शरीर एक जादूगार – राजेंद्र देशपांडे, पुणे

वरील शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल पण ते खरं आहे. माणूस व त्याचं शरीर खरंच जादूगार आहे. फक्त माणसाचं शरीरच नाही, सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांची रचना, स्वत: जिवंत राहण्याची त्यांची किमया हे सर्वच विलक्षण आहे. पृथ्वीवरील सर्व जीव याच जादूने जिवंत आहेत. आता ही जादू कोणती? तर सर्वात मोठी जादू निसर्ग करीत आहे ती म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करणं! माणसाच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर, माणसाचा जन्म व्हायच्या आधी, दोन जिवापासून जिवाची निर्मिती, 9 महिने त्याचे उदरात संगोपण, प्रत्येक अवयव जागच्या जागी तयार होणं, मातेच्या उदरात काय आहे, काय नाही हे पाहून, सर्वात प्रथम त्यात प्राण निर्माण करणं, ह्या काही नुसत्याच रासायनिक क्रिया नाहीत. आधुनिक वैद्यकाला अजून याचे गूढ उलगडलेले नाही. टेस्ट ट्युब बेबी क्लोन, या प्रसंगातून माणूस तिथे पोहोचायचा प्रयत्न करीत आहे पण या सर्व प्रयोगाचे अंतिम उत्तर येण्यास काही काळ जावा लागेल.

जन्म, जीवन व मृत्यू या साखळीतून माणूस आज 50000 पिढ्या जातोय. म्हणजे साधारण 50 ते 60 लाख वर्षे ही जादू चालू आहे. माणसाचं शरीर हे 3.2 ट्रिलियन पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक पेशीचं काम ठरलेलं आहे. शरिराच्या प्रत्येक आदेशाप्रमाणे काम करणे! आता एवढ्याच पेशी का? कधी तुम्ही पाहिलंय, एक माणूस 3’ उंच तर दुसरा 11’ उंच असं होत नाही. पृथ्वीवरील विविध ठिकाणचे हवामान, माणसाचे जनुकीय आकार यावरून ते ठरलेलं असतं. तसंच ते आजपर्यंत होत आलं आहे. कारण पेशींचं प्रोग्रॅमिंग निश्चित आहे व त्यांनी किती वाढायचं हेही निश्चित आहे. पेशींची अनिर्बंध वाढ म्हणजे कॅन्सर, म्हणजेच माणसाने प्रोग्रॅमिंगमध्ये केलेली ढवळाढवळ. तसं कोणताही आजार होणं म्हणजे शरिराच्या प्रोग्रॅमिंगमध्ये केलेली ढवळाढवळ. तुम्ही शरिराशी कितीही अनियमितता करायचा प्रयत्न केला तरी ते नीट करण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतं, हीच ती जादू.
आता असे पाहा. प्रत्येक माणूस वेगळा. एकासारखा दुसरा नाही. दिवसेंदिवस माणूस निसर्गाचा हा चमत्कार उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. आधुनिक विज्ञान त्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणारा काळच ठरवेल कोण जिंकेल, माणूस की निसर्ग. आणखी एक चमत्कार आपलं शरीर रोज करीत असतं ते म्हणजे शरिराची रोजची कामं आपल्या परोक्ष होतात. उदा. श्वास घेणे, खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया करून त्यावर आवश्यक असणारे घटक म्हणजे रक्त, हाडे, मांस ह्यांना पोषण पोहोचवणे, हृदय, फुफ्फुस, मेंदू यांच्यावर नियंत्रण करणे. एखादा व्हायरस शरिरात आला तर त्याच्याशी युद्ध करून शरिराचे रक्षण करणे, हे सर्व कमालीचे गुंतागुंतीचे आहे. एखाद्या सुपर कॉम्पुटरला शोभेशा  माणसाला आपल्या शरिराची 10% ही माहिती नाही. माणसाचे संशोधन चालूच आहे; तरी माणूस चमत्कार शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
माणसाने आपले शोध थांबवावे, असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण आधुनिक विज्ञानाने माणसाला खूप सुविधा दिल्या आहेत. ज्यांनी त्याचं जीवन सुखकर झालं आहे. हे सर्व बाजूला ठेवून, आधुनिक विज्ञान माणसाच्या शरिरात केमिकल घालून (आणि माणूस स्वत:सुद्धा) शरिराला त्रास देत आहे. आपल्या शरिराची संपूर्ण माहिती नसताना, विज्ञानाचे काम हे ट्रायल व एरर या तत्त्वानुसार चालू आहे पण या सर्व प्रयोगातून माणसाच्या आहाराबद्दल व जीवनशैलीबद्दल अनिर्बंध वागल्यामुळे  माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. याची खातरी आपल्याला पिढी दर पिढी माणसाची सक्षमता कमी होत चालली आहे ती सर्वच क्षेत्रात (शारीरिक, मानसिक, मुख्य करून प्रतिकारशक्ती) दिसून येत आहे. पटकन आजाराने ग्रासणे, लवकर बरे न होणे, झाला तरी अशक्तपणा राहणे, आजाराचे पुन्हा अस्तित्व निर्माण होणे, ह्या गोष्टी  दिसून येत आहेत. कोरोनाच्या बाबतीत प्रकर्षाने हे जाणवले. एक विषाणू सार्‍या जगाला हादरवून सोडत आहे.
माणसाच्या बाबतीत खूप गंभीर  गोष्टी घडत आहेत. तरूण मुलांमध्ये होणारे हृदयरोग, बी.पी., मधुमेह हे आजार जे आधी साठीच्या पुढे होत असत. सर्वात गंभीर म्हणजे तरूणांमध्ये कमी होत जाणारे शुक्राणूचे प्रमाण. 2.5 लाखवरून आज 25000 पर्यंत आले आहे. बी.बी.सी.ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, येणार्‍या काही वर्षात बर्‍याच देशांची लोकसंख्या कमी होत जाणार आहे. हे लक्षण नक्कीच चांगले नाही.
आज जीवनशैली नक्कीच बदलायला हवी पण सर्व त्यावर अवलंबून ठेवून चालणार नाही. आज आधुनिक वैद्यक छातीठोकपणे सांगते की ह्या औषधाने हा रोग बरा होतो. (हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण आपण त्यामध्ये जायला नको.) आज सी.टी. स्कॅन, एम.आर.आय.सारखी साधने आहेत जी माणसाच्या शरिरातील कानाकोपर्‍यातील दोष दाखवू शकतात. मग कुठे चुकतंय? का माणूस निरोगी होत नाही? रोज संशोधनात नवे नवे शोध लागतात, नव्या संशोधनानंतर आधीच्या शोधावर फुली! माणसाचं शरीर एक प्रयोगशाळा झालंय. कधीतरी आपण मुळापासून विचार करणार की नाही? आहाराचा विचार आपण गांभीर्याने कधी करणार? आहारातील घटकांची कमतरता आहारातूनच भरून निघाली पाहिजे. काही इमर्जंसी उपचार व अपवाद  सोडले तर याचं संशोधन कोण करणार? औषधवापर कमी कसा होईल, शरिराची जादू कशी टिकून राहील हे पाहणे गरजेचं आहे. ती आता आपली जबाबदारी आहे. कोणी संशोधन करेल व त्याचा आपल्याला फायदा होईल ही शक्यता धूसर झाली आहे; कारण अशा संशोधनातून कोणाचा आर्थिक फायदा होणार नाही हे स्पॉनसर करणार्‍यांना माहीत आहे. माणसाच्या उत्पत्तीपासून माणूस निसर्गाशी प्रतारणा करीत नव्हता. निसर्गाने त्याच्यासाठी ठरवून दिलेलेच खात होता. (मांसाहर सोडून) पण माणसाचा घात केला त्याच्या रूचीने. अनेक चवी त्याने घेतल्या, अनेक पदार्थ, वनस्पती, फळे फुले, पाने खाल्ली पण जेव्हा अग्निचा शोध लागला तेव्हापासून व पदार्थ एकमेकात मिसळण्यास सुरूवात केल्यापासून माणसाच्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या असं मानायला हरकत नाही.

आपण वेळीच जागे झालो नाही तर आपल्या शरिराची जादू हळूहळू नष्ट होत जाणार हे निश्चित. निसर्गाच्या विरोधात वागणे मग ते आहाराच्या बाबतीत असो, औषधे असो वा राहणीमान असो यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे. असे किती तरी पदार्थ आहेत जे आपण घेतले नाही पाहिजेत. त्यात प्रामुख्याने दूध येते. आपल्याला मिळणारे दूध तितकेसे चांगले नाही. तुम्ही म्हणाल सर्व मानके पास करूनच हे दूध पिशव्यात भरले जाते व आपल्यापर्यंत येते मग गैर काय? इथे एकच गोष्ट आड येते ती म्हणज व्यवसायवाढ (जास्त पैसा). एखाद्या गाईला दूध जास्त देण्यासाठी हार्मोनचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे 10 लिटर दूध देणारी गाय 20 लि. दूध देते पण त्यातील हार्मोनचे गंभीर परिणाम आपल्या शरिरावर होतात. बर्‍याच मुलांना ग्लासभर दूध दिले जाते. म्हणजे अधिक नुकसान. एका पाहणीत आढळून आले आहे की, मुलींचे वयात येण्याचे वय 13-14 वरून 8-9 पर्यंत खाली आले आहे. त्याला इतरही कारणे असू शकतील. (आहारातील कमतरता, खेळांचा अभाव) काही ठिकाणी हे वय 6-7 पर्यंत खाली आले आहे. इतरही अनेक समस्यांनी मुलींना घेरलं आहे. सगळ्यांची उत्तरं विज्ञान शोधत आहे. मला खूप वर्षापूर्वीचं ‘टाईम’ मासिकावरच्या मुखपृष्ठावरच चित्र आठवतंय. तिथे एक 12-13 वर्षाची मुलगी दाखवली होती व ती गरोदर होती. शीर्षक होतं, ‘Child having a child’ सुन्न करणारे! मी 20 वर्षापूर्वीपेक्षा जास्त काळाबद्दल बोलत आहे. आज स्थिती कशी असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.

शरिराची जादू संपत चालल्याची अनेक उदाहरणे देता येतील. मागे पाहिल्याप्रमाणे पाळीची वेळ, पाळीच्या इतर समस्या व त्यातून होणारे मानसिक नैराश्य. आणखी एक नवीन फॅड. एकतर   मुलींमध्ये आहाराचे प्रमाण कमी आहे. प्रोसेस्ड फूड खायचं, तेही कमी. वाढीच्या वयातच कमी अन्न गेल्यामुळे अनेक समस्यांना पुढील आयुष्यात तोंड द्यावे लागते. मुलांच्याही बाबतीत असेच आहे. स्पर्म काउंट कमी ही गंभीर बाब आहे. त्याचबरोबर शारीरिक अकार्यक्षमता, व्यायामाचा अभाव, चांगले अन्न घेण्याची आर्थिक ताकद असूनही जंक फूड खाणे, मोठ्या कंपन्याच्या जाहिरातीला भुलून स्टेटस सिंबोल असल्यासारखे खाणे या सर्वांचा परिपाक म्हणजे अनारोग्य. आज वयस्क लोकांचं औषधावरच जगण्याचं समाधान मानावं लागणं, मृत्युचं कमी होत जाणार वयं, आयुष्य औषधाच्या आधाराने जगणं… काही वेळा हे अपरिहार्य असलं तरी आपण हे टाळायचा प्रयत्न करू शकतो किंवा थांबवू शकतो.  जे आयुष्य आपल्याला मिळाले आहे ते सक्षमतेने जगण्याचा प्रयत्न करण्याच्या दिशेने पाऊल टाकणे शक्य आहे. आज 70-80 च्या वृद्धांचे आयुष्य खेड्यात व बर्‍यापैकी लहानपणी श्रमात गेले आहे. म्हणून त्यांनी थोडे तरी सक्षमतेने व्यतीत केले पण औषधावर अवलंबून 70-80 वर्षे जगणं खरंच आपल्याला आवडणार नाही.

आज नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन चालू आहे की नॅनोपार्टीकल्स शरिरात सोडली तर शरिराची सर्व देखभाल ती करतील. म्हणजे हृदय नीट काम करते का, ऑक्सीजन पातळी किती, रक्तदाब किती, बाकी इतर काही बिघाड नाही ना याची खातरी करणं व काही अनियमित असल्यास अलार्म करणं! पण नुसती माहिती मिळून काय उपयोग? त्याचा उपयोग माणसाला औषधे देण्यासाठी होईल. मुख्य प्रश्न आहे तुम्ही निरोगी राहण्याचा. मुळातच आपले चयापचय नीट रहावे यासाठी शरीर प्रयत्न करीत असते व आपण वागणुकीने ते बिघडवतो. आधुनिक वैद्यकाने शरिरावर केलेले प्रयोग मग ते औषधाच्या स्वरूपात असो की शस्त्रक्रियेच्या रूपात असो माणसाची स्वत:च स्वत:स बरे करण्याची क्षमता संपवत आहोत. (काही अपवाद व इमरजन्सी असं म्हणणं थोडं धाडसाचं वाटेल पण हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंतच्या संशोधनातून विज्ञानाच्या लक्षात हे आले आहे. काही औषधे बॅन होणे हा त्यातलाच प्रकार आहे. आपल्याला त्यात जायचे नाही.)
आपलं काम आहे शरिराची जादू कशी टिकवून ठेवायची ते जाणून घेणं. तसं ते सोपं आहे, फक्त मनाचा निग्रह करणं भाग आहे. पुढील काही प्रकरणात याविषयी विस्ताराने सांगितले आहे. तरी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून देत आहे.
1.    सर्वात प्रथम आहार बदलणे – डॉक्टर व जैवआहारतज्ज्ञांचं  मार्गदर्शन. 
2.    शारीरिक श्रम – जमेल तेवढा व्यायाम, चालणे, वयोमानानुसार घाम येईपर्यंत केला तर उत्तम. प्राणायाम, योग.
3.    विचार – विचार सकारात्मक ठेवणे, शत्रुत्व संपवणे, दुसर्‍याला क्षमा करणे, मदत करणे.
4.    खाणे – नैसर्गिक अन्न खाणे, भूक नसताना न खाणे पोटाच्या तक्रारी असतील तर लंघन करणे.
5.    प्रोसेस्ड फूड – कोणतेही फॅक्टरी मेड अन्न, पॅक्ड फूड न खाणे.
6.    निसर्गोपचार – निसर्गोपचाराने शरीर शुद्ध करण्याचा प्रयत्न करणे.
7.    औषधे – आपली ज्या पॅथीवर श्रद्धा असेल त्याचे औषध घेणे. शक्यतो औषधमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा किंवा निदान त्याची सवय लागणार नाही याची काळजी घेणे.
8.    सूर्यप्रकाश – रोज शक्यतो 1/2 तास सूर्यप्रकाशात राहणे.
वरील सर्व करण्याचा प्रयत्न केला तर शरिराची जादू टिकून राहू शकते व तुम्ही एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकाल. आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शरिराचे सॉफ्टवेअर उलगडणे कठीण आहे. म्हणूनच मी शरिराला ‘जादूगार’ म्हटले आहे.
जाता जाता मला माझ्या बाबतीतील अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही. एका गोष्टीचे मला उत्तर मिळाले नाही. ती तुमच्यासमोर मांडावी असं वाटलं. साधारणत: 1970 ते 75 च्या कालखंडात माझी बालपणातून कुमार वयाकडे वाटचाल सुरू होती. घरची परिस्थिती गरिबीची होती. सणाव्यतिरिक्त मी भात व पोळी खाल्ल्याचे आठवत नाही. ज्वारीच्या भाकरीच घरी असायच्या. त्याबरोबर एखादी भाजी. बस्स! या वयात मी दूध पिल्याचे आठवत नाही. घरी कधी कधी ताक असायचे. जवळ जवळ सर्वच घरात ही परिस्थिती होती. आजच्या भाषेत कुपोषित बालपण गेलं असं म्हणावं लागेल. हीच कुपोषित बालके 60 ते 70 वर्षापर्यंत सक्षम कशी राहिली याचे मला आजही कोडे आहे.

मग नक्की कशाने आम्हाला तारलं? किरकोळ तक्रारी सोडल्यास आरोग्य चांगलं राहिलं. थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की, त्यावेळी आम्ही खूप मैदानी खेळ खेळायचो. सूरपाट्या, विटीदांडू, आट्यापाट्या, क्रिकेट इत्यादी. खेळून घरी आल्यावर प्रचंड भूक लागलेली असायची. घरात काहीही असेल ते मुरमुरे, दाणे, लाह्या, इत्यादी आमचे खाणे. काय पोषणमूल्यं असतील त्यात? नक्कीच शरिराला अपुरी होती. जेवण तर वर नमूद केल्याप्रमाणे होतं. भुकेपोटी सर्व गोड लागत होतं. शरिराला लागणारी 40 घटकद्रव्यं निश्चितच नव्हती. प्रचंड भूक लागली असताना शरिरात जे अन्न जाईल त्याचा शरिरासाठी योग्य उपयोग करून घेत राहणे व घटकद्रव्यांची कमतरता पडू न देणे हेच शरिराचं काम. मग नक्की पोषण कोण करत होतं? नक्कीच आपलं शरीर स्वत:.  शरीर खरंच जादूगार आहे. आणखी एक गोष्ट, नववीत-दहावीत असतानाची. 72 चा दुष्काळ पडलेला. संपूर्ण महाराष्ट्र पावसाविना. अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. त्यावेळी सरकारने अमेरिकेहून धान्य मागवले होते. ‘मिलो’ नावाचा प्रकार होता. आपल्याकडील  ज्वारीसारखाच पण लाल रंग व पिवळ्या रंगाचा. त्याची भाकरी खायला कशीतरीच होती. आम्ही ती खाल्ली. आता ती कोणी खाणार नाही. अमेरिकेत डुकरांना ते खायला द्यायचे. शरिराने तेही पचवून आम्हाला मोठं केलं. धन्य आहे त्या शरिराची व त्याच्या जादूची.

पण शास्त्र सांगतं की, काही जीवनसत्त्वांची किंवा प्रोटीनची कमतरता शरीर दुसर्‍या अवयवाकडून भरून काढतं व तो अवयव निकामी होतो परंतु कुपोषित लोकांचे आरोग्य वर्षानुवर्षे चांगले राहणे ही काय किमया आहे? ते आपल्या शरिराचं सॉफ्टवेअरच जाणे. म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे, आपले शरीर एक complex unpredictable machine आहे यात काही वाद नाही. तुमच्या बाबतीतही असे अनुभव आले असतीलच. ते तपासून पाहावेत म्हणजे जादूची कल्पना येईल.
आणखी उदाहरणाने ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक माणसाला त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग येतो. जो पेशंट असतो त्याची अवस्था फार गंभीर असते. त्याला आय.सी.यु.मध्ये ठेवलेले असते. तुम्ही डॉक्टरला विचारल्यावर ते म्हणतात, आमचे प्रयत्न चालू आहेत. बाकी ईश्वराच्या हाती. काही वेळा डॉक्टरनी आशा सोडलेली असते व ते म्हणतात, जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या, फार तर दोन दिवस जगतील… पण दोन दिवसात पेशंट शुद्धीवर येतो व हळूहळू बरा होतो. हे कशाने होते? डॉक्टरची औषध योजना हा एक भाग असतो व शरीर त्याला प्रतिसाद देते, म्हणजे त्याची जादू वापरत होते. सर्व प्रकारची योजना करून शरीर साथ देत नाही व रूग्ण मृत्यू पावतो. इथे शरिराची जादू संपलेली असते. मरणाच्या दारापर्यंत शरिराची जादू अबाधित ठेवणं हे मोठं कसब निसर्ग आपल्याला न सांगता करत असतो, तेही वर्षानुवर्षे.
शरिराची जादू कमी होण्याचे संकेत :- आपण मागे पाहिल्याप्रमाणे मानवजातीचा आजपर्यंतचा प्रवास हा खरंच खडतर होता. आताच्या सुखसोयीने तो  सुसह्य झाला असे आपण मानतो परंतु आपल्याला निसर्गाने श्रम करूनच अन्न मिळवण्याचे योजले होते. त्या सर्व गोष्टी आता संपल्या आहेत. निसर्गोपचार पद्धतीनुसार शरीर स्वच्छ असल्यास कोणताही आजार होत नाही परंतु आता आपण जे अन्न खात आहोत ते शरिरातच थांबून त्याचा शरिरावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजाराची निर्मिती होऊन माणसाचे स्वास्थ्य जात आहे.

याची दुसरी बाजू अशी आहे की, आधुनिक वैद्यकाच्या मते एखाद्या रोगावर कोणती औषध योजना करायची हे ठरलेले असते. लक्षणावरून, चाचण्यावरून ती करता येते; पण खरी गोम येथेच आहे. औषधांचा शरिरावर होणारा परिणाम चांगला वाटणं व अयोग्य आहार या अनैसर्गिक युतिमुळे शरिराची जादू संपत चालली आहे, असं मानायला जागा आहे. तरी ही जादू संपू नये असं वाटत असेल तर निसर्गोपचार पद्धतीच्या आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. औषध योजना वाईट आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. आधुनिक विज्ञान हे विज्ञानाच्या कसोट्यावर चालतं. तिथं ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असा प्रकार असतो. तो काही अंशी बरोबर पण आहे पण गंमत अशी आहे की औषधे खाऊन कंटाळलेली त्यांचा आजार घेऊन निसर्गोपचार पद्धतीकडे जातात, शेवटचा पर्याय म्हणून. शरिराची जादू संपल्यावरही पेशंट बरा झाल्याची उदाहरणे घडली आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की, शरिराची जादू संपू नये ही काळजी आपण घ्यायला काय हरकत आहे? अर्थात हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा प्रश्न आहे.
आपण आपल्या शरिराची फारच परीक्षा घेत असतो असं माझं मत आहे. कमी होत चाललेला आहार, भूक नसणं (मुळातच शरीर न हलणे, ताणतणाव) अयोग्य आहार व त्यावर औषधांचा मारा दिवसेंदिवस माणसाला प्रतिकारशक्तीहीन करत आहे. त्यातच भर म्हणून एखाद्या आजाराचे सावट त्याला औषधाकडे घेऊन जात आहे. शरीर औषधांच्या दुष्टचक्रात सापडत आहे व स्वत:च आपली जादू कमी करीत आहे.
आता निसर्गरचना पाहा. शरिराला जशी अन्नाची गरज असते तशी पाण्याची व ऑक्सिजनची गरज असते. अन्नाची व पाण्याची गरज माणूस कशीही भागवू शकतो पण ऑक्सिजनची गरज त्याला कळत नाही. आता इथे गंमत अशी आहे की, आपल्याला किंवा कोणत्याही प्राण्याला ऑक्सिजन हा श्वसनातून मिळतो. ती शरिराची एक अकृत्रिम क्रिया आहे. त्यावर आपले नियंत्रण नसते. त्यामध्ये गडबड झाल्यास आपल्याला त्रास चालू होतो. श्वासावाटे ऑक्सिजन कमी पडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, दम लागेपर्यंत शरीर हलत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो. ज्याची गरज त्याचीच कमतरता निर्माण होते. पर्यायाने शरिराची जादू कमी होत जाते. खरं तर शरिराने आपल्याला नाकाने श्वास घेण्याची व पुरेसा ऑक्सिजन मिळवण्याची सोय केली आहे पण श्वास घेण्याचे टायमिंग प्रत्येक माणसाचे वेगवेगळे असते. करोनामध्ये हे दिसून आले. नाकाने श्वास घेऊन सुद्धा शरिराची ऑक्सिजनची पातळी खाली राहते व शरिराला घातक ठरते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक माणसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी अधिक प्रमाणात सारखी असली तरी फुफ्फुसाच्या शोषणक्षमतेचा प्रश्न आहे. ती चांगली असणं गरजेचं आहे. आपल्याला करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्राणायाम. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढून शरिराची जादू वाढू शकते. प्राणायमाचा तात्त्विक विचार केला तर प्राणायामाच्या वेळी श्वास आत घेतला जातो व तो नेहमीच्या श्वासापेक्षा जास्त असतो. त्यामुळे आयुकोष जास्त प्रसरण पावतात, त्यांचा आकार मोठा होत जातो. सतत प्राणायाम केल्याने हा आकार वाढून शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून रक्तशुद्धीसाठी चांगला उपयोग होतो. हाच फायदा मैदानी खेळांनी मिळतो. त्याने प्रतिकार शक्ती वाढू शकते. शरिराची जादू अबाधित राखण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे तसेच शरीर कार्यक्षम ठेवण्यासाठी हालचाल, व्यायामही आवश्यक आहे. तुमचं वय कोणतंही असो. हे कसं हे तुम्हाला सांगतो. आपल्या शरिराच्या प्रत्येक अवयवाचे काम नीट व्हायचे असेल तर त्याची हालचाल, व्यायाम आवश्यक आहे कारण प्रत्येक अवयवाकडे हृदयातून रक्तपुरवठा होत असतो परंतु मुठीएवढं हृदय खरंच सर्व नीला, रोहिण्या, केशनलिकापर्यंत ते रक्त पोहोचवू शकत असेल? ह्याच उत्तर नाही असंच द्यावे लागेल. (इंजिनियरिंग अ‍ॅरनॅलिसिस). मग आपलं शरीर काहीतरी करत असलं पाहिजे जेणेकरून त्याची जादू अबाधित राहील. आपण होऊन करावयाची हालचाल, व्यायाम व शरिरातील इतर अवयवांनी दिलेली साथ, आपलं रक्त सर्व अवयवापर्यंत पोहोचवून त्याचे कार्य नीट करते. आता असं गृहीत धरू की व्यायाम, हालचाल कमी झाली तर रक्ताभिसरणात कमतरता निर्माण होते व परिणामी अवयव काम करेनासे होतात व रोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू होते.

आरोग्यतरंग

ही जादू संपण्याचे महत्त्वाचे कारण की आपल्या पूर्वजांनी प्रत्येक पदार्थ खाण्याच्या आधी विचार  केला होता. (मी फक्त रॉ फूडबद्दल बोलत आहे). त्या पदार्थांचे फायदे तोटे काही अंशी सिद्ध केले होते. चवीचा व वासाचा उपयोग करून ते ठरवले होते. क्वचितप्रसंगी त्याला शारीरिक व्याधी व कधी  मरणही पत्करायला लागले होते. तेव्हा कुठे आज आपण भाज्या, फळे, औषधे वनस्पती यांचे योग्य उपयोग पाहत आहोत, अनुभवत आहोत. आजचे चित्र भिन्न आहे. अग्निचा व नवनवीन चवीचा शोध यांनी मूळ पदार्थाच्या गुणधर्मावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शरिराची क्षमता व ती किती दिवस आपल्याला त्याची जादू वापरून सुरक्षित ठेवणार? म्हणून जागृत राहून या सर्व गोष्टीकडे डोळसपणे पाहावयास पाहिजे जेणेकरून शरिराची जादू अबाधित राहील.
आज आपण आजूबाजूला ऐकतो की, अमूक अमूक नातेवाईक अचानक हार्ट अ‍ॅटॅकने गेला किंवा पॅरालाईज झाला, ब्रेन हॅमरेजने  गेला. वर असेही ऐकतो की तो सर्व प्राणायाम, योग करीत होता व नियमित व्यायाम करीत होता. मग आपण संभ्रमावस्थेत जातो की हे कशामुळे होते? प्रगत वैद्यकात त्याला काही तांत्रिक कारणं असू शकतील पण वस्तुस्थिती ही आहे की शरिराने त्या व्यक्तिला जिवंत ठेवण्यास असमर्थता दाखवलीय. मग शरिराची जादू कुठे गेली? काहीही झाले तरी शरीर एक कॉम्प्लेक्स मशीन आहे. आपण रचना म्हणू. कधीतरी त्यात बिघाड होणारच व मृत्यू होणारच. त्याची उत्तरं  आपणाला येणार्‍या प्रकरणातून मिळतील. प्राणायाम, योग, व्यायाम शरिरासाठी चांगले आहेतच. आपल्या हातात अशी कोणती गोष्ट आहे की शरिराची जादू अबाधित राहील? म्हणून घाबरून न जाता शरिराला स्वस्थ ठेवण्याचे  आपले काम आहे.
शरीर जादूगार असण्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे पृथ्वीतलावरील सर्व प्रजाती पाहिल्या तर त्या कोणत्याही बाहेरच्या गोष्टी (अनैसर्गिक) आहार, औषधे न घेता, आजतागायत टिकून आहेत. त्याचं कारण काय? त्यांना निसर्गाने दिलेलं शरीर हेच कारण आहे. त्यांनी निसर्गाने दिलेली जीवनशैली सोडलेली नाही.  काही प्रजाती नष्ट झाल्या त्या नैसर्गिक आपत्तीतून किंवा योग्य वातावरण न मिळाल्यामुळे. माणूसही तसा राहिला असता तर कदाचित आतापेक्षा सक्षम झाला असता, असं मानायला जागा आहे.

– राजेंद्र देशपांडे, पुणे

पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०२३

राजेंद्र देशपांडे लिखित ‘शरीर एक जादूगार’ या पुस्तकाची पूर्वनोंदणी सुरु!
किंमत : २५० रु.
फोन पे , गूगल पे क्रमांक : ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा