सोलापूर (प्रतिनिधी) : वाढत्या तापामानामुळे वन्य प्राण्यांचे आणि पक्षांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. सोलापुरातील माळरानावर वन्यप्रेमी पप्पू जमादार यांना एक मोर जखमी अवस्थेत आढळून आला होता. तापमानात झालेल्या वाढीमुळे या मोराच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. ही गोष्ट लक्षात येताच वन्यप्रेमी जमादार यांनी या मोराला सोलापुरातील प्राणीसंग्रहालयात आणले. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मोराच्या दोन्ही डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याचे दोन्ही डोळे झाकले गेले आणि तो माळरानावर भरकटला होता. त्यानंतर प्राणीमित्र मुकुंद शेटे यांनी पुढाकार घेत त्या मोरावर उपचार करुन घेतले. याकामी पशुवैद्यकीय अधिकारी घनशाम पवार, महापालिकेचे डॉ. भारत शिंदे, राहत संस्थेचे डॉ. राकेश चित्तोड यांनी सतत सहा दिवस या मोरावर उपचार केले.
आठ दिवसानंतर या मोराला पुन्हा अभयारण्य क्षेत्रात सोडण्यात आले. विशेष म्हणजे दृष्टी शेटे ह्या सहा वर्षीय बालिकेच्या हस्ते या मोराला निसर्गात मुक्त करुन तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी सोलापूर वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र बनसोडे, पप्पु जमादार, भीमाशंकर विजापुरे, सुयश गुरूकुलचे संस्थापक केशव शिंदे उपस्थित होते.