केंद्र सरकार एनआरसी राबविण्याच्या तयारीत आहे. शिवाय २०२४च्या निवडणुकांपूर्वी समान नागरी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक सांस्कृतिक उपक्रमाचं नियोजन सरकार करतंय. ते म्हणजे धर्मांध कर्मठांच्या रोषाला बळी पडून राजधानीत ज्याची धिंड काढून शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ज्यानं अक्षरशः स्वजनांचे शिव्याशाप खाल्ले नि अखेर मरण पत्करलं, अशा शहाजहानपुत्र आणि औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह यांची स्मृती जागविण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी त्याला दफन केलेल्या कबरीचा धांडोळा घेतला जातोय पण सरकारनं केवळ त्यावरच न थांबता त्यांची साहित्यसंपदा प्रकाशित करावी. याशिवाय दारा शुकोह यांच्या नावानं एखादा सन्मान सुरू करावा!
केंद्र सरकारातले काही अधिकारी सध्या मोगल काळातल्या एका मुस्लिम व्यक्तिची कबर शोधताहेत. या मुस्लिम व्यक्तिचं नाव आहे दारा शुकोह…! मात्र या कामाची प्रसिद्धी सरकार फारशी करत नाही. दारा शुकोहला एक खुल्या विचाराचा मुस्लिम नेता समजलं जातं. दारानं हिंदू धार्मिक ग्रंथांचा अनुवाद केला होता ज्यात उपनिषदं आणि भगवद्गीताचा समावेश आहे. या ग्रंथांचा त्यानं फारसी भाषेत अनुवाद केलाय. ज्यामुळं जास्तीतजास्त लोकांपर्यंत ते साहित्य पोहोचलं जाईल अशी त्यांची इच्छा होती. सध्या ज्यांची कबर सरकार शोधतेय. त्यांची कोणतीच माहिती आज तरी कुठंही उपलब्ध नाही पण त्याचं शोधकार्य सध्या जोमानं सुरू आहे. त्यांना सरकार ‘सच्चा मुसलमान’ म्हणून गौरव करणार आहे. या शोधकार्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केलीय. गेली सहा महिने त्या कबरीचा शोध समिती घेतेय पण हे शोधकाम अत्यंत अवघड आणि जटिल आहे. ज्या मोगल काळात जे कोणी मुस्लिम राज्यकर्ते मारले गेले त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी दफन करण्यात आलं होतं. हुमायूनच्या मकबर्याजवळ सर्वाधिक कबरी आहेत. म्हणजे जवळपास दीडशेच्या आसपास कबरी आहेत. त्यातल्या अनेक कबरींवर त्या कुणाच्या आहे हे लिहिलेलं वा नोंदलेलं नाही. त्यामुळं कोणती कबर ही दारा शुकोह यांची आहे हे शोधणं अतिकठिण होऊन बसल्याचं समजलं जातंय. दारा शुकोहची हत्या केल्यानंतर त्यांचं धड हुमायूनच्या मकबरेजवळ दफन केलं गेलं, जिथं बादशहा अकबर याचे पुत्र दानियाल आणि मुराद यांना दफन केलं होतं. त्यानंतर तैमुर वंशाच्या शहजादांना दफन केलं होतं आणि दारा शुकोह यांचं मुंडकं ताजमहालच्या परिसरात कुठंतरी दफन केलं. फ्रेंच इतिहास संशोधक आणि लेखक बरनियर आपल्या पुस्तकात म्हणतात की औरंगजेब याचं म्हणणं होतं की जेव्हा कधी शहाजहानची नजर आपल्या बेगमच्या मकबरेवर पडेल तेव्हा त्याला हेही लक्षात येईल की आपल्या पुत्राचं मुंडकं देखील तिथं सडत पडलंय! यामुळं दाराच्या कबरीचा शोध घेणार्या अधिकार्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. त्याची नेमकी कबर आहे तरी कुठं? त्याचा ठावठिकाणा फारसा लागत नाहीये! दारानं कुराण, इतिहास, पर्शियन भाषेतल्या कवितांचा चांगला अभ्यास केला होता. तो एक चांगला साहित्यप्रेमीही होता पण त्याचे वडील आणि त्याचा भाऊ औरंगजेब हे दोघेही क्रूर शासक होते. १६२७ मध्ये दारा शुकोहचे आजोबा जहांगीर याचं निधन झालं. त्यानंतर दारा शुकोहच्या वडिलांनी सत्ता सांभाळली. त्यांनाच नंतर शहाजहान म्हणून ओळखलं गेलं. त्यानं मोगल सैन्यात काम केलेलं होतं. त्याला अलाहाबादचा सुभेदार म्हणजेच गव्हर्नर म्हणून नेमलं होतं. नंतर मुलतान, काबूलची जबाबदारी त्यानं सांभाळली. त्यानंतर स्वतःची सत्ता वाचविण्यासाठी औरंगजेबानं भाऊ दारा शुकोह यांची हत्या केली. त्यापूर्वी दारानं शीख धर्मगुरू हर राई यांच्याशी मैत्री केली होती. शिवाय अनेक हिंदू धर्मगुरूंशीही मैत्री केली होती. तो त्यांच्याशी धार्मिक आणि वैचारिक विषयावर विचारविनिमय करीत असे.
धर्माची कुरघोडी राज्यकारभारावर होऊ नये
युरोपच्या इतिहासात धर्मसत्ता नि राजसत्ता ह्यांचा तीव्र संघर्ष प्रदीर्घ काळ चालला होता आणि त्यातून अखेर ‘सेक्युलॅरिझम’चं नवनीत प्रकट झालं! धर्मसत्तेचं जोखड राजसत्तेनं झुगारलं आणि राज्यकर्ता कोणत्याही धर्माचा असो, त्यानं कोणत्याही विशिष्ट धर्माची कुरघोडी राज्यकारभारावर होऊ देऊ नये, धार्मिक बाबतीत प्रजाजनांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं, पक्षपात न करता सर्व धर्मपंथांकडं समानतेनं पाहावं हे तत्त्व सर्वधर्मसमभावाचं – सेक्युलॅरिझमचं तत्त्व अंगिकारलं गेलं! धर्मगुरूची अरेरावी नि असहिष्णुता ह्यांच्या आगीत दीर्घकाळ होरपळलेल्या युरोपात सर्वधर्मसमभावाचा यशोदुन्दूभी विशेष निनादला. ह्यात नवल नाही पण भारतात, धर्मसत्ता नि राजसता ह्यांचं सर्प-मुंगसासारखं वैर कधीच निर्माण झालं नसल्यामुळं इथं ‘सेक्युलॅरिझम’चे स्पेशल नगारे बडवण्याचं कारणच नव्हतं! ‘साधनानां अनेकता’ हे तत्त्व देशाच्या हाडी-मांसी हजारो वर्षापासून भिनलेलं!
‘आकाशात पतितं तोयं, यथा गच्छती सागर:…!’ या सुभाषिताप्रमाणे ‘तुम्ही कोणत्याही देवाला कसंही वंदन करा, ते अखेर या जगताच्या मुखाशी असलेल्या परमेश्वरालाच पोहोचतं,’ अशी दिलदार धारणा असलेला हा देश! रेव्हरंड टिळकांच्या शब्दांत सांगावयाचं झालं तर,
भिन्न दिशांनी सरिता नाले ।
जरी कितीही वाहत असले ॥
एक नदीपति त्यांच्या पुढती ।
का मग बोंबाबोंब?॥
असा स्पष्ट सवाल संकुचित धर्मांधांना सदैव विचारीत आला! पण तरीही जेव्हा या भूमीवर धर्माधर्माचं आणि जातीजातीचा तीव्र संघर्ष सुरू झाला तेव्हा
महजब नहीं सिखाता, आपस में बैर रखना ।
हे सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. धर्मांध वा जात्यांध माथेफिरूंना ताळ्यावर आणण्यासाठी इथल्या मूलभूत सेक्युलर संस्कृतीला ‘सर्वधर्मसमभाव’चा पुरस्कार करावा लागला!
हिंदू संस्कृतीत सर्वधर्मसमभाव मुरलेला!
हा पुरस्कार ज्यानं केला नाही, सर्व धर्म हे अखेर मानवता धर्माचेच भिन्नभिन्न आविष्कार होत, असं ज्यानं मानलं नाही असा एक तरी थोर पुरूष इथं आपल्या देशात दाखवून देता येईल काय? या देशातल्या प्रत्येक युगपुरूषानं, प्रत्येक साधु-संतानं सर्वधर्मसमभावाचं तत्त्व मानलंय. यथाशक्ती पाळलंय. सेक्युलॅरिझम ही काही आजच शोधून काढलेली चीज नव्हे! आज राजकारणात विशेषत: निवडणुकीच्या राजकारणात धार्मिक वा जातीय भावनांना खतपाणी घालणार्या नि तोंडानं मात्र सर्वधर्मसमभावाचा जप करणार्या राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवावं की, इथली सर्वसामान्य जनता इथली सत्ता राजकारणाहून अधिक सर्वधर्मसमभावी आहे! कारण इथल्या सर्वसामान्य साधुसंतांच्या मानवताधर्म शिकवणीचा संस्कार तिच्या मनावर झालेला आहे. एकाच महान दर्यावर लाटा उठतात, तरंग उठतात, भोवरे निर्माण होतात, बुडबुडे उद्भवतात पण अखेर ते सारं पाणीच! तद्वत एकाच मानवता धर्माचे हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादी भिन्न भिन्न आविष्कार म्हणजे मूलत: मानव्य धर्मच होय, हीच या देशातल्या महापुरूषांची नि महात्म्यांची शिकवण! म्हणूनच
‘एक सद् विप्राः बहुधा वदन्ति’ असं म्हणणार्या प्राचीन ऋषींचा वैचारिक हुंकार ‘ईश्वर अल्ला तेरे नाम’ ह्या महात्मा गांधींच्या शब्दांतून ऐन जातीय संघर्षाच्या धुमाळीतही बाहेर पडला! हा विचार सामान्य जनतेत रूजविण्यासाठी जुन्या जमान्यातल्या भारतीय विभूतींना केवढे प्रयास पडले, ह्याची कल्पना आजच्या वाचावीरांना नाही! ती कल्पना करून देण्यासाठी जुन्या काळातल्या भारताच्या सेक्युलर प्रवासाचं संशोधन होणं आणि ते आधुनिक पिढीपर्यंत येणं हे अत्यंत जरूरीचं आहे.
सर्वधर्मसमभावावर संशोधन व्हावं
म्हणूनच सर्वधर्मसमभावावरच्या संशोधनाला सरकारनं रोख रकमेचं पारितोषिक देण्याची घोषणा करायला हवीय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख तत्त्वप्रणाली सर्वधर्मसमभाव! तिच्या प्रसाराला उत्तेजन मिळावं. ह्या उद्देशानं शिवरायांच्या सर्वधर्मसमभावावर संशोधनात्मक लिखाण करणार्यांसाठी पारितोषिक योजना शासनानं कार्यान्वित करावी! या योजनेचा तपशीलवार, नियोजनबद्ध आराखडा तयार करायला हवा. तरी ही सहेतुमूलक योजना निःसंशय प्रशंसनीय ठरणार आहे यात शंका नाही पण शिवशाहीचं नि सर्वधर्मसमभावाच्या डोळस अभ्यासकांनी काही वेगळं मतप्रदर्शन वेळीच व्यक्त करून आपली भूमिका स्पष्ट करावी. मागेच म्हटल्याप्रमाणे देशातल्या सर्वच युगपुरूष ‘सर्वधर्मसमभावा’चं तत्त्व मानणारे होते. तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा त्यात अंतर्भाव होतोच पण ‘सर्वधर्मसमभावा’ची संस्थापना हेच शिवरायांचं प्रमुख जीवित-ध्येय होतं, असं मानणं इतिहासशुद्ध ठरणार नाही. प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांच्या नावाला जोडण्याची जी टूम महाराष्ट्रात आजकाल निर्माण झालीय तिला अनुसरूनच इथं शिव-नामाचा वापर करावयाचा असेल तर गोष्ट निराळी! पण असं केल्यामुळं शिवरायांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सीमित केल्यागत होतं. शिवाय ह्या महत्त्वाच्या विषयाला ‘अव्याप्ती’चा दोष जडतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या संदर्भात ‘प्राधान्येन व्यपदेशा भवन्ति’ हा सिद्धान्त डोळ्यांपुढं ठेवून महापुरूषांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळकांनी नाट्यकलेला, गणित-विद्येला, ज्योतिर्गणिताला उत्तेजन दिलं. तेही सर्वधर्मसमभावाचेच उपासक होते पण तरीही उपयुक्त विषय हे त्याचं प्रधान क्षेत्र नव्हे, प्रधान जीवित कार्य नव्हे. स्वामी विवेकानंद संगीत शास्त्रातही प्रवीण होते पण म्हणून सरकारनं ‘विवेकानंदाचं संगीत’ या विषयावरच्या संशोधनासाठी निधी मुक्रर करणं, संयुक्तिक ठरणार नाही! हाच न्याय शिवाजी महाराजांच्या सर्व-धर्म-समभावालाही लागू आहे. शिवाय असं पहा की, शिव-चरित्राचं सर्व बाजूनं भरपूर संशोधन आधीच झालंय. त्यांच्या ‘सेक्युलरिझम’ची विस्तृत नोंद त्यांच्या अनेक विद्वान चरित्रकारांनी केलेलीच आहे. मग ह्या विषयात आणखी नवं संशोधन कोण कितीसं करणार? म्हणूनच आम्ही उपयुक्त स्तुत्य योजनेला अशी दुरुस्ती सुचवू इच्छितो की विषयाची व्याप्ती वाढवावी, म्हणजे ‘सर्वधर्मसमभावाची वाटचाल’ अथवा ‘भारतीय संतांनी पुरस्कारलेला सर्वधर्मसमभाव’ अशा प्रकारचा विषय तरूण संशोधकांपुढे ठेवावा.
‘दाराशुकोह-शिष्यवृत्ती’ ठेवण्यात यावी
‘दारा शुकोह, द मैन हू वुड बी किंग’ या पुस्तकाचे लेखक अवीक चंदा दारा शुकोह याच्या जीवनावर आधारित पुस्तकात म्हणतात, ‘सर्वधर्मसमभावाचा प्रसार हेच ज्यांचं मुख्य जीवितध्येय होय, अशा पुरूषांत शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दाराशुकोह अग्रगण्य ठरेल. तो राजकारणात कच्चा होता, रणांगणात शूर असला तरी कसलेला नव्हता पण शहाजहानचा हा लाडका पुत्र सर्वधर्मसमभावात मजबूत होता. इस्लामधर्मिय पंडितांप्रमाणेच हिंदुधर्मिय पंडितांचाही गराडा त्याच्याभोवती पडलेला असे. त्यांच्याबरोबर धर्मचर्चा करण्यात त्याचा बहुतांश वेळ निघून जाई!’ तो ‘शाहीयत’ नामक ग्रंथात म्हणतो, ‘सत्य ही कोणत्याही एकट्या धर्माची मक्तेदारी नाही!’ तो पर्शियन भाषेप्रमाणेच संस्कृतमध्येही प्रवीण होता. कुराण नि वेद ह्यांच्यात फरक नाही हे सांगताना तो म्हणतो,
‘अपौरूषेय ग्रंथोऽस्माकं कुराणं सिद्धानां वेद इत्युच्यते ।’
त्याच्या ‘मज्मा-उल्-बहरीन’ ह्या ग्रंथाचं ‘समुद्र संगम’ नामक संस्कृत रूपांतर झालंय. त्यानं ‘योग वसिष्ट्य’ इत्यादी संस्कृत ग्रंथांची फारसी रूपांतरं करवून घेतली आहेत. त्याच्या ह्या संस्कृत प्रेमावर नि धर्मातीत वृत्तीवर खूश होऊन हिंदू पंडितांनी त्याला ‘विगत-शोकसंदेहः’ अशी किताबत बहाल केली होती! अशा या थोर मोगल राजपुत्राचं सर्व चरित्र सांगण्याचं हे स्थळ नव्हे पण इतकं सांगितलं तरी पुरे की धर्मांध कर्मठांच्या रोषासच तो अखेर बळी पडला. राजधानीत त्याची धिंड काढण्यात येऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी दोन सागरांच्या संगमासाठी! ज्यानं अक्षरशः स्वजनांचे शिव्याशाप खाल्ले नि अखेर मरण पत्करलं. त्याची साधी आठवणही कोणाला होत नाही! आज पोटात जातीयता ठेवून ओठांत सर्वधर्मसमभाव बाळगणारे कैक महाभाग मानमान्यता मिळवीत असताना दारा शुकोहसारखा सच्चा सेक्युलर शहीद प्रायः विस्मृतीच्या गर्तेत पडावा हे केवढं दुर्भाग्य! म्हणूनच सर्वधर्मसमभावाचं संशोधन करणार्या तरुणांना शिष्यवृत्ती द्यावी आणि तिचं नाव ‘दाराशुकोह-शिष्यवृत्ती’ असं ठेवण्यात यावं, असं मला वाटतं.
दाराचं बालपण बुर्हाणपूरला गेलं!
दारा शुकोहचा जन्म २० मार्च १६१५ तर मृत्यू ३० ऑगस्ट १६५९ झाला. दिल्लीचा पाचवा मोगल बादशाह खुर्रम उर्फ शहाजहान जन्म १५९२, मृत्यू १६६६. याचा मुलगा आणि चौथा बादशाह जहांगीर याची कारकीर्द १६०५-२७ अशी होती, याचा हा नातू. शहाजहानची द्वितीय पत्नी अर्जुमंद बानो बेगमपासून अजमेर इथं हा जन्मला. त्याचं नाव जहांगीरनं प्राचीन इराणी राजा दारियसच्या नावावरून ‘दारियसप्रमाणे राजबिंडा’ अशा अर्थी ठेवलं. दाराला जहांआरा, हुरून्निसा या बहिणी, तर शाह शुजा, औरंगजेब आणि मुरादबक्ष हे भाऊ होते. प्रथेप्रमाणे दारा चार वर्षे, चार महिने आणि चार दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता करण्यात आली आणि त्याचा मोठा समारंभ आयोजित केला गेला. त्याचं बालपण अधिकतर बुरहानपूरमध्ये गेलं. शहाजहाननं बापाविरुद्ध बंड पुकारल्यानंतरच्या स्वार्यांत त्याचा कुटुंबकबिलाही सोबत असे. त्यातच दारानंही देशभर प्रवास केला. अखेरीस १६२६ साली शहाजहाननं शरणागती पत्करल्यावर दारासह अन्य राजपुत्रांनी जहांगीरच्या आदेशावरून राजधानी आग्र्याचा रस्ता धरला. शाहजहाननं पुढं बंड करू नये, यासाठी त्याच्या पुत्रांना ओलीस ठेवून घेतलं गेलं. तेथून जहांगीरसोबतच दारानं लाहोर आणि काश्मीरचाही प्रवास केला. जहांगीरनंतर शहाजहान आणि त्याच्या भावांमध्ये युद्धे झाली. त्यांत शहाजहान विजयी ठरला आणि तो मोगल बादशाह झाला. शहाजहाननं १६३० मध्ये आपला दरबार बुरहानपूरला हलवला. तिथंच दारानं चित्रकारांकडून काही चित्रे तयार करून घेतली आणि त्यांना प्रस्तावना लिहून एक चित्रसंग्रह अल्बम तयार केला. सुलेखन-कला आणि एकूणच साहित्यनिर्मितीचा हा त्याचा पहिला प्रयत्न होता. जहांगीरचा दिवंगत भाऊ परवेझ याची मुलगी नादिरा बानू हिच्याशी दाराचं १६३३ मध्ये लग्न झालं. या लग्नाला तत्कालीन तब्बल ३२ लाख रूपये खर्च आला. १६३४ सालच्या जानेवारी महिन्यात दारा आणि नादिरा बानू यांना एक मुलगी झाली पण ती अल्पवयीन ठरली. लाहोरमध्ये दाराचा मियां मीर या कादिरीपंथीय सूफी संत आणि त्यांचा शिष्य मुल्ला शाह यांच्याशी परिचय झाला. पुढं मुल्ला शाहनं इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याच्या आरोपाखाली त्याला मारण्याचा फतवा काही मौलवींनी काढला तेव्हा दाराच्याच मध्यस्थीनं तो फतवा शहाजहाननं रद्द केला. दाराला १६३५ ला सुलेमान आणि १६३८ मध्ये मेहेर अशी मुलं झाली. दारानं सफिनात-उल-औलिया हा ग्रंथ १६४० मध्ये रचला. सूफी पंथातल्या कादिरी, चिश्ती, कुब्रावी, सुहरावर्दी या चार महत्त्वाच्या शाखांमधल्या चारशे संतांची चरित्रं हा या ग्रंथाचा विषय होता तसंच त्यानं आध्यात्मिक विषयांवर ‘कादिरी’ या नावाखाली काव्यरचना केली. इराणी सफावी सत्तेशी लढण्याकरिता १६४२ मध्ये दारा कंदाहारच्या मोहिमेवर निघाला. लाहोरपर्यंत पोहोचल्यावर तत्कालीन सफावी बादशहा शाह शफी मरण पावल्याचं समजल्यावर मोहिमेची गरज संपल्यानं तो पुन्हा आग्र्यात परतला. त्यानंतर त्यानं १६४३ मध्ये सकिनात-उल-औलिया हा ग्रंथ पूर्ण केला. यात संतांच्या आठवणी आणि दाराची अध्यात्म साधना याबद्धलचं विवेचन आहे.
मिर्झाराजे जयसिंग यांची नात दाराची सून
काश्मीरच्या वास्तव्यात दारानं ‘रिसाला-इ-हकनुमा’ नामक अध्यात्म साधनाविषयक १६४५ मध्ये ग्रंथ लिहिणं सुरू केलं. त्याच वर्षी जून महिन्यात त्याला चुनार आणि रोहतास या महत्त्वाच्या किल्ल्यांसह अलाहाबाद प्रांताची सुभेदारी देण्यात आली. शहाजहाननं दाराच्या मुलांचा शिक्षक बाकी बेग याला तिकडं पाठवून दाराला दरबारातच ठेवलं. या दरम्यान दारानं शेख मुहिब्बुल्लाह मुबारिझ नामक एका प्रसिद्ध चिश्तीपंथीय सूफी संताशी पत्रव्यवहार सुरू केला. १६४६ला बाल्खच्या मोहिमेत भाग घेण्याकरता दारा लाहोरपर्यंत गेला आणि त्याची पत्नी नादिरा आजारी असल्यावरून तिथं तो काही महिने थांबला. यावेळी त्यानं तिला एक चित्रसंग्रह भेट दिला आणि ‘हकनुमा’ ग्रंथही पूर्ण केला. या ग्रंथात त्यानं त्रिमूर्ती, योगचक्रे इ. हिंदू संकल्पनांचं वर्णन केलेलं आहे. या सुमारास एक तत्त्वज्ञ म्हणून दाराची प्रसिद्धी झाल्यानं ‘इलाजात-इ-दाराशुकोही’ या वैद्यकीय कोशाला त्याचं नाव देण्यात येऊन त्यात त्याची स्तुती केलेली आढळते. शहाजहाननं दाराला मार्च १६४७ ला अलाहाबादसोबतच पंजाबचाही सुभेदार नेमलं. दारानं काश्मीरमध्ये परिमहालासारखी इमारत बांधली. काश्मीरमध्ये असतानाच त्यानं १६५१ मध्ये थोरला मुलगा सुलेमानचं लग्न ख्वाजा अब्दुल अझीझ नख्शबंदीच्या नातीशी लावलं. १६५२ ला सफावी सत्तेकडून कंदाहार हस्तगत करण्यासाठी शहाजहाननं दाराला पाठवलं. मोठे सैन्य, एक कोटी रूपये आणि मोठ्या तोफांसह दारा तिथं १६५३ मध्ये पोहोचला. १५ मे १६५३ रोजी प्रत्यक्ष स्वारी सुरू झाली. या आधीच्या कंदाहार मोहिमांत भाग घेतलेल्या अनुभवी सरदारांऐवजी दारानं जाफर नामक अननुभवी तोफखाना प्रमुखावर भिस्त टाकली. जाफर दिलेल्या आश्वासनांना प्रत्यक्षात आणू शकला नाही. याशिवाय जाफर आणि मीरबक्षी मिर्झा अब्दुल्ला, दारा आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात भांडणं झाली. अखेरीस निकराच्या प्रयत्नानं किल्ल्याची तटबंदी भेदूनही जाफर आणि अन्य अधिकार्यांच्या ढिसाळपणामुळं सफावी सत्तेनं मोगल सैनिकांना परतवून लावलं. मोहीम अयशस्वी झाल्यानं जानेवारी १६५४ मध्ये दारा दिल्लीत परतला. या दरम्यान दारानं ‘हसानत-उल-आरिफिन’ हा १६५४ मध्ये सूफी संतवचनसंग्रहावरचा ग्रंथ पूर्ण केला. दिल्लीतल्या वास्तव्यात दारानं ऑक्टोबर १६५४ ला मिर्झाराजे जयसिंगाशी संधान बांधलं आणि त्याचा पुतण्या अमरसिंगच्या मुलीशी स्वत:चा मुलगा सुलेमानचं लग्न लावलं. मेवाडचा असंतुष्ट राणा करणसिंग आणि मोगलांत दारानं यशस्वी वाटाघाटी घडवून आणल्या. दारानं हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला. यासाठी त्याला कवींद्राचार्य सरस्वती, ब्रह्मेंद्र सरस्वती, जगन्नाथ इ. पंडितांचं साहाय्य लाभले. रजपूत राजांशी येणार्या वाढत्या संपर्काचा हा परिणाम असल्याचं काही संशोधकांचं मत आहे. या खेरीज दारानं जेझुईटपंथीय ख्रिश्चन पाद्य्रांकरवी ख्रिस्ती धर्माचा आणि सरमद नामक पूर्वाश्रमीच्या ज्यू करवी ज्यू धर्माचाही अभ्यास सुरू केला. शहाजहाननं आपल्या साठाव्या वाढदिवशी दाराला आपला वारस आणि भावी बादशाह घोषित केलं आणि ‘शाह बुलंद इकबाल’ हा किताब देऊन दरबारात सिंहासनाजवळ एका खुर्चीत बसण्याचा बहुमानही दिला. याच वर्षी दारानं ‘मजमू-अल-बहरिन’ हा ग्रंथ लिहिला. इस्लाम आणि हिंदू धर्मांमधील आंतरिक आध्यात्मिक सत्य एकच असल्याचं प्रतिपादन त्यानं या ग्रंथात केलेले आहे. १६५५ मध्ये याचं संस्कृतभाषांतरही ‘समुद्रसंगम’ या नावं पूर्ण झालं. याशिवाय त्यानं लघुयोगवसिष्ठाचंही ‘जोग बसिश्त’ नामक फार्सी भाषांतर करवून घेतलं.
दारा तेथून निसटून लाहोरला गेला
दारानं उपनिषदांचे फार्सी भाषांतर १६५७ मध्ये करवून घेणं सुरू केलं. एकूण पन्नास उपनिषदं यासाठी संस्कृत पंडितांकडून निवडण्यात आली. पंडितांकडून हिंदी सारांश ऐकून फार्सीप्रवीण मुल्ला-मौलवींनी त्याचं भाषांतर केलं. याला ‘सिर्र-इ-अकबर’ असं नाव देण्यात आलं. हे काम सहा महिन्यांत पूर्ण झालं. कुराणात उल्लेखिलेलं ‘किताब मक्नुन’ अर्थात गुप्त पुस्तक म्हणजे उपनिषदेच होतं, असं प्रतिपादन यात दारानं केलं. याशिवाय इतरही अनेकप्रकारे उदाहरणे देऊन इस्लामी परंपरेत वेद आणि उपनिषदांना बसवण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. यानंतर शहाजहान आजारी पडला आणि दारा त्याची काळजी घेऊ लागला. काही काळानं शहाजहानला बरे वाटल्यावर तो हवापालटासाठी आग्र्याला गेला. या दरम्यान शहाजहानच्या मृत्युच्या अफवा उठल्यानं बंगालचा सुभेदार आणि दाराचा सख्खा भाऊ शुजा यानं स्वत:ला बादशाह घोषित केलं. त्याचा सामना करण्यासाठी दारानं त्याचा मुलगा सुलेमानला फेब्रुवारी १६५८ मध्ये मिर्झाराजे जयसिंगासोबत पाठवलं. दोहोंत काशीजवळ बहादुरपूर इथं लढाई झाली आणि शुजाचा पराभव झाला परंतु तो यशस्वीरित्या निसटला. पाठोपाठ दाराचा दुसरा भाऊ मुरादनंही स्वत:ला बादशाह घोषित केलं आणि वर्हाडात बदलीचं फर्मान धुडकावलं. औरंगजेबानं शहाजहानची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. शुजा आणि मुरादशीही संधान बांधलं. यानंतर अनेक लढाया झाल्या. धर्माट इथं औरंगजेब आणि मुरादच्या संयुक्त सैन्यानं शाही सैन्याचा पराभव केला. सुलेमान शुकोह आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी बंगालमध्ये शहाजहानच्या आज्ञेवरून शुजाशी तह केला; परंतु परतण्यास मात्र जयसिंगानं बराच उशीर केला. यानंतरच्या शामूगढच्या लढाईत औरंगजेबानं दाराचा पराभव केला. दारा तेथून निसटून लाहोरला गेला. शहाजहान आणि दारा दोघांनीही मुराद आणि शुजाला औरंगजेबाविरूद्ध फितवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दारानं लाहोरमध्ये सैन्य उभं करण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर दारा औरंगजेबाच्या पाठलागाला तोंड देत पंजाब, सिंध आणि अखेरीस गुजरातमध्ये पोहोचला. यावेळी दारासोबत कुटुंबाखेरीज फक्त दोन हजार सैनिक होते. तिथून पुन्हा मुलतानमार्गे कंदाहारला जाताना वाटेत बोलन खिंडीजवळ दाराची पत्नी नादिरा आजारपणामुळं मरण पावली. तिथल्याच मलिक जीवन नामक एका जमीनदारानं दाराला पकडून औरंगजेबाच्या हवाली केलं. औरंगजेबानं दाराला ठार मारलं. दाराला सुलेमान, मेहेर, सिपिहर हे मुलगे आणि पाकनिहाद बानो आणि जहांझेब बानो या मुली होत्या. पैकी सुलेमानलाही नंतर मारण्यात आलं मात्र उर्वरित मुलामुलींची लग्ने औरंगजेबानं स्वत:च्या आणि शुजा व मुरादच्या मुलांशी लावली. कोणत्याही मोगल बादशाहपेक्षा दाराचं ग्रंथप्रेम आणि हिंदू धर्माबद्दलची उत्सुकता अनेकपटींनी जास्त होती. त्याला प्रशासनाचाही प्रत्यक्ष अनुभव तुलनेनं उशिरा का होईना आलाच होता; तथापि लढाई आणि एकूण राजकारणात तो त्याच्या भावांपुढे अयशस्वी ठरला.
दारा शुकोहवर ५ विद्यापीठांत रिसर्च पॅनल
‘दारा शिकोह हा खरा हिंदुस्तानी आणि भारतीयत्वाचा प्रतीक होता!’ मुघलसम्राट शाहजहानचे ज्येष्ठ सुपुत्र दारा शुकोह यांच्याबद्दलचं हे मत तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी व्यक्त केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून संघ औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोह याचा ‘खरा मुस्लिम’ असं वर्णन करून त्यांचं जीवन आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडंच संघानं दारावर संशोधन प्रकल्पही सुरू केलाय. आगामी काळात दारा यांच्या विचारांना पुढं नेण्यासाठी संघ आणखी नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. ‘मीडिया रिपोर्ट्स’मध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. २०१७ मध्ये संघ प्रचारक चमललाल यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात दारा शुकोह याच्याबाबत चर्चा झाली होती. यानंतर २०१९ मध्ये दारा शुकोह प्रकल्पाचं काम संघाचे सहकारी कृष्ण गोपाल यांच्याकडं सोपवण्यात आलं. गोपाल यांनी यासंदर्भात अनेक बैठका आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. आता संघानं दारा शुकोह याच्या जीवनाचा आणि शिकवणुकीचा प्रचार करण्याचा प्रकल्प सुरू केलाय. या प्रकल्पांतर्गत दारा शिकोह याच्या कलाकृतींवर संशोधन केलं जाणार असून त्याच्या पुस्तकांचं विविध भाषांमध्ये भाषांतर केलं जाणार आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीनं अलीकडंच दारा शुकोह सेंटर अंतर्गत परस्पर संवादासाठी एक पॅनेल तयार करण्याची घोषणा केलीय. या पॅनेलमध्ये हिंदुंबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन विद्वान हिंदू इतिहास आणि श्रद्धा यावर संशोधन करणार्या अभ्यासकांचा समावेश आहे. लवकरच जामिया मिलिया इस्लामिया, मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हे देखील असंच एक पॅनल तयार करणार आहेत. राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ यांना दारा शुकोह यांच्यावरच्या संशोधनात संघाला मदत करण्यासाठी सामील करण्यात आलंय. यासोबतच, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरला या विषयावर मुस्लिम विचारवंतांशी संपर्क वाढवण्याचं काम सोपवण्यात आलंय.
दारा शुकोह यांची कबर शोधण्यासाठी समिती स्थापन
२०२० मध्ये, दारा शिकोह यांच्या कबरेचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं पुरातत्व शास्त्रज्ञांची ७ सदस्यीय समिती स्थापन केली होती. १६५९ मध्ये दारा शुकोह यांच्या हत्येनंतर त्यांना औरंगजेबानं दिल्लीतल्या हुमायूनच्या मकबर्यात दफन केलं होतं. हुमायूनच्या मकबर्यात जवळपास दीडशे कबरी आहेत आणि तिथं मकबर्याच्या मध्यभागी असलेल्या हुमायूनच्या कबरेशिवाय इतर कोणतीही कबर ओळखणं कठीण आहे. दिल्लीतल्या हुमायूनचा मकबरा, जिथं दारा शुकोह याला अज्ञात कबरमध्ये दफन करण्यात आलं होतं. याच कबरीची ओळख पटवण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारनं पुरातत्व विभागावर सोपवलीय. शहाजहानचा राजेशाही इतिहासकार मोहम्मद सालेह कंबोह लाहोरी यांनी त्यांच्या ‘शहाजहाँनामा’ या पुस्तकात लिहिलं आहे की, जेव्हा दारा शुकोहला अटक करून दिल्लीत आणण्यात आलं तेव्हा त्याच्या अंगावर घाणेरडे कपडे होते. काही दिवसांनी औरंगजेबानं त्यांना ठार मारलं. त्याच घाणेरड्या आणि रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्ये त्याचा मृतदेह हुमायूनच्या मकबर्यात पुरण्यात आला.
संघ दारा शुकोह यांच्या प्रचारात का व्यग्र आहे?
गेल्या काही वर्षात सरकारनं दारा शुकोह यांच्या प्रचारावर जोर दिलाय. २०१६ मध्ये दिल्लीतल्या औरंगजेब रोडचं नाव बदलून दारा शुकोह रोड असं करण्यात आलं. २०१७ मध्ये, राष्ट्रपती भवनाजवळच्या डलहौसी रोडचं नाव बदलून दारा शुकोह रोड असं करण्यात आलं. दारा शुकोह यांच्या प्रचाराचं कारण काय? किंबहुना अनेक इतिहासकार औरंगजेबला कट्टरवादी आणि इतर धर्मांबद्दल भेदभाव करणारा मुस्लिम म्हणून पाहतात. औरंगजेबानं काशी, मथुरेसह अनेक शहरांतली प्रसिद्ध हिंदू मंदिरं नष्ट केली होती. २०१९ मध्ये संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल म्हणाले होते की, जर औरंगजेबाच्या जागी दारा शुकोह मुघल सम्राट असते तर देशाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती आणि हिंदू आणि मुस्लिम संबंध सुधारले असते! या विधानावरून संघ दारा यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न का करत आहेत हे कळतं. औरंगजेबाची प्रतिमा हिंदुविरोधी असल्याचं जाणकारांचं मत आहे तर दारा शुकोह हिंदुंप्रती उदारमतवादी होते आणि त्यांनी हिंदू उपनिषदांचं भाषांतर करून हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं. या कारणास्तव संघ दारांचा प्रचार करण्यात व्यग्र आहे. संघ दारा यांना उदारमतवादी मुस्लिम चेहरा मानतो, म्हणून मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून पुढं आणायचा आहे. दारा शुकोहचा प्रचार करून संघाला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेशही द्यायचा आहे, असं जाणकारांचं मत आहे. गेली अनेक वर्षे संघ मुस्लीम समाजाला त्यांच्याशी जोडण्यासाठी आपली पोहोच वाढवण्यात ताकद लावत आहे. दारा शुकोह याचा प्रचार हा त्या योजनेचा एक भाग आहे. आजच्या काळात संघ दोन धर्मांमधल्या समन्वयाची एक आशेचा किरण शोधत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच केलेल्या विधानातही त्याचा प्रत्यय येतो. काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद वादावर मोहन भागवत यांनी हिंदुंना प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध न घेण्याचं आवाहन केलंय. न्यायालयानं मात्र आता त्याला संमती दिलीय. संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी दारा शुकोह याच्याबद्धल चुकीचं वर्णन केल्यामुळं इतिहासकारांवर टीका केली होती. दारा शुकोह यांनी इस्लाम आणि हिंदू धर्मात ऐक्य साधण्यासाठी प्रयत्न केला असं संघाचं म्हणणं आहे.
दारा शुकोह हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रवर्तक
दारा शुकोह यांचा जन्म २० मार्च १६१५ रोजी राजस्थानमधल्या अजमेर इथं झाला. शुकोह हे मुघल सम्राट शहाजहान आणि त्यांची दुसरी पत्नी मुमताज महल यांचे पुत्र होते. शहाजहाननं त्यांचं नाव दारा ठेवलं, ज्याचा पर्शियन भाषेत अर्थ खजिना किंवा तार्यांचा मालक असा आहे. दारा शुकोह यांना १३ भावंडं होती, त्यापैकी फक्त ६ जगली; ती अशी – जहाँआरा, शाह शुजा, रोशनआरा, औरंगजेब, मुराद बक्श आणि गौहारा बेगम. दारा शुकोह यांनी १६३३ मध्ये नादिरा बानोशी विवाह केला. दारा शुकोह हे अतिशय उदारमतवादी होते. ऑर्थोडॉक्स-पुरातत्त्ववादी विचार नसलेले मुस्लिम मानले जातात. दारा यांना इस्लाम आणि विशेषतः हिंदू धर्मात रस होता. दारा यांनी केवळ इस्लामचाच नव्हे तर हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्मांचाही आदर केला. त्यांनी सर्व धर्मांकडं समान नजरेनं पाहिलं. दारानं अनेक हिंदू मंदिरांनाही दान दिल्याचं सांगितलं जातं. किंबहुना दारा शुकोह यांच्याकडून उपनिषदांचं फारसी भाषेत भाषांतर करून घेण्याचा फायदा असा झाला की ते युरोपपर्यंत पोहोचले आणि तिथून त्याचं लॅटिन भाषेतही भाषांतर झालं ज्यामुळं उपनिषद आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्यास मदत झाली. दारा शुकोह यांचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक, मजमा-उल-बहारिन – ‘द कॉन्फ्लुएंस ऑफ द टू सीज’ म्हणजेच ‘दोन समुद्रांचा संगम’. या पुस्तकात वेदांत आणि सूफीवाद यांचा तौलनिक अभ्यास आहे. दारा शुकोह यांचा नादिराशी झालेला विवाह मुघल इतिहासातल्या सर्वात महागड्या विवाहांमध्ये मानला जातो. त्यावेळी भारत दौर्यावर आलेल्या इंग्लंडच्या पीटर मँडी यानं त्या लग्नात ३२ लाख रूपये खर्च झाल्याचं लिहिलं आहे. एकट्या वधूच्या वस्त्रांची किंमत ८ लाख रुपये होती. एक छायाचित्र दारा शुकोह यांच्या लग्नसोहळ्यातलं आहे. यामध्ये घोड्यावर बसलेल्या दारांच्या मागे त्यांचे भाऊ शाह शुजा आणि औरंगजेब आहेत.
शाहजहानने आपला उत्तराधिकारी घोषित केला
दारा शुकोह यानं आपला उत्तराधिकारी व्हावं अशी शहाजहानची नेहमीच इच्छा होती परंतु असं कधीच होऊ शकलं नाही. १६५२ मध्ये शहाजहाननं दरबारात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून दारांना गादीवर बसवलं आणि त्याला बादशहाचा उत्तराधिकारी ‘शाह-ए-बुलंद इक्बाल’ घोषित केलं. दारा शुकोह याला युद्धापेक्षा तत्त्वज्ञान आणि सूफीवादात जास्त रस होता असं इतिहासकारांचं मत आहे. इतिहासकार अविक चंदा यांनी आपल्या पुस्तकात म्हणजे ‘दारा शुकोह : द मैन हू वुड बी किंग’मध्ये लिहिलं आहे की, ‘दारा शहाजहान यांचे अत्यंत प्रिय पुत्र होते. लष्करी मोहिमेवर न पाठवता शहाजहान दारांना दरबारातच ठेऊन घेत असे. त्याच वेळी शहाजहाननं औरंगजेबाला वयाच्या १६ वर्षी लष्करी मोहिमेसाठी दक्षिण भारतात पाठवलं. १६५७ मध्ये शहाजहान आजारी पडल्यानंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकाराचं युद्ध सुरू झालं. दारा यांच्यासमोर धाकटा भाऊ औरंगजेब याचं सर्वात मोठं आव्हान होतं. ३० मे १६५८ रोजी दारा शिकोह आणि त्यांचे दोन धाकटे भाऊ औरंगजेब आणि मुराद बक्श यांच्यात आग्रापासून १३ किमी अंतरावर ‘समुगडची लढाई’ झाली. या युद्धात दारांचा पराभव झाला. विजयानंतर औरंगरजेबानं आग्य्राचा किल्ला ताब्यात घेतला आणि ८ जून १६५८ रोजी वडील शाहजहान यांना गादीवरून काढून आग्रा इथं कैद केलं. मार्च १६५९ मध्ये दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात दुसरं युद्ध झालं. आजमेरजवळच्या देवराईच्या युद्धात दारांचा पुन्हा पराभव झाला. इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या ‘औरंगजेबाचा इतिहास’ या पुस्तकात लिहितात, ‘दारा काही घोडेस्वारांसह आग्रा किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पोहोचले. संपूर्ण शहरात शांतता पसरली होती. जणू काही शहर शोक व्यक्त करत होतं. दारा शुकोह मुघल साम्राज्याच्या लढाईत हरले होते!’
औरंगजेबाने दारा शुकोह यांना केले कैद
युद्धातल्या पराभवानंतर औरंगजेबानं दारांना कैद करून दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवलं. इतिहासकारांचं म्हणणं आहे की, दारा शुकोह लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि औरंगजेबाला हे दाखवून द्यायचं होतं की केवळ लोकांमध्ये लोकप्रिय होऊन भारताचा सम्राट होऊ शकत नाही. औरंगजेबानं दारा यांच्यासोबत जो क्रूरपण केला त्याचा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केला आहे. फ्रेंच इतिहासकार ऋीरपॉेळी इशीपळशी यांनी त्यांच्या ’ढीर्रींशश्री ळप ींहश र्चीसहरश्र एाळिीश’ या पुस्तकात लिहिलंय की, ‘दारा यांना साखळदंडानं बांधून हत्तीवर बसवून दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवण्यात आलं. जगातल्या सर्वात श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये आपल्याच लोकांसमोर अपमानित होत होता. त्यांची ही अवस्था पाहून तिथं उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले. इतिहासकार अविक चंदा लिहितात की, ‘औरंगजेबाचे सैनिक जेव्हा दारा यांना दिल्लीच्या रस्त्यांवरून नेत होते तेव्हा एक भिकारी त्यांना ओरडून म्हणाला, ‘एकेकाळी तू राजा होतास, तेव्हा तू मला दान देत होतास. आज तुमच्याकडं देण्यासारखं काही नाही!’ हे ऐकलं अन् दारा यांनी खांद्यावरची शाल काढली आणि भिकार्याच्या दिशेनं फेकली. काही दिवसांनी ३० ऑगस्ट १६५९ रोजी औरंगजेबानं दारांची हत्या केली. औरंगजेबानं दारांचं शिर ताटात सजवून आग्रा इथं कैदेत असलेल्या शहाजहानला अनमोल भेट म्हणून पाठवलं होतं. शहाजहाननं जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यानं हंबरडा फोडला. काही इतिहासकारांच्या मते, दारांचं शरीर दिल्लीतल्या हुमायूनच्या मकबर्याजवळ दफन करण्यात आलं होतं तर त्यांचं शिर आग्रा इथल्या ताजमहालाजवळ औरंगजेबानं दफन केलं होतं. त्यामुळं आता दारा शुकोह यांची कबर नेमकी कोणती आणि तीच खरी कशावरून हे सिद्ध करणं या समितीपुढं एक आव्हान आहे! त्याचा शोध लागेल तेव्हा लागेल पण सरकारनं दारा शुकोह यांच्या नावानं शिष्यवृत्ती आणि पुरस्कार जाहीर करायला काय हरकत आहे?
दाराची कबर शोधणं हे जटिल व अवघड काम
मुघल बादशाह शहाजहानच्या काळातल्या इतिहासकारांचं लेखन आणि काह कागदपत्रांवरून दारा शुकोहला दिल्लीत हुमायून मकबर्याशेजारीच दफन केलं असावं, असा अंदाज आहे. दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी मोदी सरकारनं पुरातत्त्व शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती साहित्य, कला आणि वास्तुकला यांच्या आधारे दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करतेय. दारा शुकोह बादशाह शहाजहान यांचे थोरले चिरंजीव होते. मुघल परंपरेनुसार वडिलांनंतर खरंतर तेच उत्तराधिकारी होते. मात्र, शहाजहान आजारी पडल्यानंतर त्यांचे तिसर्या क्रमांकाचे चिरंजीव औरंगजेबनं त्यांना सिंहासनावरून पायउतार करत आग्र्यात कैद केलं. त्यानंतर औरंगजेबानं स्वतःला बादशाह घोषित केलं आणि सिंहासनाच्या लढाईल थोरला भाऊ दारा शिकोहला हरवून त्यालाही कैद केलं.
शहाजहान यांचे शाही इतिहासकार मोहम्मद सालेह कम्बोह लाहोरी ‘शहाजहाननामा’ या आपल्या पुस्तकात लिहितात, ‘शहजादा दारा शुकोहला अटक करून दिल्लीला आणण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अंगावर मळलेले कपडे होते. इथून त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं एखाद्या बंडखोराप्रमाणे हत्तीवर बसवून खिजराबादला नेण्यात आलं. काही काळ त्यांना एका छोट्याशा आणि अंधार्या जागी ठेवण्यात आलं. यानंतर काही दिवसातच त्यांच्या मृत्युचा आदेश काढण्यात आला.’
ते लिहितात, ‘काही जल्लाद त्यांचा खून करण्यासाठी कारागृहात गेले आणि क्षणात त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याच मळक्या आणि रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्ये त्यांचं पार्थिव हुमायूनच्या मकबर्याशेजारी दफन करण्यात आलं.’ त्याच काळातले आणखी एक इतिहासकार मोहम्मद काजिम इब्ने मोहम्मद अमीन मुंशी यांनीही आपल्या ‘आलमगीरनामा’ या पुस्तकात दारा शुकोहच्या कबरीचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, ‘हुमायूनच्या मकबर्यात बादशहा अकबरचे चिरंजीव दानियाल आणि मुराद यांचं पार्थिव ज्या घुमटाखाली दफन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी दाराचं पार्थिवही दफन करण्यात आलं. पुढे तैमूर वंशाचे शहजादे आणि शहजाद्यांनाही याच ठिकणी दफन करण्यात आलं होतं.’
अहमद नबी खान या पाकिस्तानी स्कॉलरनं १९६९ साली लाहोरमध्ये ‘दिवान-ए-दारा दारा शुकोह’ या त्यांच्या शोधनिबंधात दाराच्या कबरीचा एक फोटो प्रकाशित केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार वायव्येकडच्या कक्षातल्या तीन कबरी पुरूषांच्या आहेत. त्यातली दरवाजाकडं असणारी कबर दारा शुकोहची आहे. हुमायून यांच्या विशाल मकबर्यात हुमायून व्यतिरिक्त अनेकांच्या कबरी आहेत. यापैकी मकबर्याच्या मध्यभागी स्थित कबर हुमायूनची असल्याची खातरीशीर माहिती आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातले इतिहासकार प्राध्यापिका शिरीन मौसवी म्हणतात, ‘हुमायून यांच्या मकबर्यातील कुठल्याच कबरीवर शिलालेख नाही.
त्यामुळं कोणती कबर कुणाची याची माहिती मिळू शकत नाही. दाराच्या कबरीचा शोध घेण्यासाठी सरकारनं पुरातत्त्व शास्त्रज्ञांची जी समिती स्थापन केली आहे त्यात पुरातत्त्व विभागाचे माजी प्रमुख डॉ. सय्यद जमाल हसन यांचाही समावेश आहे. ते म्हणतात, ‘इथं जवळपास दीडशे कबरी आहेत. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे.’ ते म्हणतात, ‘आम्ही हुमायून यांच्या मकबर्याच्या मुख्य घुमटाखालच्या खोलीतल्या कबरींचं निरीक्षण करू. त्या कबरींचं डिझाईन्स तपासू. कुठे काही लिहिलं आहे का, तेही बघू. कला आणि वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करू!’ मात्र हे काम अवघड असल्याचं ते म्हणतात.
सरकारला कबरीचा शोध घेण्याचं कारण काय?
दारा शुकोह शहाजहान यांचे उत्तराधिकारी होते. साम्राज्यासोबतच तत्त्वज्ञान, सुफी विचारधारा आणि आध्यात्मावरही ज्याची पकड असेल असा बादशहा होण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्याविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते त्या काळातल्या प्रमुख हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि मुस्लिम सुफी धार्मिक नेत्यांशी चर्चा करत. इस्लामसोबतच हिंदू धर्मातही त्यांना बराच रस होता. ते सर्वच धर्मांना समान वागणूक द्यायचे. त्यांनी वाराणसीहून धर्मपंडितांना बोलावून त्यांच्या मदतीनं ‘उपनिषदांचं’ फारसी भाषांतर करवून घेतलं. उपनिषदांचं हे फारसी भाषांतर युरोपपर्यंत पोहोचलं. तिथं लॅटिन भाषेत त्यांचं भाषांतर करण्यात आलं. लॅटिनमध्ये भाषांतरीत झाल्यानं भारतीय उपनिषदांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. भारतात ‘उदार शहजादा’ अशी दारा शुकोहची ख्याती आहे. औरंगजेबऐवजी दारा शुकोह मुघल सल्तनतीचा बादशाह झाला असता तर देशाची परिस्थिती आज खूप वेगळी राहिली असती, असं काही इतिहासकार आणि विचारवंतांना वाटतं. या इतिहासकारांना औरंगजेब ‘कठोर, कट्टरपंथी आणि भेदभाव करणारा मुस्लीम बादशाह’ वाटतो. त्यांच्या मते औरंगजेब हिंदुंचा द्वेष करायचा आणि त्यानं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. हा समज आजच्या राजकीय परिस्थितीत अधिक बळकट होताना दिसतोय. आम्ही ज्या इतिहासकारांशी बातचीत केली त्यांच्या मते औरंगजेब यांच्या उलट दारा शुकोहवर हिंदू धर्माचा प्रभाव होता आणि तो हिंदुंच्या धार्मिक श्रद्धेचा आदर करायचा. हिंदुत्त्ववादी संघटना असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनं भारतावर मुस्लिम शासकांनी जवळपास सात शतकं केलेलं साम्राज्य म्हणजे ‘हिंदुंच्या गुलामगिरीचा काळ होता’ असं म्हटलं आहे. आधुनिक काळात मुस्लिम शासकांच्या काळाचा विशेषतः मुघल शासकांचा आणि तत्कालीन घटनांचा कायमच भारतातल्या मुस्लिमांविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. आता एक असं गृहितक तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे की, आजच्या मुस्लिमांच्या तुलनेत दारा शुकोह भारतीय मातीशी अधिक एकरूप होता.
भारत सरकार दाराच्या कबरीचं काय करणार?
‘दारा शुकोह एक आदर्श आणि उदार व्यक्तिमत्त्व होतं,’ असं मोदी सरकारला वाटतं. त्यामुळं दाराला मुस्लिमांचा आदर्श बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दारा शुकोहच्या कबरीचा शोध लागल्यानंतर धार्मिक सद्भावनेचा एखादा वार्षिक उत्सव किंवा कार्यक्रम आखला जाण्याचीही शक्यता आहे. सत्ताधारी भाजपचे नेते सैय्यद जफर इस्लाम म्हणतात, ‘दारा शुकोह असं व्यक्तिमत्त्व होतं ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि एक शांतता मोहीम राबवली. सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना याची किंमतही चुकवावी लागली. आजच्या मुस्लीम समाजातही दारांसारखे विचार आणि आकलनक्षमतेची गरज आहे.’
दारा शुकोहला मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून सादर करण्याचा विचार भारतातल्या मुस्लिमांना इथले धर्म आणि इथल्या चालीरिती यांच्यात पूर्णपणे मिसळता आलं नाही आणि ते त्यांचा स्वीकारही करू शकलेले नाहीत, या समजावर आधारित आहे. मात्र काही टीकाकार दारा शुकोहला ‘त्यांची उदारता आणि धार्मिक सलोख्याच्या विचारांसाठी केवळ मुस्लिमांचा नव्हे तर संपूर्ण देशाचा रोल मॉडेल का करू नये?’ असा सवालही विचारतात. कबरीचा शोध घेण्याबरोबरच केंद्र सरकारनं दाराच्या साहित्यसंपदेचं पुनर्मुद्रण करावं त्याशिवाय त्यांच्या त्या साहित्य संपदेचं वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित करून वाचकांना उपलब्ध करून द्यावीत याशिवाय शालेय आणि महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमातून दारा शुकोह यांच्याबाबत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. वर म्हटल्याप्रमाणे दारा शुकोह यांच्या नावे पुरस्कार आणि विविध पारितोषिकं ठेवावीत. लोकांमध्ये सर्वधर्मसमभाव निर्माण होण्यात दारा शुकोहची लेखनसंपदा सहाय्यभूत ठरेल!
हरीश केंची – पुणे । ९४२२३१०६०९
लेखक ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक, राजकीय विषयांचे भाष्यकार आहेत.
पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२
‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क ७०५७२९२०९२