पेट्रोलपंप चालविण्याची बालपणीची ‘मनीषा‌’ झाली पूर्ण, व्यवस्थापक ते कर्मचारी सर्व महिलाच

संगमेश्वर हे मूळ गाव असलेल्या मनीषा रहाटे यांचे घराणे व्यावसायिक. त्यांनी सिव्हिल इंजिनिअर हे शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यवसायात कंत्राटे घेणे आणि त्यानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेत अभियंता म्हणून स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उमटवला; मात्र घराण्याची व्यावसायिक परंपरा पाहता त्यांचे मन सरकारी नोकरीत रमत नव्हते. याच दरम्यान भारत पेट्रोलियम या कंपनीची मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात खास महिलांसाठी पेट्रोलपंपाची जाहिरात निघाली. ही जाहिरात मनीषा यांचे वडील गणपत रहाटे आणि भाऊ वैभव यांच्या नजरेस पडली आणि त्यांनी मनीषाला ही जाहिरात दाखविल्यानंतर आपल्या मेरीटवर महिलांसाठी राखीव असणारा हा पंप मिळविण्याचा या त्रिकुटाने जणू चंगच बांधला.

कंपनीच्या सर्व अटी आणि शर्तीमध्ये मनीषा या बसल्यामुळे पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आणि त्यांच्यासह रहाटे घराण्याचा आनंद द्विगुणीत झाला. खेड तालुक्यातील निगडे येथे जागेची निश्चिती केल्यानंतर भला मोठा डोंगर बाजूला करण्याचे काम प्रथम हाती घ्यावे लागले. त्या स्वतः अभियंता असल्याने त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन वडील आणि भावाच्या सहकार्याने पेट्रोल पंपासाठी जागेच्या सपाटीकरणाचे काम अल्पावधीतच पूर्ण केले. लोटे येथे गणेश फ्युएल या नावाने पेट्रोलियम व्यवसायात असलेले मनीषा यांचे चुलते सुभाष रहाटे यांनी या व्यवसायातील बारकावे समजावून दिले. मनीषा यांनी काही काळ काकांच्या पंपावर जाऊन कामकाज समजावून घेतले.

 

सप्टेंबर २०१५ मध्ये श्री महालक्ष्मी फ्युएल या नावाने मनीषा रहाटे यांचा प्रत्यक्ष पेट्रोलियम व्यवसाय सुरु झाला. यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, सेल्स अधिकारी, डेपोतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मनीषा यांनी आवर्जून सांगितले. कोणताही व्यवसाय सुरु करणे सोपे असते मात्र तो यशस्वीपणे चालवणे खूपच कठीण असते याची अनुभूती रहाटे घराण्यातील व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मनीषा यांचे आजोबा लक्ष्मणशेठ रहाटे यांना असल्याने त्यांनी आपल्या नातीला शुभारंभाप्रसंगी आशीर्वाद देताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला होता. आजोबांनी दिलेला हा मोलाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवल्याने व्यवसायात आलेल्या अनेक अडचणी आपण दूर करु शकलो असे मनीषा या नम्रपणे नमूद करतात. पेट्रोलपंपाची मालक जर एक तरुण महिला होऊ शकते तर येथील व्यवस्थापक आणि डिलिव्हरीसाठी देखील सुशिक्षित तरुणींना आणून त्यांच्यातही व्यवसायाबाबत धाडस निर्माण करण्याचा धाडसी निर्णय मनीषा यांनी घेतला. बारावी शिकलेली एक मुलगी त्यांच्याकडे घरकाम मिळेल का? असे विचारायला आली होती. तिचे शिक्षण पाहून मनीषा यांनी तिला पंपात काम करण्याची विचारणा केली.

पंपात काम करायचे म्हटल्यावर त्या मुलीवर प्रथम ताण आला हे मनीषा यांनी ओळखले. मनीषा यांनी तिला सर्व समजावून सांगून अनेक यशस्वी महिलांची उदाहरणे दिली. यानंतर त्या मुलीने पेट्रोल पंपात डिझेल-पेट्रोल सोडायला तयारी दाखवली. त्यानंतर पाठोपाठ अशा आणखी दोन सुशिक्षित मुली पेट्रोल पंपात काम करायला तयार झाल्या. आज अंजली तांबट ही पंपाची व्यवस्थापक म्हणून काम पाहतेय तर श्रुती गुरव ही डिझेल-पेट्रोल सोडायचे काम करते. शर्मिला बुरटे ही आणखी एक महिला पंपात मनीषा यांना मदतनीस म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत आहे. विशेष म्हणजे मनीषा यांचा १० वर्षांचा मुलगा गौरांग हा देखील त्यांना पंपाच्या विविध कामात मदत करतो. डेपोतून टँकर भरुन आल्यानंतर तो पंपात उतरुन घेण्यापर्यंतचे काम मनीषा यांनी या मुलींना शिकवले आहे. आलेला माल अचूक आहे की नाही याची पाहणी मात्र स्वतः मनीषा टँकरवर चढून करतात हे विशेष आहे. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या व्यवसायात महिला आली म्हटल्यानंतर सुरुवातीला मनीषा यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र अत्यंत धाडसी स्वभावाच्या मनीषा यांनी शांत डोक्याने आणि समाजात असलेल्या त्यांच्या विशेष स्थानामुळे सर्व अडचणीतून मार्ग काढला. वडील गणपत रहाटे यांच्याकडून मनीषा यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळत असते.
पेट्रोलियम व्यवसाय म्हणजे ट्रकचालक आणि अन्य वाहनचालकांशी सततचा संपर्क येतो.

हळवा कोपरा

 

अशा स्थितीत कधी बहीण तर कधी दुर्गा बनत मनीषा यांनी आपल्या व्यवसायातील कौशल्यातून महाराष्ट्रासह राजस्थान, कलकत्ता, हरियाणा, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तरप्रदेश आदी राज्यातील ट्रकचालक, मालक आणि ट्रान्सपोर्ट कंपन्या यांच्याशी स्नेहाचे नाते जोडून आपला व्यवसाय वाढविला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मनीषा यांना सर्व प्रकारची वाहने चालवता येतात. निगडे, बोरज, आवाशी, लोटे, चिपळूण, खेड आदी ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मनीषा यांना त्यांच्या या वेगळ्या कर्तृत्वाबद्दल खेड जेसीज या संस्थेने ‘अबोली‌’ हा पुरस्कार देऊन एप्रिल २०१८ मध्ये गोवा येथे सन्मानित केले. तसेच रत्नागिरी आकाशवाणीने मनीषा यांची विशेष मुलाखत घेऊन त्यांचे व्यावसायिक विचार अन्य महिलांपर्यंत पोहचवले. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्राहक संरक्षण समितीवर सदस्य म्हणून मनीषा या काम करत आहेत. या व्यवसायात आणखी महिलांनी यावे, त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे मनिषा रहाटे यांनी नमूद केले आहे.

– जे. डी. पराडकर

९८९००८६०८६

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा