प्रत्येक विचारधारेत, संस्थेत, पक्षात काही घरभेदी असतात. मूळ उद्दिष्टांपासून दूर जात ते त्याचा अतिरेक करतात. थोडक्यात काय तर ही ‘बांडगुळं’ असतात. झाडाच्या ज्या फांदीवर हे बसलेले असतात तीच फांदी हे महाभाग तोडतात. त्यांना त्याचं काही गांभीर्यच नसतं. गांभीर्य नसतं असं म्हणण्यापेक्षा मुळात तितकी अक्कलच नसते. मध्यंतरी काही कट्टरतावाद्यांनी हिंदू आणि हिंदुत्त्व हे शब्दही बदनाम केले होते. अशा वाचाळवीरांची पुरोगाम्यातील विकृत आवृत्ती म्हणजे विश्वंभर चौधरी!
पुरोगामी हा शब्द ‘ढोंगी’ या शब्दाला समानार्थी झालाय. त्यात पू भरल्याने हे रोगी झालेत. आपल्या भंपकपणामुळे वाटेल त्या थराला जायचे, वाटेल तसे तारे तोडायचे हेच त्यांचे जीवितकर्म झालेय. एखादी चांगली योजना पुढे फसावी तसे पुरोगामी विचारधारेचे झालेय. ‘पुरोगामी महाराष्ट्र’ ही व्यापक संकल्पना इतकी खुरटी झालीय की त्याला काही अर्थच नाही. पूर्वी धर्मावरून घसरणारे आता जातीवर उतरतात. त्यातूनही काही साध्य होत नाही म्हणून एखाद्या साहित्य संस्थेने एखाद्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लेखकाच्या कलाकृतीला पुरस्कार दिला म्हणून त्याचेही राजकारण करतात. कोणतेच मुद्दे नसल्याने यांचे सैरभैर होणे समजून घेण्यासारखे असले तरी यामुळे ‘पुरोगामी’ या संकल्पनेचे मात्र बारा वाजले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. जवळपास 111 वर्षे अव्याहतपणे आणि साहित्यिक निष्ठेने ही संस्था काम करतेय. ही संस्था विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानीत करते. यंदा ‘स्तंभलेखन’ या साहित्यप्रकारासाठी डॉ. सच्चिदानन्द शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड झाली. पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलाय. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची त्याला विवेचक प्रस्तावना आहे. शेवडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उत्तम आविष्कार या पुस्तकात आहेच; पण केवळ भाऊंच्या या प्रस्तावनेसाठीही हे पुस्तक विकत घ्यायला हरकत नाही.
हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि विश्वंभर चौधरी यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांची मळमळ, खदखद बाहेर पडली. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी होती –
‘‘मसाप या अतिशय सुमार दर्जाच्या साहित्यिक संस्थेनं ’सेक्युलर नव्हे, फेक्युलर’ नावाच्या (नावातच सुमारपण दाखवणार्या) पुस्तकाला पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी विश्वात खळबळ माजली आहे. ती खळबळ अप्रस्तुत आहे कारण मसाप नावाच्या धोतर्याच्या झाडाला हापूस आंबे लागतील अशी वृथा अपेक्षा पुरोगामी ठेवत आहेत! हा दोष सर्वस्वी पुरोगाम्यांचाच.
मुळात या ’मसाप’ मध्ये ’साहित्य’ शोधायला पुरोगाम्यांनी जावेच कशाला? ही संस्था एखाद्या गणपती मंडळासारखी किंवा दहीहंडी मंडळासारखी नाहीय का? वर्षाला एकदा 2500000 रुपयांचा शासकीय रमणा घेऊन संमेलनाचा ऊरूस भरवणे आणि शासनात कोणते वारे वाहते ते कुक्कुटयंत्राच्या संवेदनशीलतेनं बघून काही पुरस्कार देणे एवढंच या संस्थेचं सध्या जिवीतकार्य! माझा तर अगदी अलीकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबू, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद! मला तरी विंदा करंदीकर किंवा मंगेश पाडगावकर कधी टिळक रस्त्याला दिसलेले नाहीत. माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या मनात तरी या संस्थेची एवढीच प्रतिमा आहे.
