हल्ली असं आढळून येतं की तुमच्या दुसरी, तिसरीतल्या मुलीसुद्धा रोज मेकअप करताहेत जे अत्यंत चुकीचे आहे. कधीतरी एखाद्या लग्नसमारंभ कार्यक्रमासाठी ठीक आहे पण कोवळ्या वयात असा स्ट्राँग मेकअप लहान मुलींना करणे आपण टाळायला हवे कारण मेकअपमध्ये आय श्याडो, आय लायनर, फाउंडेशन, मस्करा अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्यात काही प्रमाणात केमिकल असतं. याच्या लहान वयातील सेन्सेटिव्ह त्वचेवरील अति वापराने पुढे केस गळणे, पिंपल्स व पाळीच्या विविध तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून आपला अग्नी चांगला राहून चेहर्यावर नॅचरल ग्लो यायला हवा. त्यासाठी डाळिंबाचे दाणे खाणे, डाळिंबाचा रस पिणे हा सुंदर उपचार आहे. त्याने त्वचा सतेज राहते आणि आपण जे खातो तेच आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक स्वरूपात वापरले तर त्याचा अपायही होत नाही.
डाळिंबाच्या रसात थोडेसे खोबरेल तेल घालून ते डीप फ्रीझरमध्ये ठेवा आणि गालावर लाली म्हणून लावायला वापरा म्हणजे लहान मुलींचीही हौस भागेल आणि आरोग्यही उत्तम राहील. त्यामुळे चेहर्यावर नॅचरल ग्लोही येईल.
मुलींना केमिकल काजळ लावण्याऐवजी घरी बनवलेले शुद्ध काजळ लावा. पूर्वी लहान बाळासाठी असे काजळ घरी बनवले जायचे. घरगुती साजूक तुपाच्या दिव्यावर चमचा किंवा पळी धरून काजळी गोळा करून त्यात एरंडेल तेलात अगदी थोडा कापूर खलून काजळ बनवून चांदीच्या डबीत भरून ठेवले जायचे. बाळासाठी हे काजळ नियमित वापरले जायचे. डोळ्यांचे तेज वाढवणारा, दृष्टी स्वच्छ ठेवणारा हा उपाय अगदी पूर्वी लहानथोर सगळ्यांसाठीच होता.
चेहर्यावर पांढरे डाग, शिबे उठते. त्यानेही सौंदर्याला बाधा येते. बर्याचदा जंतांमुळे असे डाग येतात आणि त्यावर बाहेरून क्रीम लावण्यापेक्षा पोटात औषध घेणं जास्त महत्त्वाचे असते. यावर छान उपाय म्हणजे सैंधव, तूप लावून, ओवा परतून बाटलीत भरून ठेवा आणि रोज रात्री झोपताना चिमूटभर ओवा कोमट पाण्याबरोबर घ्या. सोबत छोटा गुळाचा खडाही खाऊ शकता. ओवा किंवा ओव्याचा अर्क घेतला तरी चालतो. हा ओव्याचा अर्क आपण घरी बनवू शकतो.
ओवा भरडून पाण्यात झाकण ठेवून उकळायचा आणि झाकणावर वाफ जमते तो असतो ओव्याचा अर्क. हा साठवून ठेवायचा आणि रोज 2 थेंब घ्यायचा. पचनासाठी ओवा उत्तम आहे पण तो तीक्ष्ण आणि उष्ण आहे म्हणून रोज थोड्या प्रमाणातच ओवा घ्यायचा. तिखट-मिठाच्या पुर्या, परोठे यात पचन उत्तम व्हावे म्हणून आपण ओवा घालतो. गुढघा दुखत असेल, हात दुखत असेल तर ओवा पाण्यात वाटून तो लेप दुखर्या भागावर लावा. गॅसेस, पोटफुगी, पोट दब्ब होणे, अजीर्ण, अपचन, अयबीएसवर नियमितपणे ओवा घेतल्याने पचनासाठी छान फायदा होतो. लॅक्टोज टॉलरन्समुळे दूध पचत नाही. त्यावरही दूध प्यायल्यावर 2 ते 4 ओव्याचे दाणे चावून खाल्ल्याने फायदा होतो.
महिलांमध्ये त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे इस्ट्रोजेन हे फिमेल हार्मोन योग्य प्रमाणात स्त्रवायला हवे. याने बीपी नॉर्मल राहते, पाळी नियमित येते, चेहरा तेजस्वी दिसतो, तारुण्य टिकून राहते. जेव्हा चेहर्यावर जास्त सुरकुत्या दिसायला लागतात, केस गळणे, बीपी कमी जास्त होणे अशी लक्षणे दिसतात तेव्हा इस्ट्रोजेन लेव्हल वाढलेली असू शकते. ही लेव्हल संतुलित राहण्यासाठी फायटो इस्ट्रोजेन ज्या पदार्थात असते. अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा.
वेलची चावून खाणे, आले, जिरे, सुरण खाल्ल्याने इस्ट्रोजेनचा स्त्राव योग्य प्रमाणात स्त्रवण्यासाठी फायदा होतो आणि आपण यंग, चार्मिंग राहतो. आपले शरीरच आपल्या आरोग्यातील त्रुटी आपल्याला दाखवत असतं फक्त या कशा ओळखायच्या हे आपण जाणून घ्यायला हवं.
अगदी तुमची लघवीसुद्धा तुमच्या आरोग्याविषयी खूप काही सांगत असते. जर अगदी पाण्यासारखी असेल तर कदाचित तुम्ही जास्त पाणी पिताय, पिवळीधमक असेल तर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिताय, फेसाळ पिवळी असेल तर लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो, लालसर असेल तर ब्लाडर प्रॉब्लेम असू शकतो आणि लाईट पिवळी असेल तर तुम्ही पाणी योग्य प्रमाणात पिताय. म्हणजे बघा थोड्याशा निरीक्षणातूनही आरोग्यसंकेत आपण मिळवू शकतो. हे संकेत शोधून त्यावर उपाययोजना करून आयुर्वेद व निसर्गोपचाराने आरोग्य उत्तम ठेवा.
– डॉ. मानसी धामणकर-मेहेंदळे
फ्री चेकअप क्लिनिक : 9833683021
व्हाट्सअप्प सल्ला : डॉ. मानसी – 9137231554