Dehu Alandi Pandharpur Wari 2017 Image

पाऊले चालती पंढरीची वाट

Share this post on:

पाऊले चालती पंढरीची वाट ।
सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥

असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्‍याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात.

आषाढी वारी फार महत्त्वाची मानली जाते भागवत धर्मात. स्वतः पांडुरंगाने नामदेवरायांजवळ आपले गुपित सांगितले आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगतसे गूज पांडुरंग ॥

आषाढ ते कार्तिक हा चातुर्मास म्हणजे भागवत धर्माच्या अभ्यासकांचा, संतांचा, भागवत धर्म मानणार्‍यांचा फार महत्त्वाचा काळ. या काळात हजारो वारकरी मठ, मंदीर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादी कार्यक्रमात भाग घेतात, भागवत धर्माचा अभ्यास करतात. पांडुरंगाचा सहवास अनुभवतात. आषाढीला ज्याप्रमाणे वारकरी पांडुरंगाची आस घेऊन धावत येतात तसाच तो विठूरायाही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो. पेरण्या झालेल्या असतात, शेतकरी विठूरायाला पाऊसपाणी भरपूर होऊ दे असं साकडं घालायला, सगळीकडे आबादानी होऊ दे, सुखसमृद्धी नांदू दे म्हणून विनवायला त्याच्याकडे जातात. तसेच बर्‍याच वारकर्‍यांच्या घरी आषाढी-कार्तिकी वारी पिढ्यन् पिढ्या चालत आलेली असते.
संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरीच्या भेटीला येतात. तेव्हा विठूरायाच्या चेहर्‍यावर एक वेगळीच तकाकी येते. माहेरी आलेल्या आपल्या लेकींना बघून आईला जेवढा आनंद होत असेल तसाच आनंद विठू माऊलीलाही होतो. मग ती मऊली आपल्या लेकरांसंगे जणू नाचू-गाऊ लागते.
विठू माझा लेकुरवाळा ।
संगे गोपाळांचा मेळा ॥

ही उक्तीच जणू सार्थ होताना दिसते. सगळी पंढरी  ‘ग्यानबा-तुकाराम‘, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ च्या जयघोषाने दुमदुमून जाते.

सगळ्यांसाठी ओसंडले पात्र ।
सर्वां अधिकार आहे येथे ॥

असा विश्‍वास मनात जागवत, सगळे वारकरी भजन, कीर्तनात रंगून जातात. चार घटका आपल्या संसार चिंता विसरून जातात आणि एकमेकांच्या पायी लागत चंद्रभागेच्या काठी खेळ मांडतात. चंद्रभागा दुथडी भरून वाहत असते आषाढात. तिलाही प्रेमाचे भरते आलेले असते. आनंदाने चंद्रभागेत डुबकी मारतात हे भोळे भाविक. आपल्या घरापासून चालत, अनेक भक्त, वारकरी एकत्र येऊन भजने गात,  रामकृष्णहरीचा गजर करत, पांडुरंगाच्या कथा सांगत पंढरपूरला जातात व चालत परत येतात. त्याला दिंडी म्हणतात. या दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरात पोहचतात. पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य धन्य होतात.

टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट ती चालावी पंढरीची ॥
गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का, मुखात हरीनामाचा गजर आणि पावलात पंढरीची ओढ अन्य काही या भक्तांना माहीत नसते. अहंकार येथे गळून पडतो. श्रीमंत-गरीब, सान-थोर असा काही काही भेद राहत नाही त्यांच्या मनात आणि आचरणात. म्हणूनच एकमेकांच्या पायावर सहज डोकं ठेऊ शकतात. सगळ्यांमध्ये परब्रह्माचा वास अनुभवत ही वारी संपन्न होत असते.

वारी हे एक व्रत आहे जे वारकरी निष्ठेने, भक्तीभावाने आणि आत्यंतिक आनंदाने पाळतात. वारी म्हणजे आत्मसुखाचा, आध्यात्मिक सुखाचा परमोच्च बिंदू आहे वारकर्‍यांसाठी. भगवत भक्तीचा आविष्कार आहे ही वारी आणि मुक्तीतील आत्मानंदाचा व भक्तीतील प्रेम सुखाचा अनुभव आहे. भागवत धर्माची साधी सोपी शिकवण सहज कोणालाही आत्मसात करता येण्यासारखी आहे. प्रत्येकाने स्वधर्म सूर्य पहावा म्हणजेच आपापली कर्मे पार पाडावीत; पण ती पार पाडत असताना परमेश्‍वराला स्मरावे.  हरी मुखे म्हणत जावे. अजून त्या श्रीरंगाला काही लागत नाही. कुठलेही कर्मकांड टाळण्याचा संदेश देते वारी. वारी हा एक सामाजिक संदेश सुद्धा आहे. सामाजिक एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले असतात.
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई ।
नाचती वैष्णव भाई हो ॥

एकमेकांना संतश्रेष्ठ खूप आदराने वागवतात. समाजाला एकीचा, शांतीचा, आनंदाचा वसा देतात. नवी पिढीसुद्धा कधी कुतूहलाने तर कधी शोधकपणे, कधी भाविकपणे तर कधी खोचकपणेसुद्धा वारी अनुभवते आहे. बरेच तरूण या वारीचं काय बाबा वेड असतं लोकांना? काय असेल वारीची जादू? अनिवार ओढीने वारकरी का करतात वारी? अस म्हणत वारी अनुभवायला पायी दिंडीत जातात. खूप भक्तगण, सामाजिक संस्था, मंडळे वारकर्‍यांना अन्न, पाणी, औषधे, अंथरूण-पांघरूण याची सोय करून जनसेवा हीच ईश्‍वरसेवा हा वसा चालवतात. एकंदरीत सगळेच विठूरायाच्या भक्तीत धुंद होतात. पंढरपूरला भूवैकुंठच म्हणले जाते आणि हे वैष्णव तर पंढरपूरला आपले माहेरच मानतात. विठ्ठलाला आपला माय-बाप, कैवारी मानतात. त्याला डोळा भरून पाहतात आणि देहभान विसरून गातात.
चालला गजर, जाहलो अधिर,
लागली नजर कळसाला ।
पंचप्राण हे तल्लीन आता
पाहिन पांडुरंगाला ॥
माऊली माऊली माऊली…

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >
error: Content is protected !!