तेंव्हा एवढ्या प्रतिष्ठीत संस्थेकडून कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला तरी पुरोगाम्यांना काय फरक पडतो? सुमारांच्या सद्दीत दुसरे काय अपेक्षित असते?’’
विश्वंभर चौधरी यांनी यात जी अक्कल पाजळली आहे ती त्यांच्या बिनडोकपणाचा पुरावा आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या संस्थेला ‘सुमार’ समजणे हे यांच्या सडलेल्या मेंदूचे लक्षण आहे. ‘पुरोगामी विश्वात खळबळ’ म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे? असे काही ‘पुरोगामी विश्व’ अस्तित्वात आहे का? म्हणजे घरातल्या सिलेंडरवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे आणि ‘ज्वालामुखी खदखदू लागला’ असं म्हणायचं अशातला हा प्रकार झाला. गणपती मंडळ किंवा दहीहंडी मंडळाच्या माध्यमातून काय पुरोगामी विचार देता येतो हे जितेंद्र आव्हाडांनी दाखवून दिले आहेच. म्हणजे पुरोगामी म्हणून मिरवायचे आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत दहीहंड्या लावायच्या, तिथे बायका नाचवायच्या!! असे गोरखधंदे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले नाहीत.
पंचवीस लाखाचा ‘रमणा’ घेणे हे त्यांना या संस्थेचे जीवितकार्य वाटते. यातली पहिली गोष्ट म्हणजे संमेलन भरवणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम नाही. ते निमंत्रक संस्था आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था भरवते. त्यामुळे या निधीचा आणि मसापचा बादरायण संबंध नाही. आयुष्यभर रमणा घेऊनच जगणार्या विश्वंभरला असेच शब्द सुचणार. त्यांनी कष्टाने चार पैसे मिळवलेत हे कुणाला ठाऊक आहे का? ते जी तथाकथित एनजीओ चालवतात त्यासाठी कुणापुढे तरी वाडगा पसरून, खरीखोटी कागदपत्रे सादर करून, अंबानी-अदानीच्या मागे लागून, किंवा रस्त्यावरचा चोर, लुटारू, अगदी बेकायदा टपरी लावणारासुद्धा; अशा लोकांकडून पैसे घेऊन अशा एनजीओ चालतात. विश्वंभर चौधरींनी कोणत्या व्यवसायातून इतके पैसे मिळवले आणि सामाजिक काम केले, त्यांच्या संस्थेच्या या अमुक तमूक कामातून हे पैसे मिळाले हे त्यांनी जाहीर करावे! किंवा त्यांच्या या कामातून, विचारातून महाराष्ट्राला कोणता नवा पैलू मिळाला, कोणता प्रकल्प मार्गी लागला, बेरोजगारी संपली, साहित्यिक निर्माण झाले हे जाहीर करावे. त्यातून त्यांचे योगदान स्पष्ट होईल. माझ्यासारखा प्रकाशक कष्टाने चार पैसे मिळवतो. मसापचे पदाधिकारी अशा ‘रमण्या’वर पोट भरत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाची वेगळी साधने आहेत. विश्वंभर चौधरी मात्र त्यांच्या ज्या काही पर्यावरणवादी संस्था आहेत त्यावर जगतात.
यांना टिळक रस्त्यावर कधी पाडगावकर, विंदा दिसले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. उद्या ते म्हणतील की, मला सेनापती बापट रस्त्यावर कधी सेनापती बापट किंवा टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळक दिसलेच नाहीत! साहित्य संमेलनासाठी लागणारे तंबू, सतरंज्या, खुर्च्या बाळगणारी ही संस्था असा यांचा ‘समज’ आहे. मुळात ही मंडळी समजावर जगतात. ना त्यांचा अभ्यास असतो, ना जीवनानुभव समृद्ध असतात. ‘समजा’तच जगणारे काहीही विचार मांडू शकतात. त्यांना कोण आवरणार? यांचा वास्तव जगाशी काही संबंधच नाही. हेच वास्तव तर शेवडे यांच्या या पुस्तकात मांडले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची या पुस्तकाची प्रस्तावना प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पुस्तक सोडा, पण ही प्रस्तावना वाचूनच विश्वंभर चौधरी यांच्यासारख्यांचा जळफळाट होणे आणि ते मनोरूग्ण होणे अपेक्षित होते. घडलेही तसेच.
दलित चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिवाजीराव कदम, उल्हास पवार, यशवंतराव गडाख हे विश्वस्त मंडळावर आहेत. ही मंडळी हिंदुत्त्ववादी नाहीत. साहित्य परिषदेची एक यंत्रणा आहे. त्यांच्याकडे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवावी लागतात. आलेल्या पुस्तकातून त्या त्या साहित्य प्रकारातील पुस्तके संबधित परीक्षक निवडतात. यंदा स्तंभलेखन या साहित्य प्रकारासाठी मी परीक्षक होतो आणि यातील सच्चिदानन्द शेवडे यांचे हे सर्वोत्तम पुस्तक आहे. या निवड प्रक्रियेत मसापच्या कोणत्याही पदाधिकार्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. मुळात हा पुरस्कार ‘विचारधारेला’ नाही तर ‘साहित्यप्रकाराला’ दिलाय हे लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे या पुस्तकातील लेख एका समाजवादी विचारधारेच्या वृत्तपत्रातूनच सदर स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.
दुसरे म्हणजे विश्वंभर चौधरी काही लेखक नाहीत. माझ्या माहितीनुसार ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासदही नाहीत. मग ही जळाऊ वृत्ती कशासाठी? मसापच्या पुरस्कारावर त्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावे एखादी साहित्यिक संस्था काढावी आणि पुरूषोत्तम खेडेकरांपासून श्रीमंत कोकाटेपर्यंत हवे त्यांना पुरस्कार द्यावेत. त्यांना अडवतंय कोण? स्वतः तर काही विधायक करायचे नाही आणि इतर कोणी केले तर त्रागा करायचा हे कसले लक्षण?
अण्णा हजारे, केजरीवाल, मेधा पाटकर अशा परजीवी लोकासोबत राहून विश्वंभर चौधरी यांच्यासारख्या अनेकांच्या डोक्याचा ‘केेमिकल लोच्या’ झालाय. द्वेष पसरवणं, वाद निर्माण करणं, आक्रस्ताळेपणा करणं आणि आपली असभ्य, उर्मट वृत्ती दाखवून देत येनकेनप्रकारे चर्चेत राहणं हा यांचा आवडता उद्योग. प्रत्येक घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे आणि ते ग्राह्य धरले पाहिजे या दुराग्रहामुळे त्यांचा अहंकार सातत्याने दुखावला जातो. ‘अभ्यासाविन प्रगटे तो एक मूर्ख’ हे रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान यांच्याकडे पाहून पूर्णपणे पटते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा सर्व विचारधारांच्या सर्व लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केलाय. अर्थात यात कुणाचीही विचारधारा बघितली नाही तर त्यांची साहित्यिक ‘कलाकृती’ बघितली. यांचा आक्षेप मात्र फक्त सच्चिदानन्द शेवडे यांच्या पुस्तकावरच आहे. मनाच्या या कोतेपणामुळेच महाराष्ट्र कधीही पुरोगामी राज्य होऊ शकले नाही आणि अशा चिरकुटांची बौद्धिक दिवाळखोरी पाहता भविष्यातही ते कधी होईल असे वाटत नाही, हेच यानिमित्ताने अधोरेखित करावे वाटते.
घनश्याम पाटील
भ्रमणध्वनी : ७०५७२९२०९२