सबसे बडा खिलाडी

Share this post on:

‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1995 ते 2007 पर्यंत पुण्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. पुढे पुण्यात कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नऊ महिने तिहार तुरूंगात काढावी लागली आणि पुण्यातील ‘कलमाडी पर्व’ लयास गेलं. इतकंच नाही तर तेव्हापासून पुण्यातील काँग्रेस पक्षाचं अस्तित्वही संपुष्टात आलं.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार कलमाडींची एक आठवण सांगतात. उल्हासदादा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यावेळी पुण्याचं शहराध्यक्षपद सुरेश कलमाडी यांना मिळावं, अशी शरद पवार यांची इच्छा होती. पवारसाहेबांनी उल्हासदादांना हे सांगितलं. मात्र ‘तो पक्षात अजून नवीन आहे, त्याला काम करू द्या…’ म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. दीड-दोन वर्षांनी पवारांनी दादांना परत आठवण केली. त्यावेळी उल्हासदादांनी बाणेदारपणे सांगितलं की ‘माझ्या कार्यकारणीत एकही नेता-कार्यकर्ता दारू दुकानाचा मालक नाही. कलमाडीला त्याच्याकडील दारूचा परवाना रद्द करायला सांगा म्हणजे मी त्याला संधी देतो.’
हा निरोप गेल्यावर कलमाडींनी त्यांचा दारूधंदा इतरांकडं हस्तांतरीत केला. हे ऐकल्यावर मला उगीचच वाटलं की आजच्या राजकारणात दारूधंदा नसेल तर त्याची उमेदवारी डावलली जाते. कलमाडी पूर्वी इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत होते. 1965 आणि 1971च्या पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात त्यांनी आपल्या वायूसेनेचे पायलट म्हणून योगदान दिलं होतं. निवृत्तीनंतर त्यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडली. पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि पवारांनीच त्यांचं साम्राज्य खालसा करून प्रवाहाच्या बाहेर फेकलं.
तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात आले असता त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली होती. ही बातमी संजय गांधी यांच्यापर्यंत पोहोचली आणि कलमाडी दिल्लीत पोहोचले. पवारांसोबत एस काँग्रेसमध्ये गेल्यावर 1982 साली पवारांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्रीही होते. 1996, 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी ठरले. 1998च्या निवडणुकीत मात्र अपक्ष म्हणून उभे राहिल्यानंतर विठ्ठल तुपे यांच्याविरूद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कलमाडींचं पुण्याच्या सत्तेवर एकहाती वर्चस्व होतं. महापौर, स्थायी समिती, वाहन व्यवहार समिती अशा सगळ्यांवर ते सांगतील तोच उमेदवार असायचा. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चार महिलांना महापौरपदाची संधी दिली. महानगरपालिकेतलं पानही त्यांच्या इशार्‍याशिवाय हलत नव्हतं.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

या सगळ्यामुळे कलमाडी पवारांना डोईजड झाले होते. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री असताना पवारांनी जंग जंग पछाडलं. पुण्यात कलमाडींच्या विरूद्ध सभा घेतल्या आणि पुण्याचा कारभारी बदला, असं आवाहन पुणेकरांना केलं. भाकरी फिरवली नाही तर करपते हे त्यांनी लोकांना पटवून दिलं. दरम्यान कलमाडींनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिलं. राष्ट्रकूल स्पर्धा भारतात आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या स्पर्धातील घोटाळ्यावरून सीबीबायने त्यांना अटक केली आणि काँग्रेसनंही सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं. त्यानंतर त्यांना कधीही स्वतःचं अस्तित्व दाखवून देता आलं नाही.
घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 7 मे 2024

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!