ज्याला आय नाय त्याला काय नाय | आई – द. गो. शिर्के

Share this post on:

ज्यांना आई नाही असे ज्येष्ठ लोक आई असलेल्या त्यांच्या स्नेह्यासोबत्याकडे पाहून नेहमी हळहळतात. आपलं यश बघायला आई हवी होती, अपयशाच्यावेळी विश्वासाने डोकं टेकवायला आई हवी होती, आपल्या आजाराच्या यातनापर्वात दिलासा द्यायला आई हवी होती असं बहुतेक सर्वांना वाटतं. माणसाचं वय, पद, कितीही वाढलं तरी ती ओझी झुगारून द्यायला प्रत्येकाला एक जागा हवी असते. ती फक्त आईच देऊ शकते.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

आई हे कित्येकदा घराचे प्रतीक बनते. वयानुषंगाने जरी ती कशातही भाग घेऊ शकत नसली तरी आई असते तोवर घराचं घरपण टिकतं. पारंपरिक रीतीरिवाज टिकतात. आई आहे म्हणून घरात सणवार केले जातात. गौरी गणपती येतात. चैत्रपाडव्याची गुढी उभारली जाते. अशा प्रसंगी इतरत्र पांगलेले लोक, नातेवाईक घरात गोळा होतात. भेटीगाठी होतात, नातेसंबंधाना उजाळा मिळतो. आई कितीही वृद्ध झाली, जागीच खिळली तरी अशा माहेरपणाचा लाभ मुली घेत असतात.
माहेर हा शब्द प्रत्येक मुलीच्या हृदयात कोरला जातो तो मायेच्या धाग्यांनी. जिथं आपला जन्म आईने आपल्या रक्तामासाचं शिंपण घालून साजरा केला ते माहेर… बाबांनी कायम सुरक्षिततेची ऊब दिली ते माहेर… भावांनी लाडक्या बहिणीचं मन रमवलं ते माहेर… सासर कितीही आपल्या हक्काचं असलं तरी माहेरचे पाश तुटता तुटत नाहीत. माहेरच्या मखमली आठवणींचा खजिना घेऊन प्रत्येक मुलगी सासरी जाण्याची स्वप्ने बघते; पण आई वारली की आपला माहेरपणाचा हक्क संपला असं मानून त्या तिथं तितक्या मोकळेपणाने जात नाहीत असं सर्वत्र दिसतं. आई संपली की माहेर संपतं.
आई नसलेल्या घरात बसवत नाही. परदेशात गेलेली अनेक मुले आई हयात असेपर्यंत नियमितपणे ठराविक अंतराने मायदेशी येत असतात. आई नाहीशी झाली की, ‘कोणासाठी एवढे धडपडत जायचे भारतात?’ या प्रश्नावर ते अडखळतात. भारतातली वृद्ध, जर्जर आई त्यांच्यासाठी फार काही करू शकत नाही. फार उत्कट संवाद आई साधू शकत नसते पण तिचं असणं हाच काहीवेळा संवाद असतो व्यक्तीचा आपल्या बालपणाशी! आपल्या भूतकाळाशी! आपल्या विस्तारित कुटुंबाशी!!
आई गेल्यावर हा संवाद कायमचा खुंटतो.
स्पर्धेतील एखादं छोटंसं भाषण करायला लहान, शाळकरी मूल व्यासपीठावर चढतं. सभागृह पूर्ण भरलेलं असतं. मुलाची व्याख्यानाची पूर्ण तयारी झालेली असते. खूपदा आईनेच ती करून घेतलेली असते! पण मूल एकदम घडाघडा बोलायला लागत नाही. ते सभागृहाच्या गर्दीत नजरेनं आईला शोधतं. दोघांची नजरभेट होते. ‘तू बोल बिनधास्त. मी आहे ना? तुझं भाषण छानच होईल. माझी खात्री आहे…’ एवढा सगळा संवाद आईची पापणी लवण्याच्या आत होतो. मूल उत्तम प्रकारे भाषण करून जातं. आई शब्दाविना मुलाला दटावू शकते. त्याच्यावर वचक ठेवू शकते. आईच्या डोळ्यात बघून खोटं बोलणं बहुतेकांना जमत नाही. आईच्या अदृश्य धाकापासून काही व्यक्ती गैरमार्गाला जाण्यापासून रोखल्या जातात. आईला वाईट वाटू नये, कमीपणा येऊ नये म्हणून कित्येक मुलं आपल्या परीने चांगल्या गोष्टी करायला उद्युक्त होतात. आईच्या डोळ्यातला आनंद त्यांना प्रेरक ठरतो.
आई मुलाच्या शारीरिक गरजा भागवते हे खरं आहे; पण त्याहून जास्त प्रमाणात ती त्याच्या मानसिक गरजा भागवते. आई मुलांची अभिरुची घडवते. आई मुलाचा कल ओळखते आणि त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देते. शिवरायांच्या माँसाहेब जिजाऊ ह्याही त्यास अपवाद नाहीत. शिवाजीच्या जन्मानंतर वर्षभर शहाजीराजे दूर कर्नाटकात मुलुखगिरी करत होते. नंतरही अनेकदा मोहिमांवर ते असत; पण त्यामुळे जिजाऊंच्या बालसंगोपनावर कोणताही परिणाम झाला नाही. त्या नेहमीच चांगल्या मातृत्वाच्या प्रतीक ठरल्या.
अनेक लेखक, कवी आपली पहिली पुस्तके आईला अर्पण करतात. गाण्याच्या स्पर्धामधले गायक आपली महत्त्वाची गाणी आईला समर्पित करतात. काहीजण स्वतःला मिळालेले मानाचे पुरस्कार आईला समर्पित करतात. गरिबीतून, कष्टातून वर आलेली अनेक माणसे स्वतःच्या पहिल्या वास्तूला ‘मातृस्मृती’ असं नाव ठेवतात. आपण देणगी दिलेल्या शाळेला-कॉलेजला आपल्या आईचे नाव देणे भाग पाडणे, आपल्या उद्योगाला, उत्पादनाला आईचे नाव देणे, आईच्या नावे पुरस्कार जाहीर करणे आईच्या नावाचा सेवाभावी ट्रस्ट स्थापन करणे अशा अनेक प्रकारांनी लोक आपल्या आईविषयी वाटणारा आदरभाव व्यक्त करतात.
आई इतकाच आईच्या दुधाचाही गौरव होतो. कारण व्यक्तीला ते मिळाले म्हणजे आई मिळालेली असण्याची खात्री. ते जीवनामृत, त्याची शक्ती जन्मभर पुरणारी! म्हणून त्याला सदैव जपायचं, जोपासायचं!!
दळण दळीते जसं हरीण पळतं
माऊली बाईचे दूध मनगटी खेळतं
असं स्त्रीगीतात गौरवायचं आणि भांडणातही ‘मी काही मेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही’ म्हणून समोरच्याला सज्जड दम भरायचा. भांडणात शिवीगाळ करताना बाकी काही बोललं तरी चालवून घ्यायचं पण आईवरून शिव्या दिल्या तर क्षमा नाही. आईमाईचा उद्धार म्हणजे सर्वात जिव्हारी लागणारी गोष्ट.
आईला सांभाळायला नकार देणारी, तिचा पैसा किंवा घर हडप करणारी, तिला लुबाडणारी, आईची फसवणूक करून तिला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवणारी मुलंही या समाजात आहेत. वृद्धाश्रमातून वारंवार निरोप येऊनही आजारी आईला भेटायला न जाणारी मुलं फक्त कथा कादंबर्‍यामधेच नसतात तर वास्तवातही असतात. आईला अंध-अपंग अवस्थेत सोडून बेपत्ता होणारे, आईचा खून करणारे महाभागही निघतात.
मूल कितीही चुकलं, प्रमादशील राहिलं तरी आई उदार मनानं त्याला क्षमा करते. ‘पुत्राचे सहस्र अपराध, माता मानी काय तयाचा खेद?’ असं व्यंकटेशस्तोत्रात म्हटलेलं आहे. आज माझं मूल वाट चुकलंय पण कशावरून ते पुन्हा वाटेवर येणार नाही? कशावरून त्याला सुबुद्धी सुचणार नाही? तेव्हा त्याला आणखी एक संधी दिली पाहिजे असं आई मानते. इतर बहुतेक नात्यांमध्ये नसलेली पुढची वेळ, सुधारण्याची संधी ही फक्त आईमध्ये असते. तिचा मुलावर विश्वास असतो कारण तिचा स्वतः केलेल्या संस्कारांवर विश्वास असतो.
आईमुळे नाती वाढीला लागतात पण एरवी आई नसलेलं घर विस्कळीत, केविलवाणं होतं. त्याची छाया त्यातल्या मुलावर पडल्याशिवाय राहत नाही. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच परिसरात, एकाच पद्धतीने वाढलेली दोन-तीन भावंडे सर्वात जवळची असायला हवीत! पण त्यांच्यात स्पर्धा, मत्सर, हेवादावा माजतो. कुटुंबाची शकले होतात. याबाबत आई अमूल्य योगदान देऊ शकते.
आई आपल्या दोनतीन मुलांचे भावबंध घट्ट राहतील याची काळजी घेते. ही मुलं एकाच आईची असली तरी सारख्या गुणवत्तेची नसतात. सारख्या नशिबाची नसतात. ह्यांच्यापैकी एक मूल अनेक बाबतीत सरस असतं. एखादं जरा डावं, दुबळं असतं. एखाद्याला आपल्या कुवतीच्या मानानं खूप यश आयुष्यात मिळून जातं. एखाद्याला छोट्या यशासाठी सुद्धा आयुष्यभर झगडावं लागतं. आईला ते दिसत असतं. ती त्या कमी नशिबाच्या मुलाचं नशीब बदलू शकत नाही पण त्याच्यासाठी इतर भावंडाकडून त्याची अवहेलना होणार नाही हे बघते. आपली मुलं आपापसात स्नेहभावाने, खेळीमेळीने राहतील हे बघते.
आई आणि अपत्याचं नातं जसं कोवळं असतं तसंच ते कर्तव्यकठोरही असतं. हे नातं जसं वत्सल असतं तसंच ते विवेकीही असतं. हे नातं जितकं आनंददायी असतं तितकंच ते आश्वासकही असतं. इतकं निकोप, निरपेक्ष, निरामय आणि निर्मळ नातं इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही. त्या मानानं आपल्या आयुष्यात नंतर येणारी सारी नाती आईशी असलेल्या आपल्या नात्याच्या प्रकाशातच आपण पाहत असतो. म्हणूनच आपलं आयुष्य म्हणजे नात्यांचा सुंदर पिसाराच असतो असं म्हणता येईल. मूळ वेद वाङमयात स्त्रीचं महत्त्व प्रतिपादन करताना ‘यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता:’ असं म्हटलेलं आहे. वेदामध्ये आदिती ही प्रमुख माता आहे. तिला ‘देवमाता’ असंही म्हटलं जातं. ती संपूर्ण विश्वाची जननी आहे. निसर्गानं स्त्री आणि पुरुष जन्माला घातले आणि या दोघांनी नात्याला जन्म दिला. पुरुषापेक्षा स्त्रीला निसर्ग अधिक महत्त्व देतो कारण ती नात्याच्या साखळीची प्रमुख कडी आहे. मानवी रक्ताच्या नात्यातील आदिम नाते म्हणजे आईचे.
जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपल्या जन्माबरोबरच तीन नाती सोबतीला घेऊन येतो. जन्म देणार्‍या आणि आपल्या जीवनाला सक्षमपणे उभे करणार्‍या पित्याचे एक नाते असते. जग आणि जीवन दाखविणार्‍या तसेच आपल्या जन्माचे, जीवनाचे भरणपोषण, संगोपन, संरक्षण, संवर्धन करणार्‍या मातेच्या रूपाने अस्तित्वात येणारे दुसरे नाते असते आणि कालांतराने स्वतःलाच हळूहळू जाणवत गेलेले, स्वतःचे स्वतःशीच असणारे नाते हे तिसरे नाते होय.
आधीच्या दोन नात्यांमुळे जीवनाची आणि जगाची आपणाला ओळख होते. त्यातही आपले आपल्या आईशी असणारे नाते अतिशय अतूट, अनिवार्य आणि अविभाज्य स्वरूपाचे असते. एखाद्या फुललेल्या फुलापासून जसा त्याचा रंग आणि गंध वेगळा करता येत नाही त्याप्रकारचं हे नातं असतं. आईपासून वेगळं होताना त्याची नाळ तोडली जात असली तरी ती खर्‍या अर्थानं कधीच तोडली जात नाही. आपलं आपल्या आईशी असलेलं नातं कमालीचं गुंतागुंतीचं असतं. त्यात वय, शिक्षण, पद यांचं बंधनच नसतं. हे नातं शब्दांच्या पलीकडचं असतं.
आई आपल्या बाळाचं रक्षण, पोषण करते. त्याच्या जीवनाला विविध प्रकारचे कष्ट सोसून आकार देण्याचा प्रयत्न करते. आपण स्वतः उपाशी राहून त्याला घास भरवते. अशा काही तपशीलावरून कवी प्रत्यक्ष अनुभव आणि मनातली स्वप्ने यांची सरमिसळ करून एक मातृप्रतिमा तयार करतो. अशा मातृप्रतिमा आपल्याला लोकगीतांमधून पहायला मिळतात. ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ असे म्हणणार्‍या बहिणाबाई मातृप्रतिमाच व्यक्त करतात. पुरातन काळापासून स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना ओवीचा वापर करून जात्यावर दळताना प्रकट करीत असत.
या ओव्या नेमक्या कोणी रचलेल्या आहेत हे ज्ञात नसते. त्या ओव्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असतात. काही ओव्यांमधून मातृभाव किंवा मातृ-पितृसेवेचे पुण्य व्यक्त होते. उदा…
काशी काशी करता, काशीचे लोक येडे
मायेच्या पाया पडे, काशीचे पुण्य घडे।
म्हणजे काशीचे पुण्य आणि मातृसेवा या दोघांचे मूल्य समानच आहे.
थोर विचारवंतांना असे वाटते की,  आपल्याला देवाचे अस्तित्व कधीच जाणवले नसते. म्हणूनच कदाचित ते अस्तित्व दाखविण्यासाठी देवाने आईला घडवले आहे. माणसाचे जगणेच मुळात नात्यांनी बांधलेले आहे. निर्मितीचे आदिकारण म्हणजे जननी. ही जन्मदात्री गर्भामध्ये अपत्याचे पोषण करते आणि जन्मानंतरही त्यांचे पोषण, रक्षण करते. सर्जन, रक्षण आणि पोषण ही तीनही कार्ये करणारी ती जननी.
आईशी कितीही मतभेद झाले तरी आईच्या नजरेत पाहून आपण खोटं बोलू शकत नाही. आपल्या सुखी संसाराचा बहर आपल्या आईनं पहावा असं प्रत्येकाला वाटतं.
पडो माझ्या संसारात, माझ्या मायेचे पाऊल
माझ्या सुखसर्वस्वाची, तिला येऊ दे चाहूल॥
अशा शब्दात कवयित्री संजीवनी मराठे यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
आई हा दयेचा अफाट सागर आहे. मुलाला झालेल्या जखमेच्या वेदना तिला होतात. लहान वयात मुलाचे मन कोर्‍या कागदासारखं असतं. धर्म, देव त्याला ठाऊक नसतात. म्हणूनच त्याच्या मनावर प्रतिमा उमटते ती त्याच्या आईची. दुखलं खुपलं की त्याच्या मुखातून उद्गार येतात, आई!  भूक लागली की आई, तहान लागली की आई. आई हेच त्याचं परमदैवत असतं.
मातेचं सर्वव्यापी रूप हे महन्मंगल आहे हे मात्र खरं. जगाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत केवळ मानवी जीवनच नाही तर सर्व प्राणीमात्रातही व्यापलेली आणि अढळ राहणारी अशी ही मातृभावना आहे. म्हणूनच ती अनादी आणि अनंत आहे.
पैसा, सत्ता असली की, सारं काही मिळतं पण मिळत नाही ती फक्त आई आणि आईची माया. म्हणूनच म्हणतात ‘ज्याला आय नायत्याला काय नाय!’
आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून, आपल्या वर्तनातून आई मुलाला अनेक संदेश पोहचवत असते आणि त्याला चांगला माणूस बनायला उद्युक्त करत असते. आईविना वाढलेली, आपली आई कोण हेही माहीत नसलेली काही मुले पुढे स्वकर्तृत्वावर नावारूपाला आलेली आहेत असंही दिसतं. तर रक्ताचं पाणी करून वाढवलेली मुलंही भरकटल्याचं दिसतं. वाईट मित्रांची संगत, व्यसन अशीही कारणं त्याला असू शकतील. कण्वऋषींनी शकुंतलेला सासरी जाताना केलेला उपदेश हा आईनं लेकीला केलेल्या उपदेशासारखाच आहे. तिथे कण्वऋषीमधील मातृत्व उफाळून आलेलं दिसतं. ‘माझी कन्या’ या कवितेतून ‘गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या’ अशी मुलीची आर्जवं करणारे कवी बी यांच्या मनाची अवस्था कण्वमुनीसारखीच झालेली दिसते.

 

आई

 

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!