बाई आणि बदलणारे जग – मृणालिनी कानिटकर – जोशी

Share this post on:

एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे येऊन शिकत होत्या कवा त्यांना त्यांच्या घरात शिकण्यासाठी पाठबा मिळत होता. त्या सामाजिक कार्यात सहभागी होत होत्या. अगदी स्वातंत्र्य चळवळीत देखील स्त्रियांनी आपलं योगदान दिलं आहे. हे सगळे बदल होत असले तरी बहुसंख्य कुटुंबांमधून स्त्रीचं स्थान दुय्यमच होतं.

शृंखला हळूहळू गळत होत्या तरी त्याचे खोलवर व्रण अजूनही स्त्रीजातीच्या दु:खास कारणीभूत ठरत होते.
आज त्या काळाचा विचार करता खरंच किती पुढे आलो आहोत आपण! मुली शिकत आहेत, नोकऱ्या करत आहेत, मुलगा झाला नाही तर किमान तिला आरोपीच्या पजऱ्यात उभं राहावं लागतं नाहीये! पण स्त्रीच्या पूर्ण मुक्ततेच्या दृष्टीने पाहिलं तर वरवर दिसणाऱ्या ह्या सुधारणा म्हणजे अगदी कागदी मुखवटे असावे तशा आहेत. कधीही, कोणत्याही क्षणी हे मुखवटे फाटतील आणि त्या आड दडलेला समाजाचा तोच सनातनी चेहरा अकराळ-विकराळ रूप घेऊन आपल्या समोर येईल अशी भीती वाटते. कोणी म्हणेल की किती स्वातंत्र्य मिळाले तरी ह्या बाया आपले जुनेच मुद्दे रेटून धरतात, स्त्री मुक्तिच्या बाबतीत पण खरोखरच स्त्रीची कामे, तिचे कुटुंबातले स्थान याबाबत समाजाची मानसिकता अजूनही पूर्वीच्या धारणा तशाच कवटाळून बसण्याची आहे.
इथे मी जाणीवपूर्वक तिचे कुटुंबातले स्थान असे म्हणाले आहे, सामाजिक नाही! कारण बदलत्या जगात बाईच्या बाबतीत हा मोठा बदल झाला आहे. तिचे शिक्षण, कर्तृत्व यामुळे समाजात तिला तिचे योग्य स्थान सहसा कोणी नाकारू शकत नाही पण कौटुंबिक पातळीवर तेवढा उदारपणा आजही दाखवला जात नाही. त्यामुळे झालं आहे काय समाजात भिन्न प्रवृत्तीची दोन टोके दिसतात. एक म्हणजे नोकरी व्यवसाय सांभाळून घरी आल्यावर घरही कुशलतेने सांभाळणे हे तिचे एकटीचे कर्तव्य आहे असं मानणारा गट आणि दुसरा गट ज्या मुलींना स्वातंत्र्य देऊन वाढवलं गेलं आहे तो! इथे मी नोकरी कवा व्यवसाय करते म्हणजे घर हे माझ्या जबाबदारीत येतच नाही असं मानणाऱ्या मुली. अर्थात ह्या व्यतिरिक्त बाहेरची आणि घरची जबाबदारी शक्यतो सामंजस्याने आणि सारखेपणाने वाटून घेणारी कुटुंबे देखील आहेत पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे.

ह्या सगळ्याचे कारण शोधू गेलो तर मला असं वाटतं की ज्या वेगाने गेल्या ३०-३५ वर्षात जग बदलले आहे, जागतिकीकरण झाले आहे त्या वेगात दडले असावे. एखादी महाकाय नदी जशी रोरावत, घोंगावत आजूबाजूचं जग आपल्या पोटात सामावून घेत वेगाने वाहत जाते तशाच वेगाने हे बदल आपल्या जगात घडले. त्यात सहजपणे सामावून जाणं सर्वांनाच अवघड होतं. तरी देखील काही जण ह्या झंझावातात शांतपणे, खंबीरपणे उभे राहिले. काही जण त्या वेगाने भांबावले, कोसळले पण पुन्हा सावरले. वेगाने पुढे येणारे बदल पचवणे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही अवघड होते पण तरीही ह्या बदलांच्या काठाकाठाने जात समाजाने स्त्रीचं सामाजिक पातळीवर पुढे जाणे, अगदी कला, राजकीय क्षेत्र, अंतराळ सर्वत्र… स्वीकारले गेले पण त्याच वेळी तिच्या कौटुंबिक जबाबदारीचा भाग आपण उचलला पाहिजे हे भान कौटुंबिक पातळीवर स्वीकारले गेले नाही कवा तसे स्वीकारणे जड गेले. उच्चशिक्षित, काहीसा वेगळा विचार करणाऱ्या कुटुंबात ही गोष्ट तर मग घराघरातून आज अर्थार्जनासाठी कवा स्वतःच्या शिक्षणाला, कलेला वाव देण्यासाठी बाहेर पडलेल्या स्त्रियांचे तर अजून हाल कारण घरकामासाठी सहायक नेमण्याएवढी त्यांची आर्थिक क्षमता नसेल तर हा सगळा डोलारा त्या बाईला एकटीला तोलावा लागतो. एक समाज म्हणून इथे आपण सपशेल हारतो कारण एका गटाची कार्यशक्ती आपण क्षीण करून टाकत असतो.

ह्या सर्वाचे एक दुसरे टोक म्हणजे काही स्त्रियांनी आपण सामाजिक क्षेत्रात पुढे आहोत तर कौटुंबिक जबाबदारी घेण्यात स्वारस्य दाखवले नाही कबहुना कुटुंब संस्थेलाच नकार दिला. ह्याची बीजे स्त्रीचे आधुनिकीकरण आणि तिच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या परंपरावादी अवास्तव अपेक्षांमध्ये आहे.
आज वेगाने बदलणाऱ्या जगात बाईचं बाईपण टिकवायचे असेल, कुटुंब, प्रेम, जिव्हाळा ह्या गोष्टींना तिलांजली द्यायची नसेल तर पुन्हा एकदा बदलत्या जगाला अनुसरून कुटुंबरचना बदलायला हवी. जिथे पुरुष आणि स्त्री सामंजस्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारतील. हा बदल सुद्धा एका रात्रीत होणार नाही. हळूहळू समाजमनाला त्याची जाणीव होईल आणि तो बदल इथे रुळेल, टिकेल.
बदलत्या जगातल्या बाईला समजून घ्यायला आज आपण कमी पडलो तर त्याचे दूरगामी परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील.
म्हणून वेळेत जागृत होऊया! बदलते जग आणि त्यामुळे बाईचे बदलणारे जग ह्या वर्तुळांना परस्परात सामावून जाण्यासाठी अवकाश देऊ या.

– मृणालिनी कानिटकर – जोशी
कोथरूड, पुणे – ४११०३८
दूरभाष – ९९६०३९२९२३

पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक मार्च २०२४

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!