पहिलटकरणी – सुधीर जोगळेकर

बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी‌’ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत. जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेवर मात करत, त्या त्या क्षेत्रातलं पुरुषी वर्चस्व झुगारून देत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम या महिलांनी सुस्थापित केले. कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थानं त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी‌’ ठरल्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तिघींचा हा परिचय.

१. कादंबिनी बोस-गांगुली
वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला
(१८ जुलै १८६१ – ३ ऑक्टोबर १९२३)

१८६१ साली जन्मलेल्या कादंबिनी बोस-गांगुली, १८६४ साली जन्मलेल्या रखमाबाई आणि १८६५ साली जन्मलेल्या आनंदी गोपाळ जोशी या तिघी तत्कालीन भारतातील जवळपास समकालीन वैद्यक पदवीधर महिला! पण तिघींच्या तीन तऱ्हा भारतीयांनी अनुभवल्या…

तिघींमधल्या आनंदी गोपाळ जोशी यांनी अमेरिकेत जाऊन दोन वर्षांचे आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतले. १८८६च्या अखेरीस त्या भारतात परतही आल्या. परत आल्यावर दोन-तीन महिने त्यांनी वैद्यकसेवा बजावली परंतु क्षयरोगाने ग्रासल्याने २६ फेब्रुवारी १८८७ ला त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. रखमाबाई या स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर परंतु त्या ओळखल्या गेल्या त्या बंडखोर म्हणून! मनाविरुद्ध झालेला बालविवाह तर त्यांनी मानला नाहीच, उलट त्याला न्यायालयात आव्हान दिले, ज्याचा परिणाम विवाहासाठीचे संमती वर्ष निश्चित होण्यात झाला. त्यांच्या बंडखोर स्वभावाने वडिलांचे वा सावत्र वडिलांचे आडनाव लावणे तर नाकारलेच परंतु ज्या थोराड व्यक्तिशी त्यांचे लग्न लावण्यात आले त्याचे आडनाव लावण्यासही त्यांनी नकारच दिला.
कादंबिनी बोस-गांगुली यांची केस आणखी वेगळी. त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय केलाच परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पहिल्या महिला प्रतिनिधी वक्त्या म्हणून त्यांची नोंद झाली. कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून १८८४ साली पदवीधर झालेल्या त्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. त्यांची वैद्यकीय कारकीर्द यशस्वी ठरलीच परंतु मद्रासमध्ये भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात बोलणारी पहिली महिला वक्ता म्हणून त्यांची नोंद झाली. ही घटना १८८९ सालची. त्यानंतर १९०६ साली कोलकत्यात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महिला संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. महात्मा गांधी त्या सुमारास दक्षिण आफ्रिकेत वंशभेदाविरोधात सत्याग्रह आंदोलन करत होते. त्या आंदोलनासाठी कादंबिनी यांनी कोलकत्यात मोठा निधी गोळा केला. १९१४ साली महात्माजी कोलकत्यात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान कादंबिनीताईंनी भूषवले होते. कोळसा खाणीत काम करणाऱ्या महिलांच्या दु:स्तर स्थितीवर त्यांनी खूप काम केले. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांचं साहित्य वाचून राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्यात अंकुरित झाली होती.
तत्कालीन बेंगाल प्रेसिडेन्सीमधील आणि आजच्या बिहारमधील, भागलपूरनजीक बारिसालमध्ये ब्राह्मो समाज सुधारक ब्रजकिशोर बसू यांच्या त्या कन्या. बसू कुटुंब बारिसालमधल्या चांदसीचं. आज ते बांगलादेशात आहे. ब्रजकिशोर भागलपूरच्या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांनी महिलांच्या उन्नतीचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून १८६३ मध्ये भागलपूर महिला समितीची स्थापना केली. स्त्री शिक्षणाला पाठबा न देणाऱ्या उच्चवर्णीय बंगाली समाजात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातले. १८८२ साली त्या कोलकता विद्यापीठातून कला विषयाच्या पदवीधर झाल्या. ‘भारतातील पहिली पदवीधर महिला‌’ अशी त्यांची नोंद झाली.
जून १८८३ मध्ये त्यांचा डॉक्टर द्वारकानाथ गांगुली यांच्याशी विवाह झाला. गांगुली स्वतः ब्राह्मो समाजाचे प्रमुख नेते होते. ज्या बेथून कॉलेजमध्ये कादंबिनी शिकल्या त्या कॉलेजमध्ये ते शिकवीत आणि कादंबिनीसाठी ते साक्षात मेंटॉर होते. ‘समाजसुधारक‌’ अशी त्यांची ख्याती होती. विवाहानंतर दहा-बारा दिवसातच कादंबिनी यांनी कोलकता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या पदवीधरही झाल्या. त्यानंतर त्यांनी ग्लासगो आणि एडिनबर्ग विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. त्या भारतातील पहिल्या फिजिशियन तर बनल्याच परंतु आधुनिक वैद्यकात व्यवसाय करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वैद्यक ठरल्या. आठ मुलांची माता बनल्याने त्यांना घरीच अधिक काळ द्यावा लागे. ४० वर्षांचं वैवाहिक जीवन त्यांना लाभलं. त्यांच्या मुलांमधले ज्योतिर्मयी हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय राहिले तर प्रभातचंद्र पत्रकारितेत. त्यांच्या सावत्र कन्येचा विवाह उपेन्द्रकिशोर राय चौधरी यांच्याशी झाला. ते सुविख्यात चित्रपट निर्माते सत्यजित राय यांचे आजोबा. कादंबिनी या तत्कालीन ब्राह्मो समाजात सुधारकाग्रणी महिला म्हणून ओळखल्या गेल्या. १९२३ साली गांगुली यांचं निधन झालं…
एडिनबर्गमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर तत्कालीन पुराणमतवादी बंगाली समाजात त्यांच्यावर सडकून टीका झाली. महिलांच्या अधिकारांसाठी त्या आवाज उठवत राहिल्याने ‘बंगभाषी‌’ नावाच्या बंगाली नियतकालिकाने तर त्यांना वारांगना असेच संबोधले. द्वारकानाथ यांनी त्या मासिकाला आणि त्याच्या संपादकाला कोर्टात खेचल. त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. त्याचे पर्यावसन बंगभाषीचे संपादक महेश पाल यांना सहा महिन्यांसाठी तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात झाले.
मार्च २०२० मध्ये कादंबिनी गांगुली यांच्या जीवनावर आधारलेली प्रथम कादंबिनी नावाची दूरदर्शन मालिका स्टार जलसा या वाहिनीवर सुरू झाली. सोलंकी रॉय आणि हनी बाफना यांनी त्यात मध्यवर्ती भूमिका केल्या होत्या. २०२० मध्ये झी बंगला वाहिनीवर ‘कादंबिनी‌’ नावाची मालिका आली होती. जिच्यात उषसि राय यांनी मध्यवर्ती भूमिका केली होती. कादंबिनी यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली ती गुगलने गुगल डूडलवर त्यांचा १६० वा वाढदिवस साजरा केला तेव्हा. ३ ऑक्टोबर १९२३ रोजी त्यांचे कोलकत्त्यात प्राणोत्क्रमण झाले.

व्यथिता

 

*****

(२) आनंदीबाई गोपाळ जोशी

विदेशात जाऊन वैद्यकाचे शिक्षण घेतलेली पहिली भारतीय महिला.
(३१ मार्च १८६५ – २६ फेब्रुवारी १८८७)
मूळची कल्याणची, पुण्यात जन्मलेली, लग्नानंतर कल्याणमध्ये काही काळ राहिलेली, दगावलेल्या मुलामुळे व्यथित होऊन वैद्यकाचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊन राहिलेली, डॉक्टरीच्या दोन वर्षांच्या शिक्षणाच्या काळात क्षयरोग जडल्याने भारतात परत आल्यावर पुण्यात मृत्युला सामोरी गेलेली आणि अमेरिकेत ज्या कुटुंबाच्या आश्रयाने राहिली त्या कुटुंबाने तिच्या अस्थी मागवून तिचे थडगे आपल्या कुटुंबाच्या खाजगी स्मशानात बांधलेली आणि त्यावर आनंदी जोशी, एक तरुण हदू ब्राह्मणकन्या! परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री असा गौरवपूर्ण उल्लेख झालेली कर्तृत्ववान स्त्री म्हणजेच आनंदीबाई गोपाळ जोशी!
आनंदीबाई जोशी यांचे माहेरचे नाव यमुना. जुन्या कल्याणमधील पारनाका परिसरात राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. पुण्यात आजोळी जन्मलेल्या यमुना गणपतराव जोशींचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कोलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे-बोलणे शिकल्या.
गोपाळराव मुळात कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग आणि कोलकता येथे बदली झाली. त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नीला स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत. याउलट गोपाळराव आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे कळल्यावर ते लोकहितवादींची ‘शतपत्रे‌’ वाचू लागले आणि त्यांनी आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले.
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणासाठी गोपाळरावांनी अमेरिकेत पत्रव्यवहार केला परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची पूर्व अट होती आणि धर्मांतर करणे त्यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया‌’मध्ये प्रवेश मिळाला. तिथे जाण्यापूर्वी तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकता येथे एक भाषण केले. त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची आवश्यकता किती आहे याचे ठोस प्रतिपादन केले आणि वर हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर दोनच वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी. ही पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘हदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र‌’ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनी सुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही मात्र ‘चूल आणि मूल‌’ म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. अमेरिकेत असतानाच आनंदीबाईंची प्रकृती ढासळली. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले.
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९मध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक होते समीर विद्वांस. या चित्रपटाला १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला. आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी तयार केलेल्या डॉक्युड्रामात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोशी यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली. त्या लघुपटालाही महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला तर आनंदी गोपाळ हे नाटक राम जोगळेकर यांनी लिहिले.
******

(३) रखमाबाई राऊत
बालविवाह विरोधी लढा न्यायालयीन मार्गाने जकणारी पहिली भारतीय महिला
(२२ नोव्हेंबर १८६४ – २५ सप्टेंबर १९५५)

आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाई जोशी यांचं निधन कमी वयात झाल्यामुळे त्या डॉक्टरकीची प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत मात्र त्यांच्यानंतर भारतात प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या रखमाबाई राऊत! १८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई जयंतीबाईंचं लग्न चौदाव्या वर्षी झालं आणि पंधराव्या वर्षी रखमाबाईंचा जन्म झाला. सतराव्या वर्षी त्यांची आई विधवा झाली. सात वर्षांनंतर रखमाबाईंच्या आईनं मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर (शल्यविशारद) आणि वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी लग्न केलं. ते स्वतःही उदारमतवादी होते. सावत्र वडिलांमुळेच बहुधा रखमाबाईंना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.
प्रचलित रीतीरिवाजानुसार रखमाबाई लग्नानंतर आपल्या पतीसोबत राहत नव्हत्या. त्या त्यांच्या आई-वडिलांच्या घरीच राहत होत्या. तसेच त्या जे शिक्षण घेत होत्या ते काळाच्या निकषांच्या अगदीच विरुद्ध होतं. रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला. जस्टिस रॉबर्ट हिल पगहे या न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. समाजसुधारणेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल होतं तरीही तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. त्यामुळेच एका अर्थानं इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा केली, असंच म्हटलं पाहिजे कारण सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव घेतलं जात नाही.
रखमा आपल्याबरोबर राहत नाही म्हणून दादाजी भिकाजी यांनी कोर्टात केस दाखल केली. आपली बाजू मांडताना रखमाबाईंनी ‘मला हे लग्न मान्य नाही कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते आणि माझी संमती या लग्नाला नव्हती,’ असा युक्तिवाद केला.१८८४ साली भारतातल्या पहिल्या घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला. ‘मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही‌’, हे रखमाबाईंनी कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला दोन पर्याय दिले. ‘एक तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला जा नाही तर कोर्टाच्या आदेशाचं पालन कर आणि तेही नाही केलंस तर तुरुंगात जा.’ त्यावेळी, ‘या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन,’ असं रखमाबाईंनी कोर्टाला ठणकावलं. रखमाबाईंचा खटला फक्त न्यायालयातच चालला असं नाही तर याची चर्चा वर्तमानपत्रातून सुद्धा झाली. समाजामध्ये बदनामी, टगलटवाळी सुद्धा झाली. अशा परिस्थितीत त्यांना दोष न देता उलट त्यांचे आजोबा आणि आईबाबा त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
लग्नानंतर लवकरच रखमाबाईंच्या लक्षात आले की, त्यांचा पती हा संशयास्पद चारित्र्याचा आणि शिक्षणाविषयी आवड नसणारा आहे. दादाजींच्या उलट रखमाबाई एक बुद्धिमान आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून विकसित होत होत्या. रखमाबाईंना सासरी पाठवायची वेळ येईतो दोन्ही परिवारामधील दरी रुंदावली होती. दादाजींना अनेक व्यसनं जडली होती आणि आई गेल्यानंतर ते मामाच्या घरी राहत होते. मामांवर आर्थिकरित्या पूर्णपणे अवलंबून होते. त्यांना दम्याचा विकार जडला होता. मामांच्या घरचं वातावरण म्हणजे ‘ घरच्या लक्ष्मीवर अत्याचार तर घरात आणून ठेवलेल्या बाईच्या हाती सारी सत्ता‌’ असं होतं. हे सगळं लक्षात घेऊन रखमाबाईंनी दादाजींकडे नांदायला जाण्यास नकार दिला. त्या काळी नवऱ्याने आपल्या बायकोला सोडणं फारच सामान्य बाब होती पण रखमाबाई कदाचित भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी आपल्या नवऱ्याकडे कायदेशीर घटस्फोट मागितला.
समाजातून रखमाबाईंवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. ही टीका करणाऱ्यांमध्ये अग्रणी होते स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा रखमाबाईंना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या संमतीवयाच्या कायद्याला प्रखर विरोध होता. टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रांमधून रखमाबाईंवर कडाडून टीका केली. एके ठिकाणी ते लिहितात, “रखमाबाई, (पंडिता) रमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांना चोर, व्यभिचारी आणि खुनी अशा लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा दिल्या पाहिजेत.” (द मराठा १२ जून १८८७) तरीही रखमाबाईंनी हार मानली नाही. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहिलं. महाराणींनी कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. अखेरीस रखमाबाईंच्या पतीने पैशांच्या बदल्यात खटला मागे घेतला. याच खटल्यानंतर बहुचर्चित ‘एज ऑफ कन्सेंट ॲक्ट १८९१‌’ हा कायदा पास झाला. या कायद्यामुळे मुलींचं लग्नाचं वय १० वरून १२ करण्यात आलं.
या लग्नातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रखमेनं त्यानंतर फिनिक्स भरारी घेतली. रखमेनं आधी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि १८८९ साली London School of Medicine for Women मध्ये तिनं प्रवेश घेतला. १८९४ साली डॉक्टर होऊन ती भारतात परतली. सूरतमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून तिनं भूमिका बजावली. तिनं परत लग्न केलं नाही आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात ती सक्रिय राहिली. त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ. त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई होती. वयाच्या तब्बल ९१ व्या वर्षी डॉ. रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.

– सुधीर जोगळेकर 

पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक मार्च २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा