शोध सर्जनशील युवा नेतृत्वाचा…

परिवर्तन युवा परिषद 2017

परिवर्तन सामाजिक संस्था नेमकी कुठली? कुठल्या प्रकारचे कार्य करते? इतकी वर्षे सामाजिक काम करतेय तर मग प्रकाशझोतात कशी आली नाही?  हे सगळे प्रश्‍न निर्माण झाले 23 एप्रिल, 2017 ला… त्याचं कारणही तसंच होतं, पुण्यात 22 आणि 23 एप्रिलला सर्जनशील युवा नेतृत्वाचा शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. त्यात राज्यभरातून सकारात्मक विचारांनी भारलेले युवक युवती सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या ह्या दोन दिवसीय परिवर्तन युवा परिषदेत समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, आरोग्य, पर्यावरण, कृषी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही क्षेत्रात नेतृत्व करू पाहणार्‍या युवा रक्तासाठी अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायक विचारमंथन झाले. अगदी जिल्हा परिषद सदस्य, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी ते अगदी शेतकरी तरूणसुद्धा ह्या परिषदेत सहभागी झाले होते. 600 च्यापुढे आलेले ऍप्लिकेशन आणि त्यातून फक्त 270 जणांची निवड करणे तसे कठीण काम असूनही ते व्यवस्थित व काटेकोरपणे केले गेले.

उद्घाटक म्हणून लाभलेले भारतीय छात्र संसदेचे आयोजक राहुल कराड आणि पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक ह्यांनी सर्वप्रथम शाबासकीची थाप परिवर्तनच्या पाठीवर दिली. एवढेच सुंदर आयोजन परंतु व्यापक स्वरूपात पुढीलवर्षी गणेश कला क्रीडा ह्या थिएटरमध्ये व्हावे असा आशावाद राहुल कराड ह्यांनी व्यक्त केला… तर मुक्ताताई टिळक ह्यांनी सामाजिक कामात तरुणांनी पुढे येवून खर्‍या गरजू लोकांपर्यंत जाऊन त्यांनासुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येऊ शकते ह्याविषयी मार्गदर्शन केले.

राजकारण्यांना नावे ठेवणारा प्रचंड मोठा वर्ग आज आपल्या देशात उदयाला येत आहे. तरीही सगळ्यात जास्त राजकारण ह्याच विषयावर चर्चासत्र झडत असतात.. राजकारणातल्या लोकांची लोकप्रियता पाहता तरूणाची ह्याकडे ओढ असणे स्वाभाविक आहेच परंतु राजकारणात स्वांतत्र्यानंतर गेल्या सहा दशकाहून अधिक काळ लोटल्यावर हे लक्षात येत की राजकारण किती गढूळ झालं आहे.

भ्रष्टाचाराने पोखरलेली आपल्या देशाची शासनपद्धती, निष्काळजी आणी बेजबाबदार अधिकारीवर्ग, यांना वेळीच थोपवण्यासाठी महासत्ता होईल तेव्हा होईल पण आहे ते टिकवावे ह्यासाठी पिढ्या न पिढ्या आपल्याच घरातले नेते तयार करण्यास पायबंद घालण्यासाठी तरुणांनी राजकारण आले पाहिजे… आणि त्याचसाठी त्यांच्या मनात राजकारणाविषयी असलेल्या काळ्या आणि पांढर्‍या अशा दोन्हीहि बाजू मांडणारी दोन दिग्गज मंडळी पहिल्या सत्रात अतिशय मनमोकळेपणाने युवकांच्यासमोर आपले अनुभव सांगताना कुठेच हातचा राखून बोलले नाहीत.

युवकांनी राजकारणात का यावे? ह्या सत्राची सुरुवातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण ह्यांच्या खुमासदार उत्तराने झाली. खर तर राजकारणात यायचे नव्हतेच पण दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या सांगण्यावरून स्वतः इंजिनियरिंग करूनही मी राजकारणात आलो आणि मग अनेक महत्त्वाची खाती संभाळताना देश जवळून बघता आला. स्वतःला राजकीय वारसा होता परंतु त्याचा कधी फायदा घ्यावा असे वाटले नाही अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. राजकारणाकडे जर आपण पोट भरायचे साधन म्हणून पाहत असू तर मग राजकारणात येणे चुकीचे ठरेल असे परखड मत त्यांनी मांडले.

एका बाजूला हा असा संधी असूनही त्याचा फायदा न उचलणारा राजकारणी अन दुसर्‍या बाजूला फक्त शेतकर्‍यांचेच प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे खासदार राजू शेट्टी सुद्धा सगळ्यांना जास्त भावून गेले ते त्यांच्या निखळ आणि कुठलाही बडेजाव न बाळगता दिलेल्या बेधडक उत्तरांनी… जिल्हा परिषद ते संसद असा प्रवास करणारा हा अवलिया अनेकांना राजकारणात येण्यासाठी सहजपणे प्रेरित करून गेला…

मी आजही लोकवर्गणी काढूनच निवडणूक लढवतो आणि लढवीत राहील त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना जर तुम्ही न्याय देवू शकला तरच लोक तुंम्हाला आपला नेता म्हणून स्वीकारतील असे सांगताना शेट्टी ह्यांनी तरुणांना प्रेरणा प्रेरणा तर दिलीच परंतु कुठल्याही परिस्थितीत कुणाचेही गुलाम होऊ नका हेही ते सांगायला विसरले नाहीत.

अन् ह्या दोघांच्याही विचारांचा परीघ सर्वांच्यासमोर आणण्याचा महत्त्वपूर्ण अट्टाहास भूषण राऊत ह्याने आपल्या मुलाखत घेण्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीने केला. अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला पूर्ण न्याय मिळाल्याने युवा वर्ग खूप समाधानी वाटला. अनेकांच्या गुगली प्रश्नांनासुद्धा उत्तरे देताना ह्या दोघांनीही राजकारण केले नाही हे महत्वाचे. अतिशय भारलेल्या वातावरणातच दुसर्‍या सत्राला सुरुवात झाली. वेगवगेळ्या क्षेत्रात अफाट जिद्दीने सकारात्मक कामाचे मूळ रोवणारी कर्तृत्वशाली माणसे ह्या सत्रासाठी युवकांसाठी प्रेरणादूत म्हणून ठरली.

सामाजिक विषमता, जातीभेद, दारिद्र्य, सीमावाद, शेतीकडे आणि ग्रामीण भागाकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन, विकासाच्या नावाखाली होत असलेला जंगलांचा र्‍हास आणि त्यामुळे होणारा परिणाम ह्यामुळे निर्माण झालेले जटिल प्रश्न सोडवणारी ही मंडळी, तरूण पिढीच समाजभान जागं व्हावं आणि राष्ट्र उभारणीच्या रचनात्मक कामात तरुणांचाही सहभाग वाढून नेतृत्वगुणांचा विकास व्हावा म्हणून रचनात्मक सामाजिक कार्यात युवकांची भूमिका अधोरेखित करताना सर्वप्रथम गेली 32 वर्षे कँसर पेशंटसोबत आलेल्या गरीब नातेवाईकाना मोफत जेवण देणार्‍या हरकचंद सावला ह्यांच्या विचारांनी सर्वजण अक्षरशः हरखून गेले. एका साध्या विचाराने सुरु झालेला अन्नदानाचा यज्ञ आज हरकचंद यांना देवदूत बनवून जातो आणि ह्याच निस्वार्थ सेवेसाठी हजारो हात मदतीला येतात हेही ते सांगायला विसरले नाहीत. आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपण हाती घेतलेल्या कार्यात यश मिळतेच हा मूलमंत्र त्यांनी तरुणांना दिला. अशा ह्या 72 वर्षाच्या तरुणाच्या यशस्वी वाटचालीला युवा परिषदेला उपस्थित असलेला प्रत्येकजण सलाम करत होता आणि काळजात एक उर्मी जागवत होता…

बोलण्याचं वरदान लाभलेल्या माणसाला माणसाच्या भावना सहजासहजी समजत नाहीत… तिथं मुक्या प्राण्यांच्या व्यथा आपल्याला कधी कळणार? पण त्या समजून घेणारा एक अवलिया युवकांच्या समोर संवाद साधायला उभा राहिल्यापासून  शेवटपर्यंत एकावर एक अचंबित करणार्‍या घटना सांगत होता… त्याचं नाव आनंद शिंदे गजांतलक्ष्मी लाभलेला मनुष्यप्राणी! माणसाच्या दहापटीनं मोठ्या असलेल्या हत्तींशी आनंद शिंदे बोलतात आणि हत्तीसुद्धा त्यांच्याशी संवाद साधतात… हत्तीशी ते दंगा मस्ती करतात. हत्तीना खाऊ घेऊन जातात. हत्तीसुद्धा आनंद शिंदे ह्यांच्यावर रुसतात. त्यांची चेष्टाही करतात… हत्तींच्या जीवनपद्धतीचा ते जवळून बारकाईने अभ्यास करतात. पिसाळलेल्या हत्तीला शांत करण्याची कला त्यांना अवगत आहे. ह्या आगळ्या वेगळ्या कामाविषयी ते एवढे भरभरून बोलले की सगळे सभागृह अवाक् झाले होते.   हत्ती हे कळपाने हिंडतात, कारण ते संयुक्त कुटुंब पद्धतीचे कट्टर पुरस्कर्ते आहेत म्हणून… हेही सांगायला आनंद विसरत नाहीत. आणि हत्ती आपल्या मनुष्यवस्तीत येत नाहीत तर आपणच त्यांच्या वस्तीवर अतिक्रमण करत आहोत आणि जर का त्यांनी ठरवलंच आपल्याला त्रास द्यायचा तर आपल्या नावावर 7/12 सुद्धा दिसणार नाही…
जाता जाता ह्या कटू वास्तवाची जाणीवसुद्धा त्यांनी करून दिली. पत्रकारितेच्या क्षेत्रात अतिशय उत्तम गुजराण चालू असताना ह्या तरुणाला हत्तींच्या जीवनमानावर संशोधन करावे वाटणे आणि त्यासाठी स्वतःला त्यात झोकून देणे सगळे काही युवकांना सहज भावून गेले.

ह्या युवा परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व युवकांची मने सगळ्या वक्त्यांनी जिंकलीच परंतु अधिक कदम ह्या विसरभोळ्या युवकाने मात्र सगळ्यांना चिरकाल ध्यानात राहतील अशा आठवणी दिल्या. रक्तरंजित इतिहासाच्या पार्श्‍वभूमीचा विचार केला असता काश्मीरला साध फिरायला जाताना आपल्याला भीती वाटते तिथं अधिक कदम काम करतो. माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना पाहतो, जसेच्या तसे सांगता येणार नाही इतक्या भयानक अत्याचारांनी पिडीत काश्मिरी सौंदर्य त्याच्या नजरेस पडल्याने तो जे काही करतो अन् ते सत्यात उतरवतो ते सगळे अतर्क्य असेच आहे.  श्रीगोंदा तालुक्यातल्या छोट्याश्या खेड्यातला हा युवक युद्धापेक्षा संवादाच्या भाषेवर जास्त विश्वास ठेवतो. अगदी अतिरेक्यांनी त्याला पकडल्यावरसुद्धा तो न डगमगता त्यांना आपल्या कामाविषयी निडरपणे सांगतो व अतिरेकीही म्हणतात,  ‘‘ये तो नेक काम कर रहा है, ये तो अल्ला का बंदा है इसे मारा तो अल्ला हमे माफ नही करेगा…’’ आणि अधिक कदमला जिवंत सोडूनही देतात. हे ऐकताना श्‍वास रोखून सगळेजण ऐकत असतानाच तो म्हणतो दहशतवादाचा धर्म कुठलाही असो पण माणुसकीचा धर्म मात्र आपण जपायला हवा. बोर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून…स्वतःचा जीव धोक्यात घालून जात धर्म पंथ न पाहता पीडितांची सेवा करत राहतो अनेक निराधार मुलींचा हा भैया होतो… अधिकची मुलाखत चालू असताना त्याला खरं तर बोलताना थांबवावं  वाटतच नव्हतं. अनेक तरूण-तरुणी अधिकच्या विचारांनी प्रभावित होऊन आपापल्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावण्यासाठी सीमारेषा ओलांडून नक्कीच सज्ज झाले असतील ह्यात तिळमात्र शंका वाटली नाही. प्रदीप लोखंडेनी तर अशा काही प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या की सगळ्या तरुणांचे चेहरे आश्वासक भावाने उजळून निघाले.

जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के लोकसंख्या भारतात आहे आणि त्यातील 66 टक्के जनता अजूनही ग्रामीण भारतात राहते आणि नेमकी हीच संधी आहे आहे असं समजून अवघ्या जगाचं आपल्याकडं लक्ष आहे आणि ह्याच संधीचं सोनं करण्यासाठी ह्या चालत्या बोलत्या कंप्युटरने 85000 गावांचा सगळ्यात मोठा डेटाबेस तयार करण्याचं काम केलं…तसेच ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून प्रचंड मोठा व्यवसायही उभा केला. आणि शेकडो ग्रामीण तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला. मार्केटिंगच्या क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणे जे प्रयोग केले तेही अफलातून आहेत. उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत असताना सामाजिक कार्याचा वसा मात्र त्यांनी कधीच सोडला नाही. लाखो पुस्तकांच्या आणि हजारो संगणकांच्या दानातून त्यांनी सामाजिक कृतज्ञतेचा एक वेगळा आदर्श समाजासमोर उभा केला आहे… ह्या पोस्टकार्ड मॅनला भारताच्या कानाकोपर्‍यातून सात लाखांपेक्षा जास्त पत्रे आली आहेत.

अशा ह्या ध्येयवेड्या आणि सळसळत्या प्रदीप लोखंडे नावाच्या तरुणाने युवकांना एका वेगळ्याच पर्वाची नांदी गायला भाग पाडले. 2020 पर्यंत आपला देश महासत्ता होईल का ह्या प्रश्नावर मात्र त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आणि म्हणाले कि देश महासत्ता जरी झाला नाही तरी प्रत्येक भारतीयाच्या हातात अँड्रॉइड फोन मात्र असेल अन भारत देश युवकांच्या प्रचंड पोटेंशिअलने भरलेला आणि भारलेलाही असेल. रचनात्मक सामाजिक कामात युवकांची भूमिका आणि त्या अनुषंगाने युवकांच्या मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ह्या मान्यवरांची मुलाखत घेण्याची मला सुवर्णसंधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.  अतिशय सकारात्मक उर्जेने पहिला दिवसाचा समारोप झाला. उपस्थित प्रत्येक युवक युवतीने प्रेरणेचा अखंड स्त्रोत उरात घेवूनच सभागृह सोडले.  आपापल्या कार्याच्या अवकाशात प्रचंड ताकदीने नव्याने भरारी घेण्यासाठी हे सर्वजण दुसर्‍या दिवशीही ताज्या दमाने तिसर्‍या सत्राला हजर झाले. परिवर्तन परिवार आणि सगळे तरुण तरुणी ह्यांच्यातले पहिल्या दिवसाचे अनोळखीपण आता नकळतपणे दूर झाल्यासारखे वाटत होते. कारण पहिल्या दिवशी लाजरी बुजरी वाटणारी ही मंडळी आता मस्तपैकी परिवर्तन युवा परिषदेशी आणि तिथल्या प्रत्येकाशी एकरूप झालेली वाटली.

तिसर्‍या सत्रात ‘प्रसारमाध्यमे आणि वास्तव’ ह्याच्यावर अतिशय परखड, अभ्यासपूर्ण आणि संतुलित विचारमंथन झाले. कारण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मात्र त्यांनतर प्रसारमाध्यमामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून ज्या घटनांचं वार्तांकन केलं जातं आणि त्याचा समाजमनावर जेव्हा सकारात्मक परिणाम होतो तेव्हा हे माध्यम खर्‍या अर्थाने प्रभावी वाटू लागतं अशी खरं तर अपेक्षा असताना अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांना पेड न्यूज नावाच्या एका व्हायरसनसुद्धा ग्रासलं. राजकीय पक्षांच्या हातातले बाहुले बनल्यासारख्या काही प्रसारमाध्यमाची वर्तणूकसुद्धा आपल्याला दिसली …ही माध्यमे नेमकी कुणासाठी असाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडू लागला…आणि मग आम्हा तरुणांना ह्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी सचिन पवार ह्या मित्राने तीन वेगवगेळ्या क्षेत्रात पत्रकारिता करणार्‍यांना बोलतं केलं.

सर्वप्रथम टिपिकल पर्यावरणवाद्याप्रमाणे कुठलाही शंखनाद न करता…महाराष्ट्रातील पर्यावरणाचा अभ्यास जे आपल्या द्वैमासिकातून मांडत आहेत….पर्यावरण हा विषय मुळात क्लिष्ठ वाटत असताना तो अतिशय रंजक पद्धतीने अद्भुत आणि मजेशीर पद्धतीने मांडण्याची ज्यांची हातोटी आहे असे संपादक अभिजित घोरपडे ह्यांनी पर्यावरण ह्या क्षेत्रात काम करायला फार मोठी संधी आहे असे आवर्जून सांगितले. कारण पठडीतल्या प्रकारात जर तुम्ही काम करत असाल तर तुमची ओळख लवकर बनत नाही पण जर का तुम्ही कार्यक्षेत्र जगावेगळे निवडले तर तुम्हाला जग ओळखू लागते. अतिशय अपघाताने पर्यावरण पत्रकार झालो हे सांगताना युवकांच्या आयुष्यात काही काही अपघात हे जीवनाला दिशा देवून जातात मात्र ते ओळखता आले पाहिजेत असे म्हणताना अभिजित घोरपडे हे पर्यावरणाची गाथा उराशी घेवून चाललो म्हणून आज तुमच्यासमोर आहे हेही आवर्जून सांगितले. पर्यावरण ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मोठे अवकाश आहे ह्या त्यांच्या मताशी सर्व युवक सहमत तर झालेच परंतु एक वेगळा दृष्टीकोनसुद्धा त्यांना मिळाला.

इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी प्रतिनिधी उपस्थित होती तिने तर सर्वांची मने अगदी सहज जिंकली. ती म्हणजे हलीमा कुरेशी. गंगाखेड तालुक्यात राणी सावरगाव  ह्या छोट्या खेडेगावात जन्मलेली. खाटिक समाजाने खाटिक म्हणूनच काम करावं अशा पारंपारिकतेला प्रचंड हळव्या मनाच्या हलीमाच्या वडिलांनी मात्र छेद देवून आणि ड्रायव्हरकी केली…त्यासाठी गाव सोडलं…..साधी अक्षरओळख नसतानाही सगळ्या मुलीना मात्र पुरेसं शिक्षण दिलं. हलीमाच्या बलस्थानांपैकी एक बलस्थान म्हणजे शोध पत्रकारिता आणि दुसरे बलस्थान म्हणजे कुणासाठीही आणि कुणासमोरही तडजोड न करणे…
म्हणूनच आज युवा पत्रकारांमध्ये तिचं नाव आदरानं घेतलं जातं. आयबीएन लोकमतला काम करताना आलेले अनुभव ती सांगत होती अन् सगळेजण स्तब्ध होऊन तिला ऐकत होते. गोह्त्त्या बंदीनंतर तिने केलेल्या डोक्युमेंट्रीसाठी तिला अतिशय प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका हा पुरस्कारही मिळाला. अतिशय कमी वयात मिळालेल्या ह्या पुरस्काराने ती हुरळून तर नाहीच गेली उलट जबाबदारीने काम करत राहिली हे ती तिच्या मुलाखती दरम्यान पुन्हा पुन्हा सांगत राहिली कारण डोक्यात हवा शिरू न देता युवकांनी काम केले तरच युवक चांगले काम करू शकते हे तिच्या सांगण्यामागचा उद्देश.

सर्वसामान्य माणसांच्या दबलेल्या वेदनांना वाचा फोडणारी आणि आपल्या मुळांजवळ साचलेल्या अंधाराचाही शोध घेणारी हलीमा कुरेशी हिने प्रसार माध्यमामधल्या अनेक सकारात्मक बाबी समोर आणून प्रसार माध्यमांच्या उजळ बाजूबद्दल सर्वाना चांगल्या पद्धतीने विचार करायला भाग पाडले. अशा प्रकारे प्रसारमाध्यमे आणि वास्तव ह्याचा उहापोह मांडला असताना ग्रामीण पत्रकाराला दर महिन्याला केवळ 1500 रुपये मानधन मिळते आणि दुसर्‍या बाजूला शहरातल्या मोठ्या पेपरच्या पहिल्या पानावर पानभरून जाहिरात देण्याचा दर हा 65 लाख रुपये असतो ह्या विसंगतीने अवघे सभागृह आश्चर्यचकित झाले आणि हे अतिशय परखडपणे ज्यांनी सांगितले त्यांचे नाव घनश्याम पाटील. ज्या वयात तरूण इकडे तिकडे फिरण्यात धन्यता मानतात, अस्थिर असतात त्या वयापासून गेली 15 वर्षे जो तरूण पूर्ण वेळ पत्रकारिता करतो… महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक म्हणून ज्यांना ओळखलं जातं… वयाच्या तेराव्या वर्षी जो मुलगा वार्ताहर म्हणून काम सुरु करतो…. ‘चपराक’ मासिक व साप्ताहिक तो नेटाने चालवतो. नीळकंठ खाडिलकरांनतर उत्तम आणि परखड अग्रलेखांसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं… सर्वात मोठ्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेक प्रसिद्ध तसेच नव लेखक-कवींना ते लिहित करतात.. अशा घनश्याम पाटलांनी आपल्या मुलाखतीत अतिशय परखडपणे मते मांडून अनेक समस्यांना वाचा फोडली. विशेषतः कॉलेजगेट्च्या लोकप्रिय कादंबरीला अनेकांनी नाकारलं त्या अवघ्या 22 वर्षाच्या तरुणाला ज्यांनी पाटलांनी प्रकाशात आणलं…त्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या तर निघाल्याच आणि त्यावर आता एक सिनेमासुद्धा येतोय. अशा अनेक तरुण लेखण्यांना बळ देण्याचे काम आम्ही करतो हे सांगताना त्यांनी कसदार लिखाणाची अपेक्षा मात्र अतिशय आग्रहाने व्यक्त केली. सामान्य माणसाचा स्वर उंचावणारी प्रसारमाध्यमे ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले आणि प्रसारमाध्यमात काम करू पाहणार्‍या तरुणांना महत्त्वाचा सल्लाही दिला की, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी कुठल्याही घटनेचं वार्तांकन करू नका तर त्यामागची सामाजिक भानाची जाणीव प्रत्येक वेळेला काळजात जिवंत असू द्या.

अशा प्रकारे कधी हळूवार तर कधी चपराक देवून ह्या सत्राची शिदोरी सोबत घेवून… जगण्याला भिडताना ह्या चौथ्या सत्राची सुरुवात झाली. पुन्हा एकदा सचिन पवार ह्याने आपल्या प्रगल्भ प्रश्नांनी ह्या युवा परिषदेच्या विचार मंथनाचा परमोच्च बिंदू गाठला.  सगळ्यात आधी दिशा शेखला ( हे नाव लिहिताना अख्खी मुलाखत माझ्यासमोर उभी राहिली अन अंगावर सर्रकन् काटाही आला ) सचिनने विचारले की, आंम्ही तुला ती म्हणू? तो म्हणू? की ते म्हणू? परंतु जेव्हा दिशा म्हणाली की मला माणूस म्हणा! तेव्हा सगळे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले. दहावी शिकलेली व्यक्ती जी हिजडा आहे आणि तिलाही भावभावना आहेत ह्याची प्रांजळ कबुली देताना दिशा एखाद्या प्रचंड विद्वान माणसासारखी बोलत होती. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हे सर्वसामान्य माणसांच्या तर्कांना सुरुंग लावत होते. मी बाजार मागते अन् मग दोन वेळचं मला पोटभर जेवायला मिळतं. हे सांगणारी दिशा कधीच कुठली गोष्ट झाकून ठेवत नव्हती. बाजार मागणार्‍या अवतारातली मी स्वतःला जास्त भावते. इथे तुमच्या समोर मी खुर्चीत बसून ज्या भाषेत बोलते ती भाषा माझी नाही ती भाषा खुर्चीची आहे असं सांगताना ती म्हणते समाजाने जर ठरवले की एखाद्या व्यक्तिला नष्ट करायचे तर तोच समाज अशा व्यक्तिला एक तर पायाखाली घेतो किंवा खुर्ची देतो माझ्यासारखी. स्त्रीतला पुरुष अन् पुरुषांच्या आतली स्त्री माणसाला जेव्हा ओळखता येईल तेव्हाच माणूस हा माणूस म्हणून सर्व पातळ्यांवर समान दर्जाने जगू शकेल.

प्रचंड वाचन, अफाट स्मरणशक्ती, स्पस्ष्टवक्तेपणा, प्रसंगावधान, स्वतः हिजडा असूनही  स्त्री पुरुष असा भेद न करता संतुलितपणे व्यक्त होणारी दिशा अवघ्या सभागृहाला दिशा देवून गेली अन माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यात अश्रूसुद्धा….मला ह्यावेळी वाकुडकरांच्या काही ओळी आठवल्या अन त्यात मी दिशासाठी थोडासा बदल केला.
हि व्यथांची वेधशाळा
हि नभीचा मेघ काळा
वाळवंटा ऐक हिचे
हि उद्याचा पावसाळा…
आपल्या सणाच्या वेळी जर आपल्याला कुणी कामावर बोलावलं तर आपली खूप चिडचिड होऊन जाते परंतु सणवार असो किंवा काहींही असो ज्यांच्या पाचवीलाच ड्युटीवर जाणे पूजले आहे अशा पोलीस वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पोलीस शिपाई राहुल काळे हा आला होता. पोलीस हा समाजातला सगळ्यात जवळचा पण सगळ्यात दुर्लक्षित घटक…त्यालाही आंम्ही ह्या परिषदेत सामावून घेवून त्याचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला.

कारण , पोलिसाकडे फक्त भांडण किंवा चोर्‍या झाल्यावरच येणारी माणसे कधीतरी चांगल्या कामासाठी जेव्हा येतील तेव्हाच समाजाला पोलीस कळू शकेल. कारण खाकी वर्दीच्या आड एक माणूसच आहे हे समाज समजून जोवर घेत नाही तोवर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीच बदलू शकत नाही. एखाद्या गुंडाने जर आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर त्याला आम्ही कोपच्यात घेवू हा पोलिसी खाक्या राहुलच्या प्रोफेशनमधून मधून मधून अगदी सहजपणे डोकावत होता. परंतु खरं तर माणसांच्या मनात असलेला पोलीस आणि त्याच्यावर असेलला कामाचा प्रचंड ताण ह्याची थोडी जरी जाणीव मनात ठेवली तरी खूप झाले असे सांगताना पोलीस स्टेशनला जायची वेळच येवू नये असे समाजाचे जर वर्तन असेल तर नक्कीच खूप मोठा फरक पडू शकेल असेही त्याने सांगितले.

तबस्सुम शेख नावाची ट्रिपल तलाक विरोधात लढणारी एक तरुणी आपलं म्हणणं मांडायला पुण्यात दोन दिवस तळ ठोकून होती. एकदम हाय फाय मॉड राहणारी मुलगी अचानक बुरखा का घालायला लागली हे सांगताना तिला ज्या वेदना झाल्या त्या फार बोचर्‍या होत्या. मुस्लीम स्त्रियांना मिळणार्‍या ट्रिपल तलाख ह्या पद्धतीला तबस्सुम अक्षरश: रानटी प्रकार असं संबोधते. स्त्री कुठल्याही धर्मातली असो तिला मन असतेच ना? घटस्फोट, तलाख, डिवोर्स ह्या शब्दांनीच किती वेदना होतात. अन् मग प्रत्यक्षात ज्या स्त्रीवर अशी वेळ येत असेल तिच्या मनाचा कधी विचार केला आहे का कुणी ? अशा अनेक पोटतिडिकीने मांडलेल्या तिच्या प्रश्नांनी सर्वाना अंतर्मुख करून टाकले.

अशा प्रकारे जगण्याला भिडताना कायकाय आव्हाने असतात अन त्यातूनही माणसे कशी पार होतात ह्याचा अख्खा चित्रपट उभा समोर करून तो मनावर कोरून ह्या सत्राचा अगदी वेळेअभावी आम्हाला समारोप करावा लागला. मुंबई विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागात शिकवणार्‍या डॉ. दीपक पवार ह्यांनी तर सहाव्या सत्राला अक्षरश: गदगदा हलवून सोडले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरुणांच्या जबाबदारीच्या भानाला जागृत करणारे त्यांचे संबोधन म्हणजे दोन दिवसांच्या सगळ्या सत्रांचा परिपाक होता असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. युवकांच्या काळजाला हात घालताना त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तरुणांची नेमकी जबाबदारी पुन्हा पुन्हा युवकांच्या काळजावर बिंबवली. अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. आश्वासक विचार आणि त्याला योग्य कृतीची जोड दिल्याशिवाय आजचा तरूण जबाबदारी घेवू शकणार नाही ही गोष्ट त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या अवाढव्य राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या अनेकांच्या आयुष्यात ह्या युवा परिषदेने चांगले बदल घडतील ह्या  आशावादी विचाराने त्यांनी तरुणांना शुभेच्छा दिल्या.
ज्या सर्जनशील युवा नेतृत्वाचा शोध घेण्याच काम आम्ही शिरावर घेतलं होतं त्यातले काही तरूण/ तरूणीना  सन्मानित करून युवा परिषदेसाठी उपस्थित असलेल्यांना काकणभर का होईना चेतना द्यावी म्हणून ज्यांच्या कार्याचं वय केवळ 2 ते 2.50 वर्षे आहे अशांना सन्मानित केलं गेलं.

त्यात महिला व बालक ह्यांच्यासाठी काम करणारी सायली धनाबाई हीही होती. मी तिची मुलाखत घेत असताना जाणवले की ही तरूणी जे बोलतेय किंवा जे काम करतेय ते एखाद्या वयस्कर माणसाच्या कार्यालाही लाजवेल असे आहे. मी मुलगी म्हणून कधीच कुणाची सहानुभूती कधीच घेत नाही उलट एखाद्या गुंडा-पुंडाशी दोन हात करायलासुद्धा मागे-पुढे पाहत नाही. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून पुरंधर तालुक्यात हिने आजवर 10च्या वर वाचनालये केवळ लोकसहभागातून उभी केली आहेत. कुठल्याही कामाच्याप्रती आपली प्रामाणिक इच्छा आणि समाजाचे होत जर आपल्या कार्यातून दिसत असेल तर समाज नक्कीच मदतीला पुढे येतो असेही ती नम्रपणे म्हणाली.

महिला सरपंच आणि तीही अगदी तरूण आणि तिला गावातूनच झालेला विरोध ह्याला न जुमानता मेदनकरवाडीची पहिली उच्चशिक्षित महिला सरपंच युवा परिषदेच्या मंचावर बसली होती. खरं तर तीच फार मोठी प्रेरणादायक घटना होती. ग्रामपंचायतीला आयएसओ मिळवून देणारी सरपंच, गावात अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला समृद्ध करणारी सरपंच, गावात ई-रिक्षा चालू करणारी सरपंच, भ्रष्टाचारवर घाव घालणारी सरपंच. अशी ही प्रियंका मेदनकर तरुणांशी संवाद साधून सगळ्यांना प्रेरित करून गेली आणि जाता जाता स्थानिक पातळीवर सुद्धा काम करताना अडचणी येवू शकतात पण त्यावर मात करता येते हेही ती ठामपणे सांगून गेली.

तिला आज शिवायचं नाही, तिला अडचण आहे, तिला कावळा शिवला आहे, ती आज बाहेर बसली आहे. अशी अनेक वाक्ये आजही आपण सर्रास ऐकतोच. पण कुणीतरी स्त्रियांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत का ? समजल्या तरी त्यावर मौन ठेवण्यात धन्यता मानणार्‍या समाजात प्रवीण निकम सारखा महिलांच्या मासिक पाळी संदर्भात काम करतो. स्त्रियांच्या आरोग्याविषयी अनेक ठिकाणी आरोग्य मेळावे घेतो. माहितीपर प्रदर्शन भरवतो. स्त्रियांच्या आरोग्याविषयी असलेल्या भ्रामक कल्पनांना छेद देत त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो.  विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रियांची कुचंबणा मासिक पाळीच्या वेळेस फार होते. त्यावरसुद्धा प्रवीण निकम भाष्य करतो. असं काम करणारे अनेक आहेत पण ऐन तारुण्यात एवढ्या दुर्लक्षित विषयावर काम करणार्‍या ह्याही युवकाला सन्मानित करण्यात आले.

