आर्थिक साक्षरता

आर्थिक साक्षरता

उत्पन्नाचे दोन प्रकार असतात. हे उत्पन्न वापरायचे काही निकष आहेत. पैसे हाताळण्याच्या पण पद्धती आहेत. जो माणूस पैशाकरता काम करत असताना, हळूहळू त्यालाच आपला गुलाम बनवायला शिकतो, कालांतराने त्याच्या जीवनात अशी वेळ येते की, आता त्याच्याकरता फक्त पैसाच काम करुन दर महिन्याला त्याला उत्पन्न आणून देतो. तो स्वतः आता पैशाकरता काम करायचं बंद करतो. आपले आयुष्य मस्त जगत राहतो. असा माणूस पूर्णपणे आर्थिक साक्षर झाला असे समजण्यास हरकत नाही. चला मग आता आर्थिक साक्षर होण्यासाठी कसे वागायचे किंवा कसे वागायचे नाही ते पाहूया.

पहिल्या प्रकारच्या उत्पन्नाला महसुली उत्पन्न म्हणतात.

हे उत्पन्न सतत मिळत राहते व तुमच्या शारीरिक अथवा बौद्धिक श्रमाचे ते फळ असते त्याला महसुली उत्पन्न म्हणतात. यामध्ये पगार येऊ शकतो, धंद्यातील नफा येऊ शकतो, व्यावसायिकांना मिळणारी फी असू शकते अगर गुंतवणुकीवरील व्याज असू शकते.

उत्पन्नाचा दुसरा प्रकार म्हणजे भांडवली उत्पन्न.

आपण एखादी मालमत्ता जर विकली तर त्याला भांडवली उत्पन्न असे म्हणतात. जमीन, प्लॉट, शेतजमीन, घर, गाडी अगर दाग-दागिने यांच्या विक्रीतून आलेल्या पैशाला भांडवली उत्पन्न असे म्हणतात. भांडवली उत्पन्नातून भांडवली खर्च करावा, असा निकष आहे.

महसुली उत्पन्नाचा काही भाग आपण बचत करुन साठवतो. या बचतीतून आपण मालमत्ता निर्माण करतो. हीच मालमत्ता दोन प्रकारची असते. उत्पादक मालमत्ता व अनुत्पादक मालमता. यातच परत किंमत आपोआप वाढणारी मालमता व किंमत कमी होत जाणारी मालमत्ता असे दोन प्रकार पडतात.

महसुली उत्पन्नाच्या साधारण तीस ते चाळीस टक्के भाग सर्वसाधारण व्यक्ती बचत करु शकते असा एक अंदाज आहे. अशा बचतीचा वापर कसा केला जातो त्यावरुन आपण आर्थिक साक्षर आहोत की निरक्षर हे कळून येते. समजा वर्षभराच्या बचतीचे माझ्याकडे एक लाख आहेत. या पैशातून मी दुचाकी घेतली. मी अनुत्पादक पण भांडवली मालमत्ता निर्माण केली. अनुत्पादक का तर या गाडीतून काही उत्पन्न मिळणार नाही, उलट किंमत कमी-कमी होत जाणारी आहे. तेच एक लाख रुपये जर बँकेत ठेव म्हणून ठेवले तर वर्षाअखेर त्यांचे आठ टक्के दराने एक लाख आठ हजार किंमत होईल. त्याच एक लाखाच्या गाडीची किंमत एक वर्षाने वीस टक्के घसार्‍याने फक्त ऐंशी हजार होईल. गाडीची उपयुक्तता आहे पण त्यासाठी द्यावी लागणारी किंमत फार मोठी आहे. शहाणा माणूस म्हणेल, मी एक वर्षाने मिळणार्‍या व्याजातून सायकल घेईन व ती वापरेन.

एखाद्या माणसाने महिन्याच्या दहा हजार पगारातून जर एकदम रेफ्रिजरेटर खरेदी केला तर काय होईल? एक तर त्याने सेव्हिंगच्या प्रमाणाचा नियम मोडला. तीस टक्के ऐवजी शंभर टक्के पैसे वापरुन मालमता निर्माण केली. ती मालमत्ता अनुत्पादित तर आहेच पण काळाच्या ओघात किंमत कमी होणारी आहे. महिनाभर घरात उपासमार झाल्यावर रेफरिजरेटर विकायला गेला. तो काही सहज विकला जात नाही. शेवटी एकाने तो आठ हजाराला घेतला.

उत्पन्नाचे अजून दोन प्रकार करता येतात.

अ‍ॅक्टीव्ह व पॅसिव्ह उत्पन्न.

शारीरिक किवा बौद्धिक काम केल्याने जे उत्पन्न मिळते त्याला अ‍ॅक्टिव्ह उत्पन्न असे म्हणतात. याच्या अगदी उलटे स्वतः कोणत्याही प्रकारची अक्टिव्हिटी न करता जे उत्पन्न मिळवले जाते त्याला पॅसिव्ह उत्पन्न म्हणतात.

पॅसिव्ह उत्पन्न मिळण्यासाठी कोणीतरी सतत तुमच्याकरता काम करत असते. या कोणीतरीमध्ये आपल्यासाठी चोवीस तास अव्याहत काम करणारा एकमेव नोकर म्हणजे पैसा. मी बँकेत एक लाख ठेवले तर हेच एक लाख माझ्यासाठी वर्षभर काम करुन मला सात-आठ हजार मिळवून देतात. हेच एक लाखाचा मी प्लॉट घेतला तर दहा वर्षानी समजा मला त्याचे पाच लाख मिळाले. म्हणजे माझे एक लाख रुपये माझ्यासाठी दहा वर्षे काम करत होते व मला वर्षाला चाळीस हजार मिळवून देत होते. याला पॅसिव्ह उत्पन्नाची जादू म्हणायची.

जी व्यक्ती आपल्या एकूण उत्पन्नामध्ये पॅसिव्ह उत्पन्नाचे प्रमाण हळूहळू वाढवत नेते व दीर्घकाळात त्याचे प्रमाण अ‍ॅक्टिव्ह उत्पन्नाएवढे किंवा जास्त करु शकते तीच व्यक्ती खरी आर्थिक साक्षर. असे साक्षर होण्यासाठी सुरूवातीच्या काळात खूप त्याग करावा लागतो. राहणीमान अगदी साधे असे ठेवावे लागते. छानछोकी व विलासी जीवनमान यापासून दूर रहावे लागते. उत्पन्नाच्या साठ टक्के पैशात जे जमते व जसे जमते तसे जगायला शिकले पाहिजे. मासिक दहा हजार वाला सहा हजारात जगेल तर एक लाख वाला साठ हजारात जगेल. कर्जापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

स्वतःचे घर असणे ही प्रत्येकाची भावनिक गरज असते. कर्ज काढून घर घेणे हे तर आर्थिक निरक्षरतेचे लक्षण आहे. घर हा कायम भावनिक निर्णय असतो. तो आर्थिक कधीच होऊ शकत नाही. घराच्या किंमतीच्या तीन टक्के सुद्धा भाडे मिळत नाही आणि तुम्ही नऊ ते दहा टक्के व्याजांनी ते फेडत असता. घराची किंमत वाढते हे निश्चितच आहे, पण ती कल्पना भ्रामक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते विकत नाही तोपर्यंत पैसे हातात येत नाहीत. विकून परत त्या किंमतीत नवे घर मिळत नाही. विनाकारण भाडे भरतो, तेवढ्यात हप्ता फेडला जातो, हा तर्क एकदम चुकीचा आहे. भाड्यात जर हप्ता बसला असता तर सगळ्यांनीच घरे घेतली असती. हां! घर कर्जाचा हप्ता किती असावा? असे कुणी विचारले तर तुमच्या आत्ताच्या घरभाड्याएवढा असावा. तेव्हढ्यात घर नाही येणार. याचाच अर्थ बाकीचे पैसे स्वतःचे बिनकर्जाचे हवेत, तेवढे असतील तरच घर घ्या. तरच त्या घरात शांत झोप लागेल.

आजकाल नोकरीचे ठिकाण आयुष्यभर एकच असेल असे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या घरात किती वर्षे राहता येईल हे सुद्धा सांगता येत नाही. घरकर्जाचा हप्ता जर तुमच्या मासिक उत्पन्नाच्या तीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही बँकेसाठी काम करता, स्वतःसाठी नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

माणसांना रिस्क कव्हरेज आणि इनव्हेस्टमेंट यातील फरक कळत नाही. आयुर्विमा हे एक ज्वलंत उदाहरण आहे. मी मेलो तर माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचे कसे होईल? ही जोखीम म्हणजेच रिस्क कव्हर, तो करायचा उत्तम मार्ग म्हणजे पर्सनल टर्मविमा पॉलिसी. या मध्ये कमीत कमी विमा हप्त्यात जास्तीत जास्त रिस्क कव्हर होते. तुम्ही मेला नाही तर मात्र काहीही पैसे मिळत नाहीत पण तुमचा विमा एजंट चुकूनही तुम्हाला ही पॉलिसी विकणार नाही. तो तुम्हाला दोन्ही मिक्स असलेली लो रिस्क, लो इनव्हेस्टमेंट पण हाय प्रिमीयम पॉलिसी गळ्यात घालतो. त्याला जनरल विम्यावर कमिशन नसल्यागत मिळते. जीवन विम्याच्या प्रिमीयमवर जास्त मिळते हीच गोची असते. आपण आर्थिक साक्षर नसतो, अडाणी असतो म्हणून फसतो.

आर्थिक साक्षर माणूस आपला पैसा इतरत्र नोकरीला लावतो म्हणजेच व्याजाने गुंतवतो. तो कधीच दुसर्‍याच्या पैशाला नोकरीवर घेऊन त्याला हप्तारुपी पगार देत बसत नाही.

आर्थिक साक्षर माणूस खर्च करताना स्वतःला कायम एक प्रश्न विचारतो.

हा जो मी खर्च करत आहे, तो अनुत्पादक आहे की उत्पादक?

अनुत्पादक आहे असे समजल्यावर तो परत एक प्रश्न विचारतो.

हा खर्च मी नाही केला तर काय होईल?

उत्तर जर, ‘लोक काय म्हणतील?’ या प्रतिप्रश्नात आले तर तो खर्च मी अजिबात करणार नाही. लोक मला महिन्याला उत्पन्न मिळवून देत नाहीत.

तर आजच्या या मुक्त अर्थव्यवस्थेच्या बदलात स्वतःला टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे.

– अरुण दीक्षित
कोल्हापूर-416003
संपर्क – 9850820823

साहित्य चपराक मासिक एप्रिल 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “आर्थिक साक्षरता”

  1. जयंत कुलकर्णी

    आर्थिक साक्षरता याविषयी अरुण दीक्षित सरांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आपले आर्थिक व्यवहार केले तर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मदतच होईल हे समजून घ्यायला हवे. ऍक्टिव्ह इन्कम व पॅसिव्ह इन्कम हा फंडा समजून घेणे आवश्यक आहे. लेख आवडला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा