संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?

प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा तत्कालीन औंड्र या मेंढपाळ समाजामधून उदयाला आलेला राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मूळ नाव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळ उभारणी सातवाहन काळात झाली. तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्‍व असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या गाथा ‘सप्तशती’ सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, ‘लीलावई’सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच; पण वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ या व्याकरण ग्रंथाने महाराष्ट्रीला समृद्धी दिली. पूर्वी रठ्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रठ्ठसमुहाला एकाच राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खर्‍या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथा सप्तशतीतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.

गौतमीपुत्र सातकर्णी

त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत, असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपुत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.

सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश. महाराष्ट्र भूमीच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीसनपूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपूर्वी सातवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर इत्यादी जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक मेंढपाळ समाज. महाभारतात औंड्रांना असुर राजा महाबळीचे पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र, पुंड्र, मल्ल इत्यादी समाज दक्षिणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे डिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत. यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. पंढरपूर हे नावही पुंड्रपूरवरुन आलेले. मावळालाही आंदर मावळ असे म्हटले जाते. मल्ल लोकांना हरवणारा मल्हारीही आपल्याला माहीत आहे. आंदर मावळ (जुन्नरचा परिसर) आंध्रा या नदीच्या नावावरुन बनला आहे. या भागात आंद्र (औंड्र) अधिक संख्येने निवासास असल्याने नदी व परिसरास आंध्र नाव मिळणे स्वाभाविक आहे.

सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल इत्यादी पश्‍चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुफांतील प्रदीर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षिणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची गाथा ‘सप्तशती’, गुणाढ्याचे ‘कथा सरित्सागर’, वररुचीचे ‘माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण’, जैन माहाराष्ट्रीतील ‘अंगविज्जा’ अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लीलावती हिच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण ‘लीलावई’ या काव्यग्रंथात आले आहे.

एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवताना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. ‘क्षहरात’ घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात सातार्‍याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्‍चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. 32 मध्ये नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वार्‍या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेव्हा सातारा-कर्‍हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ’गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस.
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या 78 मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हणजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ’तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतु पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदिकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो; पण इसवी सन 78 पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन 78 मध्येच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मूळ उद्देश गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे असे की शालिवाहन शक असा मुळात शब्दच अस्तित्वात नाही. या नावाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ’सालाहन’ असा आहे. सातवाहन स्वत:ला अनेक लेखांत सालाहन असेच म्हणवून घेतात. मग त्याचे कृत्रिम संस्कृतीकरण शालिवाहन करायचे आणि नंतर शालिवाहन नावाचा राजाच इतिहासात सापडत नाही अशी लाडिक तक्रार करायची असे उद्योग आमचे विद्वान करत बसतात हे नवलच नाही काय?

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?
बरे या विद्वानांच्या बुद्धीवर कळस चढवणारे ब्रिगेडी कल्पनाशक्तीचे आजकाल झालेले विकृत रुप पाहिले तर थक्क व्हायला होते. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली ती ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार. वेद ऐकले म्हणून कानात उकळते शिसे ओतले. संस्कृत उच्चारिले म्हणून जीभ छाटली. हे सारे झाल्यावर भाल्यावर मस्तक टोचून त्याची मिरवणूक काढली. तीच पहिली गुढी व महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी तेव्हापासून गुढी हा एक सण केला. तेव्हा बहुजनांनी गुढी उभारू नये असा संदेश गुढीपाडव्याच्या आसपास फिरू लागतो.

गुढीपाडवा किमान दोन हजार वर्षांची परंपरा असलेला सण आहे हे आपण वर पाहिले. नंतरच्या मराठी साहित्यातही गुढीचे उल्लेख येतात. लीळाचरित्रात म्हाइंभट हा सडा-संमार्जन करुन मग गुढी कशी उभारावी याचे सविस्तर वर्णन करतो. तेराव्या शतकातीलच संतश्रेष्ठ चोखा मेळा टाळी वाजवावी : गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची म्हणतात. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते संत एकनाथांनी गुढीचे विजय-गुढी म्हणून जसे वर्णन केले तसेच गुढीला आध्यात्मिक अर्थही दिले. म्हणजे सातवाहनांपासून सुरु झालेली गुढीची परंपरा अव्याहत सुरु होती.

मग गुढीची परंपरा ब्राह्मणांनी आपल्या मताप्रमाने संभाजी महाराजांची हत्या करवून सुरु केली या विकृत अपप्रचाराला महत्त्व देण्याची खरे तर काही गरज नाही. औरंगजेबाने शंभुराजांची हत्या करायला हिंदुंचा सण व नववर्ष दिन निवडावा यात उलट त्याची विकृती दिसून येते. त्याबाबत औरंगजेबाचा निषेध न करिता महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जबाबदार धरत समाजात द्वेष पसरवावा हे कृत्य नक्कीच निषेधार्ह आहे. असे करुन आपण शंभुराजांचाही अवमान करीत आहोत याचे यांना भान नाही.

महाराष्ट्रात इतिहासाचे विकृतीकरण वैदिक विद्वानांनी जाणीवपूर्वक वा भाबडेपणाने केले. तसेच वेगळे विकृतीकरण स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असताना हिंदुंनी करावा हे निषेधार्ह आहे. यातून धर्म व संस्कृतीचे मुळचे स्वच्छ स्वरुप हाती लागणार नाही. उलट विद्वेष गहिरा होत जाईल याचे भान ब्रिगेडसारख्या विकृतीने पछाडलेल्या संघटनांनी ठेवले पाहिजे. इतिहास ज्याचे माप त्याच्या पदरात नक्कीच घालतो; पण हवा निकोप दृष्टिकोन!

सर्वांना गौतमीपुत्राच्या विजयदिवसाच्या व त्यानिमित्ताने सुरु झालेल्या नववर्ष दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो!

– संजय सोनवणी
9860991205

(साप्ताहिक ‘चपराक’, पुणे)

२७ मार्च २०१७

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?”

 1. Sagar Kambale

  छान लेख ….

  खरं तर हा लेख वाचल्यावर आपल्या गुढी पाडव्याच्या सणाचा खरा इतिहास समाजाला.

  आपले खुप खुप आभार🙏🙏

 2. R K Adkar

  पाडव्याच्या दैदिप्यमान इतिहासाचा तपशील देऊन गुढी ची परंपरा किती प्राचीन आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे.
  जाता जाता हिंदुद्रोही ब्रिगेडींवर आसुड ओढून चपराक हाणली आहे!
  धन्यवाद, चपराक समुहाला गुढी पाडव्याच्या आणि हिंदु नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा