाच्या खांद्यावरून आपण जाणार आहोत हे काही कळत नाही ! पण आईची कुस मात्र आठवत राहते ! ते हे आयुष्य तसे पाहायला गेले तर निष्फळ वाटू लागते अर्थात हा ज्याच्या त्याच्या कर्माचा एक भाग असतो.  त्याने आपले आयुष्य कसे व्यथित केले आहे त्यावरच ह्या भावना अवलंबून असव्यात असे वाटते आणि हो प्रत्येकाला त्या लागू असतील असेही नाही !.

सर्वसाधारण माणसाने तसेही फारसे कोणाशी वैर केलेले नसते हो आणि त्यात निसर्गाचा एक नियमच तो आयुष्यभर पाळत आलेलो असतोच की, पाण्यात राहून त्याने माशाशी कधीही वैर केलेले नसते आणि त्याला त्यात फारसे काहीही  गैर केले आहे असे वाटतच नाही !  तो कित्येकदा केलेले करार मोडत असतो आणि त्याचेच मन त्याला सांगत असते की बघ जिंदगी आता तुझी,  काही खैर नाही !  तो नियतीच्या तालावर, आयुष्यभर नाचत असतो कारण आयुष्याच्या तमाशात असाही तो कधीही स्वैर नसतो ! नियती त्याला एका हाताने देत असते आणि दुज्या हाताने काढून नेत असते तरीही त्याचे मन सैरभैर होत नाही तो खरा प्रगल्भ माणूस ! हा माणूस मरतो आहे जगतांना खुपदा तरीही त्याला मरत मरत जगण्यातही,  काही गैर नाही असेच वाटत राहते !  त्याला एकच तत्वज्ञान माहिती असते की मोठा मासा खाई, लहान माशास, आणि व्यवहारात असे होणे, तसेही फारसे काही गैर नाही. आहे की नाही गमतीशीर असे हे आपले आयुष्य.  काय बोलावे त्यावर हेच कधी कधी सुचत नाही.

म्हणूनच, मी बर्‍या वाईटाचा फारसा विचारच कधी केला नाही हो.  चूक काय बरोबर काय हे ही मला कधी समजलेच नाही, जे जे नियतीने घडवले तसे ते ते घडले, मी निमित्त मात्र होतो बाकी काहीच नाही. सूर्याने रोज उगवायचे आणि मावळायचे, चंद्र चांदणे दिवसा कधी दिसायचे नाही.  विचार करुन करुन मन कधी कधी थकते, नियतीवर अजूनही नियंत्रण कोणाचे नाही असे वाटते.  पंखात बळ असे तोवर असते की उडायचे, थांबला तो संपला नाही, असे कधी घडायचे नाही.  नशिबाला दोष देण्यात जाते हयात आपली, कर्मावर बोट ठेवण्याची आपली हिंमत नाही.  पाषाणाला असते की हृदय हे, दगडास फुटतो पाझर पण नियतीस नाही.  धर्म जात कुळ गाव राज्य आणि राष्ट्र काय, हे सारे आपल्या उपयोगाचे असतच नाही.  करावी भक्ती आणि असावी श्रध्दा कर्मावरी, दैव देते आणि कर्म नेते हे काही शास्त्र नाही.  जगावे परी किर्ती रुपे उरावे म्हणातात सारे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलेच नाही.  जगणे हे अजिबात मुष्किल झाले वाटते. जिवंत असे पर्यंत जगण्यास पर्याय नाही.

कधी ना कधी, कुठे ना कुठे, अशी एक भावना माणसाच्या आयुष्यात येत असते की, ह्या जगण्याने मला झिडकारले होते, त्याच मरणाने मला, स्वीकारले होते. केलेत मी परिस्थितीशी, दोन हातही येता जाता कित्येकांनी, नाकारले होते. टिपरी गत पाण्यावर, मज फेकलेही, तरंगही पाण्यावर मी,  साकारले होते. बांधुनी पायी चाळ  मज नाचविलेही.  बोर्डास अदाकारीने मी  झंकारले होते.  नथ माझी ही सैलावली कुठे जराशी,  बारीने तेंव्हाच मज धिक्कारले होते. अनंत वेदनांनी भरलेली,  ही झोळी रिती करण्या, यमास मी पुकारले होते. अर्थात माणसाने कुठेतरी थांबायचे असते हे त्याला कळले तर त्याचे आयुष्य सुखकर होऊ शकते.

तरीही माणूस ह्या आयुष्यासाठी वणवण करतच राहतो.  आपण केलेली वणवण म्हणजे काय सांगू आणि कसे सांगू हेच कळत नाही.  आयुष्यभर जगण्यासाठी केली, वणवण आहे, मेल्यावर जळण्यासाठी साठवितो,  सरपण आहे ! जगतोच आपण कशासाठी, उमगतच नाही, सरपणाचे जगतांनाही मनावर,  दडपण आहे !  जन्मताच मृत्यूही असतो नशिबी लिहिलेला, दडपणातच जगण्याचेही,  एक वेगळेपण आहे !  मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते, वेगळेपणातच मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे ! प्रतिभेने मिळवावी लागते,  आपली प्रतिष्ठा, अजाणतेपणातच,  प्रतिष्ठेचे देवपण आहे !  सरपणासाठीचीच ही, एक धडपड वाटते, देवपणातून शेवटी, मृत्यू हे समर्पण आहे !.

हे सगळे असेच होत राहते आणि आपल्याला कळतच नाही की, माझे मलाच ना कळले, आयुष्य हे कसे ढळले !  होते दु:ख मी खूप सोसले, सुख हे मज नाही झेपले !  सुखास मी एकदा पाहिले, दु:खच मज आपुले वाटले !  वळून मी मागे पाहिले. दु:खच मज सांगाती राहिले ! दु:खाकडे हसून मी पाहिले, दु:खातही सुख मज दिसले.  ह्या आयुष्याच्या वादळात एक अतिशय उत्कट अशी भावना आपल्या मनात कायमच येत असते की, आसवेच आज माझी फितूर होती, वाहण्यास ती ही आज आतुर होती !  मोकळ्या कुठे होत्या पापण्या तेंव्हा, आसवेही आज माझी लाचार होती !  तुफान एक भावनांचे घोंगावत आले, आसवांनाही भावनांची लकेर होती !  वेगात येऊन एक वादळ गेले होते, लोचनी उदासीची झालर होती !  क्षणात सारे विस्कटूनी गेले होते, आसवेच माझी माझा आधार होती !  मुकाट सोसले घाव मी उरावरी, आसवांचीच माझ्याकडे तक्रार होती !

ह्याचे एकमेव कारण की आपल्याला माणसांचा अंदाज कधी बांधता येतच नाही.  त्यामुळे माणूसही असा कधी कळलाच नाही.  ह्या जगात आता साधा भोळा असा कोणही राहिलाच नाही.  भावनांचे अनंत सागर जरी आपण पार करून आलो, तरीही माणुसकीचा किनारा काही लाभत नाही. त्यामुळेच की काय नियतीला सांगतो आहे की, तू दूर कुठेही अगदी सागरीही घेऊन जा, कारण माणूस अजूनही गवसलाच नाही. त्यामुळेच की काय मला आता निवृत्तीचे वेध लागू लागलते.  हे क्षण निवृत्तीचा कसे असतील असे मी जरा माझ्या मनाशी मांडून पाहत होतो आणि हे क्षण माझ्याशी बोलायलाच लागले हो. क्षण निवृत्तीचा,  असतो दुभाषी, एक मन म्हणते,  निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते,  सक्रीय व्हावेसी !  क्षण निवृत्तीचा,  असतो विलक्षण, एक मन करते,  भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण !  क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ, एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ !  क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी, एक मन म्हणते,  उरलास सकळासी, दुजे मन सांगते,  जुळवून घे समाजासी ! त्यातूनच मला जगण्याचा एक मंत्र सापडला. मोह ना कशाचा मजला आहे

रवींद्र कामठे
9822404330

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा