कुलभूषण जाधव खरेच हेर आहे काय?

कुलभूषण जाधवमुळे ‘भारतीय हेरगिरी’ हा चर्चेचा विषय बनली आहे. कुलभूषणला पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीयांनी कुलभूषणला परत आणण्याची मागणी जोरात सुरु केली आहे. भारत सरकारनेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. कुलभूषणला फाशी दिली तर तो पूर्वनियोजित खून ठरेल असेही भारताने सुनावले आहे. या सर्व प्रकरणाचे विश्‍लेषण आपण करुच, पण मुळात कुलभूषण जाधव हेर होता की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

आपल्याला गुप्तहेर माहीत असतात ते चित्रपट व कादंबर्‍यातून! त्यातील त्यांची साहसे, जीवघेणी कारस्थाने, सनसनाटी मारामार्‍या, श्‍वास रोखून धरायला लावणारे पाठलाग,  ते वापरत असलेली अत्याधुनिक साधने इत्यादींचे प्रचंड आकर्षण आपल्याला असते. इंग्रजीतील हेरकथांनी जगभराच्या वाचकांना वेड लावले आहे. जेम्स बॉंडसारख्या ‘एमआय 6’ या ब्रिटिश हेरखात्याच्या हेराने तर जगावर अद्भुत गारुड केले आहे आणि ते आजही कमी होत नाही. तुलनेने भारतीय म्हणता येतील अशा हेरकथा मात्र दुर्मीळ आहेत. मी 1985 साली लिहिलेली ‘डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर’ ही पहिली भारतीय राजकीय हेरकथा म्हणता येईल. नंतर मी पाकिस्तान व चीनच्या पार्श्‍वभूमिवर भारतीय हेरांवर आधारित कादंबर्‍या लिहिल्या. त्यातील काही इंग्रजीतही अनुवादित झाल्या व गाजल्याही! पण पाश्‍चात्य लेखकांना जेवढी संदर्भ साधने त्या काळात उपलब्ध होती ती आपल्याकडे जवळपास अभावानेच असल्याने या लेखनावर मर्यादाही होत्याच. मी प्रत्यक्ष जीवनात खाजगी गुप्तहेर संस्थाही चालवली असल्याने मला फिल्डवर कसे काम चालते याचा नेमका अनुभव होता; त्यामुळे मला माझ्या लेखनात ते अनुभव आणता आले.

कुलभूषण जाधव या प्रकरणाने मला माझ्या ‘अंतिम युद्ध’ या हेरकादंबरीची आठवण येणे अपरिहार्य होते. मुळात ही पाकिस्तानात घडणारी कथा. तिचा नायकही मराठी माणूसच! ‘रॉ’ या भारतीय हेरसंस्थेने त्याला सैन्यातून उचललेले असते. पाकिस्तानात त्याला रॉ तर्फे एक कट घडवून आणण्यासाठी नाव बदलून, बोगस पार्श्‍वभूमी बनवून व प्रचंड ट्रेनिंग देऊन पाठवले जाते. कराचीत हळूहळू उच्चभ्रू राजकीय वर्तुळात प्रवेश करत तो कशी माहिती काढत जातो. नंतर भारतीय वरिष्ठांच्या झालेल्या गैरसमजातून त्याच्यामागे कसे भारतीय हेर आणि मग पाकिस्तानी हेरही लागतात आणि त्याला कशी जिवावरची संकटे झेलावी लागतात याची सर्वसाधारण कथा या कादंबरीत होती. पाकिस्तानात भारतीय हेराला पाठवायचे तर काय किमान ट्रेनिंग द्यावे लागते याचेही चित्रण मी या कादंबरीत केले होते.

कथा-कादंबर्‍या व चित्रपटातील हेर हे तुलनेने फारच गतिमान घटनांतून जातात. त्यात थरारकता असते. प्रणयी दृष्यांचीही रेलचेल असते. प्रत्यक्षात मात्र तसे क्वचितच असते. खरे म्हणजे हेरगिरीमध्ये धोका प्रचंड असला तरी प्रत्यक्ष काम फार म्हणजे फारच संथ गतिने चालणारे व कंटाळवाणे असते. प्रतिक्षणी सावध रहावे लागते ते एक्स्पोज होऊ नये म्हणून! आपली आयडेंटिटी ओपन होऊ नये म्हणून! हेराचे सर्वात महत्त्वाचे काम हे असते की, आपली खरी ओळख चुकूनही उघड होऊ नये अथवा साधी शंकाही येऊ नये एवढ्या सावधगिरीने वागणे! असे होण्याची किंचित शंका जरी त्याला अथवा वरिष्ठांना आली तर ओळखीचा विस्फोट होऊन काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्याला तत्काळ बाहेर काढले जाते. अर्थात हेही काम शिस्तीतच होते. यातही कसलाही गडबडगुंडा होऊ नये याची तयारी पूर्वनियोजितच असते; कारण प्रत्येक कामगिरीत सुचू शकतील त्या सर्व शक्यतांवर आधीच विचार केलेलाच असतो व सर्व शक्यतात आपल्या माणसाला सुखरुप बाहेर कसे काढता येईल याची पूर्व तयारीही केलेली असतेच! किंबहुना प्रत्येक हेराचा तो विमा असतो. आले मनात आणि पाठवले हेरगिरी करायला असे कधी होत नाही.

आपण येथे विदेशात जाऊन तेथे आयडेंटिटी बदलत हेरगिरी करणार्‍या अथवा एखादा कट राबवणार्‍या हेरांचाच विचार करत आहोत. हे काम वाटते तसे सोपे नसते. कोणतेही कट रातोरात अस्तित्वात येत यशस्वीही होत नाहीत. प्रचंड योजना त्यामागे असते. अनेक योजना दीर्घकाळ चालणार्‍या असतात. पाकिस्तानात (किंवा अन्य कोठेही) हेरगिरी करायची अथवा एखादा कट शिजवायचा तर हेराला जी नवी आयडेंटिटी दिली जाणार आहे ती संपूर्णपणे आत्मसात करावी लागते. ही आयडेंटिटीही अत्यंत विचारपूर्वक ठरवली जाते. त्या आयडेंटिटीचा बनावट पण अत्यंत विश्‍वसनीय इतिहास बनवावा लागतो. हेराला तो आत्मसात करावा लागतो. त्यातही जर पकडला गेलाच तर त्याच्याकडून कसलीही माहिती दिली जाऊ नये याचे तर अत्यंत कठोर ट्रेनिंग असते. पकडला गेला तर त्याला त्याचे सरकार कधीही स्वीकारत नाही. त्याला सोडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात; पण ते इतर मार्गाने! एक मार्ग म्हणजे बार्गेनिंग! इकडे पकडलेल्या हेराला सोडण्याच्या मोबदल्यात आपल्या हेराची सुटका करवून घेणे हा मार्ग अधिक वापरला जातो. बाकी दबावासारख्या बाबी हेर किती प्रबळ राष्ट्राचा आहे यावरुन तो यशस्वी होणार की अयशस्वी हे ठरते! पण राजनैतिक व अराजनैतिक पातळीवर प्रयत्न केले जातात. अधिकृतपणे आमचा माणूस हेर आहे हे कोणीही मान्य करत नाही हे ओघाने आलेच.
ज्या भागात पाठवायचे तेथील भाषा, संस्कृती, इतिहास हेराला माहीत असलीच पाहिजे, ही अपेक्षा अर्थातच असते. कोणत्याही भागात जेव्हा एखाद्या हेराला पाठवले जाते तेव्हा त्या भागात पूर्वी काहीतरी बेसवर्क केलेले असतेच. हे प्रारंभीक काम व्यापारी, प्रवासी, इतिहास-संशोधक अथवा पत्रकारितेच्या बहाण्याने गेलेल्या लोकांनी करुन ठेवलेले असते किंवा आधीच्या हेरांनी पाया बनवलेला असतो. त्याचाच उपयोग करत नवा हेर पुढे जातो. कोणती माहिती काढायची आहे व ती कोणाकडून मिळू शकेल याची संभाव्य यादीही आधीपासूनच तयार असते. हेर तसा एकाकी क्वचित असतो. अगदी मित्र राष्ट्रांच्या हेरयंत्रणाही मदतीला घेतल्या जातात. दुय्यम स्वरुपाचे सहायक कार्य करणारे हेर सोडले तर दीर्घकाळ एकाच ठिकाणी हेर ठेवण्याची चूक कोणतेही हेरखाते करत नाही. हेराने कोणत्या पद्धतीने काम करायचे हे जी माहिती मिळवायची आहे अथवा जो राजकीय वा घातपाती कट राबवायचा आहे त्याच्या स्वरुपावरुन ठरते.

महत्त्वाची बाब म्हणजे हे करत असताना हेराला स्वत:चे आयुष्य नसते. स्वत:चा भूतकाळही नसतो. तो ज्या नावाने काम करत आहे, त्याचा जो काही बनावट इतिहास बनवला गेला आहे तो इतिहास सत्यच आहे अशा पद्धतीने त्याला जगायचे असते. यातील चूक क्षम्य मानली जात नाही; कारण यामुळे त्या हेराचे प्राण तर संकटात येण्याची शक्यता असतेच पण तो ज्या राष्ट्रासाठी हेरगिरी करतो आहे ते राष्ट्र आणि शत्रू राष्ट्रातील संबंधही ताणले जाऊ शकतात. ते कसे हे आपण जाधव प्रकरणात पाहतच आहोत.

पकडलेल्या हेराशी कसे वागायचे हे ते सरकार त्या प्रकरणाकडे कसे बघते, किती गोपनीय माहिती चोरली गेली आहे, हेर कोणत्या राष्ट्राचा आहे व त्याचे प्रभुत्व कितपत आहे यावरही ठरते. अनेक हेर हे दूतावासाचे राजकीय संरक्षण असलेले अधिकारी असतात. दूतावास हे हेरांचे अधिकृत ठिकाण असते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पकडले गेले अथवा संशय आला तर त्यांची मायदेशी हकालपट्टी करण्यापलीकडे व निषेध नोंदवण्यापलीकडे फारसे काही होत नाही. अत्यंत गंभीर बाब असेल तर असे राजनैतिक संरक्षण असलेल्या हेरांचे खूनही केले जातात; पण अशा घटना क्वचित झालेल्या आहेत. मायदेशी परत पाठवणे हाच एक मार्ग बव्हंशी वापरला जातो! पण हे भाग्य इतर हेरांना लाभत नाही. त्यामुळे त्यांनी अधिक सावधान असणे भाग असते.

भारतीय हेर हे बव्हंशी सेनादलातूनच निवडले जातात. असे असले तरी दुय्यम-तिय्यम दर्जाचे हेर हे कोणीही असू शकतात. अगदी शत्रू राष्ट्रातील असंतुष्ट आत्मे हेरुन त्यांचाही उपयोग हेरगिरीसाठी केला जातो. त्याचवेळी आपले हेर किंवा वरिष्ठ अधिकारी शत्रू राष्ट्राला फुटू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक लक्ष ठेवणारीही यंत्रणा असतेच. शत्रू राष्ट्राची मिळेल ती माहिती हाती असणे उपयुक्त असतेच. मग ती प्रादेशिक अस्मितांच्या संघर्षांबाबतची असो, राजकीय घडामोडींबाबत असो, सांस्कृतिक चळवळींबाबतची असो की सामरीक सज्जतेबाबतची असो. कोणत्या माहितीचा कसा उपयोग करायचा याचे सखोल विश्‍लेषण हेरखात्यांच्या मुख्य कार्यालयात केले जाते व त्यानुसार योजना आखल्या जातात. बव्हंशी योजना पाण्यातही जातात; पण हेरखात्यांचे बजेट ही नेहमीच गोपनीय बाब असल्याने त्याबाबत कसलीही आकडेवारी शक्यतो कोणीही प्रसिद्ध करत नाही.

पाकिस्तान व भारत
भारताचे पाकिस्तान व चीन हे महत्त्वाचे शत्रू आहेत हे वास्तव आहे. वांशिक व भाषिक भेदामुळे चीनमध्ये हेरगिरी करणे हे भारतीय हेरांसाठी जवळपास अशक्य असेच काम आहे. मी ‘बीजिंग कॉन्स्पिरसी’ या कादंबरीत चीनमधील भारतीय हेराची अत्यंत सनसनाटी कथा लिहिली होती. चीनमधील विद्यार्थ्यांच्या तिआनमेन्ह चौकात चिरडल्या गेलेल्या आंदोलनानंतर उरलेल्या, विखुरलेल्या विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचा व सशस्त्र बंड करायला प्रेरित करण्याचा कट कसा शिजतो व चीनी पंतप्रधानांची मुलगी यात कशी ओढली जाते याचे चित्रण या कादंबरीत होते. चीनमध्ये दूतावास हेच महत्त्वाचे साधन भारताला वापरता येते. तेथे पोलादी पडदा असा की भारतीय हेरांना गोपनीय माहिती मिळवणे जवळपास अशक्य होऊन जाते. सीमावर्ती व व्याप्त प्रदेशात स्थानिकांच्या मदतीने हेरगिरी केली जाते; पण पाकिस्तानचे तसे नाही. वांशिक व भाषिकदृष्ट्या खरे तर या राष्ट्रात हेरगिरी करणे एवढे जड जाऊ नये. आर्थिक दारिद्र्य व लालच हे समान गुण भारतीयांत व पाकिस्तान्यांत आहेत. असंतुष्ट गटांची व फुटीरतावाद्यांची तेथे मुळात कमी नाही. त्यामुळे हेरगिरी करणे व फुटीरतावादाला प्रोत्साहन देणे हे तितके अवघडही नाही. आय.एस.आय. हेच कृत्य काश्मीरमध्ये आजही करते आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद्यांना प्रशिक्षण ते शस्त्रसामग्री कोणी पुरवली हे तर जगजाहीर आहे.

रॉ ही भारतीय हेरसंघटना आहे. शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत माहिती मिळवत राहणे व सरकारला धोरणे ठरवण्यासाठी मदत करणे हे तिचे मुख्य काम आहे. 1968 साली या संस्थेची स्थापना झाली. त्याला चीन युद्धाची पार्श्‍वभूमी होती. रामेश्‍वर नाथ काव यांच्या काळात या हेरसंस्थेला जागतिक प्रतिष्ठा मिळाली. बांगलादेशाची निर्मिती आणि सिक्कीमचे भारतात विलिनीकरण या महत्त्वाच्या कामगिर्‍या या संस्थेने बजावल्या. अशा अनेक छोट्या मोठ्या पण अत्यंत महत्त्वाच्या कामगिर्‍या रॉने बजावलेल्या आहेत. रॉचे एजंट हे बव्हंशी सैन्यदले, पोलीस व रेव्हेन्यू खात्यातीलही रिक्रुट्स असतात.
पाकिस्तान ही भारताची सर्वात मोठी कटकट आहे. पाकिस्तानला सहाय्य करायला चीनपासून ते अमेरिकेपर्यंत बलाढ्य राष्ट्रे असल्याने पाकिस्तानचा उपद्व्याप सातत्याने चालूच असतो. तो कधी घातपाती कारवायांच्या रुपाने तर कधी दहशतवादी गटांना सक्रीय मदत करण्याच्या रुपाने आपल्याकडे नेहमी चर्चेत असतो. या राष्ट्राशी नेमके वागायचे कसे हा भारतीय धुरिणांसमोरील एक यक्षप्रश्‍न असतो. असे असले तरी गुप्तहेरांच्या पातळीवर हे युद्ध निरंतर लढले जातेच. काश्मीरमध्ये आज जी स्थिती आहे ती पाकिस्तानने निर्माण केली आहे यात शंका नाही. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत काहीच करत नाही असेही नाही.

भारतात पाकिस्तानने फुटीरतावाद रोवल्याने भारतालाही प्रति-फुटीरतावादाचे शस्त्र काढणे भागच होते. त्यात पाकिस्तानचे तीन तुकडे पाडणे हा कट आखला जाणे स्वाभाविकच होते. ते कसे हे आपण खालील माहितीवरून लक्षात घेऊयात.

बलुचिस्तान
पाकिस्तानचे जे प्रमुख राजकीय विभाग पडतात त्यात बलुचिस्तान हा मोठा भाग आहे. येथील मुस्लीम हे बलुची वंशाचे असून त्यांचं सांस्कृतिक-सामाजिक जीवन हे प्राचीन काळापासून स्वतंत्र राहिलेलं आहे. बलोची हे ऋग्वेदात भलानस नावाने उल्लेखले गेलेले आहेत. 1947 साली पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हापासूनच बलुच्यांनी आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं यासाठी चळवळ सुरू केली होती. पाकिस्तानमध्ये सामील व्हायला बलुच्यांचा पहिल्या पासूनच विरोध होता; परंतु कलात संस्थानाने 1955 मध्ये पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांचा नाईलाज झाला! पण 1960 पासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर पकडू लागली. त्यामुळे संपूर्ण बलुचिस्तानात अराजक माजलं. शेवटी पाकिस्तानला 1973 साली इराणच्या मदतीने लष्करी कारवाई करून विद्रोह दडपावा लागला होता. यात हजारो विभाजनवादी क्रांतिकारी ठार झाले.

हे स्वतंत्रता आंदोलन चिरडण्यात पाकिस्तानला तात्पुरतं यश मिळालं असलं तरी 1990 नंतर ही चळवळ पुन्हा उभी राहिली. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ आणि ‘लष्कर-ए-बलुचिस्तान’ या संघटनांनी पाकिस्तानमध्ये आजवर अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. अर्थातच पाकिस्तानने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसामग्रीने श्रीमंत प्रदेश असला तरी दारिद्र्याचं प्रमाण याच भागात खूप मोठं आहे. पाकिस्तानने या भागाचा विकास घडवून आणण्यात विशेष पुढाकार घेतल्याचं चित्र नाही. त्यामुळे आणि बलुच्यांच्या रक्तातच असलेल्या स्वतंत्रपणाच्या जाणिवांमुळे स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ थांबणं शक्य नाही. दुसरं महत्त्वाचं असं की बलुचिस्तानचा पश्‍चिम प्रभाग इराणमध्ये सध्या मोडतो. स्वतंत्र बलुचिस्तान होणं इराण्यांनाही अडचणीचं वाटत असल्याने याबाबतीत तरी इराण आणि पाकिस्तान हातात हात घालून आहेत. ही युती तोडता येणं भारताला प्रत्यक्षात कितपत शक्य आहे हा प्रश्‍न असला तरी भारताने याबाबतीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. जाधवांची कैद अथवा अपहरण इराणमधून झाले ही माहिती खरी असेल तर यातील इराणचा हातही तपासून पाहिला पाहिजे हे नक्की!

‘लष्कर-ए-बलुचिस्तान’ आणि ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या दोन्ही गटात सामंजस्य घडवून आणत भारत त्यांना आर्थिक आणि सामरीक मदत मोठ्या प्रमाणावर पुरवू शकतो असे तर्क पूर्वी केले गेले आहेत. त्यात मीही होतो. अर्थात तसं करण्यासाठी भारताला अफगाणिस्तानची मदत अत्यावश्यक आहे जी भारत घेत असावाच असा अंदाज करायला पुष्कळ वाव आहे.

पख्तुनिस्तानः
पाकिस्तानचा एक दुसरा मोठा प्रदेश म्हणजे पख्तुनीस्तान (पश्तुनिस्तान) होय. हाही प्रदेश सध्या पाकिस्तानची डोकेदुखी बनलेला आहे. याचं कारण म्हणजे बलुच्यांप्रमाणेच पख्तून (पुश्तू) लोकांचीही स्वतंत्र संस्कृती आणि अस्मिता आहे. पख्तून ही पुरातन जमात असून तिचा उल्लेख ऋग्वेदातही पख्त नावाने येतो. दाशराज्ञ युद्धात भाग घेतलेल्या एका टोळीचं नाव पख्त असं आहे. तेच हे पख्तून लोक होत. सरहद्द गांधी म्हणून गौरवले गेलेले ‘खान अब्दुल गफार खान’ हे पख्तूनच होते. पाकिस्तान स्वतंत्र होण्याआधी पासूनच पख्तून लोकांची स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अथवा अफगाणिस्तानात सामील होण्याची मागणी होती. याचं कारण म्हणजे अर्धाअधिक पख्तुनिस्तान अफगाणिस्तानात आहे. संस्कृती आणि भाषा हा सर्वांचा समान दुवा असल्याने सर्व पख्तुनांचं एक राष्ट्र असावं अथवा अफगाणिस्तानात विलीन व्हावं ही मागणी तशी न्याय्यही आहे. ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि राज्य करा या प्रवृत्तीस अनुसरून 1893 साली पख्तुनिस्तानची विभागणी केली होती.

ज्या रेषेमुळे ही विभागणी झाली तिला ‘ड्युरांड रेषा’ म्हणतात. ही रेषा पख्तुनांना स्वाभाविकपणेच मान्य नाही.
खरं तर 1965 आणि 1971 च्या भारत-पाक युद्धकाळात पख्तुनिस्तानला स्वतंत्र होण्याची संधी होती; पण केवळ पाकला युद्धकाळात अडचणीत न आणण्याचा निर्णय काही पख्तून राष्ट्रवाद्यांनी घेतला. तो निर्णय चुकीचा होता हे आता पख्तुनांना समजलं असलं तरी राजकीय पटलावर बर्‍याच हालचाली झाल्या असल्याने पख्तुनांचा विद्रोह आज तरी सीमित आहे.

दुसरी महत्त्वाची बाब अशी की आज अफगाणिस्तानातील जवळपास 45 टक्के लोकसंख्या ही पख्तुनांची आहे. पाकिस्तानातील पख्तुनिस्तान अफगाणिस्तानमध्ये यावा यासाठी अफगाणी सरकारने पूर्वी बरेच प्रयत्न केले असले तरी खुद्द अफगाणिस्तान तालिबान्यांमुळे यादवीत सापडल्याने पुढे पाक-अफगाण राजकीय चर्चेच्या पटलावर हा विषय मागे पडला.

बलुच्यांची जशी स्वतंत्र संस्कृती आणि भाषा आहे त्याप्रमाणेच पख्तुनांचीही असल्याने पाकिस्तानचा प्रभाग म्हणून राहण्यात त्यांना विशेष स्वारस्य नाही. त्यात शिया-सुन्नी हा विवाद आहेच. पाकिस्तानातील बव्हंशी दहशतवादी घटनांमागे पख्तून आणि बलुची राष्ट्रवादीच असतात हेही इथे लक्षात घ्यायला हवं. या असंतोषाला भारतच (रॉ मार्फत) खतपाणी घालतो हा पाकिस्तानचा जुना आरोप आहे. त्यात मुळीच तथ्य नसेल असं म्हणता येत नाही; किंबहुना तेच होणे संयुक्तिक आहे.

परंतु या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि धाडसी स्वरूप देणं ही काळाची गरज आहे. भारत-अफगाण संबंध हे चांगले राहिले आहेत. याचं कारण म्हणजे तालिबानी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत तर केलीच परंतु त्या राष्ट्राच्या नवउभारणी प्रक्रियेत सर्वात मोठं योगदानही दिलं. 2011 मध्ये भारताने अफगाणिस्तानशी भागीदारी करारही केला. रशियाच्या आक्रमणानंतर झालेला हा अफगाणिस्तानचा पहिला करार होता. ‘भारत आमचं बंधुसमान असलेलं राष्ट्र आहे’ अशी प्रतिक्रिया अफगाणी विदेश मंत्रालयाने दिली होती. थोडक्यात भारताचे अफगाणिस्तानशी वाढत असलेले संबंध अन्य सामरीक संबंधांप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे करता यावेत किंवा गेला बाजार पाकिस्तानवरही फुटीची टांगती तलवार लटकत ठेवणे याही हेतूने असण्याची मोठी शक्यता आहे. दुर्दैवी योगायोग म्हणजे मी गेल्या महिन्यातच ‘धोका’ या कादंबरीतून भारत हे पाकिस्तानला तोडण्याचे कारस्थान साध्य करण्यासाठी कोणते डावपेच लढवतो व ते यशस्वी होतात का हे दर्शवणारी थरारक कादंबरी पूर्ण केली आणि हे जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचे वृत्त आले.

ते असले तरी भारतीयांना ही बाब मान्य करावीच लागेल की पाकिस्तानातील फुटीरतावाद फोफावला नाही तर पाकिस्तानच्या काश्मीरमधील कारवायांवर आळाही बसणार नाही. यासाठी ‘अफगाण नोर्दर अलायंस’शीही रॉ संबंध वाढवत आहे असेही काही सूत्रे सांगतात. याला आपण ‘प्रतिफुटीरतावाद’ म्हणू शकतो. आता या पार्श्‍वभूमिवर कुलभूषण जाधव हे खरेच हेर आहेत काय, असले तर कोणत्या दर्जाचे हेर असतील आणि भारत मुळात काही चुका करत आहे काय याचा आपण तटस्थपणे, हाती जी माहिती आहे त्यावर आधारित, चर्चा करणार आहोत!

एक बाब स्पष्ट आहे की अशा महत्त्वाकांक्षी योजना एकट्या-दुकट्या हेरांच्या जिवावर आखल्या जात नाहीत. भारत गेला अनेक काळ आपले काम पुढे रेटत राहिला आहे. अफगाण-इराण-रशिया-अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील सतत बदलत राहिलेले भुराजकीय संबंधही योजनेत कधी गती देणारे तर कधी पूर्ण रुकावट टाकणारे राहिलेले आहेत. असे असले तरी तेथे बलुचिस्तान व पख्तुनिस्तानातील फुटीरतावादी नेते व त्यांच्या सहकार्‍यांच्या नेहमी संपर्कात राहत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रसामुग्री ते अर्थपुरवठा करत राहणे व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जागतिक मत अनुकूल बनवणे हे महत्त्वाचे कार्य हेरांमार्फत व अन्य पातळ्यांवरुनही करणे भारताला महत्त्वाचे आहे. घातपाती कारवाया घडवून आणणे हा यातीलच एक प्रकार! यासाठीही वेगळ्या प्रकारचे हेर असणार, तसेच खुद्द त्या त्या प्रांतात राहत एकीकडे चळवळीवरही लक्ष ठेवणे व पाकिस्तानी सैन्याच्या संभाव्य कारवायांचीही माहिती घेण्याची गरज पडत असणार. यासाठी नियमित बदलले जाणारे हेरांचे एक जाळे त्या भागात विणले गेले असणे स्वाभाविक आहे.

येथे एक महत्त्वाची बाब नमूद केलीच पाहिजे ती ही की, पंतप्रधान मोदींनी जाहीर भाषणात या बाबीची वाच्यता केली जे आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे होते. पाकिस्तान गेली अनेक वर्ष भारतावर पख्तुन आणि बलोची टोळ्यांना विभक्त करण्यासाठी कारवाया करत आहे असा जो आरोप करत होता त्याला अकारण मोदींनी बळ दिले. याची काही गरज नव्हती. ‘सर्जिकल स्ट्राईक’ असोत की अन्य कोणत्याही गुप्त कारवाया, त्या गुप्तच असायला हव्यात. असो!
हेर पकडला गेल्यावर खरा धोका असतो तो या जाळ्याची माहिती उघड होण्याचा. ही माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचे चौकशी अधिकारी हेराला बोलते करण्यासाठी अथवा खरा-खोटा जबाब मिळवण्यासाठी  कोणत्या थराला जाऊ शकतात याची एक चुणूक आपण सरबजितसिंग प्रकरणात पाहिली आहे. सरबजित खरेच दारुच्या नशेत वाट चुकून पाकिस्तानात घुसला की ती योजनाबद्ध चाल होती हे सत्य आपल्याला समजू शकणार नाही; परंतु अंदाजच बांधायचा झाला तर ज्या पद्धतीने पाकिस्तानने सरबजितसिंगचा छळ केला व नंतर योजनाबद्ध खून केला त्यावरुन तो हेर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एका हेराच्या बदल्यात त्याच्या प्राणांपेक्षा महत्त्वाचे असते आधीच सुस्थिर झालेल्या हेरांच्या जाळ्याला वाचवणे. एक हेर घुसवण्यामागेच एवढी मेहनत घ्यावी लागते तर नवे जाळे उभे करायला किती कष्ट पडत असतील याची आपण कल्पना करू शकतो.

कुलभूषण जाधव
कुलभूषण जाधवबाबतची आपली चर्चा ही भारतीय व पाकिस्तानी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे. या माहितीनुसार-

1. कुलभूषण जाधवला पाकिस्तानने 3 मार्च 2016 रोजी अटक केली असली तरी पाकिस्तानने या अटकेची अधिकृत घोषणा 24 मार्चला केली. कुलभूषणकडे मिळालेल्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नाव असून त्यात तो मुंबईचा रहिवासी असल्याचे दर्शवलेले आहे. कुलभूषणची अटक बलुचिस्तानातील माश्केल भागात केली असे पाकिस्तानचे म्हणणे आहे; तर पाकिस्तानने कुलभूषणचे इराणमधून अपहरण केले व पाकिस्तानात आणले असा भारताने आरोप केला आहे. इराणमधील जैश-उल-अदिल या सुन्नी दहशतवाद्यांनी पाकिस्तानसाठी हे अपहरणाचे कृत्य केले असाही दावा केला जात आहे.

2. पाकिस्तानमधील माहिती वेगळीच पण परस्सरविरोधी आहे. बलुचिस्तानचे गृहमंत्री सर्फराज बुग्ती यांनी कुलभूषणला चमन भागात अटक केली असे म्हटले होते; पण दुसर्‍याच दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत जनरल असिम बज्वा (पाकिस्तानी आर्मीचा प्रसिद्धी विभाग) यांनी सांगितले की, कुलभूषणला सरवान येथे अटक करण्यात आली. यात विरोधाभास असा की चमन व सरवान यातील अंतर जवळपास 900 किलोमीटर आहे. चमन हे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे तर सरवान हे इराण-पाकिस्तान सीमेजवळ आहे.

3. कुलभूषण नेव्हीत अधिकारी होता. त्याने 2001 मध्येच स्वेच्छानिवृत्ती घेत स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. खास करुन इराणमधील बंदर अब्बास येथून तो काम पाहत होता. पाकिस्तानचे म्हणणे असे आहे की, जाधवने आपण 2003 पासूनच हेरगिरीच्या कामात सामील होतो, छबहार बंदरापासून कराचीला वारंवार जाणे सोपे होते असे कबूल केले आहे; मात्र रॉ मध्ये तो 2013 मध्ये सामील झाला आणि बलोच फुटीरतावाद्यांना भडकावण्याचे आणि घातपात घडवून आणण्याचे काम करत होता. यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक ठार झाले. इराणमधून पाकिस्तानमध्ये सरवान सीमेवरुन घुसत असताना त्याला अटक करण्यात आली असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. शिवाय कुलभूषण अजूनही भारतीय नौदलात काम करत असून 2022 मध्ये तो सेवानिवृत्त होणार आहे असाही पाकचा दावा आहे. त्यासाठी एक व्हिडिओ सादर करण्यात आला असून त्यात जाधवचा कबुलीजबाब आहे; पण हा व्हिडिओच मुळात छेडछाड करून बनवण्यात आला आहे हे स्पष्ट दिसते. भारताने कुलभूषण हा आता नौदलात नाही अशीच भूमिका घेतलेली आहे.

4.  कुलभूषण जाधवचे फोन गुपचूप ऐकले जात असावेत व तो घरी फोन करतो, मराठीत बोलतो यामुळे त्याची ओळख फुटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. विशेष म्हणजे हा अंदाज भारतीय गुप्तचर खात्याचा आहे असा दावा पाकिस्तानी वृत्तपत्रे करतात.

वरील मोजक्या माहितीची छाननी केली तर खालील बाबी आपल्या लक्षात येतील.

कुलभूषणकडे मिळालेल्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नाव असून त्याला जर पाकिस्तानात घुसताना अटक केली असेल तर लगोलग तो पटेल नसून जाधव आहे हा तपास पाकिस्तानी हेरखात्याला कसा लागला याचा उलगडा त्यातून होत नाही. त्याची अटकेची तारीख व ती जाहीर करण्याची तारीख पाहिली तर मधल्या तीन आठवड्यात त्याचा छळ केला गेला असण्याची शक्यता आहे किंवा त्याचे फोन तो इराणमध्ये असतानाच ऐकले जात असण्याची शक्यता आहे. पाकी हेरांना तो खरा कोण आहे याची माहिती आधीपासूनच असू शकेल; पण तसे घडायला नेमके कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

प्रश्‍न असा उपस्थित होतो की रॉ किंवा कुलभूषण खरेच हेर असेल आणि हुसेन मुबारक या नावाने वावरत असेल तर तो आपल्या घरी कसा फोन करेल आणि मराठीत का बोलेल? एवढा बावळटपणा एक हेर, मग तो कोणीही असो, कसा करेल? जगातील कोणताही हेर जोवर एखाद्या कामगिरीवर आहे तोवर आपल्या आयुष्याशी ज्या लिंक्स असतात त्या पूर्णपणे तोडतो! किंबहुना तेच अभिप्रेत असते. कुलभूषण सांगलीला घरी फोन करुन मराठीत खरेच बोलत असेल आणि तो खरेच जर हेर असेल तर तो पकडला गेल्याचे दु:ख करायचे काही कारण नाही. उलट त्याने जी काही कामगिरी चालली होती त्यात मोठा अडथळा आणून भारताचे नुकसानच केले आहे असे म्हणावे लागेल; पण खरेच असे असेल का?
प्रश्‍न असाही उपस्थित होतो की खरोखर त्याच्याकडे मिळालेला हुसेन मुबारक पटेल या नावाचा पासपोर्ट भारतीय पारपत्र खात्याने कधी इश्यू केला होता काय? की पाकिस्ताननेच तो बनावट बनवला व जाधवला अडकवले? भारताने अद्यापपर्यंत तरी या संदर्भात कसलेही निवेदन केलेले नाही किंवा केले असले तरी वृत्तपत्रांत त्या संदर्भात माहिती आलेली नाही. भारत सरकारने हा पासपोर्ट जारी केलाच नसेल तर भारत सरकारने या बनावटगिरीवर आवाज उठवायला हवा; कारण भारताने हा पासपोर्टच मुळात इश्यू केला नसेल तर पाकिस्तानचे सर्व दावे निकाली निघू शकतात! पण अद्यापपर्यंत तरी तसे झाले नसल्याने व कुलभूषणवरील खटला चालवून त्याला शिक्षाही ठोठावण्यात आली असल्याने याबाबत काय केले जाणार हा प्रश्‍नच आहे. मुळात कुलभूषणला अटक होऊन एक वर्ष उलटले आहे. या काळात भारताने त्याच्या सुटकेसाठी काय प्रयत्न केले हे आपल्याला माहीत नाहीत. कुलभूषण सर्वसाधारण नागरिक असता तर भारत व आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर दडपण आणले असते; पण तसेही झालेले दिसत नाही. त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण हाताळायला आपण कमी पडलो आहोत की काय अशी शंका वाटते.

पाकिस्तानने कुलभूषणची अटक ते त्याचा व्हिडिओ यात जी हकीगत आणली आहे ती परस्सरविरोधी व छेडछाड केलेली आहे हेही उघड आहे. कुलभूषणची अटक नेमकी कोठे झाली? सरवान की चमन येथे? भारताने मात्र जैश-उल-अदिल या दहशतवादी संघटनेने त्याचे इराणमधून अपहरण केले असा आरोप केला आहे. इराणच्या भूमीवरुन अपहरण झाले असेल व नंतर त्याला पाकिस्तानमध्ये नेण्यात आले असेल तर हा प्रकार आंतरराष्ट्रीय गुन्ह्यात मोडतो. इराणशी भारत चांगले संबंध बनवून आहे. इराणची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे? या संदर्भातही मौन आहे. याचा अर्थ इराणची मदत मागितली गेली नसेल असे नाही. भारताचे राजनैतिक संबंध कितपत मजबूत आहेत त्यावरून इराण मदत करणार की नाही हे ठरेल; पण आजवर तरी तशी मदत झाली आहे असे दिसत नाही. मग हा प्रकार काय आहे? की हे अपहरण इराण सरकारला मान्य करायचे नाही? का?

मी आधीच वर म्हटल्याप्रमाणे बलुचिस्तानात इराणचेही हितसंबंध अडकले आहेत. इराणची एरवीची भूमिका काहीही असली तरी बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य लढा इराणमधील बलोच्यांतही विद्रोह निर्माण करू शकतो. त्यामुळे या बाबतीत इराणचे धोरण दुटप्पीपणाचे असू शकते. त्याबाबतीत भारत काय करणार आहे हाही प्रश्‍न आहे.

कुलभूषण 2001 मध्ये नेव्हीतून निवृत्त झाला व त्यानंतर व्यवसायात पडला. यात नवीन काही नाही. सैन्यदलातील अनेक अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेऊन व्यवसायात पडतात, नेव्हीत असल्याने व इराणमधील बंदरविकासासाठी भारत सरकार मदत करत असल्याने त्याचे नेव्हीत असतानाच इराणी उद्योजकांशी संबंध येऊन त्याला व्यावसायिक संधी दिसली असल्यास नवल नाही. त्याने तेथे व्यवसायासाठी बस्तान बसवले हेही आश्‍चर्यकारक नाही; पण रॉसाठी तो पार 2013 पासून काम करू लागला हे अजब आहे. या माहितीत गफलत आहे. मग जाधव 2003 पासून ते 2013 पर्यंत नेमका कोणासाठी हेरगिरी करत होता?  ती सोडून 2013 पासून तो रॉमध्ये कसा गेला?

जर त्याचे नाव बदलून, नवी आयडेंटिटी देत त्याला हेरगिरी करायला लावायची होती तर त्यासाठी विशेष प्रशिक्षण कसे दिले गेले नाही? ते दिले असते तर मुळात रॉच त्याला बनावट नावाचा का होईना, भारतीय मुळाचा पासपोर्ट का देईल? अन्य कोणत्याही देशाचा, अगदी पाकिस्तानी अथवा इराणी पासपोर्ट त्याला मिळवून देता येणे रॉला अवघड नव्हते. रॉचा इतिहास पाहता अगदी सामान्य हेराबाबतही एवढा भोंगळपणा ती करेल याची शक्यता नाही. जर कुलभूषणला खरेच हेरगिरीसाठी वापरायचे असते तर सर्वप्रथम त्याचे मागचे आयुष्यच पुसण्यात आले असते. दुसर्‍या देशाचा पासपोर्ट देण्यात आला असता. कुलभूषणला ऐनवेळीस मदत करु शकणारी यंत्रणा अस्तित्वात असती. कुलभूषणने चुकूनही घरी फोन केला नसता. तसे करणे हा सरळ सरळ आत्मघात आहे, हे त्याला चांगलेच माहीत असले असते.

पण तसेही झालेले दिसत नाही. बलुचिस्तान व पख्तुनिस्तानच्या फुटीरतावादाला बळ द्यायचे भारतीय धोरण नवीन नाही; पण त्यासाठी असल्या भोंगळपणाने त्या भागात हेर उतरवले जाण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी सोडायची नसते. त्यामुळे रॉ कोणतीही कारवाई करताना प्रचंड सावध असते. रवींद्र कौशिक या हेराला पाकिस्तानात घुसवले होते हा एक इतिहास येथे थोडक्यात पहायला हवा. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याचा धर्म बदलून, नाव बदलून त्याला पाकिस्तानात पाठवण्यात आले. तेथे शिक्षण पूर्ण करुन तो सैन्यदलात दाखल झाला. पार मेजर जनरल या पदापर्यंत तो पोहोचला. भारतासाठी माहितीचा खजिनाच उघडला गेला. 1973 ते 1983 हा तो काळ. तो उच्च पदावर पोहोचल्यावर मात्र त्याला माहिती पाठवता येणे अवघड व्हायला लागले. भारताकडून मग इनायत मसीह या दुसर्‍या हेराला संपर्क केंद्र बनण्यासाठी पाकिस्तानात पाठवले गेले; पण तो पकडला गेला आणि रवींद्र कौशिकचे बिंग फुटले. पाकिस्तानला (व भारतालाही) हा मोठा झटका होता यात शंका नाही! पण भारताने तो हेर आहे किंवा त्याच्याशी भारताचा काही संबंध आहे हे कधीही मान्य केले नाही. 1985 मध्ये त्याच्यावर खटला चालवत त्याला देहदंडाची शिक्षा दिली गेली; पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे पुढे फाशी रद्द झाली व त्याला कारावासात टाकण्यात आले. तेथेच त्याचा 2001 मध्ये मृत्यू झाला. भारत सरकारच्या दृष्टिने तो अनामिकच राहिला. हे अत्यंत स्वाभाविक आहे. भावनांचे जग हेरगिरीत कुचकामी असते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

पण 1973 साली एका हेराला पाकिस्तानात घुसवून त्याला पार सैन्यदलात उच्चाधिकारी बनवायची क्षमता असलेल्या रॉ कडून कुलभूषणबाबत असला भोंगळपणा कसा होईल?
कुलभूषणचा कबुलीजबाब देणारा व्हिडिओ अस्सल नाही. त्यात छेडछाड करत हवा तसा एडिट केला गेला आहे. त्याला नेमकी कोठे अटक केली याबाबत परस्सरविरोधी माहिती पाकिस्तानने दिली आहे. त्याचा हुसेन मुबारक पटेल  नावाचा पासपोर्ट त्याच्याकडे कसा मिळाला याबाबतही स्पष्ट माहिती नाही. त्याचा फोन आधीपासूनच ट्रॅप होत होता असेही गृहित धरले तर मग त्याच्यावर आधीपासूनच पाकी हेरांना संशय होता हे मान्य करावे लागेल. हा संशयच मुळात त्यांना का आला? त्याची कसलीही कारणमीमांसा पाकिस्तानने दिलेली नाही. तो मराठीत बोलत होता यावरुन कोणाला संशय आला असे म्हटले जात असेल तर तेही अनैसर्गिक आहे कारण इराणमध्ये कोण मराठीत बोलतोय हे कसे इतरांना मराठी माहीत असल्याशिवाय समजेल?

त्यामुळे कुलभूषणचे इराणमधून अपहरणच केले गेले असण्याची शक्यता जास्त बळकट होते. एका भारतीय नागरिकाचे इराणच्या भूमीवरुन अपहरण व्हावे व त्याला पाकिस्तानात नेले जावे हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. त्याच्याकडे कसलाही पासपोर्ट मिळालेला नसून पाकिस्ताननेच तो बनावटपणे बनवला असण्याची दाट शक्यता आहे. भारताने तो पासपोर्ट जारी केला असता तर पाकिस्तानने जग डोक्यावर घेतले असते; पण तसे झालेले दिसत नाही. इराणचीही या बाबतीत साथ मिळवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे पण त्यासाठी कुलभूषण हेर नव्हता ही बाब इराणच्या गळी उतरवता आली पाहिजे होती. जर तो हेर नसेल तर बलुचिस्तानातील इराणचे हितसंबंध अडचणीत यायचे कारण नाही पण तसेही भारताने केल्याचे दिसत नाही. कुलभूषण जाधवबाबत इराणी वृत्तपत्रे शांत आहेत.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव हे टार्गेट म्हणून निवडले असेल ते त्याच्या भारतीय नौदलाच्या पार्श्‍वभुमीमुळे! रॉ अनेकदा आपले एजंट सैन्यदलांतूनच निवडते हे त्यांना चांगलेच माहीत आहे. हेतू काय? भारतावर दबाव आणणे हाच! भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करून काश्मीरमधील त्यांच्या कारवाया मात्र राजरोस करता याव्यात यासाठी हा खेळ केला गेला असण्याची शक्यता आहे; पण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हे मांडायला आपण कमी पडत आहोत काय?
एकंदरीत घटनाक्रम पाहता व जी माहिती बाहेर आली आहे ती पाहता कुलभूषण जाधव हेर असण्याची शक्यता नाही आणि जर असलाच तर तो हेर होण्याच्या मुळात योग्यतेचा नाही व रॉ ही एक कुचकामी हेरसंस्था आहे असे म्हणावे लागेल. भारत कधीही, अगदी असला तरी, कुलभूषणला प्रकटपणे हेर असल्याचे कबूल करणार नाही. ती अपेक्षाही नाही. अपेक्षा ही आहे की पाकिस्तानवरील दबाव वाढवला जायला हवा. त्यासाठी उपलब्ध असतील ती राजनैतिक हत्यारे वापरली जायला हवीत. हेर नसलेल्या माणसाला हेरगिरी व हिंसक कारवायांच्या आरोपात फाशीची शिक्षा देत पाकिस्तानने अंतर्गत राजकारणही पाहिलेले आहे हेही येथे विसरता येत नाही.

कुलभूषण जाधव हेर नाहीत ही भारताची भूमिका बरोबर असली तरी आतापर्यंत त्यांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी का झालेले नाहीत हे पाहणेच आता महत्त्वाचे आहे. पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारत पुढचे कोणते पाऊल उचलणार आहे हे महत्त्वाचे तर आहेच पण अन्यही काही विशेष स्थितीत वापरायची दबावतंत्रे आहेत. समजा हे असे काही इस्रायली नागरिकाबाबत झाले असते तर त्यांनी जेथे आपल्या हेराला ठेवले आहे तो तुरुंग शोधून सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या माणसाला सोडवले असते किंवा एकाच्या बदल्यात आम्ही दहा जणांना फासावर चढवू असे धमकावले असते व वेळ आल्यावर तसे केलेही असते. कंदाहार प्रकरणावरुन भारताला असे काही करण्याची इच्छाशक्ती आहे असे दिसत नाही. छुटपुट सर्जिकल स्ट्राईकचा इव्हेंट करणे वेगळे आणि आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी संकटात सापडलेल्या एखाद्या आपल्या नागरिकाला काय वाट्टेल ते करुन सोडवणे वेगळे! आपले आंतरराष्ट्रीय धोरण, भारतीय नागरिक व भारतीय हेरांबाबतचे धोरण धरसोडीचे तर झाले नाही ना याबाबतही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. अशामुळे नवीन हेर निर्माण करणे अशक्य होत जाईल हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

तसेही मुळात येथे देशभक्तीचे उमाळे फुटणारे गल्लीबोळात असले तरी हेरगिरीसाठी लागणारे मानसिक धैर्य, स्वत:चे अस्तित्व पुसण्याची तयारी असलेले कुशाग्र बुद्धीचे नागरिक आहेत तरी किती हा प्रश्‍न आहे. फेसबुकवर गप्पा झोडणार्‍यांपैकी कितीजण आंतरराष्ट्रीय मित्र जोडतात व सांस्कृतिक राजदूताची भूमिका निभावतात? हेही महत्त्वाचे असते, हे आम्हाला समजलेले नाही. आमचे राष्ट्रप्रेम हे वांझ आहे ते असे! अशा स्थितीत कुलभूषण जाधवसारख्या हेरगिरीचा आरोप ठेवल्या गेलेल्या भारतीय नागरिकाला पाकिस्तानच्या कचाट्यातून सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.
कुलभूषण आता हेर आहे की नाही हा मुद्दाच नसून तो एक भारतीय नागरिक आहे हेच काय ते महत्त्वाचे आहे. राजकीय सुडासाठी उद्या कोणाही परदेशस्थ भारतीयाला हेर म्हणून उचलून नेले जाईल आणि छळ करुन वाटेल तो कबुलीजबाब घेत नंतर फासावर चढवले जाईल! नागरिकात ही अशी असुरक्षितता निर्माण होणे विघातक आहे. नागरिक व सरकारला ठाम धोरण बनवणे अत्यावश्यक होऊन जाते ते यामुळेच!!
संजय सोनवणी 9860991205

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा