जगद्व्यापक संघाची शताब्दी !

Share this post on:

जगातील अत्यंत प्रभावी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख काय? असा प्रश्न केला तर त्याचे एका शब्दात सांगता येण्यासारखे उत्तर म्हणजे ‘देशभक्ती!’ मुघलांच्या अनन्वित छळाने त्रस्त झालेले भारतीय पुढे ब्रिटिशांच्या जुलूमशाहीने हतबल झाले होते. या सगळ्या परिस्थितीचे चिंतन करून ‘हिंदू संघटन’ हे सूत्र घेत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विजयादशमीला या अभूतपूर्व घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकी वर्षात यशस्वी पाऊल ठेवलेल्या संघाने सामाजिक कार्याचा आणि अर्थातच राष्ट्रभक्तीचा जाज्ज्वल्य आविष्कार दाखवून दिला आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतर आलेली असंख्य स्थित्यंतरे यांचा विचार करता केवळ भारतातच नाही तर जगभरात संघाचा इतका विस्तार कसा झाला, हा अनेकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय आहे. संघावर बंदी आणण्यापासून ते संघ स्वयंसेवकांच्या क्रूर हत्या करण्यापर्यंत अनेक कटकारस्थाने रचली गेली. अगदी 2014 सालापर्यंतही काँग्रेसच्या केंद्रिय गृहमंत्री असलेल्या नेत्यांनी ‘भगवा दहशतवाद देशासाठी घातक’ म्हणून संघाची निर्भर्त्सना केली. तरीही संघाचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे असंख्य स्वयंसेवकांनी आपले तन, मन, धन अर्पून संघविचार समाजमनात पेरला आहे.
संघाला ना कधी राजाश्रय गरजेचा वाटला ना धनाश्रय! तरीही ही जगातील सर्वात मोठी संघटना ठरली. ज्यांना रोज दोन घास कसे खायला मिळतील याची भ्रांत असायची अशा सर्वसामान्य घरातील अनेकांनी संघापासून प्रेरणा घेतली आणि आपापल्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं. सेवा आणि समर्पण हा संघाचा मूलस्रोत आहे. आपली मातृभूमी हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा गाभा आहे, ही शिकवण डॉक्टरांनी दिली. आपला देश हीच आपली माता आहे आणि आपण सर्व तिचे पुत्र, या भावनेत संघाच्या यशाचे गुपित दडले आहे.
संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आज देशभरात 61045 शाखा कार्यरत आहेत. संघकार्यासाठी तीन हजार युवक शताब्दी विस्तारक म्हणून कार्यरत असून अजून एक हजार शताब्दी विस्तारक प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात संघाच्या शाखा सुरू व्हाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न आहेत. हे सर्व पाहताना गेल्या शंभर वर्षात संघाने जे वैभव निर्माण केले ते लखलखीतपणे दिसून येते. कुणालाच विरोधी न मानता प्रत्येकाशी स्नेह जपता यायला हवा, ही संघाची शिकवण सत्यात उतरताना दिसते आहे.

संघाचे नाव ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ठेवण्यापूर्वी या नावावर बराच विचार झाला होता. या संघटनेच्या नावात ‘राष्ट्रीय’ हा शब्द आल्याने संघाचे दरवाजे इथल्या मुसलमान, ख्रिश्चन आदी लोकासाठी मोकळे ठेवावे लागतील, असे काहींचे म्हणणे होते. त्यामुळे राष्ट्रीय ऐवजी ‘हिंदू’ हा शब्द वापरावा असे त्यांचे म्हणणे होते. या अनुषंगाने एक आठवण मुद्दाम सांगाविशी वाटते. मुंबईत एके ठिकाणी हिंदू कॉलनी आहे. तिथे राहणार्‍या काहींनी विचार केला की, यातील ‘कॉलनी’ हा विदेशी शब्द असल्यामुळे तो बदलायला हवा. त्यासाठी सर्व जण एकत्र आले. अनेक बैठका पार पडल्या. दरम्यान आद्य सरसंघचालक त्यावेळी मुंबईत होते. ही मंडळी त्यांना भेटली. त्यांचे मत विचारल्यावर सरसंघचालकांनी सांगितले, ‘‘या नावातील ‘कॉलनी’ शब्दाऐवजी प्रथम ‘हिंदू’ हा शब्दच बदलला पाहिजे.’’
तिथे जमलेले सगळे कट्टर हिंदू असल्याने सगळ्यांना या सूचनेचे आश्चर्य वाटले. त्या धक्क्यातून सावरत त्यांनी विचारले, ‘‘आपण निष्ठावंत हिंदू असूनही हिंदू या शब्दावर आक्षेप का?’’
त्यावर सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणाले, ‘‘हिंदू कॉलनी या शब्दातून सूचित होते की, हिंदू लोकानी आपल्या देशात राहण्यासाठी एक वेगळी कॉलनी बनवली आहे. समजा, काही इंग्रज भारतात आले व त्याला ‘ब्रिटिश कॉलनी’ हे नाव दिले तर ती गोष्ट समजू शकते किंवा आपण इंग्लंडमध्ये गेलो आणि तिथे विशिष्ट स्थानाला ‘हिंदू कॉलनी’ असे नाव देऊन राहू लागलो तर तेही योग्य आहे. इंग्लंडमध्ये ‘ब्रिटिश कॉलनी’, अमेरिकेत ‘अमेरिकन कॉलनी’ किंवा आपल्या हिंदुस्थानात ‘हिंदू कॉलनी’ असे नाव मात्र निश्चितपणे विसंगत आहे.’’
आपल्या देशाचा, धर्माचा इतका मूलगामी विचार करणारे डॉक्टर संघाचे प्रेरणास्थान आहेत.
आपल्या मातृभूमिइतकेच संघाने महत्त्व दिले ते भगव्या ध्वजाला! हा ध्वज हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या ध्वजाकडे बघितल्यानंतर आपला देदीप्यमान इतिहास, संस्कृती, परंपरा, त्यातून मिळालेली शिकवण हृदयात प्रज्वलित होते. म्हणूनच संघाने भगव्या ध्वजाला गुरू मानले आहे. हजारो वर्षांचे आपले शौर्य, पराक्रम आणि पराकोटीचा त्याग याची प्रेरणा या ध्वजापासून मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आजही आपल्या अंगात वीरश्री संचारते आणि भगव्या ध्वजाला वंदना दिली जाते. त्यामुळेच भगवा ध्वज हा संघ स्वयंसेवकांच्या अस्मितेचा विषय आहे.
गेल्या शंभर वर्षात संघाचे काम जगभर पोहोचले आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार, प्रा. मा. स. गोळवलकर तथा श्री गुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैय्या, के. एस. सुदर्शन आणि डॉ. मोहन भागवत या सरसंघचालकांचे समर्थ नेतृत्व संघाला लाभले. त्यांनी हिंदू ऐक्याला प्राधान्य देत देश जोडण्याचे काम केले. ‘इथला मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल किंवा आणखी कोणी जो कोणी या भारतभूमीला मातृदेवता मानतो तो हिंदू’ इतकी साधी-सोपी व्याख्या करत त्यांनी संघसंस्कार समाजमनात रुजवला. नागपूरातील महाल या छोट्याशा भागातील एक पडका वाडा! त्यातील जागेची साफसफाई करत संघस्थान ठरले. सात-आठ महिन्यात जेमतेम पन्नास-साठ तरुण या ठिकाणी एकत्र आले. त्यांना सोबत घेऊन डॉक्टरांनी संपूर्ण हिंदुस्थान आणि हिंदू समाज डोळ्यासमोर ठेवला. या छोट्याशा उगमाचा आज असा अथांग प्रवाह झालाय. ‘सर्वेषां अविरोधेन’ म्हणजे कोणाच्याही विरोधात उभे न राहता आपल्या समाजासाठी आपण हे काम करायचे आहे, असे डॉक्टर सांगत असत.
कोणाचाही द्वेष न करता अथवा शत्रुभाव मनात न धरता आजवरच्या सरसंघचालकांनी संघाची वाटचाल सुरू ठेवली. ‘सामाजिक कार्यकर्ता हा शीलवान, शुद्ध चारित्र्याचा असला पाहिजे. विरोधकांना सुद्धा त्याच्या पवित्र शीलावर आक्षेप घेण्याचे धाडस होऊ नये,’ अशी शिकवण श्रीगुरुजींनी दिली. डॉ. मोहनजी भागवत हे सुद्धा आजच्या परिस्थितीवर चिकित्सक भाष्य करत असतात. समाज एकत्र असावा या दृष्टीने प्रयत्न करणे हा संघाचा खरा विचार ते सातत्याने मांडतात.
देशाचे भवितव्य घडवायचे तर इथल्या बालकांना सक्षम, सुदृढ करायला हवे. त्यासाठी संघशाखांत मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्यात देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. त्यांच्या शारीरिक क्षमता विकसित व्हाव्यात यासाठी काही मैदानी खेळ, शस्त्र प्रशिक्षण यालाही प्राधान्य दिले गेले. केवळ बोलघेवडेपणा करण्याऐवजी आपल्या आचरणातून आपण देशाचे उत्तम नागरिक होऊया ही शिकवण संघ शाखेत दिली जाते. हिंदुत्त्व हा संकुचित विचार नाही तर ती जीवनशैली आहे, याचे धडे संघात दिले गेले. ‘हिंदुराष्ट्रांगभूता’ ही अस्मिता मूर्त स्वरूपात यावी यासाठीचे प्रयत्न केले गेले. ते करताना केवळ धार्मिक जंजाळात न अडकता ही संकल्पना किती व्यापक आहे ते सांगितले गेले. क्रियाशील समाज घडविण्यात संघाने जे योगदान पेरले ते अलौकिक आहे.
संघाला हुकुमशाही संघटना ठरवत 1948 साली भारत सरकारने संघाच्या कामावर बंदी घातली होती. काल्पनिक आणि निखालस खोटे आरोप करत संघावर बंदी घालण्यात आली. सामान्य माणसाच्या जीवनपद्धतीपेक्षा थोडा वेगळा विचार करत संघ प्रचारक पुढे येतात. अतिशय समर्पित भावनेने, सर्व ऐहिक सुखाचा त्याग करत ते स्वतःला देशासाठी वाहून घेतात. संसारावर, सुखाच्या सर्व कल्पनांवर तुळशीपत्र ठेवून देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेण्यात केवळ आणि केवळ संघ परिवारच कायम अग्रेसर आहे. त्यामुळे राष्ट्रभक्तांच्या या मानदंडांना संपविण्यासाठी जे काही करता येईल ते जाणिवपूर्वक करण्यात आले. तरीही हे ध्येयासक्त अग्निकुंड कायम धगधगत आहे. अनेक स्वयंसेवकांनी आपल्या आयुष्याच्या समिधा यात आनंदाने समर्पित केल्या. शरीरातून रक्त वाहावे त्याप्रमाणे समाजमनाच्या ‘जिवंत नाड्या’ म्हणून संघशाखा कार्यरत असाव्यात हा विचार गेल्या शंभर वर्षापासून सत्यात आला आहे.
संघावर सुरूवातीपासून काहींनी मनुवादी, ब्राह्मणवादी, जातीयवादी म्हणून कठोर टीका केली; मात्र लाखो स्वसंसेवकांनी हे आरोप आपल्या कृतिशीलतेतून खोडून काढले. हिंदुत्त्व आणि राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संघ हे त्यांनी सिद्ध केले. आजवर अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोन संघ प्रचारक पंतप्रधान देशाला लाभले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदा, 1975 साली अणीबाणीच्या वेळी दुसर्‍यांदा आणि  1992 साली अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी तिसर्‍यांदा संघावर बंदी घालण्यात आली. यातून संघ संपला तर नाहीच उलट कात टाकून नव्याने सिद्ध व्हावे त्याप्रमाणे संघाने आणखी उजळपणे आपल्या क्षमता सिद्ध केल्या.
संघस्वयंसेवकांना कोणतेही ‘वेतन’ दिले जात नाही तर आपल्या ‘वतना’साठी म्हणजेच मातृभूमीसाठी ते अतिशय निरपेक्षपणे संघात येतात. देशावर ज्या ज्या वेळी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी तिथे सेवा-शुश्रुषा करण्यासाठी सर्वप्रथम संघ धावून आला. केरळमध्ये अत्यंत निर्घृणपणे संघ स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. तामिळनाडूमध्ये तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. तरीही संघ कधी खचला नाही. एकनाथजी रानडे यांच्यासारख्या मराठमोळ्या माणसाने कन्याकुमारीला जाऊन विवेकानंद केंद्राची स्थापना केली. आज आसाम, अरुणाचलपासून सगळीकडे विवेकानंद केंद्राने जे काम उभे केले ते संघविचाराचे यश म्हणावे लागेल.
येत्या काळात संघात महिलांचे कार्य वाढेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 25 कोटी कुटुंबे, साडेसात लाख मंदिरे यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे. संघ कधीही आपल्या भूमिका, विचार बदलत नाही, आधुनिकतेशी त्याचे वावडे आहे असे आरोप केले जातात. संघाने मात्र आपल्या गणवेशातही बदल करून काळाबरोबर चालणे स्वीकारले. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे अनेक जण आजही त्याच त्या जुन्या गोष्टीत अडकून पडले आहेत. संघाचे आजचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मात्र काळाशी सुसंगत भूमिका घेत काही सकारात्मक बदल घडवले आहेत. नव्या पिढीशी संपर्क ठेवताना त्यांच्या अडी-अडचणीत संघ सोबत आहे. भारतातील तरुणाई सोडाच जगभरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या तरुणाईला मदत व्हावी, ज्यांचे शिक्षण सुरू आहे त्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी जगभर संघ यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. हिंदू, हिंदुत्त्व, राष्ट्रीयत्व ही भावना जपत, जोपासत संघ ज्या पद्धतीने कार्यरत आहे त्याला तोडच नाही.
संघाने थेट सत्तेचे राजकारण केले नाही मात्र सत्तेवर अंकुश राहावा असे प्रयत्न मात्र निश्चित केले. त्यासाठी तशा विचारधारेचे नेते घडवले. त्या नेत्यांनी देशाच्या विकासात अनमोल योगदान दिले. संघातून राजकारणात सक्रिय झालेले आणि अनेक महत्त्वाच्या पदावरून देशाच्या विकासात हातभार लावणारे असंख्य नेते आपल्याकडे आहेत.
1925 साली स्थापन झालेला संघ शंभर वर्षे पूर्ण करतोय. या संघटनेचे हे घवघवीत यश सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल. राजकीय विचारधारेने प्रेरित प्रसारमाध्यमांच्या टीकेला भीक न घालता संघाची वाटचाल सुरूच आहे. सतत शंभर वर्षे एखादी संघटना कार्यरत राहणे आणि जगभर त्या संघटनेचे सदस्य असणे हीच विलक्षण घटना आहे. आणखी काही वर्षांनी म्हणजे 2047 साली भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. या शंभर वर्षात देशाने काय कमावले, काय गमावले याचे अनेकांकडून मूल्यमापन होईल. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला संघ अत्यंत प्रतिकूलतेतही टिकला आणि त्याची पाळेमुळे जगभर विस्तारली हे महत्त्वाचे आहे. सध्या देशापुढे ज्या अनेक गंभीर समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य संघ विचारधारेत आहे. भविष्यात सर्व अरिष्ट गाडून देशाला मंगलतेकडे नेण्याचे महतकार्य संघाकडून घडेल, याबाबत आमच्या मनात यत्किंचितही किंतू नाही.
वंदे मातरम! भारत माता की जय!!

– घनश्याम पाटील
7057292092
(संपादकीय लेख, मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2024)

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!