‘नन्नाचा पाढा लावू नको, निगेटिव्ह बोलू नको, वास्तूपुरुष ‘तथास्तु’ म्हणत असतो’ अशी भीती लहानपणी आई घालायची तेव्हा हसू यायचं! कारण जमिनीत पुरलेली वास्तूपुरुषाची ती एवढीशी प्रतिमा आपलं काय वाकडं करू शकणार? असा विचार मनात यायचा. पाण्याला ‘जीवन’ म्हणतात इथपर्यंत ठीक आहे; कारण पाण्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असतो! पण लगेच त्याला ‘तीर्थ’ काय म्हणायचं? प्रत्येक गोष्टीची सांगड देवाधर्माशी का घालायची असेही बंडखोर प्रश्न माझ्याच नाही असंख्यांच्या मनात आले असतील… येत असतील…
मात्र ते प्रश्न तिथेच सोडून द्यायची माझी तयारी नव्हती. त्यामुळे असं का म्हटलं जात असेल, त्यात काही तथ्य आहे का? याचा वेध घ्यायचा प्रयत्न मी केला. जगभरातले अनेक शास्त्रज्ञसुद्धा या प्रश्नांच्या मुळाशी गेले आणि जे सापडलं ते थक्क करणारं होतं.
हे जे सांगितलं जात होतं किंवा पाण्याला जे जीवन किंवा तीर्थ म्हटलं जातं ते शंभर टक्के खरं आहे असं आता सिद्ध झालं आहे.
त्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्या पंचमहाभूतांमधलं एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे पाणी. हे पाणी आपल्या शरीरात सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे 72 टक्के इतकं आहे. म्हणजेच आपल्या स्वास्थ्याचा सर्वाधिक संबंध या पाण्याशी आहे.
पूर्वी आजच्या इतक्या संशोधनाच्या आधुनिक सोयी नसतील पण त्यांचे जे संशोधनाचे मार्ग होते ते अफलातून असावेत कारण या पाण्याचा आपल्या स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो हे त्या लोकाना अचूक माहिती असावं आणि म्हणूनच पाण्याला तीर्थ म्हटलं गेलं. पाणी भरताना स्तोत्र-मंत्र म्हटले गेले, नदीच्या किनार्यावर यज्ञ-याग केले गेले… पाणी अभिमंत्रित केलं गेलं! हा वेडाचार नव्हता, भाबडेपणा नव्हता हे आता सिद्ध झालं आहे.
हा वेडाचार नव्हता कारण पाणी काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये एनर्जी बाहेर टाकतं हे आता सिद्ध झालं आहे. म्हणूनच ‘डाऊझिंग’सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीत दडलेलं पाणी शोधता येतं, कारण ती फ्रिक्वेन्सी पकडता येते. म्हणजेच पाणी जिवंत असतं. मग त्याचा आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतो?
हे शोधण्यासाठी सर्वात चांगला पथदर्शी प्रयत्न जो केला तो मसारू इमोटो या जपानी शास्त्रज्ञाने केला. त्याने वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि त्या प्रत्येक बाटलीवर प्रेम, विश्वास, आनंद, समाधान अशा काही सकारात्मक गोष्टी आणि राग, द्वेष, मत्सर, दुःख, संताप अशा काही नकारात्मक गोष्टी लिहिल्या आणि त्या त्या बाटलीतल्या पाण्यावर त्याच त्या भावनेचं सिंचन केलं. म्हणजे जिथे प्रेम लिहिलेलं होतं त्या पाण्याच्या बाटलीसमोर उभं राहून तो, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ वगैरे बोलायचा. असं रोज त्या त्या बाटल्यांजवळ जाऊन तो त्या त्या भावना प्रकट करायचा. असं त्याने सलग 3-4 महिने केलं आणि मग जेव्हा त्याने त्या बाटल्यांमधलं पाणी मायक्रोस्कोपखाली तपासलं तेव्हा तो थक्क झाला
ज्या बाटल्यांमधील पाण्याला सकारात्मक भावनांचं सिंचन करण्यात आलं होतं, त्या बाटल्यांमधल्या पाण्याचे जे क्रिस्टल्स होते, त्यांच्या अतिशय सुरेख, नेत्रदीपक, भौमितीय आकृत्या तयार झाल्या होत्या तर ज्या बाटल्यांमधल्या पाण्याला नकारात्मक भावनांचं सिंचन करण्यात आलं होतं, त्या बाटल्यामधल्या पाण्याच्या क्रिस्टल्सच्या अशा काही भौमितीय आकृत्या तयार झाल्याच नव्हत्या. त्याचे जे आकार तयार झाले होते ते अत्यंत वेडेविद्रे होते.
पुढे त्याने नदीकाठी पाचशे लोकाना बसवून मंत्र म्हणायला लावून किंवा वेगवेगळ्या प्रकारचं संगीत पाण्याला ऐकवून त्याचे पाण्यावर काय परिणाम होतात अशा रीतीनेही तपासलं. त्याचे निष्कर्ष पुस्तक रूपानेही प्रसिद्ध आहेत.
त्यांचा सारांश सांगायचा तर एकच होता की पाणी जिवंत आहे. त्यामुळे आपण जर सकारात्मक भावनांचं सिंचन त्या पाण्याला केलं म्हणजेच मनात सकारात्मक भावना ठेवल्या, सकारात्मकच बोललो तर ते पाणी आपल्याला आरोग्य मिळवण्यासाठी उपयोगी ठरतं आणि नकारात्मक भावना मनात वागवल्या तर आपल्या शरीरातल्या पाण्याच्या माध्यमातून त्या पेशी पेशीपर्यंत जातात आणि आपल्याला अनारोग्याची देणगी देतात.
आता स्वास्थ्य हवं की आजार हे तुम्हीच ठरवायचं आहे! सकारात्मक भावना ठेवायच्या, सकारात्मकच बोलायचं की नकारात्मक बोलायचं, नकारात्मक भावना वागवायच्या हेही तुम्हीच ठरवायचे आहे. चॉईस इज युवर्स!
– जयश्री देसाई
प्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ जानेवारी २०२५
Very good https://is.gd/tpjNyL
Very good https://shorturl.at/2breu
Very good https://t.ly/tndaA
Good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Awesome https://is.gd/N1ikS2
Awesome https://is.gd/N1ikS2