८ मार्च हा महिला दिन म्हणुन साजरा होतो. जागतिक पातळीवर स्त्रिया हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजऱ्या करताना हल्ली दिसतात.
महिलादिन साजरा का करतात? या पाठीमागील कारण काय? ८ मार्चलाच हा दिवस का साजरा केला जातो? याचा इतिहास काय? असे अनेक प्रश्न आहेत! काही जणांना हे प्रश्न पडतात तर बर्याच जणांना हे प्रश्न पडत नाहीत. ज्यांना हा प्रश्न पडतो त्यातील काहीच लोकं यामागील कार्यकारण भाव माहित करुन घेण्याचा प्रयत्न करतात तर काही करतही नाहीत. म्हणजेच समाजातील बहुसंख्यांना याबद्दल काहीही माहीती नसते,केवळ सगळे उत्सव साजरा करतात म्हणुन आपण करायचे असे असते. म्हणुनच यामागील कार्यकारण भाव आपण जाणुन घेऊया जेणेकरुन आपण साजरा करत असलेला हा दिवस साजरा करणे का सुरु झाले व ते किती महत्वाचे आहे हे समजावे.
याची सुरुवात ८ मार्च १८५७ रोजी न्यूयॉर्क शहरात झाली. या दिवशी न्यूयॉर्क शहरातील अनेक महिला कापड कामगार एकजुट झाल्या. त्यांच्या एकजुटीचे कारण होते कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा अन्याय आणि त्यांना मिळणारी असमानतेची वागणुक. कामाच्या ठिकाणी असलेली ही अन्यायकारक परिस्थिती आणि महिलांना असलेले असमान अधिकार यांच्या निषेधार्थ त्यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चाचे रुपांतर पुढे महिलांच्या संपामध्ये झाले. स्त्रीवर्गाच्या इतिहासात कामगार महिलांनी केलेला हा पहिला संघटित प्रयत्न म्हणजे हा संप होता. या संघटीत प्रयत्नात महिला कामगारांनी त्यांच्यावरील अन्यायकारक कामाचे दिवस कमी करावेत आणि त्यांना केलेल्या कामाचा योग्य पगार मिळावा अशी मागणी केली होती.
आज १६६ वर्षांनंतरसुद्धा जगभरात सगळीकडे, मग तो विकसित व प्रगत देश असो की अविकसित देश…स्त्रियांना त्यांच्या कामाचे वेतन पुरुष सहकार्यांपेक्षा कमीच दिले जाते. १६६ वर्षांपुर्वी जेव्हां स्त्रिया अतिशय मागास परिस्थितीत होत्या, त्या फक्त पुरुषांच्या सौख्याचे कारण समजल्या जात होत्या, पुरुषांशिवाय ज्यांना वेगळे जग व अस्तित्व नव्हते, मतदानाचा व इतर कोणताच अधिकार नव्हता, त्यावेळी या महिलांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन हा लढा दिला ही विशेष महत्वाची व कौतुकाची बाब आहे.
या लढ्याची आठवण म्हणुन याच दिवशी म्हणजे ८ मार्चला महिलादिन साजरा होतो. जर्मनीमधील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या ‘महिला कार्यालयाच्या’ नेत्या क्लारा झेटकिन नावाच्या महिलेने या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना मांडली व तेथुन पुढे हा महिलादिन साजरा करणे सुरु झाले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास 100 वर्षांहून अधिक जुना आहे. हा दिवस पहिल्यांदा युरोप आणि अमेरिकेत साजरा करण्यात आला.
‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे तसेच हा दिवस लैंगिक समानतेला जाणण्यासाठी म्हणजेच स्त्री व पुरुष हे समानच आहेत, त्यांच्यात लिंगभावात्मक कोणतेही भेद नाहीत हा समज दृढ करण्यासाठी साजरा केला जातो आणि म्हणुन या महिलादिवस सर्वांनी तशी कृती करावी असे आवाहन करतो.
महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महिलादिनाचे प्रतिक म्हणुन जांभळा रंग वापरला गेला आहे कारण हा एक असा रंग आहे जो न्याय आणि सन्मान दर्शवितो, तर हिरवा रंग हा आशेचे प्रतीक मानला जातो. जांभळा हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा रंग आहे आणि हिरवा रंग स्त्रीवादी चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. महिला दिनासाठी शक्ती आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून मिमोसाचे फूल पिवळे फुल निवडले गेले आहे.
पक्षपात, स्टिरियोटाइप आणि भेदभाव मुक्त जग, वैविध्यपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक जग, असे जग जेथे स्त्री-पुरुष समानता असावी…. हे सर्व, सर्वांना समजावे व याची जाणीव होऊन हे मूल्य लहानथोरांच्या अंगवळणी पडावे म्हणुन हा उत्सव साजरा केला जातो.
परंतु आता या दिनाचे महत्व व इतिहास माहीत नसलेला हा समाज केवळ एक दिवस महिलादिन साजरा करुन इतरवेळी मात्र महिलांच्या हक्कांची पायमल्ली करतांना दिसतो. माझ्या या विधानाला विरोध करणारे थट्टा करत म्हणतील की सर्व दिवस “महिलादिन” च असतो व पुरुष मात्र “दीन” आहे परंतु हे विधान केवळ पांढरपेशा समाजाला गृहित धरुन केले जाते. सर्वसामान्य बहुजन कष्टकरी समाजात अजुनही स्त्रियांच्या कष्टाला व त्यांच्या अधिकारांना तुच्छ समजुन गौणत्व दिले जाते. आजही घर, शेती आणि व्यवसायात स्त्रीच्या नांवावर काहीही मालमत्ता नसते, तिला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता मिळत नाही, आजही स्त्रीला तिच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळत नाही, आजही तिला आर्थिक-सामाजिक व वैचारीक स्वातंत्र्य नाही आणि आजही मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात नाही. महिलादिन साजरा करणार्या सर्व महिलांनी तरी निदान हा इतिहास जाणुन घेऊन त्यानुसार स्वत:च्या हक्कांबद्दल जागरुक व्हावे व महिलांच्या कष्टाबद्दल ज्या पुरुषांना सहानुभुति आहे त्यांनी किमान आपल्या घरात व परिसरातील महिलांना यासाठी सहाय्य करावे.
स्त्री-पुरुष हे एकमेकांचे शत्रु नसुन निसर्गाने त्यांना एकमेकांसाठी पुरक बनविले आहे. काही जैविक फरक दोघांमध्ये आहेतच परंतु ते दोघे मिळुन एक जीवन निर्माण करत असतात. तशी सोय निसर्गाने करुन ठेवलेली आहे. आपण मात्र स्त्री विरुध्द पुरुष असे चित्र उभे करतो, महिलादिना दिवशी तर बरेचदा असे बोललेही जाते. काहीठिकाणी महिलादिनाला मोठ्याप्रमाणावर सोहळ्याचे स्वरुप आलेले सद्ध्या दिसते. मात्र एक दिवस साजरा करुन इतर ३६४ दिवस महिलांची परिस्थिती जर जैसे थे! होत असेल तर याबद्दल जरा विचार केलेलाच बरा. सोशल मिडीयावरही, मी बायकोला बाहेर जेवायला कसे नेले, आज सकाळचा चहा कसा हातात दिला, नवीन ड्रेस कसा घेतला हे सांगण्याची अहमहमिका सुरु असते. परंतु वर्षातील एकदिवस म्हणजे आयुष्य नव्हे. एरवी ३६४ दिवस आईबहीणीवरुन शिवीगाळ केली जाते, महिलांचे हक्क सहज डावलले जातात, महिलेचा अपमान केला जातो, कामाच्या ठिकाणी तिचा सहज विनयभंग केला जातो, तिला कमी वेतनावर राबवुन घेतले जाते, जातायेता महिलांच्या कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले जातात, महिला बेदरकारपणे गाडी चालवत नाहीत तर त्याबद्दल त्यांची चेष्टा केली जाते, लहान व मोठ्या स्त्रियांवर बलात्कार होतो, त्यांचे खुन होतात, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते … अशी अनेक न संपणारी यादी इथे मांडता येईल. हे सर्व कमी करत करत नाहीसे झाले तरच या सोहळ्याला काही अर्थ असेल नाहीतर फक्त एक दिवस साजरा करुन ३६४ दिवसांचे पापक्षालन केले जाते असेच म्हणावे लागेल.
काही ठिकाणी अगदी उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो तर काहीजण मात्र या सोहळ्याला बैलपोळ्याची उपमा देत याची खिल्ली उडवतात. महिलादिनाला मिळणारे हे दोन्ही प्रतिसाद मला वाटतं, कोणतीही गोष्ट एकतर डोक्यावर घेणे अथवा पायदळी तुडवण्याइतके टोकाचे आहेत. असं न करता यामागील कार्यकारणभाव लक्षात घेऊन स्त्री व पुरुषांनी जर या महिला दिनामागच्या उद्देशाचा विचार केला तर हा महिलादिन साजरा करणं उचित ठरावं व याचा उद्देश काही प्रमाणात सफलही व्हावा!
संत जनाआई तेराव्या शतकात म्हणुन गेली,
स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास॥
त्याच चालीवर आता म्हणावेसे वाटते आहे की,
महिलादिन म्हणुनी न व्हावे उत्सवी॥
तर याप्रसंगी स्त्री व पुरुषानी उत्सवी न होता एकमेकांचे मित्र व्हावे! कारण जेव्हां मैत्र निर्माण होते तेव्हां कोणतही नातं समान पातळीवर येतं !!!
महिलादिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!!!
संजीवनी घळसासी,
सी ११०१, सिंहगड रोड, वडगांव बु.,
पुणे -४११०४१.
फोन नं : ९२८४०२८०७६
खूप छान वैचारिक लेख आहे.