सध्या कोणत्याही पक्षाचा विचार केला तर उमेदवारी देताना ‘निवडून येण्याची क्षमता’ या एकाच निकषाचा प्रामुख्याने विचार होतो. त्यात उमेदवाराची आर्थिक परिस्थिती, जात, धर्म, त्याचा संपर्क, त्याचे आधीचे काम अशा बाबींचा विचार होतो! मात्र पुण्यात जन्मलेला, इथेच शिक्षण झालेला एखादा मराठी माणूस बिहारमध्ये जातो आणि एकदा, दोनदा नाही तर तब्बल चार वेळा खासदार म्हणून निवडून येतो, हे तुम्हाला सांगितले तर अनेक जण विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही म्हणाल, ‘फार तर तो राज्यसभेवर निवडून जाईल!’ पण असे घडले आहे. पुणेकर असलेल्या मधू लिमये यांनी बिहारमध्ये जाऊन चार वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.
1964 साली बिहारमधल्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत ते प्रथम निवडून आले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि गोवा मुक्ती संग्रामातही योगदान देणार्या मधू लिमये यांनी नंतर बिहारमधीलच बांका मतदारसंघातूनही विजय मिळवला. त्यांनी बिहारमध्ये सहावेळा निवडणूक लढवली. त्यापैकी चार वेळा ते विजयी झाले. जातीय राजकारणाचे धागे बळकट असलेल्या बिहारमध्ये हा चमत्कार घडला तो केवळ आणि केवळ विचारधारेच्या भक्कम परंपरेमुळे. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण अशा दिग्गजांनी इथे समाजवाद पेरला. त्याची मधुर फळे लिमये यांना चाखायला मिळाली.
अतिशय तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक राजकारणी अशी ओळख असलेले मधू लिमये यांचा पाच वर्षाचा खासदारकीचा कालावधी संपला तेव्हा ते अणीबाणीमुळे तुरूंगात होते. त्यांनी तुरूंगातून त्यांच्या पत्नीला पत्र लिहिलं आणि सांगितलं की, ‘ताबडतोब दिल्लीला जा आणि माझं सरकारी निवासस्थान खाली कर!’
लिमये यांच्या धर्मपत्नी चंपा याही इतक्या एकनिष्ठ होत्या की त्या मुंबईहून दिल्लीला पोहोचल्या. घरातील सर्व सामान त्यांनी बाहेर रस्त्यावर काढलं पण पुढे कुठं जायचं हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा एका पत्रकारानं त्यांना मदत केली. अणीबाणीमुळे लोकसभेचा कालावधी एक वर्षानं वाढवलेला असताना त्यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिला. इतकंच काय तर त्यांनी खासदार म्हणून मिळणारं निवृत्ती वेतनही घेतलं नाही. ‘आपल्यानंतरही कोणी हे वेतन घ्यायचं नाही’, अशी स्पष्ट ताकीद त्यांनी त्यांच्या पत्नीला दिली. मधू लिमये यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से सांगितले जातात, जे आतच्या वातावरणात ऐकल्यानंतर कुणालाही अविश्वसनीय वाटतील.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अणीबाणीच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर कठोर टीका केली होती. मोरारजी सरकारने त्यांना मंत्रीपदाची ऑफर दिली तीही त्यांनी धाडसाने धुडकावून लावली. ते सभागृहात आले की आता कुणावर तुटून पडणार म्हणून सत्ताधारी नेते चळवळा कापत. एस. एम. जोशी, साने गुरुजी यांच्यासोबत त्यांनी मोठं काम उभं केलं. जर ते त्यांच्या म्हणण्यावर, विचारावर ठाम राहिले नसते तर ‘भाजपचा राजकीय पुनर्जन्म’ही झाला नसता.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 6 मे 2024