ह्या युवा परिषदेचा कळस म्हणजे आपल्या राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सरांनी केलेले समारोपाचे भाषण हे होय. महाराष्ट्राची नेतृत्व संस्कृती ह्या विषयाला न्याय द्यायला एवढा प्रगल्भ साहित्यिक मिळावा हे खरे तर परिवर्तन युवा परिषदेच्या उदात्त हेतूला मिळालेला आशीर्वादच. मोरे सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत तरुणांना जे मार्गदर्शन केले त्यात अगदी तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आणि सद्यस्थितीवरसुद्धा अतिशय उत्तम भाष्य केले. देशाची भावी पिढी घडवायची असेल तर चांगली पुस्तके तर वाचावी लागतीलच परंतु त्याच्या जोडीला संस्कारक्षम तरूण म्हणूनही पुढे यावे लागेल असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

एवढ्या भरगच्च सत्रांच्या नेटक्या आयोजनाने पहिल्या परिवर्तन युवा परिषदेला समृद्ध तर केलेच परंतु समर्थ राष्ट्र उभारणीच्या कार्यात सकारात्मक पद्धतीने नेतृत्व करू पाहणार्‍या अनेक युवक युवतीसाठी ही युवा परिषद एक प्रेरणास्त्रोत ठरली. कारण परिषदेच्या समारोपानंतर आणि त्यांनतरही मिळालेल्या सहभागी युवकांच्या प्रतिक्रिया खूप बळ देणार्‍या आणि भारावून टाकणार्‍या होत्या व पुढील वर्षीच्या युवा परिषदेबद्दल अतिशय जबाबदारीने पावले टाकायला लावणार्‍या होत्या. नेतृत्व म्हणजे फक्त राजकारणच नव्हे तर आपल्या कोणत्याही आवडीच्या परंतु समाजोपयोगी क्षेत्रात पुढाकार घेवून त्यात सातत्य ठेवणे म्हणजे नेतृत्व. अन अशाच नेतृत्वाला दिशा दाखवण्यासाठी आणि अशा नेतृत्वाच्या शोधासाठी ह्या परिषदेची आखणी केली गेली होती. त्यामध्ये अतिशय काटेकोरपणे वेळचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रातला एक तरी प्रेरणादायी वक्ता असावा हाही अट्टाहास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे इतिहासात जर डोकावलं, तर हे पदोपदी दिसत की, अवघ्या देशाची काळजी घेण्याची पुण्याची परंपरा फार जुनी आहे. आणि त्याचसाठी परिवर्तन युवा परिषदेच्या माध्यमातून समर्थ राष्ट्र उभारणीच्या कामात युवा नेतृत्वाची उणीव भासू नये आणि म्हणूनच प्रगल्भ युवक युवतींच्या नेतृत्वगुणात गुणात्मक वाढ व्हावी म्हणून दोन दिवस वेगवगेळ्या विषयांवर सविस्तर आणि नेतृत्वगुणाच्या वाढीस असे पूरक चिंतन झालं.

ह्या परिवर्तन युवा परिषदेचे आयोजन परिवर्तन सामाजिक संस्थेने केले होते. आजवर ग्रामीण शिक्षणावर काम करणारी ही संस्था, बीडमध्ये आत्महत्त्याग्रस्त भागात गरजू परंतु हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणारी संस्था म्हणून तिला ओळखले जाते. ह्या संस्थेत कुणीही सचिव नाही, खजिनदार नाही, अध्यक्ष नाही, सल्लागार नाही. ह्या संस्थेत सगळे फक्त काम करायला पुढे पुढे  धावणारे आणि स्वतःचे नाव मात्र कुठल्याही प्रसारमाध्यमात किंवा इतर ठिकाणी न येवू देण्यासाठी तडफडणारे कार्यकर्ते म्हणून ह्यांची ओळख आहे. आणि म्हणूनच मी इथे कुणाचीही नावे न घेता ह्या परिवर्तन युवा परिषदेसाठी  रात्रंदिवस राबलेल्या परिवर्तनासाठी झटणार्‍या माणसांना सलाम करतो आणि पुढल्या वर्षीच्या युवा परिषदेसाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो कारण शुभेच्छा देत नसतात तर त्या व्यक्त करायच्या असतात.

देवा झिंजाड, पुणे 9881235377

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा