sadhuwani

साधुवाणी भाग १ : जो साध्य करतो तो साधु

Share this post on:

‘जगात राहूनही अलिप्त राहण्याची कला जो साध्य करतो, तो साधु! त्याच्या बाह्य वेषाशी काहीही देणे घेणे नाही. तो भगव्या वस्त्रात असेल नसेल. जो साध्य करतो तो साधु,’  गणेश महाराजांचे शब्द मला आठवले.
‘‘म्हणजे जीन्स-टी शर्टमधला माणूसही साधु असू शकतो, होऊ शकतो?’’ मी विचारले.
‘‘बेलाशक. साधु हे एका वृत्तीचे नाव आहे, ड्रेसचे नाही’’ ते म्हणाले होते.

तोच माझ्या घरचा दिवाणखाना. तसे माझी खोली आत. तिथे माझे लिहाय-वाचायचे टेबल वगैरे. टेबलवर अनेक फायली आणि पुस्तके. फायली कोर्टाच्या आणि पुस्तके माझ्या आवडीची! कायद्याशी दुरदुरपर्यंत संबंध नसणारी. मराठी व्याकरणापासून उपनिषदांपर्यंत. माझी खोली म्हणजे पसारा. तो आवरायला नको म्हणून मी आताशा हॉलमध्ये बसतो. त्यातील डायनिंग टेबल वर लिहिता-वाचता येते. खुर्च्याही अतिशय आरामदायी. त्यावर मांडी घालून आरामशीर बसताही येते. तुम्ही म्हणाल किती गबाळा माणूस आहे हा. असू द्या. म्हणा. साफसफाईवर सुदैवाने माझा चरितार्थ चालत नाही. म्हणजे ज्यांचा चालतो त्यांच्याबद्दल काही माझे वाईट मत नाही. माझे म्हणणे एवढेच की पुस्तके नीट रचली नाहीत, टेबल आवरले नाही म्हणून काही मी माझ्या कर्तव्यात चुकलो असे होत नाही. इंग्लिशमध्ये एक कविता आहे ‘Dust if you must’ गुगलवरही मिळून जाईल. त्याचा मथितार्थ हा की अत्यंत आवश्यक असल्याशिवाय साफसफाई करू नका. तो वेळ पुस्तके वाचणे, गढ किल्ले चढणे, चित्रं काढणे अशा गोष्टींसाठी सत्कारणी लावा; कारण एक दिवस म्हातारपण येणार आहे आणि ते काही फारसे दयाळू नसते. ह्या कवितेमुळे काही माझे आयुष्य बदलेले असे काही झाले नाही पण काही वेळा उगाचच काही गोष्टी आठवतात तशी ही ही आठवली. लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष न देता आपले आवडीचे काम करत राहणे साधले तर मीही साधुच. साधते आहे काही वेळा. काही वेळा नाहीही साधत हे. मडके अजून कच्चे आहे. मी थोडा आळशी मार्ग स्वीकारलाही असेल पण मी खर्‍या मार्गावर आहे याचा आनंद आहे. भले मग  मंझील कितीही का दूर असेना!
पुस्तक बंद केले. पाय वर घेऊन खुर्चीतच मांडी घातली आणि डोळे मिटले. डोळे मी मिटले? का ते अपोआप मिटले गेले? ती निद्रीतावस्था निश्चित नव्हती. मागील काही महिन्यांपासून हे असे चाललेले. ‘ह्याला ट्रान्समध्ये जाणे असे म्हणतात. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी लोक काय काय करत नाहीत’असे उत्तर एका मित्राने दिले.
‘‘होय का? त्याने काय होते?’’ मी विचारले.
त्याच्याकडे उत्तर नव्हते आणि मलाही काही उत्तर हवे होते असे नाही. मी आता शांत शांत होत चाललो होतो. एक एक गाठ सुटत चालली होती. पूर्वी वाटायची तशी भीती, चिंता, काहीतरी मिळवण्याची जिद्द, आग्रह, दुराग्रह सगळा गळून पडत होता.

**
बाबाजींना मी फोन लावला.
‘‘अरे किती दिवस झाले. आप तो आये ही नही’’ तिकडून उत्तर आले.
काय ओढत होते मला या साधुंच्या दुनियेत तेही गणेश बाबाजींकडे. मी कोणत्याही बाबांचा भक्त वगैरे नाही. त्यामुळे दीक्षा-बिक्षा घ्यायचा प्रश्नच नाही पण हे सगळे साधु माझे दोस्त आहेत. मलाही कोणा एकेकाळी संन्यास घ्यायचा होता पण तो काही कारणांनी घेता आला नाही. किंबहुना मला तो नाकारला गेला. झाले.  त्याबाबत आता काहीही दुःख  नाही. अर्थात त्यावेळी संन्यास नाकारल्याचे दुःख नक्कीच झाले होते. खूप, अतीव आणि तीव्र. माणसाचे कसे आहे ना, तो आहे त्या परिस्थितीत कधीही समाधानी नसतो. साधु झालो जरी असतो तर संसारात का राहिलो नाही याचे दुःख झाले असते.
पण या सगळ्या गोंधळात एक झाले हे सगळे बाबाजी माझे मित्र झाले. जगात साधुंचे अनेक भक्त असतील पण साधुंचे मित्र, किंबहुना ज्याचे मित्र साधु आहेत असा माझ्यासारखा माणूस विरळाच असेल. मैत्रीचे एक असते, कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही. दोघेही समान पातळीवर. बाबाजीपण खुलतात अशा वेळी. शेवटी तीही माणसेच की! भगवा वेश धारण केल्यावर त्यांच्या डोक्यावरही मोठेपणाचे ओझे येतेच! दिसला साधु की लगेच लोक प्रापंचिक समस्या घेऊन त्याला गराडा घालणार. कुणाला नोकरी नाही, कुणाला घर. कुणाचे लग्न होत नाही तर कुणाला मुले.
अशा वेळी असे मोकळेपणाने बोलता येईल असा मित्र हवाच साधुनाही. माझे साधुविश्वात अनेक मित्र असले तर गणेश महाराज खासच. माणसाची परीक्षा त्याच्या वेषावरून करू नये हेच खरे. गणेश महाराज जंगलात  एका गढीसारख्या मंदिरात राहतात.
**
‘‘अण्णा, तू सारखे फिरत असतोस! मी ही येतो तुझ्याबरोबर या वेळी’’ गिरीश म्हणाला.
मीही फार आढे वेढे न घेता ‘हो’ म्हणालो. गिरीश माझ्या कर्नाटकात असणार्‍या मावशीचा मुलगा. त्याची आई माझ्या आईची चुलत बहीण. आम्ही आयुष्यात फक्त दोनदा भेटलेलो. तो माझ्यापेक्षा सतरा-अठरा वर्षांनी लहान. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो दहावीत होता आणि दुसर्‍यांदा पाहिले तेव्हा बारावीत. फार काही बोलणे, मैत्री असे नव्हते आमच्यात.
पण तो मावशीसोबत आमच्या घरी आला तेव्हा मी नेमका भ्रमंतीत. आल्यावर आई म्हणाली, ‘‘गिरीश म्हणत होता की आधी कळाले असते तर मीही गेलो असतो नर्मदा किनारी अण्णासोबत.’’
आता मी परत जाणार होतो हे आईने मावशीला आणि मावशीने गिरीशला सांगितल्याने कळाले. आता तो  बी .एस्सी. पूर्ण करून एम. एस्सी. करत होता. त्याने ‘‘सोबत येऊ का?’’ विचारल्यावर मी लगेच ‘‘हो’’ म्हटले. विचार करून बोलणे माझ्या स्वभावातच नाही.
पण मग नंतर वाटायला लागले की उगाच नसती ब्याद मागे लाऊन घेतली. एकटे गेलो की कसे कुणाशी काही बोलायचा प्रश्नच नसतो. आपलाच आपल्याशी संवाद चालतो. अवचित माझ्या तोंडातून ‘हो’ निघाले. नंतर उगाचच हो म्हटले असे वाटायला लागले. मी काय ह्या जंगलात मौजमजा करायला येतो का? कशाला ही नसती ब्याद मागे लाऊन घेतली. पटकन खोटे बोलता येत नसल्याचा परिणाम.
मग त्याला मेसेज केला, ‘अजून जायचे काही नक्की नाही, मी फायनल कळवल्याशिवाय निघू नको.’ तो जरासा हिरमुसला! पण माझेच जायचे नक्की नव्हते. माझे एकदा नक्की झाले की त्याला फोन केला. तो ट्रेनने थेट खांडव्याला येणार होता. त्याची ट्रेन रात्री पोचणार असल्याने मी त्याला रात्री तिथेच मुक्काम करायला सांगितले पण तो रात्रीच येतो म्हणून बसला.
‘‘अण्णा, मला हाही अनुभव घ्यायचा आहे’’ तो फोनवर म्हणाला.
‘‘माझ्या सोबत नको. तुला इतरत्र कुठे तरी घेता येईल. तुला इथे पोचायला मध्यरात्र होईल.’’
‘‘मध्यरात्र झाली तरी येईन मी अण्णा’’, असे तो म्हणत होता. तरुण रक्त आणि त्याचा फाजील आत्मविश्वास.
‘‘तुझ्या आईने, तुला माझ्या भरवश्यावर पाठवले आहे. गपचूप तिथे खंडव्यालाच मुक्काम कर आणि सकाळी उठून बसने ये’’ मी त्याला म्हणतो.
मागे माझे दोन परिचित गणेश महाराज यांना भेटायला गेले होते. त्यांना अर्थात महाराजांबाबत माझ्याकडूनच समजले होते परंतु त्यांची भेट झाली नाही. एकाने खूप उशीर झाला होता म्हणून त्यांच्याकडे जायचे टाळले आणि दुसरा गेला तेव्हा बाबाजी तिथे नव्हते. मग मलाच का ते सतत भेटत गेले? नशीब, प्रारब्ध, कर्म जे काही म्हणतात ते हेच का? मग गिरीशच्याही नशिबात होते का इथे येणे, बाबांची भेट घेणे. त्याचे काय कर्म होते मला माहीत नाही पण तो कसाही असला तरी म्हणजे तो भौतिक जगात जास्त रमणारा असला तरी त्याच्या सोबत राहूनही मला जर का त्याच्या वागण्याचा परिणाम न होता, त्याच्यात न गुंतता करता आली तर ती खरी साधना. जंगलात जाऊन काय कुणाचेही ध्यान लागेल. चांगलंच आव्हान होतं माझ्यासमोर. जीवनातील काही आव्हाने आपण स्वतःहून स्वीकारतो आणि काही आपल्याला स्वीकारतात. गिरीशच्या बाबतीत ह्या दोन्ही गोष्टी पन्नास पन्नास टक्के होत्या.
मी जेव्हा या विषयावर लिहायचे ठरवले तेव्हा मला एका माझ्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या मित्राने सांगितले, ‘‘नको लिहू अशा अनुभवांबाबत. साधनेच्या गोष्टी अशा सार्वजनिक करायच्या नसतात!’’ पण ना मी कोणती साधना करत होतो ना ह्या पैकी कोणतेही साधु माझे गुरु होते. ‘‘तरीही, कृपाप्रसाद आहे तुझ्यावर’’ मित्र म्हणाला.
मागे काही पुस्तकातही वाचले होते की प्रकृतीला अशी तिची रहस्ये सार्वजनिक केलेली आवडत नाहीत. काही जणांनी असा प्रयत्न केला पण ते सतत आजारी पडले, काहींचा त्यात मृत्यू झाला. त्यांच्या हातून हे लेखन कार्य पूर्ण झाले नाही पण मी तर या बाबत एक दीर्घ कथा आणि एक लेख सुद्धा लिहिला. कथा ‘मौज’ तर लेख ‘चपराक’सारख्या प्रतिष्ठित दिवाळी अंकात छापून सुद्धा आला. मग याचा अर्थ काय?
अर्थ स्पष्ट आहे. ‘तू याबाबत लिहायला हवेस.’  हाच संदेश आहे, पलीकडून आलेला. हेच कार्य आहे तुझे. कदाचित हे कार्य करण्यासाठीच तू साधु होऊ शकला नाहीस पण साधुंच्या घरात आणि मनात तुला मुक्त प्रवेश मिळाला.
**

रात्र झालेली. सगळीकडे किर्र अंधार. मोबाईलची बॅटरी तर सूर्य मावळायच्या वेळीच मावळून गेली आहे. मी चालतो आहे. तसा मी ह्या वाटेवरून या आधी पाच-दहा वेळा चाललेलो आहे परंतु रात्रीच्या वेळी कधीच नाही. हा जंगलाचा भाग. इथे गाडी रस्ता नाही. ही पाउलवाट तेवढी आहे. जंगली प्राणी सहसा या वाटेवर येत नाहीत पण ते दिवसा. रात्री कोण सांगावे? काही नाही तरी साप तरी नक्की असतील इथे ह्या उष्ण कटिप्रदेशात. मध्यप्रदेशमधले हे नर्मदा तटावरील ठिकाण. अधून मधून नर्मदा माई दर्शन देते आहे पण मी तिच्याकडे बघत नाही. मला घाई आहे, ठरलेल्या ठिकाणी पोचायची. घाईपेक्षा या अंधाराची भीती म्हणून पोचायची घाई, म्हटले तर जास्त बरोबर होईल. हा मधला पट्टा निर्जनच. दिवसा असतात कुणी परिक्रमावासी आणि आदिवासी पण रात्री सगळे गुडूप! मीच आपला बस लेट झाली म्हणून अशा अंधाराच्या वेळी येऊन पोचलो.
**

मी इतक्यावेळा इथे येऊनही रात्रीच्या वेळेत मला भय वाटत होते आणि हा मुलगा पहिल्यांदा येत असूनही मध्यरात्री यायला तयार होता. शेवटी एकदाचा रस्ता संपला आणि आश्रमाच्या जुन्या दगडी पायर्‍या लागल्या. तसे हुश्श झाले. आता पोचलो होतो तरीही पायांनी वेग धरला.
‘‘लगाव आसन’’ म्हणून महाराजांनी माझे स्वागत केले.
‘‘लाईट नाही का बाबाजी?’’ मी म्हणालो.
‘‘अरे, लाईटचे काय खरे इथे. जिवासारखी कधीही न सांगता जाते आणि मृत्युसारखी कधीही अवेळी येते पण मला याचा काय फरक पडतो. आम्ही पडलो साधु माणसे…’’ गणेश महाराज सांगत होते. सतत गांजा पिऊन खरखरीत झालेला त्यांचा तो आवाज. काळा ठिक्कर देह. उसाच्या चिपाडाइतकी पातळ शरीरयष्टी आणि समोरच्याला भेदून जाणारी त्यांची ती बंदुकीसारखी नजर.
**

रात्रीचा तो अंधार. समोर गांजा पीत बसलेले अंगभर राख फासून बसलेले गणेश महाराज. कोपर्‍यात पेटलेली धुनी. तिच्या पिवळ्या प्रकाशात उजळून निघालेला महाराजांचा  चेहरा. मागे भिंतीवर असलेल्या खुंटीवर लटकलेल्या असंख्य पिशव्या आणि त्या कधी काळी चुन्याने रंगवलेल्या भिंतीवर पडलेल्या आमच्या मोठ्या सावल्या. गणेश महाराजांची खाटेवर बसलेली आणि माझी उभी.
‘‘महाराज दूध पावडर आणली आहे. चहा हवा असेल तर सांगा’’ मी म्हणालो.
‘‘पावडरचा चहा… घोर कलियुग… बनव बनव.’’
चहा त्यांच्या आवडीचा.
भगोणे ठेवले धुनीवर आणि पाणी उकळायला ठेवले.
‘‘तुझ्या जेवणाचे काय?’’ महाराजांनी विचारले.
‘‘भूक नाही फारशी.’’ मी म्हणालो.
‘‘आणि रात्री लागली तर?’’
‘‘बिस्किटे आणली आहेत. तुम्हाला देऊ का चहासोबत?’’
‘‘हे बिस्कुट फिस्कुट मी खात नाही. मी एकभुक्त प्राणी.’’
‘‘आम्हालाही आशीर्वाद द्या, कधीतरी या जीभेवर आम्हालाही ताबा मिळवता यावा.’’
‘‘प्रत्येक गोष्टीला कशासाठी लागतो रे आशीर्वाद? स्वतःला शिस्त स्वतःच लावायची असते. ती काही वरून कोणी भगवान उतरून लावणार नाही.’’
‘‘खरं आहे बाबाजी,’’ मी चहा गाळत म्हणालो.
‘‘आम्ही नागा साधु म्हणजे काही फक्त साधु नाही. आम्ही योद्धे आहोत, धर्म योद्धे! आमचे मुख्य तेरा आखाडे आहेत. त्यापैकी दहा शैव आणि तीन वैष्णव’’ गणेश महाराज मला सांगत होते. त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दाताकडे राहून राहून माझे लक्ष जात होते.
‘‘साधु लोक हे रुद्राक्ष, हे वाघाचे दात वगैरे का गळ्यात घालतात?’’ मी त्यांना विचारले.
‘‘हा साधुंचा शृंगार असतो’’ महाराजांनी चहाचा एक घोट घेतला आणि ते पुढे बोलू लागले, ‘‘परकीयांची आक्रमणे सुरु होती आणि आम्हाला धर्म रक्षणासाठी योद्धा बनावे लागले. साधु आखाड्यांचा पहिला उल्लेख इसवी सन 547 चा मिळतो. त्या वेळी झासी केंद्र होते आखाड्यांचे. पंचायती दशनामी जुना आखाडा,  पंचायती तपोनिधी निरंजनी आखाडा, पंचायती आवाहन आखाडा, पंचायती आनंद आखाडा, पंचायती अग्नी आखाडा, पंचायती महानिर्वाणी आखाडा, पंचायती अटल आखाडा, पंचायती बडा उदासीन आखाडा, पंचायती नया उदासीन आखाडा, पंचायती निर्मल  आखाडा हे प्रमुख दहा शैव आखाडे. यापैकी उदासीन आखाडे गुरुनानक देव यांचे पुत्र श्री चंद यांनी स्थापित केले होते. पुढे त्याचे नया उदासीन आणि बडा उदासीन असे दोन भाग झाले. तसेच वैष्णवांचे श्री निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा आणि दिगांबर आखाडा हे मुख्य तीन आखाडे. अर्थात त्यांच्याही उपशाखा आहेत’’ महाराज सांगत होते.
‘‘म्हणजे प्रत्येक साधु हा या पैकी कोणत्या ना कोणत्या आखाड्याचा सदस्य असतोच?’’
‘‘अर्थात. त्याची लिखित नोंद असते. तीच तर त्याची ओळख असते. कोणते कपडे घालायचे, कोणती उपासना पद्धती स्वीकारायची, इतकेच काय कपाळावरचे गंध कसे लावायचे हे सुद्धा या आखाड्यावरूनच ठरते. पुरे झाले आजचे प्रश्न! झोप आता. दमला असशील.’’
‘‘उद्या माझा भाऊ येतो आहे, इथे आपल्या आश्रमात.’’
‘‘येऊ दे! स्वागत आहे.’’
‘‘मला त्याला आणायला जावे लागेल. इथे आतला रस्ता त्याला समजणार नाही.’’
‘‘उद्याचे उद्या बघू! आणि मर्द आहे तो! येईल आपला आपण वाट शोधत. फार काळजी नाही करायची.’’
कशाचीच काळजी नाही करायची, हे साधु जीवनाचे सार मला अगोदरच समजले असले तरी ते आचरणात आणणे मला अजून जमत नव्हते हेच खरे!!

(क्रमशः)

– महेश सोवनी

9511773618

प्रसिद्धी : मासिक ‘साहित्य चपराक’ जानेवारी २०२५

 

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

10 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!