मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते.
याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत पडतं!’ हा दोन संस्कृतीतला फरक आहे. इंग्रजीकडं मराठीच्या तुलनेत शब्दसंग्रह खूप कमी आहे. काका-काकी हे शब्द आपण चुलता-चुलतीसाठी वापरतो. मामा-मामी हे शब्द आईच्या भावासाठी आणि त्याच्या बायकोसाठी वापरतो. इंग्रजीत अशा नातेसंबंधांना एकच शब्द वापरतात. इंग्रजीकडं शब्दसंग्रह कमी असल्यानं असं घडतं.
मराठीचा भाषिक इतिहास खूप जुना आहे. अँग्लो सॅक्शन टोळ्या ज्यावेळी इंग्लंडमध्ये लढत होत्या त्यावेळी मराठीत म्हाइंभट सरोळेकर लीलाळचरित्राचं तत्त्वज्ञान सांगत होते, ज्ञानेश्वर गीतेवर निरूपण करत होते. मराठी ही शूर आणि पराक्रमी लोकांची भाषा आहे. कोणत्याही भाषेत किती कर्तबगार माणसे झाली यावरून त्या भाषेचं महत्त्व ठरतं. मराठी भाषेनं जगाला सर्व क्षेत्रातील दिग्गज दिलेत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकाचा जरी त्यासाठी विचार केला तरी क्रिकेटचे महानायक मराठी आहेत, गायनातील सम्राज्ञी मराठीतील आहेत, चित्रपटसृष्टीचे जनक आणि महानायक मराठीतील आहेत. मग प्रश्न पडतो की, ज्या भाषेतील सुपूत्र जगभर लौकिक प्राप्त करत आहेत ती भाषा का मोठी होत नाही? आपल्या भाषेचं सामर्थ्य का वाढत नाही? ती उपेक्षित का राहते? याचा विचार होणं गरजेचं आहे.
दोन मराठी माणसं बाहेर कुठंही भेटली की हिंदी किंवा इंग्रजीत संभाषण सुरू करतात. हा न्यूनगंड विसाव्या आणि एकविसाव्या शतकात निर्माण झालाय. सोळाव्या किंवा सतराव्या शतकात मराठी माणसात असा न्यूनगंड नव्हता. तसं नसतं तर ज्या ज्या अमराठी भागात आपली मराठी माणसं आहेत ते तिथं तिथं आपापल्या घरी मराठीत बोलत राहिले नसते. तिथं मराठी शब्दांची पखरण झाल्याचं आपल्याला दिसलं नसतं. त्यामुळे मराठी माणसानं भाषेविषयीचा आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे.
कोणाच्या कसल्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही चळवळीशिवाय, कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीशिवाय किंवा कसल्या अनुदानाशिवाय मराठी भाषा बोलणार्यांची संख्या जगभर आहे. महाराष्ट्रातील बारा कोटी, भारताच्या अन्य प्रांतातील चार कोटी आणि जगभरातील विखुरलेली मराठी माणसं त्यांचं मराठीपण टिकवून आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषेत मराठी दहाव्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ ही सामर्थ्यशाली भाषा आहे. ही भाषा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची संभाषणासाठी वापरली, या भाषेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व्यक्त झाले, ही भाषा अभिव्यक्त करण्यासाठी सगळ्यात चांगली आणि सगळ्यात मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यामुळे ही भाषा सामर्थ्यशाली आहे, हे सांगण्यासाठी कुणाचे प्रमाणपत्र कशाला हवे?
आपली भाषा इतकी सामर्थ्यशाली असताना या भाषेतून सर्व शाखांचे शिक्षण का दिले जाऊ नये? आत्ता आत्ता अभियांत्रिकीपासून ते विधीशाखेपर्यंतचे शिक्षण मराठीत उपलब्ध झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. हे असं नेमकं का होतं? आपण इंग्रजीतून मराठी करताना किंवा मराठीचं इंग्रजीकरण करताना कोणते शब्द वापरतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ‘अकॉर्डिंग टू सेक्शन थ्री हंड्रेड अॅन्ड टू मर्डर इज क्राईम’ हे अनेकांना समजतं. ‘भारतीय दंडसंहितेच्या धारा 302 अन्वये मृत्यूदंड हा दखलपात्र गुन्हा आहे’ हे समजायला अवघड जातं. त्यामुळे ‘भाषेतली क्लिष्टता काढून टाका’, असं आचार्य अत्रे सांगायचे. मराठी भाषेतील अनावश्यक अरबी, फारसी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजीमहाराजांनी भाषाशुद्धा केलीय. त्यांनी सामान्य माणसाला कळावं यासाठी व्यवहारकोश तयार केला. त्यामुळं भाषेतला किचकटपणा जाऊ द्यात पण आपल्याकडे रूळलेले इंग्रजी शब्द काढायचे, हिंदी शब्द काढायचे हे काय चाललंय? ऑक्सफर्ड स्वतःचा शब्दकोश काढते. त्यात इतर भाषेतील दीडशे ते दोनशे शब्द दरवर्षी इंग्रजीत वाढतात. आपणही इतर भाषेतले आपल्याकडे रूजलेले शब्द आपल्यात समाविष्ट करून घेण्याऐवजी ते काढून टाका म्हणून ओरड करतो. असे शब्द काढून टाकणं हा भाषा समर्थ, सामर्थ्यशील करण्याचा उपाय नाही. उर्दू शायरी लिहिणारे शायर अन्य भाषेतील अनेक शब्द बिनदिक्कत वापरतात. ‘ये श्याम हो गई, सूरज ढल गया पश्चिम की तरफ। हम भी ढल गये गिलास में’ असं लिहिताना ‘ग्लास’ हा इंग्रजी शब्द ‘आहे तसा’ उचलल्याने त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे मराठीत आलेले व्हाटसअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल, जिमेल, नेटफ्लिक्ससारखे तंत्रज्ञानाविषयीचे किंवा अन्य रूजलेले, रूळलेले शब्द आपण स्वीकारायला हवेत. त्यावरून भाषाशुद्धीच्या नावावर आकांडतांडव करणार्यांमुळे आणखी भीती वाढते.
जुन्या-नव्या शब्दांचे संशोधन करणारे प्रामाणिक लोक आपल्याकडे कमी झालेत. मराठीत पहिल्यांदा ‘गाढव’ ही शिवी कधी दिली गेली यावर ज्ञानतपस्वी रा. चिं. ढेरेअण्णांनी लिहिलं. चौदाव्या शतकात सर्वप्रथम माणसाला गाढव म्हणून शिवी दिली गेल्याची मांडणी त्यांनी केली. इंग्रजीतील शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधणारे महाभाग मराठीत नव्या शिव्या तयार होत नाहीत याकडे लक्ष देत नाहीत. राग व्यक्त करण्यासाठीचं शिवी हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळं शिव्यांचे अर्थ कळायला हवेत. त्याचा आविर्भाव लक्षात घ्यायला हवा. आजकालच्या पोरांना मराठीत धड शिव्याही देता येत नसतील तर भाषासौंदर्याची, भाषाशुद्धतेची मांडणी करणार्यांचे हे अपयश आहे.
रिचर्ड बर्टन नावाचा एक ब्रिटिश संधोधक होता. त्याला उत्तम मराठी येत होतं. तो काही काळ मुंबईत रहायला होता. त्यानं सांगितलं होतं, एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतल्या शिव्या आधी शिका. ‘माणसाला जे योग्य वाटतं ते मनसोक्त करणं म्हणजे पुरूषार्थ’ असं सांगणारा रिचर्ड बर्टनसारखा माणूस सोळा-सतरा भाषा बोलत होता. आचार्य विनोबा भावे मराठीसह अनेक भाषा बोलायचे. पी. व्ही. नरसिंहरावांना अनेक भाषा ज्ञात होत्या. ही मंडळी बहुभाषिक होती. त्यामुळं मराठी भाषेचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर शिक्षणाची ज्ञानभाषा ही मातृभाषा असायला हवी, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावं. ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय त्यांच्यासाठी विविध नोकर्यात वीस टक्के जागा राखीव ठेवायला हव्यात.
भाषेबाबत मानसिकता बदलणं आणि भाषेवर प्रेम करणं आत्यंतिक गरजेचं आहे. जाता जाता इतकंच सांगतो की, दिपीका पादुकोन कितीही सुंदर असली तरी ती आपल्या आईपेक्षा सुंदर असू शकणार नाही. त्यामुळे हिंदी, इंग्रजी, उर्दू, जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा आपल्याला भुरळ घालत असल्या तरी ज्ञान मिळवण्याच्या द़ृष्टिने त्या आत्मसात कराव्यात पण आपली आई मराठी आहे, याचं भान कायम ठेवावं. हे भान ठेवलं की मातृभाषेचा ज्ञानभाषेकडील प्रवास खर्याअर्थाने सुरू होईल.
-घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी – दैनिक ‘देशदूत’, नाशिक
शनिवार, दि. 25 फेब्रुवारी 23