‘चपराक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेला, बालकांना मोहिनी घालणारा दिवाळी अंक म्हणजे लाडोबा! चपराक प्रकाशन, पुणे यांची अतिशय आकर्षक अशी ही निर्मिती! लाडोबा ह्या अंकात घराघरातील लाडोबांना साहित्याची नाविन्यपूर्ण मेजवानी संपादक घनश्याम पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे लाडोबा लाडक्या वाचकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!
लाडोबा हे नाव उच्चारताच एक मधाळ, हसरं, खोडकर नि खेळकर असं एक चित्र पटकन डोळ्यासमोर येते. बहुतांश बालकांना लहानपणी या नावाने लाडाने बोलावलेले असते. त्यामुळे ह्या नावाशी एक प्रकारे नाळ जोडलेली असते.
बोलकं मुखपृष्ठ रेखाटलं आहे, सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी! लाडोबाला आवडतो चांदोबा. काही महिन्यांपूर्वी चांद्रयान थेट चंद्रावर पोहोचल्यामुळे चंद्र अत्यंत जवळ आला की काय असे वाटून लाडोबांना चंद्रावर जायचे वेध लागले असून एका बालकाने आपल्या बहिणीला चंद्रावर जाण्याची इच्छा बोलून दाखवली असणार. आजची बाल पिढी किती हुशार, चोखंदळ आणि कल्पक आहे हे या मुखपृष्ठातून लक्षात येते. भावाची इच्छा पाहून बहीण एक गोलाकार रांगोळी अर्थात चंद्र काढते. पण चंद्रावर जाण्यासाठी यान हवे हे लक्षात येताच ते बालक सायकल घेऊन येते आणि मग बहिणीने काढलेल्या चंद्रावर सायकल घेऊन उतरतो. मुखपृष्ठ दिसायला अगदी साधेसुधे असले तरीही त्यातील बालकांची कल्पकता लक्षात घेता चित्रकार संतोष घोंगडे यांना सलाम ठोकायला हवा. त्याचबरोबर आतील कथांना सुबक, आशय युक्त चित्रं देणारे मयुरी देवाळकर, प्रकाश पारखे आणि सुहास जगताप ह्यांचेही कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मयुरी मालुसरे यांनी केलेली अंतर्गत सजावट लक्षणीय आहे.गुळगुळीत, रंगीत पाने, त्यावर शोभतील आणि सहजपणे वाचता येईल असा अक्षरांचा आकार यासाठी दक्षतेने लक्ष देणारे संपादक मंडळ ह्या सर्वांच्या एकत्रित परिश्रमाचा आविष्कार म्हणजे लाडोबा दिवाळी अंक २०२३.
अंतरंगातील अनुक्रमणिका म्हणजे बालकांसाठी असणारी मेजवानी! ही मेजवानी देणाऱ्या लेखक आणि कवींची नामावली पाहिली की, व्वाह! कित्ती छान! असे उद्गार बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत.
‘चैतन्य चूर्ण’ ही पहिलीच कथा नव्वदीच्या घरात असलेल्या परंतु मनाने बालक असलेल्या ज्येष्ठ बालसाहित्यिक न.म. जोशी यांची आहे. कारण बालकांसाठी लिहिताना मुल होऊन लिहावे लागते. घरातील बालकाच्या हुशारीला, चतुराईला नि कल्पकतेला संधी दिली, पाठिंबा दिला की तो कसा यशोशिखरावर जातो ह्याचे सुंदर वर्णन या कथेत वाचायला मिळते.
दिवाळी म्हटलं की, बालकांना फराळ, कपडे यासोबत आकर्षण असते ते फटाक्यांचे! बालकांची ही आवड घेऊन खास बालांसाठी आश्लेषा महाजन घेऊन आल्या आहेत फुलबाज्या अर्थात कथा आहे, ‘फुलबाज्यांचा राजा’! या वाचनीय कथेचा नायक तेजसला दिवाळीत फुलबाज्या उडवताना एक आयडिया सुचली… फुलबाज्यांचा राजा होण्याची! ही त्याची कल्पना प्रत्यक्षात उतरली का? तेजसला ‘फुलबाज्यांचा राजा’ हे नाव का मिळाले यासाठी प्रत्येकाने कथा वाचायलाच हवी.
आपल्याकडे लहान असल्यापासून ते अगदी मोठ्या पदावर पोहोचले तरीही अनेकांना टोपणनाव असते. अनेक लेखकांना ही असे टोपणनावे आहेत. बालसाहित्यातील एक ठळक नाव म्हणजे आबा महाजन! बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते आबांनी त्यांच्या टोपणनावांचा इतिहास रंजकतेने बालकांसमोर मांडला आहे तो ‘टोपणनाव’ या कथेत! हा इतिहास सांगताना त्यांनी बालपणीच्या मजेशीर आठवणीही सांगून कथा रंगवली आहे.
नामवंत शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे ह्यांची ‘… आणि सुमित वाचू लागला…’ ह्या कथेची भट्टी मस्त जमली आहे. शालेय जीवनात अवांतर वाचनाचे महत्त्व साध्या, सोप्या भाषेत पटवून देण्याची वाकचौरे ह्यांची हातोटी प्रशंसनीय आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके शिकून आणि वाचून मुले हुशार होतील परंतु ती चौकस, अष्टावधानी होणार नाहीत त्यासाठी पूरक वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे हे बालकांच्या अगोदर पालकांना समजायला हवे त्यामुळे ही कथा पालकांनी वाचायलाच पाहिजे.
प्रा. बी.एन. चौधरी यांची ‘प्रणवचे मातृप्रेम’ ही कथा आगळेवेगळे कथाबीज घेऊन आली आहे. कथेचा नायक प्रणव चौदा वर्षांचा हुशार, गरीब मुलगा आहे. त्याचे आईवडील रोजमजुरी करणारे असतात. त्याच्या वस्तीत पाण्याचे दुर्भिक्ष असते. मजुरी करून आल्यावर प्रणवच्या आईला लांब जाऊन पाणी आणावे लागते. प्रणवने श्यामची आई यातील गोष्टी वाचलेल्या असतात. शामप्रमाणे आपणही आईला मदत करावी हा विचार त्याच्या मनात शिरतो आणि त्याला पाण्यासाठी होणारी आईची भटकंती आठवते. तो एक धाडसी निर्णय घेतो तो म्हणजे अंगणात विहीर खोदण्याचा! बाप रे! किती अवघड कार्य होते हे पण प्रणवने तो विचार अंमलात आणायला सुरुवात केली. त्याचा विचार पूर्णत्वास गेला का? विहिरीला पाणी लागले का अशा प्रश्नांची उत्तरे आपणास कथेच्या शेवटी निश्चितच मिळतील.
भूत म्हटलं की, आबालवृद्धांच्या अंगावर भीतीचा काटा येतो. पण जर कुणी सांगितलं की, भूत डायरी लिहिते तर विश्वास बसणार नाही परंतु अशा डायरीतील काही पाने बालवाचकांसाठी घेऊन आले आहेत… फारूक एस. काझी हे ख्यातकीर्त लेखक!
औषध म्हटलं की, काही बालकं चक्क रडायला लागतात तर काही मोठी माणसं नाक मुरडतात. औषध त्यात ते कडू असले की मग प्रत्येकालाच घेणे जीवावर येते. परंतु औषध कडू असले तरी लवकर गुण आणणारे असते हे सांगणारी हर्षल कोठावदे ह्यांची कथा निश्चितच रामबाण औषधासारखी आहे. राम आणि शाम या दोघा मित्रांच्या परस्पर भिन्न स्वभावाच्या माध्यमातून अति लाड किंवा फास्टफुडमुळे होणारे दुष्परिणाम परिणामकारकपणे मांडले आहेत.
‘अनुभवले की कळतेच…’ ही जनार्दन देवरे ह्यांची कथा झाडं- वेलींना होणाऱ्या वेदना सांगणारी आहे. संयुक्ता कुलकर्णी ह्यांची ‘मुकी मैत्री’ ही कथा वेगळ्या धाटणीची आहे.
‘बुद्धिचा वापर’ ह्या कथेत डॉ. पूजा देखणे ह्यांनी बुद्धिचा वापर न करता, सारासार विचार न करता केलेल्या कामात कशी चूक होते हे सहजपणे सांगितले आहे.
वंदना गांगुर्डे यांनी लिहिलेली ‘आळशी रामू’ ही कथा खूप छान संदेश देते. ‘दे रे हरी पलंगावरी’ अशा विचारसरणीने शरीरात जो आळस शिरतो त्यामुळे होणारे नुकसान लेखिकेने बिंबवले आहे.
ख्यातनाम लेखक, विचारवंत श्री संजय सोनवणी ह्यांची ‘लीलेचा दुष्ट शक्तिंशी लढा’ ही दीर्घ कथा वाचनीय नि वेगळा संदेश देणारी आहे.
अस्मिता पगडे- मांगरे ह्यांनी ‘दिवाळी सण मोठा’ या कथेतील सायली ही कथानायिका दिवाळी पाठोपाठ येणारे तुळशीचे लग्न कशा अभिनव पद्धतीने लावते ते अत्यंत सुंदर रीतीने लिहिले आहे.
उत्तमोत्तम बालसाहित्य, कथा संग्रह , कविता, गाणी इ. घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा
लेखक, कलाकार, शिक्षक अशा विविध भूमिकेतून विद्यार्थ्यांचे लाडके, आवडते असलेले राउकाका अर्थात राजेंद्र उगले ह्यांची वाईट मित्राशी मैत्री केल्यास कशी फजिती होते ह्याचे हृदयस्पर्शी वर्णन ‘असंगाशी संग, प्राणाशी गाठ’ या कथेत केले आहे.
अर्चना शिरसाठ, आजीबाईची पूजा ह्या कथा वेगळ्या आहेत. गटशिक्षणाधिकारी पदावर असूनही विद्यार्थी हे माझे दैवत याप्रमाणे आचरण असलेले रवींद्र खंदारे ह्यांनी ‘जादूमय पहाट’ या कथेतून बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आहे. त्या गोष्टी आत्मसात करणारे विद्यार्थी हमखास जीवनाचा खराखुरा आनंद लुटू शकतील.
राजेंद्र सोमवंशी यांनी लिहिलेल्या आणि चपराक प्रकाशनाने दर्जेदार स्वरूपात प्रकाशित केलेल्या ‘गीत नवे गाऊ’ या विद्यार्थीप्रिय पुस्तकाचा ओघवत्या शैलीत वि.दा.व्यवहारे यांनी करून दिलेला परिचय संग्रहाला वेगळ्या उंचीवर नेणारा आहे.
आईची महती, तिचे वात्सल्य अधोरेखित करणारी लाडोबा दिवाळी अंकातील शशिकांत शिंदे ह्यांची कथा ‘वात्सल्याची नदी’ वेगळ्या आशयाची आहे.
संजय गोराडे ह्यांची ‘श्वास’ ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनांना ओलावा प्राप्त करून देणारी आहे.
या अंंकाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ‘श्री शिवाजी महाराजांवर’ एक नाही, दोन नाही तर चक्क दहा पुस्तके लिहिण्याचा संकल्प सोडणाऱ्या लेखकाचे नाव आहे… मानस पोतदार! वय फक्त चौदा वर्षे! मानसच्या या निश्चयाची माहिती दिली आहे पराग पोतदार ह्यांनी!
कथांशिवाय नामवंत बालकवींची उपस्थिती ही बालवाचकांसाठी एक पर्वणीच आहे. याशिवाय पानोपानी बाल चित्रकारांनी चितारलेली चित्रे आकर्षक आहेत. कदाचित याच बालचित्रकारांमध्ये उद्याचे महत्त्वाचे चित्रकार दडलेले असतील. त्यांना चपराक सारखे सशक्त व्यासपीठ मिळणे नशिबात असावे लागते. इतर बरीच माहिती वाचनीय, अनुकरणीय,मार्गदर्शक अशी आहे.
वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण विषयावरील लाडोबांना दिलेली साहित्य मेजवानी बालक- पालक ह्यांना निश्चितच आवडेल.
००००
नागेश शेवाळकर पुणे
(९४२३१३९०७१)
शेवाळकर सर लाडोबाबद्दल अतिशय विस्तृत प्रतिक्रिया देऊन आपण वाचणाऱ्याची उत्सुकता चाळवली आहे. लिखाणातील नेमकेपणा फार भावला. हार्दिक शुभेच्छा सर.
शशिकांत शिंदे
9860909179