नुकतंच एक व्यंगचित्र चर्चेत आलं. एका वृत्तवाहिनीवरील राजकीय चर्चेत जाहिरातीसाठीचा ब्रेक होतो. 30 सेकंदाच्या ब्रेकनंतर निवेदक चर्चा सुरू करतो तर त्यातील सहभागी एक नेता म्हणतो की, ‘ब्रेकदरम्यान मी पुढच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात आता काही तात्त्विक वाद राहिले नाहीत. त्यांच्या ‘सर्व’ मुद्यांशी मी सहमत आहे.’
सध्याच्या राजकारणातील घडामोडी, पक्षप्रवेश, नाराजी, स्वार्थ हे सगळं पाहता अशी घटना प्रत्यक्षात घडली तरी आश्चर्य वाटू नये. असे जरी असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील बांसवाडा-डुंगरपूर मतदारसंघात मात्र आणखी एक मजेशीर घटना घडली आहे. इथले काँग्रेसवाले जिवाच्या आकांताने प्रचार करत होते की, ‘यंदा काँग्रेसला मतदान करू नका, पंजापुढील बटन दाबू नका!’
हो! आपण बरोबर वाचलं. इथले काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खरंच असा प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ आली. इथं दुसर्या टप्प्यातील मतदान काल (दि. 25) एप्रिल पार पडलं. या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसचा मित्रपक्ष अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसने शेवटच्या क्षणी भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी केली. तत्त्पूर्वी त्यांनी अरविंद दामोर यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यांना एबी फॉर्मसह उमेदवारी अर्जही दिला होता. दामोर यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला. निवडणुकीच्या एक दिवस आधी काँग्रेसची भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी झाली. मग आघाडीच्या वतीने राजकुमार रौत या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्याने दामोर यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. दामोर यांनी मात्र गायब होत निवडणूक कार्यालयाकडे पाठ फिरवली. माघार घेण्याची वेळ निघून गेल्यावरच ते हजर झाले.
या सगळ्या घडामोडींमुळे इथून तिरंगी लढत झाली. काँग्रेसवर त्यांच्याच पक्षाचे उमेदवार अरविंद दामोर यांच्या विरूद्ध प्रचार करत ‘काँग्रेसला मते देऊ नका’, असे आवाहन करण्याची नामुष्की आली. याउलट दामोर यांनी ‘आपणच काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून काँग्रेसची मते आपल्यालाच मिळतील’ असा दावा केला आहे. या सगळ्या घडमोडीचा आणि मतविभाजनाचा फायदा भाजपला होईल, असे सांगितले जात आहे.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष फुटले. फुटीरांनी पक्षचिन्हांसह ‘पक्ष आपलाच’ असा दावा केला. त्यापूर्वी अगदी पहाटेच्या वेळी दोन भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करण्यात आले. गेल्या काही काळात इतके अनपेक्षित आणि धक्कादायक बदल घडले की, लोकांचा राजकारण, निष्ठा, नैतिकता अशा शब्दांवरील विश्वासच उडाला आहे. ‘आपल्या पक्षातून कुणी बाहेर गेला तर तो गद्दार आणि दुसर्या पक्षातून कुणी आपल्याकडे आला तर ते त्याचं हृदयपरिवर्तन’ अशी सोयीस्कर व्याख्या राजकारण्यांनी केली आहे. या सगळ्याचे काय परिणाम होतील ते निकालाच्या दिवशी दिसून येईलच!
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 27 एप्रिल 2024