स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ. अत्यंत सुसंस्कृत, प्रगल्भ आणि लोकहितदक्ष नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. बाभळगावच्या सरपंचपदापासून आपली कारकिर्द सुरू करणारे विलासराव दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरदार मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री म्हणून काम केले. लोकांच्या सुख-दुःखाची जाण असलेले आणि जनसामान्यांची नाडी अचूकपणे हेरणारे विलासराव 1995 साली लातूरमधून 32 हजार मतांनी पराभूत झाले होते. लातूर शहर आणि ग्रामीण हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला असूनही जनता दलाच्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या विरूद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामागे एक मजेशीर किस्सा आहे.
लातूर भागात कानडी संस्कृतीचा प्रभाव आहे. इथे वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लातूर शहरातील औसा रोडवर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याची आग्रही मागणी होती. या मागणीला लातूर नगरपालिकेने प्रतिसाद दिला आणि 1989 ला इथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर झाला. दरम्यान 21 मे 1991 ला राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येने अस्वस्थ झालेल्या विलासरावांनी बसवेश्वरांच्या जागी राजीव गांधी यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. लिंगायत समाजाकडून मात्र याला तीव्र विरोध होता. एस. आय. देशमुख हे त्यावेळी लातूरचे नगराध्यक्ष होते आणि ते विलासराव देशमुख यांचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी औसा रोडवरच राजीवजींचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करून घेतला. या निर्णयाने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली.
1995च्या निवडणुकीत याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. विलासराव देशमुख यांनी त्या दृष्टिने सावधानता बाळगून जोरदार तयारी केली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांची प्रचाराची सांगता सभा झाली. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. ती पाहून विलासरावांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास शैलीत जोरदार भाषण केलं. ते म्हणाले, ‘हा जनसागर हीच माझी ताकद आहे. त्यामुळे मला विजयाची चिंता नाही. सुना है कुछ मामुली लोग मेरे खिलाफ है! मात्र इथे जमलेल्या तुम्हा सर्वांपुढे हे ‘मामुली’ लोक माझं काय बिघडवणार?’
टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विलासराव देशमुख यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मात्र दुसर्या दिवशी लातूरमधील एका महत्त्वाच्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर मोठी बातमी केली. त्याचं शीर्षकच होतं, ‘हे मामुली लोक माझं काय बिघडवणार?’ त्यात त्यांनी मांडलं की, विलासराव देशमुख यांनी त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत मराठ्यांची ताकद दाखवून देत जातीयवाद केला. ते म्हणाले, ‘हे मामुली लोक माझं काय बिघडवणार?’ यातील ‘मामुली’ या शब्दाचा अर्थ आहे, मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत! त्यामुळे अशा जातीयवादी मानसिकतेच्या नेत्याला अद्दल घडवायलाच हवी.
लातूरात मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. विशेषतः मारवाडी आणि लिंगायत समाज हा तर परंपरागत भाजपचा मतदार आहे. त्यात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यावरून नाराजी होतीच. या सगळ्यामुळे टोकाचा कट्टरतावाद वाढला आणि विलासराव देशमुख यांचा तब्बल 32 हजार मतांनी पराभव झाला. पुढे 1996 साली औसा रोडवरच बसवेश्वरांचा पुतळा उभारला. तेव्हा विलासराव देशमुख यांना त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचंही निमंत्रण नव्हतं. विलासराव देशमुख उपस्थित जनसमूदायाला उद्देशून प्रामाणिकपणे बोलले होते मात्र त्यांच्या ‘मामुली’ या शब्दाचा वेगळा अर्थ लावला गेल्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 26 एप्रिल 2024