व. पु. काळे – माझे दोस्त!

ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्‍यावर बसून आम्ही  यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’ 
ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’ 
मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून झर्रझर्र ओळी कागदावर उमटत होत्या. का माहीत नाही, पण त्यावेळी हा लेख लिहून झाल्यावर मी खूप रडलो होतो. एप्रिल २००७ च्या ‘चपराक’ मासिकाच्या अंकात ही मुखपृष्ठकथा केली. त्यावेळी आजच्यासारखी समाजमाध्यमं नव्हती, तरीही या लेखावर उदंड प्रतिक्रिया आल्या होत्या. म. भा. चव्हाण आणि व. पु. काळे या दोघांच्या दोस्तीविषयीचा हा खास लेख आणि मभांची कविता ‘चपराक’च्या वाचकांसाठी.
– घनश्याम पाटील.
व. पु. काळे – माझे दोस्त!
इथे एक मोठा माणूस होता
जणू अक्षरांचा पाऊस होता...
या ओळी मी वपुंवर लिहिल्या. माझ्या आयुष्यात सुरेश भटांनी मला लिहितं केलं आणि व. पुंनी मला बोलतं केलं.
अर्धे अधिक आयुष्य
पडद्याच्या मागे गेले
आत्ताआत्ता कुणीतरी
मला पुढे ढकलले…
हो! मला पुढे ढकललं ते वपुंनी!
बरं, वपुंची खासियत अशी की, त्यांनी मला स्टेजवर आणलं आणि ते स्वतः पुढे प्रेक्षकांत जाऊन बसले, दाद देण्यासाठी!!
दिलखुलास, चौफेर दाद द्यावी ती वपुंनीच. त्या बाबतीत वपु ‘दादा’ होते.
जेव्हा जेव्हा मी स्टेजवर जातो तेव्हा प्रेक्षकांत, पुढच्या रांगेत मी वपुंना शोधत असतो. त्यांचं नसणं सोसवत नाही. या माणसानं स्वतःच्या मनाला माती लागू दिली नाही. मनमोकळेपणा हा त्यांचा खरा स्वभाव. तो त्यांना शोभून दिसायचा. त्यांच्या हसण्यातून तो सांडायचा.  ते छानच बोलायचे. बोलता-बोलता त्यांची कथा सुरू व्हायची. शब्दांची उबदार शाल ते श्रोत्यांच्या अंगावर घालायचे. एखाद्या कलाकाराचा सत्कार करताना ते हरखून जायचे. त्या कलावंताला कधी एकदा जाऊन भेटतो असं त्यांना व्हायचं. भेटताना ते उराउरी भेटायचे. त्यांचं भेटणं म्हणजे आपलेपणाचा महोत्सव असायचा. त्यांच्याबरोबर माझा एक फोटो आहे. तो फोटो सुंदर आहे. त्यांच्यामुळे माझा फोटो सुंदर आलेला आहे.
काही माणसांच्या सहवासाने आपण कधी सुहास झालो हे आपल्यालाच कळत नाही. बरं, वपुंचा उत्साह इतका दांडगा असायचा की, जे मनात येईल ते करायचं. रिक्षा नाही मिळाली तर शिरीष रायरीकरची स्कूटर घेऊन कुठेही जायचं. ज्यांच्या घरात ते जायचे त्यांचं घर उजळून निघायचं.
जे आवडेल त्याचा फोटो काढायचे. हसणार्‍या मुलांपासून ते फुलणार्‍या फुलांपर्यंत त्यांनी अनेकांचे फोटो काढलेत.
एकदा त्यांनी मला माझं वय विचारलं. मी म्हटलं, ‘‘चाळीस वर्षे.’’
ते म्हणाले, ‘‘मभा, तुमच्याकडे अजून बरंच आयुष्य आहे. कवितांचे कार्यक्रम करा. तुमच्यात लोकांना हलवून टाकण्याची ताकद आहे.’’
या वाक्यानं मला बळ मिळालं. मी त्यांना म्हटलं, ‘‘कार्यक्रमाचे शीर्षक सांगा.’’ 
ते म्हणाले, ‘‘प्रेमशाळा.’’ 
झालं! कार्यक्रम सुरू झाला. माझं दुर्दैव असं की, वपुंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी मला अहमदनगरला ‘प्रेमशाळा’चा कार्यक्रम करावा लागला. कार्यक्रम रंगला पण…
कधीकधी कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मला विचारतात, ‘‘मभा, वपु कसे होते?’’
मी सांगतो,
‘‘वपु वपुंसारखेच होते आणि ते माझे दोस्त होते.’’
वपु एकदा मला म्हणाले, ‘‘मभा, नातेवाईकांवर काहीतरी ऐकवा.’’
मी त्यांना ओळी ऐकवल्या –
सोयरा एकेक माझा थोर होता
हा लफंगा, तो दरोडेखोर होता…
वाटले काळोख आता संपला हा
आणला ज्याने दिवा तो चोर होता!
यावर वपु म्हणाले, ‘‘मभा, द्या टाळी! तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे. माझ्याही आसपास जळाऊ लाकडाच्या वखारी आहेतच. आपण या अनुभवाचे पुस्तक काढू. त्याचे नाव, ‘त्रास देणारे लोक!’’
हा माणूस जगाला जवळ घ्यायला निघाला होता पण जग त्याला जवळ येऊ देत नव्हते. कधीकधी त्यांच्या अतिसंवेदनशील मनाचा कोंडमारा मी बघत होतो.
वपु जवळच्यांना कळले नाहीत. चाहत्यांना फारसे लाभले नाहीत. समीक्षकांना पचले नाहीत. वपुंची अफाट लोकप्रियता हे त्याचे कारण होते. हजारोंच्या संख्येने लोक त्यांचे एकट्याचे कथाकथन ऐकत रहायचे. एवढी अमाप लोकप्रियता त्यांना लाभली होती. त्यांच्या परिचयासाठी तरूणाई तळमळत असे. 
वपुंशी दोस्ती हा माझा प्लस पॉईंट होता. जेजूरीला जाताना मी, वपु आणि प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर काटे आम्ही प्रवासात बरोबर होतो. वपु मला म्हणाले, ‘‘मभा, सध्या काय लिहिताय?’’
मी त्यांना ‘स्त्री दर्शन’ची कल्पना सांगितली. त्याच्यावर मी दीर्घकाव्य लिहितोय, असंही सांगितलं. ‘स्त्री दर्शन’ची मांडणी ठरली. मी कविता लिहायच्या, वपुंनी त्याचं रसग्रहण करायचं आणि काट्यांनी त्यातल्या सौंदर्यवतींना रंग, रेषांत बद्ध करायचं. आमच्या तिघाचं हे संकल्पित पुस्तक… ‘स्त्री दर्शन’ अंतिम टप्प्यात आहे पण त्यातला भाष्यकार आता नाही.
मध्यंतरी त्यांना कवितांचा लळा लागला होता. स्मिताताई शेवडे, माधुरी भागवत, जयंत दाढे यांच्याशी ते कवितेतच बोलायचे. त्यातून अनेक विनोद व्हायचे. पुढे त्यांनी ‘वाट पाहणारे दार’ आणि ‘नको जन्म देऊ आई’ ही दोन कवितांची पुस्तके लिहिली. ती हातोहात खपली.
मला म्हणाले, ‘‘मभा, आता मी भाऊसाहेब पाटणकरांच्या प्रेमात पडलोय.’’
भाऊसाहेबांच्या शायरीने वपु झपाटले. त्यांच्यावर वपुंनी अनेक लेख लिहिले. योगायोग असा की, मला नुकताच ‘भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार’ मिळाला तेव्हा मला वपुंचीच आठवण झाली. सामाजिक सभ्यता मी त्यांच्यापासून शिकलो. जे आपल्याला आवडत नाही ते करायचं नाही, आवडलेलं केल्याशिवाय रहायचं नाही.
वपुंचं आयुष्य एक प्रयोगशाळा होती. ते उत्तम स्वयंपाक करीत. नुसताच करीत नसत तर आग्रहाने जेवू घालत. त्यांच्याकडे उत्तम वस्तु असत. त्यांना वपुंनी आवडीची नावं दिली होती. मनीपर्सला ‘चारूदत्तची सखी’ असं त्यांनी नाव दिलं होतं.
‘वर सूर्य थांबला होता’ ही कविता मी लिहिली ती वपुंवरच. त्यांच्या ‘निमित्त’ या पुस्तकाचं अनौपचारिक प्रकाशन होतं. माझा ‘धर्मशाळा’ हा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्यानिमित्ताने मी वपुंच्या घरी गेलो होतो. त्यांच्या पत्नी सौ. वसुंधराताई तेव्हा बे्रन ट्यूमरने आजारी होत्या. वपु त्यांची सुश्रुषा करत. वसुंधराताईंना काहीच समजत नव्हते. त्या केवळ शरीरानेच हयात होत्या. त्या दिवसात वपुंनी जाहीर कार्यक्रम करणं थांबवलं होतं. स्वतःच्या सावलीची ते सेवा करत होते. दुसर्‍या दिवशी मी पुण्याला आलो आणि वपुंवर कविता लिहिली. – 
घायाळ सावलीसाठी 
जो मागे वळला होता
मी त्याच्यामधला येशू
प्रत्यक्ष पाहिला होता…
शब्दांच्या मागावरती
जो विणतो सुंदर शेला
तो कबीर कवितेसाठी
आतून फाटला होता…
हे सूर्यफुल दुःखाने
पाहते असे का खाली?
याचीच लागूनी चिंता
वर सूर्य थांबला होता…
– म. भा. चव्हाण 
9922172976
पूर्वप्रसिद्धी – मासिक चपराक, एप्रिल 2007.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

7 Thoughts to “व. पु. काळे – माझे दोस्त!”

 1. Shashikant Shinde

  फारच सुंदर लेख…
  अप्रतिम…

  -शशिकांत शिंदे

  1. Dnyaneshwar Mane

   खूपच छान लेख आहे सर

   1. सौ.माधुरी बाळकृष्ण यादव

    हृदयस्पर्शी आठवणी 👍.

 2. Kunda bachhav,nashik

  अप्रतिमच 👌👌 छान आठवणी मांडल्या.

 3. Gauri Rao

  हा लेख मनाला स्पर्शून गेला. व पू ना माणसं आणि मानवी मन खूप छान कळलं होत. त्यांची सर्व कथाकथन जवळ जवळ तोंडपाठ झाली आहेत. 🙏

 4. Pkkharade

  अप्रतिम लेख.
  मभा फार भारी वाटलं हे वाचून.

 5. Babasaheb Bhorkade

  अप्रतिम लेख..! वपुंचे अनेक कथा साहित्य वाचले. कवी मित्र किरण भावसार यांच्या मुळे एकदा कथाकथन ऐकण्याचा योग आला.साहित्य व साहित्यिकांना मनापासून मोठं करण्याचं काम वपुंनी केलं.चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत सहसा दिसत नाही.मभांमुळे वपु कळले..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा