बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध

काठियावाड हे गुजरातमधलं एक ठिकाण. तेथील ख्यातनाम वकील, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या हरजीवनदास काठीयावाडी यांची गंगा ही लाडकी कन्या. गंगाला चित्रपट, नाटक, अभिनयाची आवड. चौदा वर्षाची असताना एका मैत्रिणीकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्यात हरवून गेली. अशातच मुंबईत काही काळ वास्तव्य करून आलेला रमणिकलाल हा तरूण तिच्या वडिलांकडं हिशेबनीस म्हणून कामाला लागला. त्याच्याकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्याच्याकडं आकर्षित झाली. परिणामी गंगानं तिच्या आईचे दागिने, काही रोकड उचलली आणि दोघेही मुंबईला पळून आले…

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी गंगाची कहाणी. पुढे रमणिकलालनं फसवून तिला पाचशे रूपयात एका कुंटणखान्यात विकलं आणि गंगाचा गंगूबाईकडचा प्रवास सुरू झाला. तिथं तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. शौकतखान या पठाणानं तर तिचे हाल हाल केले. त्याच्या मनात येईल तेव्हा तो यायचा, तिला ओरबाडून निघून जायचा. या जुलूमाचा कहर झाल्यावर गंगूबाईनं थोडं धाडस दाखवलं आणि ती तडक करीम लालाकडं गेली. त्याला आपली आपबिती सांगतानाच तिनं त्याला प्रेमानं जिंकून घेतलं आणि ती त्याची ‘राखी बहीण’ झाली.

या घटनेनंतर मात्र तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ग्राहकांच्या शरीराची भूक भागविणारी गंगूबाई ‘घरवाली’च्या निवडणुकीसाठी उभी राहिली आणि निवडुनही आली. नंतर ती ‘बडे घरवाली’ही झाली. तिचा राजकारणातला वावर वाढला. कुंटणखाण्यातल्या स्त्रियांसाठी तिनं काम उभं केलं. ती इतकी पुढं गेली की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिला हा धंदा सोडायला सांगितल्यावर ती त्वेषानं म्हणाली, ‘‘तुम्ही मला तुमची पत्नी म्हणजे मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी एका पायावर हा धंदा सोडण्यास तयार आहे…’’

परिस्थितीला, आमिषाला बळी पडलेल्या, फसवून आणलेल्या, चंगळवादाची चटक लागलेल्या, सूडानं पेटलेल्या, अन्याय-अत्याचारानं ज्यांचं जगणं नरक करून सोडलं अशा अकरा लेडी डॉनची करूण, रोमांचकारी, धाडसी, हतबल, क्रूर जीवनकथा मांडलीय नाशिक येथील लेखिका सुरेखा बोर्‍हाडे यांनी. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘बाईची भाईगिरी’ या पुस्तकातून स्त्री जीवनाची अशी कितीतरी रूपं आपल्याला वाचता येतील, अनुभवता येतील. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध केलेलं असताना गुन्हेगारी जगतातही त्या मागं नाहीत याची झलक दाखवणारं हे पुस्तक. अर्थात यातून त्यांचं उदात्तीकरण केलं नाही तर त्यांच्या मनोवृत्तीचा अचूक वेध घेऊन समाजाला जागं करण्याचं काम सुरेखा बोर्‍हाडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केलंय. ही सर्व शब्दचित्रं वाचताना वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्याचा स्फोट अटळ असतो याची जाणीव वाचकांना होते.

मध्यप्रदेशच्या चंबळ खोर्‍यात परिस्थितीमुळं पायात चाळ बांधून सुंदर रात्री सजवण्याऐवजी पुतळाबाई नावाची एक बहादूर डाकू दुसर्‍यांना फक्त धमकावत असते आणि कुणापुढंही हतबल न होता गोळीबार करत असते. तिचा एक हात कापण्यात आला. तिची निर्दोष बहीण आणि भाऊ, नवरा सुल्ताना हे सगळे पोलिसांच्या गोळीला बळी पडले. इतकं होऊनही तिच्या टोळीची जी दहशत होती ती पुरूषी अहंकार चेपून काढणारी होती. ‘क्वीन ऑफ मुंबई’ असं जिचं वर्णन केलं जातं ती ‘जुर्म की हसीना’ म्हणजेच हसीना पारकर हिच्यावर मध्यंतरी चित्रपटही आला. परिस्थितीला बळी पडलेल्या हसीनाला नाईलाजानं गुन्हेगारीत यावं लागलं. 2014 ला तिची संपत्ती पाच हजार काटींची होती असं सांगितलं जातं. या हसीना पारकरचे अनेक पदर सुरेखा बोर्‍हाडे यांनी त्यांच्या लेखणीतून नेमकेपणानं उलगडून दाखवलेत.

भारतातलं सर्वात मोठं सेक्स रॅकेट चालवणारी आणि ‘सेक्सरॅकेटची मल्लिका’ अशीच ओळख असणारी सोनू पंजाबन उर्फ गीता अरोडा, मुंबईची पहिली माफिया क्वीन म्हणून प्रसिद्धीस आलेली जेनाबाई दारूवाला, गोरगरीब तमिळ लोकांचं आदरस्थान असलेली, मादक पदार्थांचा व्यापार करणारी मुंबईतील सर्वात श्रीमंत महाराणी महालक्ष्मी पापामणी, 1989 ते 1994 मध्ये पोरबंदर विभागातून मेहर समाजाची पहिली आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारी आणि 103 गुंड सदस्यांची टोळी चालवणारी ‘गॉडमदर’ संतोकबेन जडेजा, अवघ्या अडतीस वर्षांच्या आयुष्यात जीवनाचे अनेक रंग अनुभवणारी, पुरूषी विकृतीला बळी पडलेली आणि नंतर रणरागिणी होत व्यवस्थेच्या विरूद्ध बंड पुकारणारी द बैंडिट क्वीन फुलनदेवी, ‘प्रेममूर्ती डाकुराणी’ अशी ओळख असलेली सीमा परिहार, आपल्या डोळ्यादेखत आपल्या नवर्‍याचा बनावट एन्काउंटर पाहून सूडाच्या भावनेनं पेटून उठलेली अशरफ उर्फ सपना आणि कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालणारी पतीपरायण आशा गवळी अशा खलनायिकांचं चित्रण या पुस्तकात करण्यात आलं आहे.

यातील प्रत्येकीच्या जीवनाचा आढावा घेताना सुरेखा बोर्‍हाडे यांनी त्यांचा आधी ‘स्त्री’ म्हणून विचार केलाय. समाजानं त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला, या लेडी डॉननी त्यांच्या परीनं त्यांचा बदलाही घेतला मात्र या दलदलीत त्या कशा अडकल्या, त्यांचं जगणं नेमकं कसं होतं, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांची झालेली फसवणूक-पिळवणूक, त्यांची हतबलता, शस्त्र हातात घेण्यापूर्वी आणि ते घेतल्यावरची मानसिकता, समाजाचा दृष्टिकोन अशा सगळ्या अंगानी अतिशय नेमक्या शब्दात, सुस्पष्टपणे मांडणी केल्यानं हे पुस्तक या महिला गुन्हेगारांचा जीवन परिचय करून देण्याबरोबरच अनेकांच्या डोळ्यांवरील झापडं बाजूला सारणारं आहे.

उत्तम ललित लेखिका असलेल्या सुरेखा बोर्‍हाडे यांनी या पुस्तकात कुठंही भाषेचा फुलोरा फुलवला नाही. जे आहे, जसं आहे तसं मांडण्याची आणि त्यातून त्यांचं जीवन वाचकांसमोर उभं करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मैत्रेयी-गार्गीपासूनचा वारसा सांगताना आणि दुर्गा-कालिका म्हणून तिची पूजा करताना आपण समाज म्हणून किती नालायक आहोत हे सातत्यानं दिसून आलंय. यातील अकरा व्यक्तिरेखा या आपल्या मुर्दाड मानसिकतेच्या वेलीवर आलेली फळं आहेत. हे असं भविष्यात व्हायचं नसेल तर अजूनही आपला दृष्टिकोन बदलायला हवा याचं भान देणारं हे पुस्तक आहे. महिला दिनाचे, स्त्री शक्तिच्या गौरवाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू असताना स्त्रियांचं हे रूपही जरूर अभ्यासावं. त्यातून काही बोध घेता आला तर उत्तम! अन्यथा ‘बाईची भाईगिरी’ पुरूषी अहंकाराची मक्तेदारी नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही हे तर खरंच.

– घनश्याम पाटील
7057292092

‘चपराक’चे हे आणि इतरही पुस्तके घरपोहच मागविण्यासाठी आमच्या  shop.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. आमच्या 7057292092 या क्रमांकावरूनही आपण आपली मागणी नोंदवू शकाल.

To order this book click here

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध”

  1. Ravindra Kamthe

    अतिशय दाहक सत्य व बाईच्या आयुष्याची मन हेलावून टाकृणारी कहाणी वाचतांना जीव कासावीस होतो हेच लेखिका सुरेखाताई बोराडे यांच्या “बाईची भाईगीरी”चे यश आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा