वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. इथला देव, धर्म, भाषा, आहार, विहार, राजकारण इत्यादी गोष्टींवर निर्णायक परिणाम वारकरी संतांनी घडवून आणला. मराठी जनमानसाची बोधपातळी वाढवण्याचे काम ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या संतपरंपरेने केले. त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम संत निवृत्तिनाथ महाराजांनी केले.
तेराव्या शतकात धर्मांतर्गत कर्मकांड आणि अनाचाराने जोर धरला होता आणि बाहेरच्या बाजूने परकियांचे आक्रमणं होत होती. खर्या धर्माला आतुनही संकट होतं आणि बाहेरूनही. अशा पेचप्रसंगाच्या काळात संत श्रीनिवृत्तिनाथांनी तोडगा काढला. त्यामुळे महाराष्ट्राचे आत्मभान अबाधित राहीले. भागवतधर्माचा विस्तार झाला.
वारकरी पंथाचा पूर्वइतिहास म्हणून श्रीगुरू गोरखनाथ व श्रीगुरू गहिनीनाथ या सत्पुरुषांच्या चरित्र, तत्त्वज्ञान आणि शिकवणीचा गंभीरपणे अभ्यास करायला हवा. ओशो रजनीश यांचा तत्त्वज्ञान विषयातील अधिकार निर्विवादपणे सर्वांना मान्य आहे. ‘भारतीय धर्म अवकाशातील सर्वात तेजस्वी चार दार्शनिक कोण?’ असा प्रश्न कवी सुमित्रानंजन पंत यांनी ओशो यांना केला होता. ओशोंनी ‘श्रीकृष्ण, बुद्ध, पंतजली आणि गोरख’ या चार जणांना भारतीय विचारपरंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणून उल्लेख केला आहे. या यादीत गोरक्षनाथांचा समावेश आहे इतके महत्त्वाचे कार्य त्यांनी करून ठेवले आहे. समाजातील शेवटच्या घटकांशी नाळ जोडलेल्या या सत्पुरूषांना समाजावरील संकटाचा आणि त्यावर द्याव्या लागणार्या उत्तरांचा अंदाज होता. धर्म, समाज, लोकव्यवहार आणि राजकीय परिस्थिती या सर्वांचे व्यापक आकलन त्यांना होते. गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना श्रीकृष्णमंत्राचा उपदेश केला. श्रीकृष्णभक्तिची परंपरेने आलेली सूत्रे विशद केली व तोच कृष्ण विठ्ठल रूपाने पंढरपूरात अवतीर्ण झाला हेही सांगीतले. ‘निवृत्तिचे गुज विठ्ठल सहज । गयनीराजे मज सांगीतले ॥’ त्याच श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेचे भाष्य ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या शिष्याकरवी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांकडून करवून घेतले. भगवान शिवशंकर- मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीना
नाथपंथाची पार्श्वभूमी असतानाही निवृत्तिनाथांनी पंढरीची वाट सोपी केली. योगमुद्रेपेक्षा प्रेममुद्रेला महत्त्व दिले. एक गुरू-एक शिष्य असा संकुचित पारमार्थिक व्यवहार नाकारून पारमार्थिक ज्ञानाचे सार्वत्रिकरण करण्याची मुहूर्तमेढ रोवली. भक्तितत्त्वज्ञानाचे ज्ञानेश्वरीच्या रूपाने सिद्धान्तीकरण करवून घेतले. ‘गहिनीनाथे मज सांगीतले सार । केली ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची ॥’ बोधाचा हा सारा प्रसाद महाराष्ट्राच्या झोळीत टाकला. श्रीज्ञानेश्वर महाराज ही श्रीनिवृत्तिनाथांनी आपल्या सर्वांना दिलेली सर्वोच्च देणगी आहे.
शैव-वैष्णव वाद संपवत, नाथ-भागवत पंथ यांचा अपूर्व संगम श्रीनिवृत्तिनाथ महाराजांनी घडवून आणला. मराठी भाषेत भक्तिचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी आग्रह धरला. तीरे संस्कृताची गहने । तोडोनिया मराठी शब्दसोपाने । रचिले धर्मनिधाने । श्रीनिवृत्तीदेवे ॥ संस्कृताची गहन तीरे तोडून मराठीत धर्मनिधान रचण्याचे श्रेय श्रीनिवृत्तिनाथांचे असल्याचे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. अहंकार नाकारून भक्तिचा व्यवहार अधिक समतापूर्ण व्हावा याचा ठाम आग्रहही श्रीनिवृत्तिनाथांच्या अभंगामधून दिसून येतो. ‘समता वर्तावी अहंता खंडावी । तेणेची पदवी मोक्षमार्ग ॥’ हा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या अभंगाची भाषा ही गूढ, योगाची भाषा आहे. त्यातील अनेक संकल्पना या योगातील, नाथपंथातील आहेत. भागवतधर्म, नाथ पंथ आणि योग यांचा विशेष अभ्यास असणे हे श्रीनिवृत्तिनाथांचे अभंग समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
‘बाळक्रीडा’ या प्रकरणात प्रत्येक अभंगाच्या सुरुवातीला परब्रह्मांच्या विशेष गुणाचे वर्णन करायचे व तेच परब्रह्म गोकुळात श्रीकृष्णाच्या रुपाने लिला करते आहे याचे विवरण करायचे व समारोपाला आपला व त्याचा संबंध सांगायचा, ही श्रीनिवृत्तिनाथांची शैली आहे.
उदाहरणार्थ,
जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु ।
तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥ 1 ॥
जनकु हा जगाचा जीवलगु साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥ 2 ॥
श्रीज्ञानदेवांची गुरुभक्ती प्रख्यात आहे; पण त्यांच्यासमोर गुरुभक्तिचा आदर्श म्हणून स्वतः श्रीनिवृत्तिनाथच होते. आपल्या मोजक्या अभंगातून त्यांनी श्रीगुरुंचा अधिकार, त्यांची पारमार्थिक अवस्था, त्यांचा उपदेश व केलेली कृपा यांचे समर्पक शब्दांत वर्णन केले आहे. सरोवर, कासवी तुषार या प्रतिमा त्यांच्या अभंगातून वारंवार येतात. स्वतःविषयी ‘निवांत’ हे विशेषण ते अनेकदा वापरतात. श्रीकृष्णरूपी सरोवरचा काठ म्हणजे श्रीनिवृत्तिनाथ होय. दृष्टीतून अमृताचा वर्षाव करणारे, मातृहृदयी पण धीरगंभीर श्रीनिवृत्तिनाथांचे दर्शन आपल्याला त्यांच्या अभंगामधून होत राहते.
गोकुळात कृष्णावतारात झालेला ‘काला’, त्याला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. वारकरी संतांनी काल्याचा अर्थविस्तार पंढरपूरच्या वाळवंटात केला. श्रीनिवृत्तिनाथांचे काला प्रकरणातील अभंग हे गोकुळातील काल्याचे वर्णन करणारे नसून पंढरपूरातील काल्याचे वर्णन करणारे आहेत. देव आणि भक्त यांचे ऐक्य प्रतिपादित करणारे हे अभंग आहेत.
आपल्या अभंगातून ते पंढरीचे महात्म्य सांगतात, विठोबा हाच जनांचा तारक असून त्याला विठेवर उभं केल्याबद्दल पुंडलिकाचे ऋण व्यक्त करतात. रामकृष्णाच्या भजनाचा आग्रह धरतात. सातत्याने कीर्तनाचा उपदेश करतात. दुसर्याला पिडा देणे म्हणजे द्वैत आणि सर्वत्र तेच एक तत्त्व व्यापून उरले आहे याची अनुभूती म्हणजे अद्वैत. परपिडा, परनिंदा नाकारून श्रीविठ्ठल भजनाकडे प्रवृत्त होण्याचा श्रीनिवृत्तिनाथांचा निरोप आपल्याला त्यांच्या अभंगातून मिळतो. श्रीनिवृत्तिनाथांच्या अभंगात त्यांच्या व्यक्तिमत्वाची सखोलता आहे. त्यांचा अंदाज लागत नाही. त्यांचा तळ सापडत नाही पण इथे साधकाच्या उद्धाराची पूर्ण शाश्वती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत मातोश्री जिजाऊंची जी भूमिका होती तीच भूमिका श्रीज्ञानोबारायांच्या जडणघडणीत निवृत्तीनाथ महाराजांची आहे. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला मात्र त्याची आखणी निवृत्तिनाथांनी केली आहे.
सचिन पवार
संत साहित्याचे अभ्यासक
प्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ जाने २०२५
Awesome https://t.ly/tndaA
Very good https://rb.gy/4gq2o4
Good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2