जीवनात दुःख का? – संदीप वाकचौरे

Share this post on:

सकाळी सकाळी सूर्याने आपली कोवळी किरणे पृथ्वीवर टाकली होती. त्यात प्रकाश होता त्याप्रमाणे शीतलताही होती. पक्षी छान गुंजन करत होते. सकाळी थंडगार हवा वाहत होती. झाडांवरील फुले आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवत होती. आपल्या जवळच्या सुंगधाची निसर्गात उधळण करत होती. निसर्गाचा भाव देण्याचा होता. त्यात कोणताही दुजाभाव राखला जात नव्हता. सकाळी सकाळी निसर्गाकडे पाहत गेले की, मनाचा साराच भाव प्रसन्न होत जातो. निसर्ग रोज पाहावा तर असाच बहरलेला असतो. तो सतत वाटत असतो. त्याच्यात समर्पणाचा भाव असतो, आनंदाचा भाव असतो आणि आहे त्याची उधळण असते सारी. अशावेळी त्याच्याकडूनच आपण काही घ्यायला हवे का? निसर्गाकडून काही शिकायला हवे का? निसर्गातील माणसा व्यतिरिक्त असलेला प्रत्येक सजीव नित्य आनंदाने जीवनभरारी घेत असतो. माणसांच्या आयुष्यात मात्र आनंदापेक्षा दुःखाचेच ओझे अधिक असते. असे का बरे होत असावे?

जेथे सारा निसर्ग आनंदाने भरलेला आहे तिथे निसर्गाचाच घटक असलेल्या माणसाचे आयुष्य दुःखाने का बरं भरलेलं आहे? माणसाला त्याचे जीवन आनंदाने नाही का जगता येणार? माणसांना नाही का चिरंतन आनंदाची वाट सापडणार? असा प्रश्न नेहमीच मनात घर करत असतो. आपल्या भोवती अशीच अनेक माणसं दुःखाला कवेत घेऊन जगत असतात. त्या दिवशी निसर्गाच्या बहरलेल्या फुलांच्या विश्वात रममाण असताना आणि प्रसन्न माहोलात रममाण असताना खूप वर्षानी ‘ती‌’चा फोन आला. ती म्हणजे सुखाचे आगार. ती म्हणजे सौंदर्याची खाण, शब्दांचा फुलोरा, शब्दांवर प्रेम करणारी, प्रत्येकवेळी शब्दांच्या फुलोऱ्यात स्वतःचा आनंद शोधणारी. ती म्हणजे जीव ओवाळून टाकावी अशी मदमस्तीत जगणारी. सतत जीवनाचा शोध घेणारी. जीवनाबद्दल सतत विचार करणारी. आपल्यापेक्षा इतरांच्या आयुष्यावर अधिक प्रेम करणारी. ती म्हणजे केवळ आनंदाचे उधाणच जणू. त्या दिवशी तिच्या बोलण्यात शब्दांवरील प्रेम आटलेले होते. शब्दातील हसरा भाव संपला होता. डोळ्यातून नेहमीच वाहणारा प्रेमाचा झरा आटला होता. आनंदाचा भाव पारखा झाला होता. तिच्या शब्दांतील जीवनविषयक माधुर्य कमी झाले होते आणि दुःखाचा प्रवाह भरभरून वाहत होता. तिच्यात झालेला हा बदल मनाला धक्का देणारा होता.
तिचा अनेकदा आधार वाटायचा. तिचे शब्द म्हणजे जीवन फुलोऱ्याची वाट वाटायची. आज तीच सुखाच्या आगारातून दुःखाच्या महासागरात बुडाली होती. असं कसं बरं झालं असेल? जीवनात खरंच दुःखाला काय बरं कारण असेल? पण जीवन म्हणजे दुःखाचे आगार नाही आणि सुखाचा महासागरही नाही. प्रत्येकाचे जीवन आनंदाचे भरते आहे आणि दुःखाच्या लाटाही आहेत. आपणच आपल्या वाटा निवडायच्या असतात. आपण आपला दृष्टिकोन निश्चित केला आणि विचारांची दिशा स्पष्ट केली की भाव निर्माण होतात. आपल्याला जीवन निश्चित फुलवता येते आणि बहरवता देखील येते. जीवनातील अनेक संकटावर मात करता येते. आपण आपलेपणाने अपेक्षा करतो आणि दुःखाची वाट निर्माण होते. तिच्या आयुष्यात असंच काही झालं होतं.
जीवनात दुःख का? या प्रश्नाच्या मुळाशी जात आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर मिळत जाते. आपण जेथे स्वतःला जोडून पाहतो तेथेच दुःखाचा उगम असतो. आपल्या भोवती अनेक घटना घडतात म्हणून प्रत्येक घटनेमुळे काही आपल्या आयुष्यात दुःख निर्माण होत नाही. जगात रोज कोणी तरी मरते म्हणून प्रत्येकासाठी डोळ्यात अश्रू ढाळत बसत नाही. घटना समान असतात तरी प्रतिक्रिया आणि भाव मात्र समान असत नाहीत. एका घटनेचे एकाला दुःख आणि दुसऱ्याच्या मनात कोणताही भाव नाही. याचा अर्थ आपणच आपल्या आनंदाच्या आणि दुःखाच्या वाटा निर्माण करत असतो. त्या वाटा जीवनात येत नाहीत. आपल्या दृष्टीत तो भाव सामावलेला असतो इतकंच. नेहमीच आनंदाने बागडणारी ती अनेक वर्षानंतर इतकी दुःखात का बरं डुबून गेली होती? असा प्रश्न तिच्याशी बोलताना सतत जाणवत होता. तिच्या बोलण्यात जाणवणारा तणाव, निराशा मनाला भेदत जात होती. तिचे आयुष्य एका अर्थाने हरवत गेले होते. जी आरंभी जीवनाचा अर्थ शोधत होती, तिच्या आयुष्यातील जीवनानंद हरवत जाऊन केवळ जगणं उरलं होतं. तिच्या बोलण्यातून सतत निराशेचा भाव व्यक्त होत होता. तेव्हा तिच्या डोळ्यातील वाहणाऱ्या अश्रुंचा गरमागरम झरा अधिक काही सांगून जात होता. त्या अश्रुंना वाटा होत्या पण पुसणारी माणसं मात्र हरवत गेली होती. असं तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं. आपण अपेक्षा करतो आणि ते मिळालं नाही की आणखी दुःखाची वाट निर्माण होते. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली की जीवन पुन्हा पुन्हा नव्या वाटेने आनंदाची पेरणी करत प्रवाहीत होत जाते. आपला दृष्टीकोन बदलला की जीवनात आनंदाला पारावार राहणार नाही. आपले आणि परके हा भाव जाणून घ्या. मग जीवनात फुलांसारखे बहरणे घडेल. जीवनप्रवासातील आपपर भाव सोडा आणि वाटा चालत राहा. मग जीवनात निराशेचा विचारही स्पर्श करणार नाही. आपण विचार कसा करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपला दृष्टीकोन जीवनावर परिणाम करत असतो.
जुनैद नावाचे एक सुफी संत होते. त्यांचा प्रपंच उत्तम सुरू होता. संसाराच्या वेलीवर मुलांच्या रूपाने फुले फुलली होती. मुलावर तर त्यांचे अत्यंत प्रेम होते. मुलांशिवाय त्यांचे जीवन अशी कल्पनाही करवत नव्हती. बायकोही मुलांवरील पतीचे प्रेम जाणून होती. एक दिवस अचानक मुलाचा अपघात झाला आणि त्यात मुलाचा अंत झाला. मुलाच्या अंताने आपला नवरा कोलमडून पडेल, ते मुलाशिवाय जगूच शकणार नाहीत, ते वेडे होऊन जातील ही त्यांच्या पत्नीची भावना होता. मुलाच्या निधनाने ती कोलमडली होती पण तरीसुद्धा तिला अधिक चता पतीची होती. मुलाचा दफनविधी करून जुनैद घरी आले होते. खरंतर तिने मनात जे आणले होते त्यापैकी काहीच झाले नव्हते. ते पूर्वीसारखेच होते. त्यामुळे मुलाचे निधन झाले असे जाणून काही घडलेच नाही. मुलगा जिवंत आहे असाच त्यांचा व्यवहार होता. बायकोला हे पाहून फारच आश्चर्य वाटले होते. मुलाचे निधन झाल्याने शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र परिवार सारेच जुनैदला भेटून जात होते. त्याचे सांत्वन करत होते. या साऱ्या भेटीत तर जुनैद अजिबातच तुटलेले नव्हते.
बायकोला आश्चर्य वाटल्याने घरात कोणी नसताना तिने विचारले की, “अहो, मला वाटले मुलाच्या निधनानंतर तुम्ही अगदी तुटून जाल. तुम्ही वेडे व्हाल. तुमचे तर मुलावर एवढे प्रेम होते की, तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकणार नाही! पण मुलाच्या निधनानंतर तर तुमच्यात तसे काहीच जाणवत नाही.”
तेव्हा जुनैद म्हणाले, “हो तू जे म्हणते आहेस ते अगदीच खरं आहे. मी खरंच तुटून गेलो असतो पण विचार केला की, मी जेव्हा तरूण होतो, माझा भूतकाळ तेव्हा मला सांगत होता की, मला जेव्हा मूल नव्हते तेव्हा तू होतास. मूल नव्हते तेव्हाही मी आनंदात होतो. मग आज मूल नाही तर मी दुःख का करावं? कारण तो नसतानाही माझा आनंद होता. तो आला तेव्हा आनंद होता. आता तो गेला असला तरी मी पूर्वीसारखा एकटाच उरलो आहे. आता मध्ये जे काही घडले आहे ते एक स्वप्न होते. त्या स्वप्नासोबत मी स्वतःला आनंदी करत गेलो. त्या स्वप्नात मी स्वतःला रमवत गेलो! पण जाग आली आणि स्वप्न भंग्न पावलं. आता स्वप्न संपलं. पुन्हा मला रोजच्यासारखे जगावे लागणार आहे इतकेच. जीवनात स्वतःच्या आयुष्यात अशी सुंदर स्वप्नं पडतात आणि भग्न पावतात तेव्हा त्या स्वप्नासोबत फक्त काही काळ आनंद घ्यायचा असतो. पुन्हा आपला प्रवास स्वप्नं नसतात तसे जगायचे असते. आपल्या जीवनात आनंद आणि दुःख हा फक्त भाव आहे आणि तो आपल्या दृष्टीत सामावलेला आहे.”
जुनैद यांनी आपल्या आयुष्यातील घटनेकडे एका नजरेने पाहिले आणि ते जीवन जगत गेले. ते तुटून पडतील असे वाटत असताना त्यांच्यात तसे काही घडले नाही कारण आपल्या भोवती जे काही असते ते आपले मानले की, दुःख होते आणि ते आपले नाही असे मानले की सुखाचा प्रवास सुरू होतो.
त्या दिवशी एका वृद्धाच्या घराला आग लागली. पै पै कमावून त्यांनी ते घर मिळवले होते. तेव्हा घराचा मालक असलेली वृद्ध व्यक्ती जोरजोरात रडत होती. आक्रोशाने तो उन्मळून पडला होता. आयुष्यातील सारेच गमावले असा तो भाव होता. त्याचा आक्रोश पाहून इतरही अनेक जण कोलमडले होते. तो आपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न करत होता. अखेरच्या क्षणी त्याच्या डोळ्यातील अश्रू देखील आटले होते पण तेवढ्यात त्याचा मुलगा आला आणि त्याने पाहिले तर बाबा जोराजोरात आक्रोश करत होता. डोळ्यातील पाणी आटले आहे. फक्त एकटक नजरेने जळणाऱ्या घराकडे ते पाहत आहेत. तेव्हा तो म्हणाला, “बाबा का रडत आहात? अहो आपण हे घर तर मागील आठवड्यात विकले आहे.”
तेव्हा टाहो फोडून रडणारा म्हातारा आता शांत होऊन जळत्या घराकडे पाहत होता. घराकडे पाहताना स्व भाव संपुष्टात आला होता. त्यामुळे भडकणारी आग पाहूनही डोळ्यातील वाहणारे अश्रू थांबले होते कारण घर आता आपले उरले नव्हते. आपले नाही म्हटल्यावर दुःख नाही.

Image Credits: AI

आपल्या जीवनात आपण आपले म्हणून खूप जणांना स्वीकारत जातो आणि दुःखाच्या वाटा निर्माण करत जातो. आपण आपल्या आयुष्यात जे जे कोणी येत जाते त्याला स्वीकारत जावे पण त्याच्या वर्तनाने आपले जीवन दुःखी का करावे? त्याचे येणे हे लाटेसारखे असे मानावे. लाट तात्पुरती असते आणि समुद्र कायम असतो. लाट येते आणि जाते म्हणून समुद्रात चलबिचल होत नाही. तो जसा पूर्वी होता तसा लाट गेल्यावर देखील राहतो. त्या प्रमाणे आपल्याला जगता येण्यास काय हरकत आहे? मात्र आपण लाटेने हरवत जातो आणि जीवनात दुःख करत बसतो.
जीवनात अपघात होतात म्हणून पूर्वीच्या दिवसासारखे जगण्याचा मोह कायम असायला हवा. आपण माणसं जोडत जातो तेव्हा नाते निर्माण होत जाते. त्या नात्यातील आंतरिक ओलावा जाणता यायला हवा असतो इतकेच. नाते फसवे असू शकतात. आपल्याला फक्त निरपेक्षतेने जीवनाकडे पाहता यायला हवे. स्वतःचा दृष्टीकोन आपण पक्का करत गेलो की, जीवनाची आनंदाची वाट निश्चित सापडत जाते. खरंतर जीवनात कोणी आले म्हणून आनंदी होता कामा नये आणि कोणी वजा झाले म्हणून दुःखी होता कामा नये. हा एक प्रवास आहे. आपण शून्य आहोत हा भाव खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी अनेकांनी साधना केली आहे. अशी अवस्था ज्यांना लाभली त्यांनाच दुःखापासून दूर होता आले. शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी त्याच्यात फरक पडत नाही. तसे आपले आयुष्य असायला हवे. इतके छान आयुष्य जगण्याची वाट आपण निर्माण करायला हवी. हो, अगदी असे जगता येते. आपल्यातील दुःखाच्या लाटा आल्यावर आपले आणि परके कळते असे म्हणतात पण आपण त्यांना तसे काही न मानता स्वीकारले की आपली वाट समृद्ध होत जाते आणि जीवनाला आनंदाचे झुंबर लगडते. फक्त वाट चालण्याचे धाडस दाखवायला हवे इतकेच.

– संदीप वाकचौरे
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ
8329328470

(प्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ ऑगस्ट २०२४)

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!