सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या ‘अनोख्या रेशीमगाठी’

Share this post on:

‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारची सामाजिक भीती, समाजातला प्रत्येक समूह, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक माणूस बाळगत असतो. त्याच ओझ्याखाली प्रत्येकजण आपले संपूर्ण आयुष्य, धडपडत जगत असतो. समाज नावाची स्वार्थी संस्था ही गंमत बघण्यात अघोरी आनंद मानणारी असते. त्यांना कोणाचे काय झाले, याच्याशी मतलब नसतो.

ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक, जुनाट, बुरसटलेल्या आणि कालबाह्य रुढी, परंपरा टिकून आहेत. नव्हे, कष्टकरी, श्रध्दाळू लोकांना अनामिक भीती घालून त्यांना खतपाणी घातले जाते. हे सगळे झुगारुन देऊन नवे परिवर्तन करणारा एखादा मसिहा जन्माला येतो आणि समाज, कुटूंब सावरते. आपल्या जींदगीच्या अनुभवातून टक्के, टोणपे खाल्लेल्या एखाद्या माणसाने पुढाकार घेऊन इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी धाडसी पाऊल उचलले तर गंमत बघणारा तथाकथीत समाज तोंडात बोटे घालून गप्प बसतो. त्याला चपराक बसते. असे परिवर्तन व्हायला त्या त्या घटकाची आर्थीक परिस्थितीही महत्त्वाची ठरते. ज्यांची परिस्थिती बेताची आहे, त्यांना लोक अधिक शहाणपण शिकवितात. परंतु जे सक्षम आहेत, त्यांच्या नादाला कोणी लागत नाही.
असेच अनोखे, नवे सामाजिक परिवर्तन रवींद्र कामठे या सिध्दहस्त लेखकाने लिहिलेल्या ‘अनोख्या रेशीमगाठी’ या कादंबरीतून वाचायला मिळते. अनेक जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांनी बरबटलेल्या परंपरांना छेद देत ही कादंबरी, जीवनाचे अनेक रंग उकलीत पुढे पुढे सरकते. पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजाने सुरु झालेली ही कथा हळूवार रेशमाचे धागे गुंफण्यासाठी, मिलनाच्या ओढीने, परिवर्तनीय विचार घेऊन थांबते. ‘अनोख्या रेशीमगाठी’ मधून लेखक रवींद्र कामठे यांनी समाजातील अनेक भाकड समजुतींना धक्का दिला आहे. त्यांची लेखनशैली ओघवती आणि बोलीभाषेतली असल्याने प्रत्येक वाचकाला कादंबरीतल्या अनेक घटना आपल्या आयुष्यात कुठे तरी येऊन गेल्याचे स्मरते. कादंबरी वाचताना अनेक प्रसंगात डोळ्याच्या कडा नकळत पाणावतात. एखादी घटना वाचताना मध्येच हुंदका आल्याशिवाय राहत नाही. सुरुवातीच्या दहा मिनिटांतच वाचकांच्या मनाची पकड घेणारी ही कादंबरी आहे.
कोकणातल्या आंजर्ले गावात या कादंबरीचे बरेचशे कथानक घडते. उर्वरीत मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडते. मुंबईच्या दमट, कोंदट आणि गर्दीने गजबजलेल्या वातावरणात राहणाऱ्या नोकरदार चाकरमान्यांना लागत असलेली खेड्याची ओढ स्पष्टपणे जाणवते. हे खेडे कोकणातल्या निसर्ग सौंदर्याने बहारलेल्या भागातले असेल तर पुन्हा कधीच मुंबईला जाऊ नये, ही भावना निर्माण होणे स्वाभावीक आहे. ती या कादंबरीतून व्यक्त झालेली आहे. रवींद्र कामठे यांनी आंजर्ले गाव आणि तेथील परिसराचे मनमोहक, सुंदर वर्णन केले आहे. कोणीही वाचक ही कादंबरी वाचल्यानंतर आंजर्लेत मुक्काम करण्याचा मानस करेल. ती, तशी ओढ त्यांच्या लेखनातून प्रसृत झाली आहे.
कादंबरीची नायिका पुजा आणि नायक प्रभाकर असला तरी खरी नायिका आजीच वाटते. आजीमुळेच कादंबरी बहरली आहे. सामाजिक परिवर्तनाचे बीज आजीनेच रुजविले आहे. म्हणून आजी या कादंबरीची खरी नायिका ठरते. आजीने आपल्या आयुष्यात भोगलेल्या यातना, नवऱ्याच्या मृत्यूनंतर, विधवा असताना चालविलेले कुटूंब आणि त्यांच्यावर केलेले संस्कार हे केवळ कादंबरीपुरतेच महत्त्वाचे नाहीत, तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. सामाजिक परिवर्तनाचे शिवधनुष्य पेलताना आजीच्या विचारांची परिपक्वता लक्षात येते. ग्रामीण भागात राहत असली तरी आयुष्याचे अनेक खटके, रटके तिने खाल्लेले आहेत. म्हणूनच पुजा आणि प्रभाकर यांचे लग्न लाऊन देण्याचे तीच ठरविते. गावातल्या लोकांनी काही बोलण्याच्या अगोदरच आपल्या घरात ही परिवर्तनाची नांदी करुन, तसे वागते. पुजा आणि प्रभाकरला मुंबईत जेवढा त्रास होतो, तेवढा आंजर्लेत होत नाही, याचे कारण आजीचा समाजावर आणि गावावर असलेला वचक हेच सिध्द होते.
आजीला शहरी शब्द माहित नाहीत, परंतु पुजा विधवा आहे, तर तिचा मुलगा प्रभाकर विधूर आहे. पन्नाशीनंतर त्या दोघांनी एकत्र यावे, समाजानेही त्यांना मान्यता द्यावी, असे आजीला वाटते. म्हणूनच ती कड्यावरच्या गणपतीला साक्षी ठेऊन पुजा आणि प्रभाकरच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ला परवानगी देऊन त्यासाठी पुढाकार घेते. दीपा आणि प्रभाकर यांना दिपक हा एकुलता एक, परंतु अतिशय समजदार असा मुलगा असतो. एके दिवशी गावाहून परत येताना त्यांच्या कारला अपघात होऊन त्यात दीपाचा मृत्यू होतो. प्रभाकरचे कुटूंब कोलमडते. त्यात प्रकाश त्यांच्या मदतीला धाऊन येतो. नोकरीला एकाच बँकेत, आणि राहायला एकाच इमारतीत असल्यामुळे प्रकाश प्रभाकरला सर्वतोपरी मदत करुन, त्याला जगण्यासाठी नवी उमेद देतो.
पुजा आणि प्रकाश यांच्या संसार वेलीवर सई नावाचे फूल उमलेले असते. सुखी संसाराला ग्रहण लागते. अचानक प्रकाशचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. त्यावेळी प्रभाकर आणि दिपक पुजाच्या कुटूंबाला आधार देतात. यातून त्यांच्या परिचयाला नवे धुमारे फुटतात. सई आणि दिपक वयानुरुप प्रेमाची स्वप्ने पाहू लागतात. पुजाच्या मनातून अचानक बसलेल्या धक्क्याची तीव्रता कमी व्हावी, म्हणून प्रभाकर पुजा आणि सईला त्यांच्या आंजर्ले गावी घेऊन जातात. कादंबरीतील समाज परिवर्तन होते, ते याच ठिकाणी. अनेक घटना आंजर्लेतच घडतात.
‘अनोख्या रेशीमगाठी’ मध्ये नात्यातील गुंतागुंत सहज, सोप्या आणि संयमी भाषेत गुंफली आहे. एका विधवेची आणि विधुर व्यक्तीची ती अनोखी कहाणी आहे. त्या दोघांच्या एकुलत्या एक मुलाची आणि मुलीच्या प्रेमामुळे त्यांचेही नकळत झालेले प्रेम कसे उमलत जाते, त्याची ही कहाणी आहे. दोन कुटूंबातील जगण्याच्या व्यथा, त्यांचा समाजाशी, स्वतःशी आणि एकमेकांच्या भावनांशी चाललेला संघर्ष व त्यांच्या समस्यांची प्रसंगानुरुप मांडणी करुन कथा समृध्द झाली आहे. वरवर वाचताना कादंबरीचा विषय काही अंशी प्रेमकथेकडे झुकणारा असला तरी, त्यात अतिशय संयमाने सामाजिक समस्यांवर जोरदार प्रहार केलेला आहे.
प्रभाकरची पत्नी दिपाचे निधन झाल्यानंतर त्याची व दिपकची ओढाताण वाचून डोळे पाणावतात. सईच्या बाबांना दवाखान्यात नेणे, तेथील प्रसंग आणि निधन पुढे पुढे गतीने वाचावेसे वाटते. याठिकाणी कादंबरीने विलक्षण गती घेतलेली आहे. काही क्षणातच कादंबरी वाचकांच्या मनावर मजबूत पकड घेते. कादंबरीतील सर्वच घटना क्रमाने घडत जातात. व्यावसाईक कादंबरीप्रमाणे दुसरा एखादा विषय मध्येच घुसडून वाचकांना मुद्दाम खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही कादंबरी वेगळ्या धाटणीची आहे. ती सत्यघटना असावी, असे जाणवते. म्हणूनच तिच्या कथानकात आणि लेखणात सलगता आणि सहजता आहे.
ग्रामीण भागातील राहणीमान, तेथील संस्कृती अतिशय खुलेपणाने मांडली आहे. कोकणातील खेड्याच्या घराचे वर्णन अंगण, गोठा, ओसरी, पडवी, मागील ओसरी, माजघर आदींची वर्णने सहज आणि आपसूकच येतात. आजीकडून होणारे संस्कार, दिवाकर आणि अपर्णा यांचे कामात व्यस्त राहणे. हे वाचताना कोणत्याही सुज्ञ वाचकाला, ‘माझ्या जवळची नाती, नातेवाईक कोठे आहेत? आंजर्लेच्या वाडीवरच्या घरातली आपुलकी माझ्या वाट्याला का आली नाही? ते संस्कार, आपुलकी, गणपतीची आराधना माझ्या नशिबात का येऊ शकली नाही?’ असे वाटणे स्वाभाविक आहे. यातच लेखकाच्या लेखन कौशल्याचे खरे श्रेय आहे.
कलाकृती गर्भात असताना अनेक वर्षे ती मनात घर करुन असते. लेखकाच्या मनाची घालमेल होत असते. कित्येक दिवस तो तेच आयुष्य जगत असतो. जीवनातले अनेक पदर तो उलगडून पाहत असतो. कलाकृतीचा जन्म होतो, तेव्हा लेखक स्वतःला कोंडून घेत असतो. आपल्या आपत्याशिवाय त्याला काहीच सूचत नसते. त्याच्या लेखनीतून प्रगल्भतेचा पान्हा पाझरत असतो. त्यातूनच कलाकृती बाळसे धरते, फुलते, बहरते. हेच तर जन्मजात, खऱ्या लेखकाचे सामर्थ्य असते. हे सामर्थ्य रवींद्र कामठे यांनी सिध्द केले आहे.
कोकणातील आंजर्ल्याचे वर्णन करण्यास लेखकाने कंजूसपणा केलेला नाही किंवा हातचे काही राखूनही ठेवले नाही. खाद्य संस्कृतीचे वर्णन करताना तर लेखकाने मुक्तहस्त ठेवला आहे. उपवासाला भगर आणि दाण्याची आमटी, गरमागरम साबुदाण्याचे वडे, साईचं दही आणि लिंबाचं लोणचं. साबुदाण्याची खिचडी आणि काकडीची कोशिंबीर. संध्याकाळी उकडीचे मोदक, साजूक तूप, वरण-भात, मिरगुंड. इतरवेळी, ताज्या नारळाचे सारण, कोल्हापुरी गुऱ्हाळाचा गूळ, हातसडीच्या तांदळाची उकड, पुरण-पोळी. साजुक तुपातला काजू, बदाम, केळी घातलेला गोडाच्या शिऱ्याचा नैवेद्य. कटाची आमटी, बटाट्याची भाजी, चटणी, पापड, कुरडई, मटकीची उसळ, साजूक तुपाची वाटी. पोह्यांचा चिवडा, बुंदीचा लाडू, भरपूर भाजलेले दाणे घालून केलेला उपमा. याचा वाचनानंद घेताना त्याचा आस्वाद घेत असल्याची भावना निर्माण होते. सामान्य माणूस कोकणात गेल्यावर मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्री अन्न खाण्याची अपेक्षा बाळगतो. परंतु संपूर्ण कादंबरीत कोकणाच्या या मेव्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. याचा अर्थ कोकणातल्या वाड्या-वस्त्यावर राहणारा माणूस सर्वसाधारण, सुग्रास अन्न ग्रहन करुन जगत असावा असे वाटते.
माणसाला परिवर्तनवादी भूमिका घेऊन जगताना अतिशय अडचणी येतात. समाज तर दूर, बाजुलाच राहतो, परंतु नात्यातीलच अनेक व्यक्ती त्रास देण्यात पुढाकार घेतात. त्यावर मात करीत ‘अनोख्या रेशीमगाठी’ जुळून येतात. रवींद्र कामठे यांची ‘अनोख्या रेशीमगाठी’ ही कादंबरी अतिशय प्रवाही आणि जळमटलेल्या विचारांच्या समाजावर घणाघात करणारी आहे. एक वेगळा परिवर्तनाचा आणि जगण्याची नवी उमेद, नवी पाऊलवाट शोधण्याचा प्रयत्न करणारी आहे.

– प्रा. डॉ. बाबा बोराडे, संभाजीपूर,

९४२२५ ८३१०६.

( पूर्वप्रसिद्धी – दै.जनप्रवास १९ मार्च २०२३ )

जगभरातील वाचकांसाठी ‘अनोख्या रेशीमगाठी’ आता ई-बुक स्वरूपात उपलब्ध

अनोख्या रेशीमगाठी घरपोच मागविण्यासाठी 

अनोख्या रेशीमगाठी

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!