भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता. मी आणि माझा नातू भारत सामना पाहण्यासाठी कारमध्ये बसून निघालो. भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती.
मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहर्यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून लक्ष वेधून घेत होते.
भारत, झेंडा घ्यायचा ना?
आजोबा, नाही हो. सुरक्षा रक्षक काठीसह ध्वज आत नेऊ देत नाहीत. काठी काढून घेतात. आजोबा, काठी नसलेला ध्वज नेणे मला आवडत नाही. दोन्ही हातात धरून ध्वज जास्त उंचावर नेता येत नाही. आमचे गुरुजी सांगतात की, तिरंगा हा आपल्यापेक्षा उंच असायला पाहिजे. आपण किती वेळ हात उंच धरणार ना? हाताला कळ लागली की, आपण हात खाली घेणार म्हणजे त्यावेळी हातातील ध्वजही खाली येणारच ना म्हणून मी ध्वज घेणार नाही… भारत सांगत असताना आम्ही स्टेडियममध्ये पोहोचलो. दक्षिण आफ्रिकेचा एक बळी घेऊन भारतीय विजयाच्या दिशेने दौडत होते. आम्ही आसनांवर जाऊन बसलो. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. बहुतेक प्रेक्षकांनी तीन रंगांनी चेहरे रंगवून घेतले होते. हातातील ध्वज उंचच उंच नेत होते. टाळ्या, आरडाओरडा सुरु असताना अचानक भारत म्हणाला,
आजोबा, तो माणूस चक्क झेंडा डोक्यावर घेऊन बसला आहे…
भारत, अरे, ऊन किती लागतंय ते बघतोस ना?… मी बोलत असताना भारत म्हणाला,
मग काय ध्वज गुंडाळून डोक्यावर घ्यायचा? आजोबा, हे बरोबर नाही… त्वेषाने बोलत असताना भारत त्या माणसाचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी ’ओ..ओ..शुक्… शुक मामा, अहो, मामा …’ असे ओरडत होता परंतु प्रेक्षकांच्या गोंधळात भारतचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळे भारत अस्वस्थ होत होता. मी काही बोलणार त्यापूर्वीच भारत आमच्या बाजूच्या स्टँडमधील एका माणसाकडे बोट दाखवत म्हणाला,
बघा. तो माणूस बघा. तो तर झेंड्याने चक्क घाम पुसतोय हो. आजोबा, कुणीही त्याला अडवत नाही हो. तसे करु नकोस म्हणून सांगत नाही हो. आजोबा, तुम्ही सांगा ना त्याला…
भारत, तुझे बरोबर आहे. तुझी तळमळ योग्य आहे. पण आपण काय करू शकतो? आपले कुणी ऐकणार नाही. उलट आपल्यालाच भांडतील… मला मध्येच थांबवून भारत आमच्यापुढे असलेल्या एका रांगेत बसलेल्या एका व्यक्तिकडे बोट दाखवून संतापाने म्हणाला, बघा. तो माणूस झेंडा कसा फडकावतोय ते बघा …मी त्या दिशेने पाहिले. आफ्रिकेचा एक गडी बाद झाल्यामुळे आनंदाने बेहोश झालेला एक माणूस उड्या मारत ध्वज उंच नेत होता परंतु बेभान झालेल्या अवस्थेत आपण ध्वज उलटा फडकावतोय हे त्याच्या गावीही नव्हते. इकडे भारतची तळमळ आता संतापात बदलली होती. सर्वत्र फार मोठा जल्लोष सुरू होता. आनंदाचे भरते आले होते. तो माणुसही जोराजोरात उड्या मारत ध्वज उंच नेत होता. सर्वत्र फिरवत होता तरीही त्याच्या लक्षात त्याची चूक येत नव्हती. भारतची अस्वस्थता पाहून माझेही सामन्याकडे लक्ष लागत नव्हते. अनेकजण अंगावर ध्वज पांघरून बसले होते तर काही प्रेक्षकांनी ध्वज डोक्याला गुंडाळला होता. राष्ट्रीय ध्वजासोबत तशी वागणूक ही मनाला पटणारी नव्हती.
मला काहीही न बोलता भारत त्या माणसाच्या दिशेने निघाला. मीही त्याच्या मागोमाग निघालो. त्या माणसासमोर उभे राहून भारत जोराने ओरडला,
भारतमाता की…जय!… त्याच माणसाने नव्हे तर इतर माणसांनी विशेषतः भारतच्या वयाच्या मुलांनी आणि तरुणांनी भारतला जोरदार साथ दिली. तसा भारत त्या माणसाला म्हणाला,
दादा, तुमच्या हातातील ध्वज बघा ना…
काय झाले? असे विचारत त्या तरुणाने झटकन ध्वज खाली घेतला आणि त्याची चूक त्याच्या लक्षात आली. दुसर्या क्षणी तो ओशाळला, खजील झाला. अपराधीपणाची जाणीव त्याच्या चेहर्यावर स्पष्टपणे जाणवत असताना ध्वज व्यवस्थित घेत त्याने जोरदार घोषणा दिली,
भारत माता की…
जय!.. असे म्हणत सर्वांनी त्याला जोरदार साथ दिली…
– नागेश शेवाळकर
पूर्वप्रसिद्धी – लाडोबा मासिक जाने. २०२४