नोंदी

एक पत्रकार, ब्लॉगर आणि लेखकाने समाजमाध्यमावर केलेल्या या नोंदी आहेत. मजकुराच्या आशय आणि आकृतीबंधात सलग सूत्र नाही. असे असले तरी या कथनातून पत्रकार आणि लेखकासोबतच एक सजग, संवेदनशील माणूसही व्यक्त होत जातो आणि वर्तमानासोबतच दडलेल्या गतकातर आठवणींचाही एक पट मग उलगडतो.

– संपादक –

 

बदलती है राहे और बदल जाते है निशान,

बदलती है चाहे बदल जाते है इन्सान!

कई शक्स के पास अपने जवाब होते है, 

शायद कुछ नये, कुछ पुराने हिसाब होते है!

 

9 मे

दिवसाची सुरूवात कशी व्हावी हे काही आपल्या हातात नसतं हे खरं पण जेव्हा सकाळ डॉ. अभय बंगच्या भेटीने उगवते आणि संध्याकाळ महेश एलकुंचवार यांच्या साक्षीने मावळते; त्या दिवसाला काय म्हणावं तर… इट्स माय डे!!

काल असं घडलं. सकाळी फिरून येतायेताच अभयचा विमानतळावरून फोन आला की, तो येतोय आणि तो आला. मग बेगम मंगलनं केलेल्या नाश्त्यासोबत आमच्या गप्पा.

कालचा विषय राजकीय अर्थशास्त्र म्हणजे राजकारणात अर्थशास्त्राचं महत्त्व! जे काही अभय बोलत होता ते विस्मयचकित करणारं मुळीच नव्हतं कारण मुलभूत अभ्यास करूनच बोलणं-लिहिणं हा अभयचा स्वभाव आहे. कालचं बोलणंही या विषयाबद्दलचा अभयचा व्यासंग कसा वैविध्याने विपुल आहे याची साक्ष देणारं होतं. आदिवासींच्या आयुष्यात आरोग्यदूत म्हणून आलेला अभय डॉक्टर झाला नसता तर काय ताकदीचा समाजशास्त्रज्ञ/विचारवंत झाला असता हे जाणवलं अन् राजकारणातील बहुसंख्यांचं खुजेपण पुन्हा एकदा लक्षात आलं. बहुपेडी महेश एलकुंचवार यांच्यासोबत गप्पा ही बहुसंख्य वेळा काहीतरी नवीन कळण्याची पर्वणी असते. कालची त्यांची भेट याला अपवाद नव्हतीच. मंगला आणि मी नागपूर-विदर्भ सोडतोय हे काही एलकुंचवार आणि अभय या दोघांना आवडलेलं नाहीये पण ते असो. कालचा दिवस मस्त मावळला आणि आजचा दिवस कलापिनी कोमकलीच्या (फोनमधून आलेल्या) मेलोडियस स्वरांनी सुरू झाला… बघू दिवस मावळतीला जातो कसा ते!

10 मे

धंतोलीतून जाताना ग्रेसची आठवण न येणे शक्यच नाही इतक्या ग्रेसच्या आठवणी अभिन्न आहेत. ग्रेस हयात असते तर आणि माझा मूड असता तर एखाद्या वेळी वर जाऊन भेटलोही असतो त्यांना. (अचानक जाऊन त्यांच्या दरवाजावर थाप मारावी असा स्नेह होता आमच्यात) किंवा खालूनच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या. एकमेकांशी अशा शुष्क वागण्याची दोघांनाही सवय होती. ग्रेस आता हयात नाहीत त्यामुळे ‘आज त्यांचा वाढदिवस’ असं न म्हणता ‘आज त्यांचा जन्मदिवस’ म्हणावं लागतंय. कार बाजूला पार्क करून ग्रेस राहत त्या इमारतीच्या फाटकाजवळ गेलो. क्षणभर थांबलो आणि परत फिरलो… ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा’ असं ग्रेससारखं कोणाशी तरी फिल्मी बोलावं वाटलं.

ग्रेसचे असे अनेक विभ्रम आहेत, भास आहेत. एकाच वेळी गंभीर आणि  दुसर्‍या क्षणी एकदम तद्दन फिल्मी होणं, एका क्षणी अनावेगी उत्कट आणि दुसर्‍या क्षणी विलक्षण कोरडं-अलिप्त होणं, एका क्षणी कोसळत राहणं, नाही तर कितीही वेळ उलटला तरी शब्दाविना स्वत:ला टांगून घेणं… असं दोन टोकांवरचं वागणं ग्रेस यांना कसदारपणे जमत असे. ग्रेस, भास्कर लक्ष्मण भोळे आणि महेश एलकुंचवार ही वृत्ती, विचार, वर्तन आणि सर्जनशीलता या निकषावर परस्परभिन्न टोकावरची तीन गर्भश्रीमंत माणसं आयुष्यात आली आणि अनेक जगण्याचे अनेक संदर्भ भरजरी झाले. या तिघांनाही परस्परांविषयी किती संपन्न ममत्त्व आहे हे चांगलं ठाऊक असणार्‍यांपैकी आस्मादिक एक. या तिघांवरही ‘क्लोज-अप’मध्ये भरपूर लिहिलंय पण आपल्याला हे तिघेही गवसले नाहीत, ते कवेत आलेच नाहीत हे वाटणं अजूनही कायम आहे.

ग्रेसच्या अनेक कथा आणि दंतकथा हाती लागल्या आणि पाहता-पाहता निसटून गेल्या. त्यातल्या कथा कोणत्या, दंतकथा कोणत्या हे ग्रेसशी बोलून तपासून पाह्यचं राहून गेलं. ग्रेससोबत कवितेवर बोलायचंही राहूनच गेलं. ‘आसक्ती आणि अलिप्तता या विरोधी पातळ्यावर इतकं भावनांनी चिंब होणं कसं काय जमतं गुरूजी तुम्हाला?’ हेही ग्रेसना विचारणं राहून गेलं. मला पाठवलेलं पत्र पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात वाचायचं राहून गेलं तर ते ग्रेस यांनी ‘ओल्या वेळूची बासरी’त लेख म्हणून वापरलं आणि ‘खुन्नस’ म्हणून एसएमएस पाठवून कळवलं. ते का म्हणून हेही विचारायचं राहून गेलं.

‘लोकसत्ता’चा संपादक झालो आणि ग्रेस यांनी मला ‘सर’ म्हणणं सुरू केलं. ‘कां, असं?’, विचारलं तर म्हणाले, ‘‘लोकसत्ता’चं संपादकपद फार मोठं आहे. त्या पदाचा मान ठेवायला हवाच. त्या पदावर असेपर्यंत मी सर म्हणणार तुम्हाला. आज जर ग्रेस असते तर त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी म्हणालो असतो, ‘‘कवीश्रेष्ठ, ‘लोकसत्ता’चा राजीनामा देऊन तीन वर्ष झालीयेत. आता पूर्वीसारखं मित्र म्हणून वागूयात का?’’

या प्रश्नाला काय उत्तर दिलं असतं ग्रेस यांनी ते हयात असते तर?

 

12 मे

प्रतापनगर चौकातून माटे चौकाकडे जाताना डाव्या हाताला कोणत्या तरी देवीचं एक देऊळ लागतं. तिथून डावीकडे वळलं (पूर्वी हा रस्ता प्रशस्त आणि दुभाजक टाकून विभागलेला नव्हता तेव्हा माटे चौकाकडून येताना मंदिराजवळ उजवीकडेही वळता येत असे. आता वळणंही वळायचं विसरून एकमार्गी झालीयेत!) आणि थेट शेवटी गेलं की कोपर्‍यावर ना चौकोनी ना त्रिकोणी अशा आकाराचं एक दुमजली घर आहे. अंगणाच्या कोपर्‍यात कंपाउंडला लागून बांबूचं एक वाढलेलं छोटं ‘डेन’ लक्ष वेधून घेतं.

16, ब विद्याविहार कॉलनी, प्रतापनगर, नागपूर, हा या घराचा पत्ता माझ्या मनावर शीळेसारखा कोरलेला आहे. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा हा पत्ता. हे घर बांधलं जात असताना भोळेंसोबत मी अनेकदा इथे आलो आणि घर बांधून पूर्ण झाल्यावरही अनेकदा या घराचा दरवाजा मी ठोठावला आहे. भोळे यांचा अचानकपणे शेवटचा प्रवास सुरू झाला तोपर्यंत या घराशी माझी नाळ जोडलेली. नागपूर-विदर्भ-महाराष्ट्रातून आलेल्या सामाजिक बांधिलकी आणि समानतेचा पुरस्कार करणार्‍या कोणाही जाती-धर्म-भाषा आणि लिंगाच्या कार्यकर्ता-लेखक-विचारवंत तसंच कवी यांच्या क्षुधाशांति, गप्पा, मुक्काम आणि प्रेरणांचं हे घर म्हणजे अड्डा. एक पत्रकार म्हणून  भोळेंसकट अनेक नामवंतांच्या मुलाखती मी या घरात घेतल्या. याच घरात मला हक्कानं अनेकदा तहानलाडू-भूकलाडू मिळाले.

वर्तमानात स्वतंत्र विचार करणारे, निगर्वी, नि:स्वार्थी, स्पष्टवक्ते आणि निष्ठा-भूमिकांशी किंचितही तडजोड करून प्रलोभनाला बळी न पडणारे जे मोजके विचारवंत महाराष्ट्राला लाभले त्यात भोळे यांचं स्थान अव्वल. हाती आलेला सन्मान-पारितोषिकाचा किंवा जास्तीचा पैसा गरजवंताला त्याच्या दारी नेऊन देणारे आणि त्याचा गाजावजा तर सोडाच उच्चारही न करणारे पत्रकारितेच्या आजवरच्या माझ्या जगण्यातले भोळे आणि एलकुंचवार हे केवळ दोघंच आहेत. उक्ती आणि कृती यांच्यात एका स्वल्पविरामाचे अंतर शेवटचा श्वास घेतानाही नसणारा भोळे यांच्यासारखा पारदर्शी माणूस आयुष्यात आजवर आलेलाच नाही.

भोळे यांचा सहवास मला साडेचार दशके लाभला. ते  मार्गदर्शक, मित्र, वैचारिक आधार, टीकाकार, समर्थक, शिक्षक, वाचकही… पण हे सर्व शब्द थिटे पडावे अशा पत्रकारिता आणि वैयक्तिकही पातळीवरील ‘वडिलधार्‍यांच्या’ भूमिकेत ते होते. लिहिता-मांडणी करताना काही ऊणं-दुणं लिहिलं जात नाहीये ना, चुकीचा शब्द-उपमा-अलंकार तर वापरला जात नाहीये ना, असा त्यांचा धाक मनावर अदृश्यपणे कायम वावरत असायचा. सकाळी सातच्या आत फोन वाजला की, आजच्या अंकात काही तरी चूक झालीये आणि त्यासाठी कान उपटणारा तसंच शिकवणारा तो भोळे यांचा फोन… असं ते पक्क समीकरण होतं. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी भोळे मला भेटले आणि माझ्या वयाच्या पंचावन्नाव्या वर्षापर्यंत त्यांनी मला घनगर्द व्यापून टाकलं होतं त्याला आता साडेचार वर्ष उलटली.

प्रकृतीच्या तपासणीसाठी सहज भोळे रूग्णालयात… मग कोमात काय जातात आणि पाहता पाहता मृत्युच्या दाट मळभात अंतर्धान पावतात… सारंच मन आणि मती सुन्न करणारं. हे सर्व घडत होतं तेव्हा मी 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या धबडग्यात मग्न होतो. ‘प्रवीणला नका कळवू काही कारण तो निवडणुकीच्या कामात आहे’, असं भोळेसरांनी रूग्णालयातल्या बेडवरून विजयावहिनी तसेच डॉ. अविनाश रोडेला बजावून सांगितलं होतं.

कोणी तरी विधानसभा निवडणुकीचा विषय काढल्यावर भास्कर लक्ष्मण भोळे-विजयावहिनीचा हा पत्ता आठवला. त्या पत्त्यावर गेलो पुन्हा… आता बंद असलेल्या त्या ‘16, विद्या विहार’कडे पाहताना हे सर्व दाटून आलं. भोळे कोमात असताना मृत्युच्या सावटाने गहिवरलेल्या त्या गल्लीत क्षणभर थबकलो… तो गहिवर आता कुठेच नव्हता विद्याविहार कॉलनीतल्या रस्त्यावर… त्या गल्लीचं दैनंदिन जगणं सुरू होतं.

हयात असते तर हे सांगितल्यावर, घड्याळावर नजर ठेऊन व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर झुलत माझी वाट पाहणारे भोळे म्हणाले असते, ‘यालाच जगरहाटी म्हणतात!’ आता भोळे नाहीत.

मला रॉय किणीकरांच्या ओळी आठवल्या –

हा देह तुझा पण देहातील तू कोण

हा देह तुझा पण देहाविण तू कोण

हा देह जन्मतो वाढत जातो सरतो

न जन्म मरण ना देहातील तो म्हणतो

 

24 मे

नागपूर-विदर्भ सोडल्याला आता सात वर्ष होतील. नेमकं सांगायचं तर 16 जून 2013 ला सकाळी आम्ही नागपूरहून दिल्लीला प्रयाण केलं आणि 25 मे 2015 ला औरंगाबादला येऊन स्थायिक झालो.

26 जानेवारी 1981 ते 10 ऑक्टोबर 1996, नंतर 25 मार्च 2003 ते 16 जून 2013 असं; सुमारे 25 वर्षापेक्षा जास्त काळ नागपुरात वास्तव्य झालं. बेगम मंगला तर ‘बॉर्न अँड ब्रॉटअप’ नागपूर; आधी धंतोली केडरची मग ते केडर सोडून ते कुटुंब वसंतनगरला आलं. हे ‘धंतोली केडर’ प्रकरण एकेकाळी प्रतिष्ठा ‘मोजण्या आणि तोलण्या’चं नागपूरचं वैशिष्ट्य होतं. सांस्कृतिक जगताच्या संपन्नतेची भुरळ पडून मी नागपूरकडे कसा ओढला गेलो, हे यापूर्वी लिहिलं आहेच त्यामुळे त्याची पुनरूक्ती करत नाही.

अगणित छटांची हिरवाई पांघरलेल्या नागपूर शहरात पडाव टाकला तेव्हा वयाची पंचविशी नुकतीच ओलांडलेली आणि निरोप घेताना साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो होतो. आमच्या लहानपणी मराठवाड्यात मुलाची किंवा मुलीची सोयरिक अमुक एकाशी ठरली असं न म्हणता ‘अमुक गावात सोयरिक ठरली’ असं म्हणत. त्याबद्दल उत्सुकता वाटायची. लहानपणी प्रवचनं ऐकण्याचा छंद होता. तेव्हाची एक आठवण सांगतो – हरिभाऊ नावाचे एक प्रवचनकार होते. त्यांना या संदर्भात विचारलं तर ते म्हणाले, ‘लग्न म्हणजे काही केवळ दोन जिवांचं मीलन नसतं. मुलगा आणि मुलगी केवळ नवे नातेसंबंध निर्माण करत नाहीत तर ते त्या परिसराशी जोडले जातात. लग्न करून स्त्रीनं दुसर्‍या गावच्या सासरी जाणं किंवा पुरूषानं चाकरीसाठी दुसर्‍या गावी जाणं हे एका माणसाचं स्थलांतर नसतं. माणूस म्हणजे झाड असतं. ते झाड दुसर्‍या गावी जाताना अर्थातच त्याच्या मुळांसह जातं. चार भिंती असलेल्या तिथल्या घरात माणूस राहतो पण, त्याची मुळं त्या गावच्या मातीत रूजतात, तिथल्या प्राणी, पक्षी, उन्ह-पाऊस-पाणी, वातावरण असं एकूणच त्या निसर्गाशी त्या झाडाचं नातं जोडलं जातं. तो निसर्गही त्या नवीन झाडाला आपलासा करतो. ते झाड मग बहरतं, फुलतं, फळतं, असं हे ते एकूण समरस होणं असतं. मी नागपूरशी असाच समरस झालो. मंगलाशी याच नागपुरात भेट झाली, प्रेमाच्या आणा-भाकांतून पुढे ती माझी बेगम झाली. वाद, प्रतिवाद आणि प्रेमातून आमचं समंजस सहचर्य सर्वार्थानं याच नागपुरात आकाराला आलं.

पावसावरून आठवलं. आम्हा दोघांनाही पाऊस आवडत असे. मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या आणि दुष्काळी भागातून आल्यानं तर मला नागपूरच्या पावसाची असोशीनं प्रतीक्षा असायची. कार घेईपर्यंत म्हणजे, 1993 पर्यंत आम्ही कधीही रेनकोट किंवा छत्री वापरली नाही. आम्ही मस्त भिजत असू. पुढे तान्ह्या कन्येलाही या भिजण्यात आम्ही सामील करून घेतलं. आम्हा दोघांच्या अनेक आवडीच्या गाण्यांपैकी पावसाशी संबंधित ‘रिमझिम गिरे सावन’ (चित्रपट – मंझिल.) हे गाणं. पावसाळ्यात किमान पंचवीस-तीस वेळा तरी हे गाणं ऐकून होत असेच. त्यात घनघोर मतभेदाचा भाग म्हणजे बेगमला ते किशोरकुमारच्या तर मला लता मंगेशकरच्या स्वरातलं आवडत असे. सुरूवातीला त्यावरून आमच्यात होणारे वाद ऐकून एकदा बेगमची आई – तिला सगळेच ताई म्हणत, गंमतीनं म्हणालीही होती, ‘तुम्हा दोघांच्या घटस्फोटाला हे गाणं कारण ठरू नये म्हणजे झालं! अखेर किशोरकुमार आणि लता मंगेशकर या दोघांच्याही आवाजात एका पाठोपाठ हे गाणं ऐकायला आम्ही सुरूवात केली आणि ताईच्या घटस्फोटाच्या शक्यतेला पूर्णविराम दिला. नागपूरच्या अशा असंख्य गतकातर आठवणी मनात आकंठ आहेत!

आपल्या देशातील, दोन गावातील अंतराचं मोजमाप करणारा झिरो माईल नागपुरात आहे!

‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा एक वार्ताहर ते ‘लोकसत्ता’ या दैनिकाच्या विदर्भ आवृत्तीचा संपादक; मार्गे तरूण भारत, युगधर्म, लोकमत असा पत्रकारितेतला वाटा-वळणांचा प्रवास या काळात झाला. पत्रकारितेच्या 45 पैकी 25 वर वर्ष या नागपूर-विदर्भात कशी भुर्रकन उलटली ते कळलंच नाही. विदर्भात टळटळीत उन्हात बसने फिरलो, गोठवणार्‍या थंडीत स्कूटर-मोटर सायकलवरून भटकलो. टॅक्सी, मग स्वत:च्या कारनंही गावा-गावात गेलो. विदर्भातल्या बहुतेक सर्व तालुक्यांच्या गावी आणि निवडणुकांच्या निमित्तानं प्रत्येक लोकसभा/विधानसभा मतदारसंघाला भेटी दिल्या.

तो काळ जणू पायाला चाकं बांधलेला होता. वेगळ्या विदर्भाचा विरोधक असूनही विदर्भावर होणार्‍या विकासाच्या अनुशेषाबद्दल पोटतिडकीनं लेखन केलं, समस्या लिहिल्या, गावोगावच्या बातम्या दिल्या, अन्य लेखन केलं, भाषणं-व्याख्यानं दिली, असंख्य कार्यक्रमात एक वृत्तसंकलन करणारा वार्ताहर ते संपादक-लेखक आणि प्रमुख पाहुणा म्हणूनही सहभागी झालो. वेगवेगळ्या विचारांच्या व्यासपीठावर गेलो, वाद घातले-प्रतिवाद केले, कधी आक्रमकपणे तर कधी संयतपणे वागलो. 1981 नंतर नागपूर-विदर्भातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा असंख्य घटनांचा पत्रकार/संपादक म्हणून एक साक्षीदार झालो. ते सर्वच अनुभव जगण्यातले बावनकशी ऐवज आहेत.

पत्रकारिता करताना कधी सुन्न करणार्‍या, कधी डोळे दिपवणार्‍या, कधी भोवंडून टाकणार्‍या बहुरंगी, बहुपेडी अनुभवांचं भांडार खुलं झालं. या काळात असंख्य प्रकारचे मृत्यू पहिले. प्रत्येक गाव आणि शहर तसंच तेथील जगणं आणि मृत्युला वेगळा गंध आणि रंग असतो, याची अनुभूती याच काळात आली. अपघातात माणसं मरताना पाहिली. 46/47 डिग्री सेल्सियस उन्हात भर चौकात स्वत:ला जाळून घेणारा अभागी जीव बघितला तेव्हा सुन्न झालो आणि चेंगराचेंगरीत किड्या-मुंगीसारखे चिरडलेले गोवारींचे देह बघताना आसवं गोठून गेली. कधी इतिहास निर्माण करणार्‍या, कधी त्या-त्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार्‍या, कधी उमेद तर कधी आनंद देणार्‍या, कधी भावना अनिवार करणार्‍या तर कधी नाउमेद करणार्‍या, कधी निराशेचे मळभ दाटून आणणार्‍या तर कधी नकळत अश्रूंना वाट मोकळ्या करून देणार्‍या अशा असंख्य घटनांना एक पत्रकार म्हणून सामोरं गेलेल्या कितीतरी भल्या-वाईट घटना… आज आर्त साद घालत आहेत.

नागपूर-विदर्भानी जगण्याचं बळ दिलं, पत्रकारिता आणि लेखनाच्या प्रेरणा दिल्या. नवं भान दिलं. ज्ञानाच्या कक्षा व्यापक आणि टोकदारही केल्या. माझ्यातल्या अनेक चांगल्या पैलूंना लखलखीत तसंच भरजरी केलं आणि माझ्यातला केवळ एकच बाजू बघणारा एकांगीपणा खाक केला. नागपूरनं नावलौकिक, मान-सन्मान काय काय दिलं! नागपुरात असंख्य लोक भेटले. वाचक, हितचिंतक, स्नेही, मित्र, अश्रू आणि आनंदाश्रू ओघळत असताना साथ देणारे दोस्तयार तर काही चक्क मेंटर असा हा मोठ्ठा गोतावळा आहे. ज्याच्याशी माणसं जोडली जातात त्याला धनसंचय करण्याची गरज नसते असं का म्हणतात याची व्यापक आणि संपन्न जाणीव करून देणारा खूप मोठा गोतावळा विदर्भानं दिला. समाजाच्या सर्व स्तरातल्या ‘कळवळ्याच्या जाती’तल्यांची ही नावं मनातल्या मनात जरी नोंदवायची म्हटलं तर दिवस पुरणार नाही! जीवाभावाच्या गोतावळ्याचा हा अमूल्य खजिना घेऊन नागपूर सोडून निघालो तेव्हा मनात मोठा कल्लोळ माजलेला होता…

पण, हेही पुरेसं नाहीच… बहुसंख्येने भल्या असणार्‍या वैदर्भीयांच्या कळपात कद्रू वृत्तीची, संकुचित मनाची, मत्सरी स्वभावाची आणि खुरट्या उंचीची काही माणसं भेटली नाही, असं नाही. अशी माणसं आयुष्यात येणं ही जगरहाटी असते. असेही लोक भेटले आणि जसं वागायचं असतं तसेच ते वागले पण भल्या माणसांनी पांघरलेला लोभ अशा किरट्या लोकांच्या वृत्तीपेक्षा जास्त गडद, ममत्वाचा, उबदार, आश्वासक आणि शीतल होता. त्यामुळे जगण्याच्या प्रवासात हे खुरटे आणि किरटे लोक खूप मागे पडले आहेत!

प्रादेशिकवाद, भाषा, धर्म, जात, मत्सर, हेवेदावे असे कोणतेही संस्कार आणि संचित घेऊन मी विदर्भात आलेलो नव्हतो आणि त्यापैकी एकही किटाळ सोबत घेतलं नाही. तसंच मागेही ठेवलं नाहीये. इतकी वर्ष अपरंपार लोभ विदर्भाने दिला. तो यापुढेही कायम राहील असा विश्वास सोबत घेऊन मी निघालो…

आता नागपूर खूप बदललं आहे. हे महानगर डोळे विस्फारून जावेत असं आणखी विस्तारलं आहे. नागरी सोयीसुविधा प्रचंड वाढल्या आहेत आणि त्यांचा उपभोग घेणारे लोकही. बेगमच्या आजारपणामुळे अलीकडच्या तीन वर्षात तर नागपूरला जाणंही झालेलं नाही. तरी व्ही.एन.आय.टी. किंवा वसंतनगरच्या क्रिकेट मैदानावर मॉर्निंग वॉक करत असल्याची, तिथे हमखास भेटणार्‍या भारद्वाज या बेगमच्या शब्दात ‘लकी’ समजल्या जाणार्‍या पक्ष्याचं दर्शन झाल्याची, सेमिनरी हिलवर भल्या पहाटे जमिनीवर विसावणार्‍या दाट धुक्यात हरवल्याची स्वप्न पडतात. दोस्तयारांनी केलेला गलबला ऐकू येतो. त्या गाढ दोस्तीचे गंध प्रफुल्लीत करतात… काठोकाठ भरलेल्या अशा आठवणींना उर्दूतला ‘लबरेज़ लम्हें’ असा सुंदर उल्लेख नुकताच वाचनात आला. नागपूर माझ्या मनात कायमच ‘लबरेज़ लम्हें’ आहे, कायम टवटवीत आहे!

 

30 मे

अणीबाणीनंतरची लोकसभा निवडणूक संपली अन् मी औरंगाबाद सोडलं. ‘लोकसत्ता’साठी पत्रकारिता करण्याच्या निमित्ताने 10 मे 1997 ते 24 मार्च या काळात पुन्हा औरंगाबादला मुक्काम झाला आणि परवा पुन्हा ‘शहर-ए-अंबरी’त डेरेदाखल झालो आहे. नागपूरला गुडबाय म्हणणार्‍या मजकुरावर फेसबुक, मेल, व्हॉटसअ‍ॅपवर चिक्कार प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी म्हटले की ‘मी माहेरी परतलो’. खरं सांगायचं तर असं काही फिलिंग माझ्या मनात पिंगा घालत नव्हतं. चौथ्या वर्गात असताना मराठीच्या पुस्तकातल्या पहिल्याच पानावरची ‘खुणा गावच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी, उडे किती खळबळ माझ्या हृदयातुनी’ या कवितेसारखी काही माझी मुळीच अवस्था झालेली नव्हती . (बाय द वे, कोणाला या कवितेच्या कवीचे नाव आठवत असेल तर नक्की कळवावं) याचं एक कारण म्हणजे, महाराष्ट्रातील कोणतंही गाव मला आपलंच वाटतं. भाषा किंवा प्रादेशिक अस्मिता आड न येता गडचिरोली ते असह्य उकाडा वगळता मुंबई आणि चांदा ते बांदा ही सगळी गावं मला माझ्या सख्ख्या नात्याची वाटतात. यातील काही गावात मी कमी-अधिक काळ मुक्काम ठोकले आहेत. कित्येक गावांना माझ्या वेगवेगळ्या कारणाने भेटी झाल्या झालेल्या आहेत. यापैकी प्रत्येक गावात किमान मैत्रीचा एक तरी बंध आहे. विश्वास नाही बसणार अनेकांचा पण यापैकी अनेक गावांना एक विशिष्ट गंध आहे… तो माझ्या निकटच्या परिचयाचा आहे. प्रवास करून येताना गाव येण्याआधीच हा ओळखीचा गंध मला साद घालतो आणि मग त्या गावाची भेट होते. तरीही एक मात्र खरं, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरं मला माझ्या हक्काची वाटतात!

औरंगाबादला बारा वर्षांनी परतताना जाणवलेली पहिली बाब म्हणजे माझ्या लहानपणचं; सत्तरीच्या आधीचं असलेलं टुमदारपण या गावानं गमावलेलं आहे. हे गाव माणसांच्या गर्दीत हरवलं आहे. अपरिहार्यता म्हणून नागरिकरणाच्या वेढ्यात आणि सिमेंटच्या जंगलात हरवलं आहे. खरं सांगायचं तर बकाल झालंय… अत्यंत खराब तसेच सर्वत्र आडवे-तिडवे अतिक्रमण झालेले रस्ते, धुळ आणि सर्वत्र घाण! रस्ता दुभाजकावर सुद्धा बेसुमार कचरा! ज्या गावच्या अंगा-खांद्यावर मी बागडलो, लहानाचा मोठा झालो, धडपडलो आणि पुन्हा उठायची प्रेरणा ज्या गावानं  दिली, ज्या गावानं  दिलेले संस्कार आणि संचित घेऊन मी जगभर भटकलो त्या गावाची ही अवस्था मन विषण्ण करणारी आहे. या गावात प्रशासन नावाची काही यंत्रणा आहे हे प्रथमदर्शनी तरी जाणवत नाही. महापालिका करते काय? नगरसेवक, आमदार आणि खासदार यापैकी कोणालाही या बकाल-ओंगळवाण्या परिस्थितीचं काहीच वाटत नाही का? यापैकी कोणालाच पालकत्व घ्यावं वाटत नाही का या शहराचं? नेटक्या नागरी सुविधांचं काजळ-तीट लावून आपलं गावं साजरं-गोजरं करावंसं का नाही वाटत? आपल्या शहराचं हे दर्शनी ओंगळ रूप पर्यटकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण करत असेल? दिल्ली आणि नागपुरातून आल्याने तर हे दर्शन खूपच खटकलं आणि असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले.

मी दुसर्‍यांदा औरंगाबाद सोडलं तेव्हा राजेंद्र दर्डा मंत्री होते आणि एकदा घरी आले तेव्हा झालेल्या गप्पात या शहराचं एक सुंदर स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं होतं. या शहराचं सीईओ व्हायची कल्पना होती त्यांची. चंद्रकांत खैरे आधी मंत्री आणि मग खासदार आहेत इतक्या वर्षांपासून. दर्डा आणि खैरे यांना राजकीय मतभेद बाजूला ठेऊन औरंगाबादचं पालकत्व स्वीकारण्याचं आव्हान पेलवलेलं दिसत नाहीये हाच या औरंगाबादच्या बकाल दर्शनाचा अर्थ म्हणायचा का? जे नागपुरात, नाशकात, मुंबई, दिल्लीत, फार लांब कशाला लातुरात घडलं… घडत आहे ते औरंगाबादेत का घडू नये? या गावाची नावं घेतली कारण महापालिका आणि राज्य सरकार वेगळ्या पक्षाचं आहे या सर्व शहरात तरीही या शहरांचं प्रथम दर्शन औरंगाबादइतकं बकाल… ओंगळ नाही! या शहरांत घडलं ते विकासाचं राजकारण औरंगाबादेत घडत नाही याचं कारण आमचे लोकप्रतिनिधी नागरी सुविधा निर्माण करण्याबाबत समंजसपणा दाखवत राजकीय विचार बाजूला ठेवायचं विसरले आहे असं समजायचं का? का त्यांचं विकासभानच हरवलं आहे?

औरंगाबादचं हवामान किती बदलंलय नाही का? इतक्या असह्य उकाड्यात आम्ही कधी राहिल्याचं आठवत नाही. या शहरात या आधीही गच्च हिरवाई नव्हती पण ती निर्माण करण्याचं आव्हान पेलणारा कोणी इतक्या वर्षात निर्माणच कसा झाला नाही? बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि लोकांनाही एखादी वृक्षारोपणाची एखादी चळवळ उभारावीशी वाटली नाही? नागरिकरणाच्या झंझावातात हवामानाचा समतोल टिकवण्यात आहे ती हिरवाई कमी पडली असणार! मला आठवतंय, दिवाकर रावते वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना डोंगर हिरवे करण्याची मोहीम मोठा गाजावाजा करून हाती घेण्यात आली होती पण या शहराभोवतीचे डोंगर तर अजूनही उघडे-बोडकेच दिसतायेत! ती हिरवाई न पांघरल्याचा राग या डोंगरांच्या डोळ्यात भरल्यानं तर हा जिवाची काहिली करणारा उकाडा वाढला नाहीये ना?

 

1 जून

एका उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड या गावी तेव्हा तिथे स्थायिक असलेल्या मामाकडे गेलो होतो. त्याचं नाव अशोक खोडवे. आता त्यानं वयाची ऐंशी पार केलेली आहे. दुपारची वेळ होती. घरी अक्का म्हणजे माझी आजी. माईची आई, तेव्हा (बहुदा 1985 साल असावं ते)  तिचं वय वर्ष 87 का 89 असं कांहीसं होतं. वाकेलेली पण ठणठणीत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही दोघंच घरी होतो. दुपारी अचानक जोरदार वारं सुटलं आणि वळिवाचा पाऊस सुरू झाला. हा पाऊस सुरू झाला की, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या –

वळवाचा पाऊस पडून ओसरला

भावाला झाल्या लेकी बहीण विसरला…

या ओळी कातर आवाजात म्हणत डोळे पुसणारी माई आठवली. ते मी अक्काला सांगितल्यावर तिचे डोळे भरून आले. घळाघळा वाहूही लागले. ते अश्रू माझ्या आजीचे नव्हते. माईच्या आईचे होते. वयाच्या 47व्या वर्षी मृत्युच्या अधीन झाली त्या लेकीशी असलेल्या मातृत्वाच्या अश्रुंची ती नाळ होती. त्या अश्रूंच्या स्पर्शानं स्त्रीत्वाचा आणखी एक अर्थ मला उमगला. जीव कासावीस झाला…

 

7 जुलै

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार याबद्दल प्रत्येक वृत्तपत्रात एका वेगळ्या गावाचं नाव आणि समर्थन होतंय. प्रत्यक्षात संमेलन दूरदेशी घुमानला घ्यायचं ठरलं. ही प्रक्रिया काही एका दिवसात झाली नाही तर त्यासाठी बरेच दिवस लागले. याचा अर्थ साहित्य बीट कव्हर करणारा एकही पत्रकार साहित्य महामंडळाच्या संपर्कात नव्हता किंवा महामंडळात कोणाचाही सोर्स पक्का नव्हता. फक्त ‘हाण कॉपी असा’ प्रकार सुरू होता म्हणायचा!

कोणत्या तरी वृत्तपत्रात तर नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देऊन बडोदा येथे संमेलन होणार अशीही बातमी वाचली आणि देशातील सर्वच क्षेत्रावरील ‘दिवाळखोर मोदी प्रभावा’ची खातरी पटली. वरातीआधी घोडं हे माहिती होतं, साहित्य संमेलनाआधीच मनोरंजन यानिमित्तानं अनुभवयाला मिळालं. एकंदरीत हा प्रकार आवडला. संमेलनस्थळाची निवड या विषयावर एखादा परिसंवाद ठेवला तर तो अधिक मनोरंजक ठरेल.

 

16 जुलै

मुख्य मुद्दा वेगळाच असतो आणि त्याकडे जाण्यास आपण तयार नसतो. उदाहरणार्थ 1 – उपमुख्यमंत्री म्हणून औरंगाबादच्या सुभेदारी विश्राम गृहावर अजित पवार यांना भोजनानंतर आईस्क्रीम (किंवा गोड) मिळालं किंवा नाही हा मुळीच नाही तर राज्याचा उपमुख्यमंत्री येऊनही अधिकारी गाफील असतात, हजर राहत नाहीत हा आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या अजित पवार यांच्या भोजनाची जबाबदारी प्रशासनाची होतीच पण ती टाळण्यात आली. नोकरशाही किती उद्दाम झाली आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. सामान्य माणसाला तर किमानही न जुमानणार्‍या आणि राज्यकर्त्यांच्या बाबतीतही तसेच वागणार्‍या नोकरशाहीच्या या बेलगाम वृत्तीला आळा बसणार की नाही हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे.

2 – अजित पवार यांनी भोजनानंतर आईस्क्रीम (किंवा गोड) उपलब्ध नाही म्हटल्यावर जर काहीच नाराजी व्यक्त केलेली नाहीये तर त्यांच्या समर्थकांनी एवढा थयथयाट करण्याचं कारण काय?

 

18 जुलै

नेताजी राजगडकर यांच्या मृत्युची बातमी कळवणारा अरूणा सबानेने पाठवलेला एसएमएस आला आणि धक्काच बसला. अलीकडच्या काही वर्षात नेताजीशी नियमित संपर्क नव्हता. आमच्यात फोनवरचा शेवटचा संवाद होऊनही किमान आठ-दहा महिने तरी उलटले असावेत.

नेताजी आकाशवाणीच्या नागपूर केंद्रात होता तेव्हा आम्ही ‘बायविकली सोप’वाले मित्र होतो. आम्ही सर्व तेव्हा सडेफटिंग होतो आणि लग्न झाल्यावर सर्व एकाच परिघात राह्यला आलो. मग भेटी वाढल्या. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात कामासाठी आठवड्यातून दोन-तीनदा तरी चक्कर असायची आणि त्या चकरेची सुरूवात किंवा शेवट आकाशवाणी चौकात नेताजीच्या उपस्थितीत चहा आणि बिडी-काडीने व्हायचा. प्रकाश देशपांडे, सिद्धार्थ सोनटक्के हेही या ‘शिखर परिषदे’चे सदस्य असायचे. अधून-मधून जयंत नरांजे, धनंजय गोडबोले असायचे. अनेकदा घमासान चर्चा रंगायच्या. विषयाचे कोणतेही बंधन नसायचं… नुकतंच वाचलेलं पुस्तक, कोणता तरी आवडलेला किंवा न आवडलेला चित्रपट, एखादं गाणं, तोंडी लावायला राजकारण तर हमखास, समाजकारण, नक्षलवाद, एखादी बातमी इत्यादी इत्यादी! विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असलं की आमच्या भेटी नियमित व्हायच्या. पोलीस बंदोबस्ताचा जाच वाढला की अनेकदा आम्ही आकाशवाणीत नेताजीच्या भरवशावर मोटरसायकल्स सोडून विधानभवनात चालत जायचो तर आम्हाला सोडायला गेटपर्यंत नेताजी यायचा! कित्येक वेळा डेडलाईन जवळ आली असल्यानं चपराशी बोलवायला आला की चर्चेच्या गुर्‍हाळातून स्वत:ला सोडवून घेत नेताजी लगबगीने आकाशवाणीत पळायचा.

अशाच एका वादळी गप्पात निवडणुका लढायचा विषय निघाला आणि बहुदा बरेच दिवस मनात घोळणारा विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा नेताजीने जाहीर केला. घनघोर चर्चा झाल्यावर त्यावर नेताजीने शिक्कामोर्तब केले तेव्हा आम्हा सर्वांच्या खिशात मिळून 2000 रूपये निघाले नाहीत. यथावकाश निवडणुका जाहीर झाल्या. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून नेताजीनं आणि पै-पैसा जमवून आम्ही सर्वांनी ती निवडणूक निगुतीनं लढवली. विजय मिळाल्यावर राळेगावचे स्वागत आटोपल्यावर नेताजी निघाला आणि टाकोटाक बजाजनगरमधल्या आमच्या घरी आल्यावर मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबत साजरा केलेला विजयोत्सव अजूनही मनावर टवटवीत आहे.

नंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. भेटी कमी झाल्या पण मैत्रीतली उबदार आणि आश्वासक स्निग्धता कायम राहिली. राजकारणाच्या रूळलेल्या वाटेवर कट्टरपंथीय बांधिलकीने चालण्याचा नेताजीचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. कर्मठ सामाजिक बांधिलकी जपणारा नेताजी राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. तो गेल्या काही महिन्यापासून आजारी होता हेही ठाऊक नव्हतं मला आणि कोणी कळवलंही नाही. आधी अचानक सिद्धार्थ सोनटक्के गेला, मग प्रकाश देशपांडेनेही अचानकच मृत्यू नावाच्या प्रदेशात जाण्याची सिद्धार्थची वाट चोखाळली आणि आज आली ती नेताजीच्या मृत्युची बातमी. नेताजी राजगडकर नावाचा मित्र ही तारूण्यातील ओल्याकंच आठवणींतली ठेव उरली आहे…

 

20 जुलै

मुंडे यांच्या ‘अवकाळी’ मृत्युमुळे… ‘भाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस!’ या माझ्या ब्लॉगमध्ये ‘गोपीनाथ मुंडे यांच्या अवकाळी मृत्युमुळे’ असा शब्दप्रयोग एके ठिकाणी आला आहे. हा शब्दप्रयोग चूक आहे किंवा योग्य आहे का, अशी विचारणा काहीकडून झाली. माझा दीर्घकालीन स्नेही, ग्रंथप्रसारक, औरंगाबादच्या श्याम देशपांडेनं (तेच ते, ‘राजहंस’वाले हो!) तर या शब्दाचं प्रयोजनच विचारलं. ‘अवकाळी मृत्यू’ शब्दकोशात नाही हे खरं आहे पण ‘अकाली’ मृत्यू आणि त्यामुळे पक्षास प्राप्त झालेली ‘अवकळा’ अशा एकत्रित व व्यापक अर्थाने ‘अवकाळी मृत्युमुळे’ असे मी मजकुरात म्हटले आहे.

याच वर्षीच्या मे महिन्यातील एका ब्लॉगमध्ये (नरेंद्र मोदी+अनुकूल असे दोन मिळून) ‘मोदीनुकुल’ असा शब्दप्रयोग मी केला तेव्हा तो कसा, असा सवाल त्यावर भास्कर लक्ष्मण भोळे यांचा मुलगा हिरण्मय यानं विचारला. त्याचं स्मरण झाले या निमित्तानं. लिहिताना अशा गंमती-जमती अधूनमधून करण्याची ‘खोड’ आहे मला. ती काहींच्या लक्षात येते आणि मग मजा येते. काहीजण किती गंभीरपणे वाचतात याचा आनंदही मिळतो. असो!

 

5 ऑगस्ट

सकाळी रेडिओ ऐकण्याची सवय जुनी. लहानपणी, घरात बारीक तांब्याच्या जाळीची एक लांब पट्टी (एरियल म्हणत त्याला) रेडीओ ऐकण्यासाठी असे, तेव्हापासूनची ही नाळ. सकाळची सुरूवात आकाशवाणीच्या सिग्नेचर ट्यूनने होत असे. मग भक्ती गीतं वगैरे. वय वाढल्यावर आकाशवाणीच्या ऐवजी विविध भारती आली. तरीही दुपारी दीडच्या मराठी बातम्याआधी प्रसारित होणारा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम अनेक वर्ष चुकला नाही. अशातही संधी मिळाली तर तो आवर्जून ऐकला जातो.

एफएमचा जमाना आला आणि तो (म्हणजे एफएम हो) पिसाटासारखा फोफावला. तरीही आस्मादिकांचे विविध भारतीवरील प्रेम काही कमी झाले नाही. घरात सकाळपासून आणि बाहेर पडल्यावर कार सुरू केल्याबरोबर विविध भारतीची साथ पक्की. मुंबई-नागपूर असो की दिल्ली, या श्रवणसाधनेत कोणताही फरक नाही. लेक कारमध्ये असेल तरच एफएमचा नया जमाना धुडगूस घालणार. एक मात्र खरं, एफएमवरच्या नव्या गाण्यापेक्षा निवेदनातला बिनधास्तपणा आणि ती गती आवडायची-आवडते मला.

औरंगाबादला आल्यापासून गेल्या दीड महिन्यात विविध भारती लागत नाही आणि मीडियम वेव्हजही. अनेकांना विचारलं, ‘का नाही लागत?’ तर ‘माहिती नाही’, हेच उत्तर मिळालं. आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावर फोन केला तर कोणी उचलला नाही. सरकार भाजपचे असो की काँग्रेसचे… केंद्र असो की राज्य शासन, दिल्ली असो की मुंबई की नागपूर की औरंगाबाद सामान्य माणसाला दाद द्यायची नाही हे प्रशासनाचं सूत्र समान असतं हेच खरं! पण पहाटे उठण्याची सवय आणि रेडिओ ऐकण्याची खोड काही जात नाही. अशा वेळी पर्याय उरला तो एफएमचा तर तिथले निवेदक जे काही बोलतात ते फारच थोर, म्हणजे अतिअतिच थोर म्हणजे, अनेकदा थोर ताळतंत्र नसलेलं! अर्थात हा थोर दोष काही निवेदकांचा नाही तर कॉपी एडिटरचा. उदाहरणार्थ आज सकाळी निवेदक म्हणाला, ‘जायकवाडी धरणात शंभर दिवस पुरेल इतके पाणी साठलं आहे… ते शंभर वर्ष पुरेल इतके साठलं जावं. शंभर वर्ष पुरेल इतके पाणी साठवण्याची जायकवाडीची क्षमता नाही आणि जायकवाडीत शंभर वर्ष पुरेल इतक्या पाण्याची साठवणूक होण्याइतका पाऊस पडला तर अख्खा मराठवाडा वाहून जाईल. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागात महाजलप्रलय होईल. कसा होईल या केवळ कल्पनेनेच कापरं भरलं!

गेल्या आठवड्यातला प्रसंग. निवेदकाने सवाल उपस्थित केला की, मुंबई-पुण्यात पाऊस पडतो, विदर्भात पडतो, मध्यप्रदेशात पडतो, कोसीला महापूर येण्याइतका पडत असतो पण मराठवाडा कोरडा राहतो याचा काही अभ्यास वगैरे होणार आहे की नाही? एकदम विकासाच्या अस्मितेला हात घालणारा हा प्रश्न. कॉपी लिहिणार्‍याला – ओके करणार्‍याला आणि निवेदकाला माहिती नाही की पन्नास-पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा अभ्यास झालेला आहे. तो निष्कर्ष थोडक्यात असा की – सह्याद्रीला ढग अडतात आणि तिकडे (म्हणजे पुण्या-कोल्हापूर-सातारला हो!) पाऊस पडतो. हे ढग मराठवाड्याकडे सरकतात पण डोंगरावरून खाली येत नाहीत कारण ढगांवर खाली येऊन बरसण्यासाठी वरून दाब निर्माण होत नाही. जमिनीवरूनही जंगलाचे हवे तसे गारपण निर्माण होत नाही. मग आहे त्याच उंचीवरून ढग पुढे सरकतात आणि अन्यत्र कुठे तरी बरसतात! मराठवाड्यात वृक्षारोपणाचा मोठ्ठा कार्यक्रम हाच यावरचा एकमेव पर्याय आहे.

काही दिवसापूर्वी तर कळसच झाला… सकाळच्या मराठी गाण्याच्या स्लॉटमध्ये ‘डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी…’ लागलं! सकाळी-सकाळी घरात सांज भरून आणि पाडगावकरांच्या त्या गाण्यातल्या उदासीचे सावट दाटून आले. माझी वाचाच बंद झाली. माझ्यासमोर दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता. शाळेत असताना आम्हाला ‘अज्ञानात आनंद’ नावाचा एक धडा होता तसा हा एकूण एफएमचा अज्ञानी प्रक्षेपण कारभार. यापेक्षा विविध भारतीचे अज्ञातले आनंद फारच दुय्यम दर्जाचे असायचे हे पटलं!

 

6 ऑगस्ट

आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे आणि जवळीक असणारे अखेरचा निरोप घेतात तेव्हा जीव गलबलतो… संध्याछाया दाटून येतात आणि मन कातर होतं.

स्मिता तळवलकर आणि माझी काही किमानही घनिष्ठ मैत्री नव्हती पण भेटल्यावर क्षेमकुशल विचारावं अशी ओळख होती; ओळख झाली तेव्हा दूरदर्शनवर ती बातम्या वाचायची आणि तेव्हा दूरदर्शनची क्रेझ होती; त्यामुळे स्मिता ‘स्टार’ होती पण तिच्यात ‘स्टार’पणाचा तोरा नव्हता. त्यामुळे ती चित्रपट आणि नाटकात खरी ‘स्टार’ झाली तरी ही ओळख टिकून राहिली. नियमित भेटी नव्हत्या आणि दोस्ती नसल्याने भावबंध नसले तरी एकमेकाविषयी अपडेट असायचो  आम्ही.

अधून मधून आमच्या भेटी व्हायच्या. इकडच्या-तिकडच्या समानधर्मी मित्रांचे संदर्भ निघायचे. क्षेमकुशलच्या, हवामानाच्या गप्पा व्हायच्या आणि परस्परांकडे पाठ फिरवून आम्ही मार्गस्थ व्हायचो. दोन-तीन वेळा आम्ही व्यासपीठही शेअर केलं. एक तर तिची पर्सनॅलिटी ग्रेसफुल आणि त्यात भाषण न करता ती संवाद साधायची श्रोत्यांशी; लोकांना खूप आवडायचं ते. ती मोठ्या आजारातून उठल्यावर एकदा नागपूरला शिवसेनेच्या शेखर सावरबांधेच्या एका कार्यक्रमात आम्ही सोबत होतो.

गडचिरोलीहून प्रवास करून ती आली आणि सरळ व्यासपीठावर लगबगीने पोहोचली कारण कार्यक्रम संपवून तिला मुंबईसाठी विमान गाठायचं होतं. जीवघेण्या ठसठसत्या वेदनांसोबत येणार्‍या रोगाचा आणि त्यावरील जालीम उपचाराचा सामना करूनही तिची ग्रेस आणि ऐट कायम होती. मी ते बोलून दाखवलं तर म्हणाली, ‘‘रक्तात आहे ते! कोणाला असं काढून घेता थोडीच येतं?’’ मग व्यासपीठावरच थोडसं काहीबाही बोलणं झालं आमच्यात. ती आमची शेवटची भेट.

आणि आज सकाळी कळलं की, she has joined the majority… मन गलबलून आलं …

चित्र-नाट्यसृष्टीतलं तिचं स्थान माईल स्टोन आहेच पण माणूस म्हणून तिची ग्रेस आणि ‘स्टार’ असूनही ‘न-स्टार’ असणं कायम राहणार आहे मित्रांच्या मनात.

 

8 ऑगस्ट

खरं सांगायचं तर महेश झगडे या सनदी अधिकार्‍याची आणि माझी थेट ओळख नाही. (त्यांच्या प्रशासकीय कामातून आणि माझ्या लेखनातून आम्ही एकमेकांना ओळखतो. आंतरजालाच्या माध्यमातून आम्ही दोन-तीन वेळा संपर्कात आलो तेवढंच.)

दिल्लीत एकदा अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यालयात दोन-तीन जन ‘वो महेश झगडे बहोत डेंजर है ’, अशी चर्चा करत होते म्हणून कान टवकारले तर ते बघून उठून ते लोक दूर गेले. उत्सुकता वाढून सध्या झगडे यांचं काय सुरू आहे याची माहिती घेतली तर अन्न आणि औषध प्रशासनात ते घालत असललेला ‘धुमाकूळ’ कळला. कोणी अधिकारी कायद्यानुसार काम करतो ही आता बातमी व्हायला लागली नाही का? बघा दिवस कसे भराभरा बदलले!

औषधव्यवहार सुरळीत करण्याची पदानुसार आलेली जबाबदारी झगडे यांनी कसोशीने निभावली आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला तसेच त्याबद्दल कौतुकाचे चार शब्दही त्यांच्या वाट्याला आले. या चांगल्या कामगिरीबद्दल नियमानुसार त्यांची सरकारने बदली केली आहे आणि याच चांगल्या कामगिरीचे पारितोषिक म्हणून त्यांना सध्या तरी नियुक्ती दिलेली नाहीये! बदली नियमानुसार असल्याने कोणी आवाज काढायचा नाही आणि नवी नियुक्ती नाही. म्हणजे सरकार कोणाच्या दबावाला बळी पडले याबद्दल ब्र उच्चारायचा नाय, असा हा अरबी सुरस कथेत शोभावा असा कारभार आहे.

झगडे या माणसाविषयी नाही बोलत. या सरकारने अशा पद्धतीने घुसमट केलेल्या दहा-बारा तरी अधिकार्‍यांची नावे मला माहीत आहेत. यापैकी एकाही अधिकार्‍याला मी स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही पण त्यांचं चांगलं  काम विसरणे हा कृतघ्नपणा ठरेल राव… म्हणून म्हणतो, अशा अधिकार्‍यांचे काम थोर… त्यांची बदली नियमानुसार करणारे सरकार थोर… त्या बदलीसाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबाव आणणारे तर थोरच थोर… आणि आपली लोकशाही तर अतिअति थोर. शेवटी काय तर आपण सर्व थोरच थोर! आपल्या या थोरपणाची महत्ती कथन करावी तेवढी थोडीच आहे!

 

11 ऑगस्ट   

सन्मानपदकं सन्मानाने देण्याचा जोड व्यवसाय (साईड बिझिनेस) सुरू करण्याचा विचार मनात घोळतोय. ‘प’ आद्याक्षराने अक्षरसंख्येत वाढ करत ही सन्मानपदकं सुरू होतील आणि ‘भ’ या आद्याक्षराने सुरू होणार्‍या शब्दापाशी थांबतील.

हे सन्मानपदक माझ्याकडून देण्यात आणि कोणालाही ते घेण्यात धर्म-जात-लिंग-रंग-वय-कामगिरी-व्यवसाय किंवा धंदापाणी कोणते याचा संबंध असेलच असे मुळीच नाही. त्यात कोणतेही आरक्षण/हरकत/आडकाठी नसेल. महत्त्वाचं म्हणजे रौप्य, सुवर्ण आणि हिरेजडीत शुभ्रसुवर्ण अशा चढत्या तीन क्रमाने ही सन्मानपदकं उपलब्ध असतील. आधी रौप्य, दुसर्‍या वर्षी किंवा पैशाची सोय होईल तसे सुवर्ण आणि नंतर हिरेजडीत शुभ्रसुवर्ण या क्रमाने ही पदकं बोलीनं-पारदर्शक लिलाव पद्धतीनं खरेदी करता येतील. थेट शुभ्रसुवर्ण हवे असल्यास जादा चार्ज आकारला जाईल. लिलाव वर्षातून केवळ दोनच वेळा केले जातील. दर वर्षी प्रत्येक प्रकारातील (एकूण 6 प्रकारात) केवळ तीन अशी एकूण 18च सन्मानपदकं उपलब्ध असतील. त्यामुळं या पदकप्राप्त सन्मानार्थींची संख्या मर्यादित राहून बाजार मांडला जाणार नाही.

अपेक्षित असलेली रक्कम मिळाली तर पदक सन्मानाचा कार्यक्रमही पाहिजे त्या शहरात आयोजित करून दिला जाईल. हे सन्मानपदक कसेही म्हणजे; लॉकेट, शौर्यपदक, मंगळसूत्र, की-चेन म्हणून वापरण्याचा/प्रदर्शित करण्याचा अधिकार ते प्राप्त करणार्‍याला राहील. गेल्या साताठ वर्षांपासून हा व्यवसाय मनात होता पण नोकरी असल्याने जमू शकत नव्हते पण आता लेखन-वाचन-व्याख्याने (हा मुख्य व्यवसाय!) यासाठी नोकरीच्या बंधनातून मुक्त झालेलो आहे. शिवाय काही महिन्यांतच वयाची साठी पूर्ण करणार असल्यानं या व्यवसायासाठी नाही म्हटलं तरी वेळ काढता येईल आणि विरंगुळाही होईल थोडा फार! इच्छुकांनी संपर्क साधावा… आपल्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

 

23 ऑगस्ट

‘बिटविन द लाईन्स’ शिकवणारे कुलदीप नय्यर!

कालची सकाळ गुरूदास कामत तर आजची सकाळ कुलदीप नय्यर यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली. कुलदीप नय्यर खासदार, राजदूत, लेखक होतेच पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आमच्या पिढीचे आयडॉल पत्रकार, स्तंभलेखक, लढवय्या संपादक होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर ही जवळीक जास्त विषन्न करणारी आहे.

घटना 1982 म्हणजे 36 वर्षापूर्वींची आहे. तेव्हा मी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे हे एक उमदा माणूस आणि जबरी वाचक होते. आमच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक व्हाव्यात यासाठी नरेश गद्रे यांनी जी नियोजनबद्ध मोहीम राबवली त्यात कुलदीप नय्यर यांची दोन व्याख्याने झाली. बातमी ‘बिटविन द लाईन्स’ कशी ओळखावी आणि वाचावी, हा ‘बिटविन द लाईन्स’ सेन्स पत्रकारांना कसा असावा आणि तो विकसित कसा करावा याबद्दल कुलदीप नय्यर खूप वेळ सोदाहरण अशा तळमळीनं बोलले की त्यांचं बोलणं थेट काळजालाच भिडलं. तेव्हा त्यांचा ‘बिटविन द लाईन्स’ नावाचा स्तंभही लोकप्रिय होता. साधं-सोपं आणि रसाळ इंग्रजी हे त्यांचं वैशिष्ट्य भुरळ पाडणारं होतं. छायाचित्राखालच्या ओळींत ‘अमुक तमुक छायाचित्रात दिसत आहेत’ असं लिहिण्याची गरज काय कारण ते दिसत असतातच म्हणून वाचकांना कळावं यासाठी त्यांची केवळ नाव ओळीत द्यावीत, असं त्यांनी सांगितलेलं मी कधीही विसरलो नाही. अजूनही माझ्याकडून ते पाळलं जातं आणि तोच संस्कार टीममधल्या सर्वांवर मी केला. नंतरही अनेकदा त्यांच्या भाषणांचं वृत्तसंकलन करण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कोणताही ज्ञानताठा न बाळगता ते भेटत आणि बोलत. त्यांचं व्यक्तिमत्त्च, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं.

क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. अणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते. एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला त्याबद्दल नय्यर यांचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील. कुलदीप नय्यर नावाचं पान पिकलं होतं, ते गळून पडलं…

 

25 ऑगस्ट

लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या प्रतिपादनासाठी ’Lies’  (खोटे) हा शब्दप्रयोग केल्याबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका झाली. त्यानंतर अत्यंत उमदेपणानं त्याबद्दल नेहरू यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. हा शब्दही नंतर त्यांनी मागे घेतला म्हणून तो स्वाभाविकपणे कामकाजातून काढून टाकण्यात आलेला आहे. ही घटना 2 जून 1951ची आहे. (संदर्भ : पुस्तकाचं  नाव -History of the parliament of India, लेखक – Subhash Kashyap) संसदेचा शिष्टाचार आणि परंपरा जपण्याबाबत पंडित नेहरू किती काटेकोर होते हे समजण्यासाठी हा संदर्भ दिलेला आहे.

विद्यमान लोकप्रतिनिधी कामापेक्षा सभागृहात गोंधळच घालत असतात त्यामुळे त्यांना हे सांगून काहीच उपयोग होणार नाही म्हणा!

31 ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकदिनी करणार असलेले भाषण ऐकायची सक्ती शिक्षक (तोबा, तोबा!) आणि विद्यार्थ्यांना केल्याच्या वार्ता ऐकल्या/वाचल्या /बघितल्या. त्यासाठी टीव्ही सेट कोठून आणि कसा उपलब्ध करायचा याची चिंता अनेक शाळांना भेडसावते आहे हे बातम्यातून कळलं. मूळ कळीचा प्रश्न असा आहे की शाळांना मिळालेले टीव्ही सेट गेले कोठे? ‘पाणीच पाणी चोहीकडे, गेला मोहन कुणीकडे’च्या धर्तीवर ‘मालकीचा वाद उफाळला चोहीकडे, गेले शाळेतले टीव्ही कुणाकडे? कोणत्या पित्तू मास्तर, हेडमास्तर का शिक्षण संस्था चालकाकडे?’ असं गाणं कोणी ‘कवीश्रेष्ठ-ए-शिक्षणसंस्थाचालक दरबार’ रचून ते कोणाकडून तरी शिक्षकदिनी गाऊन घेणार आहे का? ते गाणं ऐकायला मजा येईल! (‘शिक्षणसंस्थाचालक’ हा शब्द शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकासाठी मोठ्ठा झाला असल्यास त्यांना तो हवा तसा तोडून उच्चारण्याची मुभा आहे!)

आणखी एक मुद्दा – स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, खासदार यांनी त्यांच्या फंडातून शिक्षण संस्थांना दिलेले संगणक. ते व्यवस्थित काम करत आहेत का भंगारात विकले गेले? की आणखी कुठे म्हणजे कोणाकडे आहेत? याचाही शोध घेतला जायला हवा. इलेक्ट्रॉनिक्स किंवा मुद्रित माध्यमातील कोणी संपादक हे टीव्ही संच आणि संगणक शोधण्यासाठी एखादा वार्ताहर डेप्युट करेल का?

 

3 सप्टेंबर

जाहीर कबुलीजबाब

आजवर मी कधी पुरोगामी-प्रतिगामी किंवा डावा-उजवा असण्याचा गाजावजा  केला नाही. ना कधी दावा केला अधार्मिक असण्याचा किंवा जातीअंताचा पुरस्कर्ता असण्याचा. ना कोणता तरी वादी असण्याचा. जातीचा माज दाखवला नाही आणि लाजही बाळगली नाही. धर्म पाळला नाही, कर्मकांडे केली नाहीत. व्यासपीठावरून स्वत:च्या पुरोगामी किंवा समाजवादी असण्याचा गाजावाजा करवून घेत दरवाजा बंद करून सत्यनारायण केला नाही आणि ‘घरच्यांचा आग्रह मोडू शकत नाही’ असा बचाव करत स्वत:चे किंवा अपत्याचे लग्न विधिवत वैदिक पद्धतीनं करण्याचा ढोंगीपणा केला नाही. ‘डंके की चोट पर’ प्रेमविवाह केला आणि तेच स्वातंत्र्य लेकीला दिलं. ‘इट्स पार्ट ऑफ गेम’ असा बचाव करत कोणाच्या पाठीत गुपचूप खंजीर नाही खुपसला. राजकीय भूमिकेसंबंधी सोयीचा चष्मा लावला नाही. माणूस महत्त्वाचा मानला आणि माणसावर जात-पात-धर्म-राजकारण आड ना आणता प्रेम केलं-दिलं.

जो कुणी माणूस, संस्था, राजकीय पक्ष यापैकी कुणाचंही जे काही आवडलं त्याची मुक्त कंठानं स्तुती केली आणि त्यापैकी कोणाचंही जे नाही पटलं त्यावर कोरडे ओढताना कचरलो नाही.

पण कोरडे ओढताना आक्रमकता आणि आततायीपणा-आक्रस्ताळेपणा यातील सीमा ओलांडल्या नाहीत. समोरच्याचा प्रतिवादाचा हक्क मान्य केला पण माझं प्रतिपादन सोडलं नाही आणि जेव्हा केव्हा चुकलंय असं जाणवलं तेव्हा ज्येष्ठ-कनिष्ठत्वाचा बाऊ न करता चूक मान्य करून टाकली. ढोंगीपणा ही माणसाची अपरिहार्य मुलभूतता असली तरी त्या व्यभिचाराच्या वाटेवर जाणं टाळलंच आजवर.

माझं हे म्हणणं कोणाला उद्दामपणा वाटला तर ती माझी जगण्याची भूमिका आहे असं समजा आणि कोणाला उद्धटपणा वाटला तर तो माझा अलंकार समजा! कारण दुटप्पीपणाला जागा नाय जगण्यात. असंच जगत राहणार!

मे. हु. जा. व्हा.

 

5 सप्टेंबर

…आणि 500 रूपये मिळवा!

सूट परिधान न केलेला कुलगुरू दाखवा आणि 500 रूपये मिळवा अशी स्थिती सध्या आलेली आहे! सूट परिधान करता येत नसेल तर कुलगुरू या पदी नियुक्ती होणारच नाही अशी काही अट घालण्यात आली आहे, असा हा जाम ‘इनोदी’ प्रकार आहे. विदर्भातला उन्हाळा प्रसिद्ध पण त्याही उन्हात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू झालेले पुण्याचे एक ‘विद्वान’ (हा शब्द मी टीका म्हणून वापरतोय, सन्मान म्हणून नाही!) त्या तशाही उन्हात सूट घालून फिरत. फारच ‘फनी’ दिसे ते.

हे कुलगुरु-गृहस्थ झोपतानाही सूट परिधान करतात अशी चर्चा तेव्हा त्या विद्यापीठात रंगलेली होती!

(क्ल्यू – टीका करण्याचं माझं कायम लक्ष्य असत ते, इतके हे महाराज बालिश होते. कुलगुरूपदावर राहण्याच्या शेवटच्या दिवशीही संकेत बाजूला ठेऊन हाण-हाण-हाणले होते मी त्यांना!)

मग ती ‘लागण’ राज्यात सर्वत्र झाल्याचे सध्या जाणवतं आहे. उंची सूट घालून विद्वता सिद्ध होत नाही, ‘विद्या विनयेन शोभते’ हे बहुसंख्य कुलगुरूंना कोणी शिकवलेले दिसत नाहीये. याला अपवाद नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मी अनेकदा त्यांना ‘विदाऊट सूट’ पाहिले आहे. चर्चा, परिसंवाद वगैरे ठिकाणी ठीक हो पण बायको (?)सोबत हिल स्टेशनवर आणि रेल्वेने प्रवास करतानाही सूट म्हणजे अति-अतिच झाले आणि हसू येते बुवा!

बजाते रहो, बजातेही रहो…

 

17 सप्टेबर

हुश्श !! जी-20 ही जगातील विकसनशील देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक अखेर एकदाची संपली काल रात्री आणि आज सकाळी सेंटपीट्सबर्गहून निघून सायंकाळी भारतात परतलो. देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यात एक पत्रकार म्हणून सहभागी होणे हा विस्तृत, श्रीमंत, वेगळा आणि जगाचे दरवाजे किलकिले करणारा अनुभव आहे. एकदा त्याबद्दल सविस्तर लिहायला हवे. लिहिनच.

मराठवाडी शैली आणि भाषेत सांगायचे तर वाढदिवसाच्या खंडीभर (खरं तर त्यापेक्षा कितीतरी जास्तच) शुभेच्छा मिळाल्या. फोन… शेकडो एसएमएस आणि सोशल साईटवर… तिकडे मुलूखगिरी करायला गेल्याने उत्तर नाही देता आले. आता उशीर झालाय तरी म्हणतो, असाच लोभ राहू द्या आणि मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेल्यावर, जे जाणे कोणालाच टाळता आलेले नाही, एवढंच म्हणा…

उसके दुश्मन थे बहुत,

लेकीन आदमी अच्छा था!

(बशीर बद्र यांची एकच ओळ थोडी बदलून)

 

18 सप्टेंबर

दिल्लीतला गणपतराव आंदळकर ब्लॉक…

दिल्लीच्या वास्तव्यात घनदाट झाडीत लपलेल्या खेलग्राम या कॉलनीत वारंवार जाण्याची संधी मी घेत असे. त्याचं कारण क्षमा आणि प्रफुल्ल पाठक या वयानं धाकट्या असेलल्या दांपत्यानं दाखवलेला लोभ (तो लोभ अजून कायम असेल असं मी गृहीत धरलेलं आहे!) आणि केलेला पाहुणचार हे आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत मी रशियात गेलो तेव्हा दिल्ली या परक्या शहरात एकटं राहण्याऐवजी आस्मादिकांची बेगम याच दांपत्याच्या घरी राहिली होती अशी ती आमच्यातली आत्मीयता!

खेलग्रामला सर्वप्रथम गेलो आणि त्या कॅम्पसच्या परिसराच्या प्रेमात पडलो. हिरवीकंच वनराई वेगवेगळ्या रूपात ल्यायलेला तो नितांतसुंदर परिसर आहे. आशियाड क्रीडा स्पर्धा झाल्या तेव्हा ही नियोजनबद्ध टुमदार वसाहत उभी राहिली. तेव्हा या स्पर्धेसाठी आलेले परदेशातले खेळाडू इथेच वास्तव्याला होते. नंतर ही वसाहत निवासी करण्यात आली. काही राज्यांच्या कार्यालयांसाठीही जागा देण्यात आली. महाराष्ट्राच्या ऊर्जा खात्याचं कार्यालय, या कार्यालयाचा प्रमुख असलेला प्रफुल्ल पाठक याचं निवासस्थान आणि रेस्ट हाऊसही याच परिसरात आहे. या परिसरात रस्ताभर निवांतपणे पसरलेल्या घनदाट सावलीत प्रफुल्ल आणि मी अनेकदा निरूद्देश भटकत असू.

प्रख्यात सिरिफोर्ट सभागृहही खेलग्रामगत आहे. तोही परिसर नयनरम्य आहे. त्या परिसरात झाडीत लपलेलं एक रेस्तराँ आमच्या आवडीचं झालेलं होतं. तिथलं जेवण आणि ड्रिंक दोन्हीही अवीट चवीचं होतं. पहिल्यांदा खेलग्रामला गेलो आणि नजरेत भरलं ते एका निवासी भागाला (ब्लॉक) दिलेलं मराठमोळे पैलवान गणपतराव आंदळकर यांचं नाव आणि रस्त्यावर लावलेली त्या नावाची ठळक पाटी . (पाटी हिंदीत असली तरी ते नाव ‘गणपतराव आंदळकर’ हेच असल्याची खातरजमा लगेच करून घेतली.) कोल्हापूर, सातारा भागात पत्रकारितेची मुळाक्षरं गिरवलेली असल्यानं गणपतराव आंदळकर, खाशाबा जाधव ही ‘बडी’ नावं आणि त्यांची सुवर्णमयी कामगिरी माहिती होती. खाशाबा जाधव यांना एकदा भीतभीत भेटलो आणि 3/4 वेळा पाहिलेलं आहे. गणपतराव आंदळकर यांचं नाव असलेली ती पाटी बघून उर भरून आला. खेलग्रामच्या प्रत्येक चकरेत त्या पाटीकडे अभिमानानं मी बघत असे. गणपतराव आंदळकर यांच्या निधनाची बातमी काल रात्री कळली आणि खेलग्राममधली ती गणपतराव आंदळकर यांच्या नावाची पाटी लगेच आठवली. त्या पाटीसोबत छायाचित्र काढून घ्यायचं राहिलं, याची मग रूखरूख लागली…

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि तत्कालीन खासदार विजय दर्डा यांच्या लोधी इस्टेटमधील निवासस्थानी असाच एकदा रमत-गमत जात असताना मधू लिमये यांचं नाव असलेला एक रस्ता सापडला तेव्हाही आदरानं त्या ‘मधू लिमये रोड’ या पाटीजवळ थबकलो होतो. मधू लिमये यांना अनेकदा भेटलो; गणपतराव आंदळकर यांची मात्र कधीच भेट झाली नाही. भेटली ती त्यांच्या नावाची आणि त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करून देणारी आणि कायम स्मरणात राहिलेली दिल्लीत लावण्यात आलेली पाटी…

 

29 सप्टेंबर

शांतारामजी पोटदुखे; शालीन राजकारणी…

शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलंय. महाराष्ट्राच्या अरण्य प्रदेशातील चंद्रपूर या लोकसभा मतदार संघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे शांतारामजी यांचा राजकारण, समाजकारण, साहित्य, शिक्षण आशा विविध क्षेत्रात शालीन संचार होता. मूळचे पत्रकार असलेले शांताराम पोटदुखे इंदिरा गांधी यांच्यामुळे राजकारणात ओढले गेले आणि त्यांचं प्रदीर्घ काळ दिल्लीत वास्तव्य झालं तरी  राजकारणातला माज आणि बनेलपणा त्यांच्या अंगी आला नाही. ते शालीनच राहिले हे फार महत्त्वाचं आहे.

नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात ते अर्थ राज्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांचे कॅबिनेट मंत्री पुढे पंतप्रधान झालेले मनमोहनसिंग होते; हा उल्लेख आवर्जून यासाठी की भारतात आलेल्या खुली अर्थव्यवस्था आणि मुक्त बाजार धोरणाचे ते सत्तेच्या दालनातले साक्षीदार होते. देशाचे अर्थ राज्यमंत्री असताना ‘ब्रिज लोन’ ही कन्सेप्ट शांतारामजी यांना पटकन उमगली नाही आणि त्या संदर्भात त्यांना मोठ्या गॉसिपला सामोरं जावं लागलं होतं.

चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातल्या सांस्कृतिक चळवळीचे शांतारामजी आधारवड होते आणि अशा उपक्रमांना त्यांची संस्था सढळ हाताने मदत करत असे. अशा असंख्य उपक्रमांना शांतारामजी यांची उपस्थिती असे आणि व्यासपीठाखाली बसून शांतपणे व्याख्यानं, कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याइतके त्यांचे पाय मातीचे होते! त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमात मला सहभागी होता आलं; व्हावंही लागलं कारण त्यांचा अगत्यशील आग्रह.

वाचन, अभिजात संगीत आणि जुन्या हिन्दी चित्रपट गीतांचं श्रवण ही त्यांची आवड होती आणि त्या संदर्भातील माहितीचा मोठा साठा त्यांच्याकडे होता. खुलल्यावर त्या हकिकती, ते किस्से शांतारामजीच्या तोंडून ऐकणं ही पर्वणी असायची.

निवडणूक लढवतानाही शांतारामजी सुसंस्कृतपणाची पातळी कधीच सोडत नसत. त्या काळात त्यांच्या आणि आमच्या रात्री उशिरा भेटी होत. कितीही उशीर झाला तरी त्यांच्यातला यजमान जागरूक असे. 1996च्या निवडणुकीत रात्री साडेबारा वाजता शरद पवार आम्हाला शांतारामजींच्या निवासस्थानी भेटल्याचं अजून आठवणीत आहे.

शांतारामजींच्या लोकसेवा आणि विकास संस्थेचा प्रतिष्ठेचा 2008चा कर्मवीर कन्नमवार पुरस्कार मला जाहीर झाला. त्याआधी अर्थातच माझी संमती घेण्यात आली तेव्हा प्रमुख पाहुणे कोण अशी पृच्छा मी केली. शांतारामजींनी ज्या विचारवंताचे नाव घेतलं ते नामवंत असले तरी जातीयवादी आहेत असं माझं अनुभवाअंती बनलेलं मत होतं. शांतारामजींना मी म्हटलं, ‘हा पुरस्कार त्यांच्या हस्ते स्वीकारणार नाही कारण ती माझी भूमिका ठाम आहे. तुम्ही द्या मी पाया पडून स्वीकारेन; त्यांच्या हस्ते देणार असाल तर मी येणारच नाही.’ माझी भूमिका शांतारामजींनी मान्य केली आणि त्यांच्या हस्ते तो पुरस्कार मी स्वीकारला. सन्मानांची जी मोजकी स्मृतीचिन्ह मी जपून ठेवली आहेत, त्यात हे आहे.

मध्यंतरी शांतारामजींची सून रमा गोलवलकर घरी आली होती. प्रकृती ठीक नाही; शांतारामजी बरेचसे जाणीव-नेणीवेच्या बाहेर गेले आहेत असं तिच्या बोलण्यात आलं आणि काळीज लककन हललं होतं. आज अखेर ती बातमी आलीच. ज्ञानाचा आव नाही, सत्तेचा माज नाही, स्वभाव लोभी नाही आणि वृत्ती ऋजू व वैपुल्यानं सुसंस्कृतपणा असलेली शांतारामजी यांच्यासारखी खूप कमी माणसं राजकारणात पाहायला मिळाली.

 

29 सप्टेंबर

जे काही अमेरिकेत राजदीप सरदेसाईबाबत घडलं त्याकडे ‘सोयीचा चष्मा’ लाऊन न बघता चिकित्सक नजरेनं बघायला हवं. ‘हल्ला’ आणि ‘धक्काबुक्की’ यात महदंतर आहे हे विसरता येणार नाही. एक तर तो हल्ला नाही, राजदीपला झालेली धक्काबुक्की आहे. ती निषेधार्ह आहे यात शंकाच नाही. त्या घटनेचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे पण… हा ‘पण’ फार महत्त्वाचा आहे. अनेक पत्रकारांबाबत जेव्हा आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि आततायीपणा यातील सीमारेषा ‘मिटवल्या’ जातात आणि वर्तनात हेकेखोरपणा येतो तेव्हा हे असं घडणं स्वाभाविक असतं. मी कितीही हेकेखोरपणा केला, आततायीपणा केला, आक्रस्ताळेपणा केला तरी समोरच्या प्रत्येकाने तो सहन केलाच पाहिजे ही हेकट भूमिका बरोबर नाही. झुंडीची मानसिकता असते आणि ती ओळखून सार्वजनिक जीवनात वागायला हवं, हे आपण पत्रकारांनीही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असं पत्रकारांना वागताच नाही येणार!

 

30 सप्टेंबर

‘मी चुकूच शकत नाही कारण मी कायम बरोबरच असतो’ अशी भूमिका साहित्यिक / कलावंत / विचारवंत / पत्रकार-संपादक / राजकीय नेतृत्वाने घेतली की मग टोकाचे एकारलेले समर्थनात्मक कर्कश्श आवाज सुरू होतात. तारतम्य, सारासार विवेकाचे आवाज अशा वेळी अपरिहार्यपणे अंग चोरून बसतात आणि क्षीणही होतात!

 

28 ऑक्टोबर

काहींचे काही प्रश्न बिनतोडपणे निरूत्तर करणारे असतात. उदाहरणार्थ राजकीय वर्तुळात चांगल्यापैकी वावर असणार्‍या एका ‘कष्टाळू’ परिचिताचा फोन आला. ते म्हणाले, ‘लोच्या झालाय. प्रश्न गंभीर आहे.’

मी विचारलं, ‘काय झालं?’

तर ते म्हणाले, ‘मंत्रालय आणि प्रशासन पातळीवरची सगळी कामं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करून घ्यायची सवय गेल्या पंधरा वर्षात लागली आहे.’

‘आता भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांशी जवळीक वाढवा’ मी सल्ला दिला.

ते म्हणाले, ‘मी विमानाचं तिकीट पाठवतो. तुम्ही या मुंबईला आणि द्या ना एखादा चांगला कॉन्टॅक्ट गाठून… प्लीज…’

मी म्हटलं, ‘सॉरी हो पण भाजपात माझ्या कोणी ओळखीचं नाही तुम्ही म्हणता तसं. जे आहेत ओळखीचे ते काही माझं ऐकतील असं नाहीये मुळी. ’

ते ताड्कन म्हणाले, ‘म्हणजे इतके वर्ष पत्रकारितेत कोरडी झक मारली तुम्ही! देवाशपथ खरं सांगा, गेला बाजार मुंबईत घर नाही घेतलं तुम्ही इतकी वर्ष घासली तरी.’

‘माझा देव नाही कोणताच पण तुमच्या देवाशपथ खरं सांगतोय हो. माझी कुठेही शाखा नाही’ मी कळवळून म्हटलं.

‘मग जिंदगी फुकट गेली राव तुमची! नुसत्याच ओळखी म्हणजे तुम्ही कामाचे ना धामाचे…’ असं म्हणून त्यांनी मी काही तरी बोलण्याआधीच फोन बंद केला.

जिंदगी वगैरेचं सोडा पण त्या परिचिताचा ‘कोरडी झक’ हा शब्द सॉलिड आवडला. कधी तरी कुठे तरी वापरायला हवा.

 

29 ऑक्टोबर

काळ्या पैशाचा काथ्याकूट!

भारतातील काळ्या पैशाचा काथ्या गेली अनेक वर्ष कुटला जात आहे. हा कालावधी लक्षात घेता तो पैसा परदेशी बँकात ठेवणारे शांत बसले असतील असे समजणे म्हणजे कोणतीही भेसळ नसलेला अस्सल भाबडेपणाच नाही का? चर्चा सुरू असण्याच्या काळात त्या पैशाची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली गेली असणार यात शंकाच नाही. अलीकडच्या दीड-पावणे दोन दशकात आपल्या देशातील रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक किती झाली आणि ते करणारे कोण, त्यांचे कोणते उद्योग (उदाहरणार्थ – कोळसा खाणी, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा निर्माण करणारे उद्योग…) भरभराटीला आले हे जरा जरी तपासलं तरी ही हुशार मंडळी कोण, हे सहज समजेल.

परदेशी बँकातील काळ्या पैशाची बातमी देताना एक प्रकाशवृत्त वाहिनीवर चक्क एका स्विस बँकेसोबत भारतीय चलन दाखवले आणि चक्करच आली. परदेशी बँकात डॉलर्स/पाऊंड/युरो या चलनात गुंतवणूक होते! भारतीय चलन या परदेशी बँकांनी स्वीकारलं असतं तर गावगन्ना  चार-दोन तरी खाती या बँकात काढली गेली असती. हे लोक लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात कशाला सापडत बसले असते?

 

6 नोव्हेंबर

शंकरराव गेडाम यांचे निधन झाल्याची बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळाली आणि मन गलबललं. समाजाचा तळमळीने विचार करणार्‍या साध्या आणि सच्छील राजकारण्यांच्या साखळीतला दुवा निखळला ही जाणीव तीव्र झाली. पत्रकारिता करताना गेली अनेक वर्ष मी विदर्भात घालवली. या वास्तव्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील जे असंख्य राजकारणी पाहता आले त्यात शंकरराव एक. इतकी वर्ष राजकारणात घालवून म्हणजे, प्रदीर्घ काळ काँग्रेसचे पदाधिकारी, चार वेळा आमदार आणि एक टर्म मंत्री राहूनही शेवटपर्यंत शंकरराव हाऊसिंग बोर्डाच्या गाळ्यात राहिले यावर आज कोणाचा विश्वास बसणार नाही कारण राजकारणाचा आता बाजच बदलला आहे.

एक टर्म आमदार तर सोडाच नगरसेवक किंवा पक्षाचा राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून सुरूवात केली-न-केली की हाताच्या दहाही बोटात लठ्ठ अंगठ्या, मनगटावर भले मोठे ब्रेसलेट आणि काही महिन्यांतच टेलरमेड कपडे, बुडाखाली आलिशान भलीमोठी कार, श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन करणारे घर, पंचतारांकित वावर सुरू होण्याचे दिवस आता राजकारणात आलेले आहेत. अशावेळी महात्मा गांधी म्हणजे फक्त नोटेवरचे आणि पुजायला सोनिया किंवा राहुल (त्याआधी पुजायला इंदिराजी, मग संजय आणि मग राजीव गांधी होते!). हे देणारा जो कोणी असेल त्याचा राजकीय विचार खुंटीला टांगून उदोउदो ही संस्कृती आता आलेली आहे.

शंकरराव गेडाम यांनी मात्र काँग्रेस विचारावर आयुष्यभर निष्ठा जपली. महात्मा गांधींवरची श्रद्धा अव्यभिचारी वृत्तीने पुजली आणि कायम सामान्य माणसाच्या हिताचा विचार मनात तेवत ठेवला. अफाट चोफेर वाचन हे त्यांचे वैशिष्ट्य होतं त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचे कथन ऐकताना आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत. आवाज गडगडाटी, उच्चार स्पष्ट आणि स्वच्छ, भाषा एकदम खणखणीत!

शंकरराव गेडाम वृत्तीने स्वतंत्र विदर्भवादी आणि तेवढा एक मुद्दा वगळता आमच्यात  छान जमत असे. गप्पा मारताना राजकारणाच्या जुन्या आठवणीत ते रमून जात आणि आज आपण कसे ‘अनफिट’ आहोत हे वैषम्याने सांगत. मी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा निवासी संपादक म्हणून सूत्रे घेतल्यावर हा वृद्ध माणूस दीड जिना चढून वर आला. आमची बैठक सुरू होती तर न बोलता वाट बघत बसला कारण बाहेर कोणी त्यांना ओळखलंच नव्हतं. बैठक संपल्यावर आत आले आणि ठणठणीत आवाजात आशीर्वाद दिले तेव्हा मलाही भरून आलं होतं. अनेकदा त्यांनी आमच्यासाठी लिहिलं आणि संदर्भ, तपशिलाच्या चुका आवर्जून कळवत आम्हाला अचूक करण्यात वडीलधारी मोठी भूमिका निभावली.

महाराष्ट्राल्या राजकारण्यांची जी सोन्यासारखी असणारी पिढी मला एक पत्रकार म्हणून पाहता आली त्यात विदर्भातील शंकरराव गेडाम यांचा समावेश आहे. ही माणसं पैशाने श्रीमंत नव्हती, राहणीने साधी होती, मनानं निर्मळ आणि सच्छील होती, सुसंस्कृत होती, निष्ठावान होती, विचारानं व्रतस्थ होती… म्हणून माझ्यासारख्यांच्या आयुष्यात कायम मुक्कामाला आली. अशी माणसं पुन्हा-पुन्हा जन्माला यायला हवीत.

 

12 नोव्हेंबर

घटनेच्या नावाप्रमाणे नुसता आरडा-ओरडा! 1995साली सेना-भाजपचे युती सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी तत्कालिन राज्यपाल अलेक्झांडर यांनी अनुमती दिली आणि बहुमत सभागृहात सिद्ध करण्यास सांगितलं. त्यावेळीही आवाजी मतदानानेच बहुमताचा ठराव संमत करण्यात आला. उत्साहाच्या भरात बहुमत सिद्ध करण्यासाठी मतदानाची मागणी करण्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे उठून उभेही राहिले होते पण तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मतदान होऊ दिले नाही. हे त्यावेळी विधानसभा कव्हर करणार्‍या पत्रकारांना स्मरत असेल. (आपण कसं चातुर्य दाखवले त्यावेळी हे मनोहरपंतांनी पत्रकारांना कसं रंगवून सांगितले होते हेही त्यावेळी हजर असणार्‍या पत्रकारांना आठवेल.) घटनेत बहुमत कसे सिद्ध करावे याबाबत माझ्या माहितीप्रमाणे तरतूद नाही. ते कलम तर सांगावे कोणा नेत्याने. घटनेच्या नावाप्रमाणे नुसता आरडा-ओरडा करू नये. बहुमताच्या संदर्भात जे काही संदर्भ आहेत ते ‘कौल आणि शकधर’मध्ये म्हणजे भारतीय संसदीय कामकाजाच्या बायबलमध्ये!

 

22 नोव्हेंबर

लिहिलेले काय आहे ते नीट समजून आणि उमजूनही न घेता खूप आव आणत काही लोक अशी काही प्रतिक्रिया व्यक्त करतात की आपण निरूत्तर होतो. उदाहरणार्थ आजच्या तांत्रिक प्रगतीच्या युगात एका टिप्पणीवरून माणसांबद्दल मत मांडताना तुम्ही नक्कीच घाई करताय याचा खेद वाटतो. या प्रतिक्रियेचा अर्थ काय घ्यायचा? कोणाला या अवतरण चिन्हातील विधानाचा अर्थ कळला तर मलाही कळवा राव. अशा काही अनाकलनीय प्रतिक्रियांमुळे मी सध्या फारच त्रस्त आहे. प्लीऽऽऽजज हेल्प मी!

 

4 डिसेंबर

विस्मरणात गेलेल्या ‘जनता’ परिवारातील नितीश कुमार, मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव आदी सहा समाजवादी नेते एकत्र येणार आणि मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘समाजवादी जनता दल’ स्थापन करणार ही बातमी वाचली आणि आठवलं; लष्करशाही असलेल्या राष्ट्रात हुकुमशहा कधीच निवृत्त होत नाही. त्यांना पदच्युत करावं  लागतं! कोणत्याच लष्करशाही राष्ट्र किंवा हुकूमशहाचे नाव मी घेतलेले नाही. ते ज्याचं त्यानं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आठवून पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार भारतीय लोकशाहीत कायम ठेवण्यात आलेला आहे!

 

5 डिसेंबर

‘आम्ही (म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष) एकत्र यावे अशी जनतेची इच्छा आहे,’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अगदी खरं असावं ते आणि फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवावं असंही काही नाहीच मुळी.

प्रश्न एवढाच आहे की, ही शिंची ‘जनतेची इच्छा’ गेले 62 दिवस लपून कुठे बसली होती? आज भल्या पहाटे पडलेला हा प्रश्न आहे! वृत्तपत्रांनी चर्चा केली, ‘च्यानल’वाल्यांनी काथ्याकूट केला, राजकीय विश्लेषक तर्कांच्या चिंध्या फाड-फाड-फाडून थकले… पण ही शिंची जनतेची इच्छा काही सापडली नव्हती आणि आज अचानक ती कशी काय प्रगट (की प्रकट… चर्चेसाठी आणखी एक तुकडा!) झाली, हे काही समजलं नाही बुवा!

 

24 डिसेंबर

भारतरत्न हा सन्मान आहे की पुरस्कार की पारितोषिक, असा प्रश्न (भाबडा?) प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून प्रकाशित होणार्‍या बातम्यात होणार्‍या विविध उल्लेखांवरून पडला.

भारतीय संसदीय लोकशाही आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल तसेच सर्व विरोध झुगारून भारत-पाक संबध सौहार्द्रपूर्ण होण्यासाठी केलेल्या स्पृहणीय प्रयत्नाबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान या आधीच मिळायला हवा होता. वाजपेयी हे एक ‘लिव्हिंग लिजंड’ आहेत असे म्हटले जाते तर त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना हा सन्मान वाजपेयी यांच्या आधी का दिला गेला हा प्रश्न याप्रसंगी फिजूल आहे.

आज एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘किमान गेल्या वर्षी तरी सचिनच्या वेळेसच वाजपेयींना हा सन्मान मिळायला हवा होता.’

मी त्याला म्हटलं, ‘असे सन्मान देणे ही बहुतांश वेळा औचित्यभंगाची अपरिहार्य राजकीय अगतिकता असते. पद्मजा फेणाणी या शिष्येला आधी आणि नंतर त्यांचे गुरु हृदयनाथ यांना पद्म सन्मान मिळतो; संजीवकुमार, नसिरूद्दीन शहा यासारख्यांना न मिळता सैफ अलीला पद्म पुरस्कार मिळतो; जेमतेम चाळीशी पार केलेल्या प्रकाशवृत्त वाहिन्यांतील दोन पत्रकारांना पद्म मिळतो पण अगदी मराठीपुरतं बोलायचं तरी अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, दि. भा. घुमरे, गोविंदराव तळवलकर यांना मिळत नाही… अशा सर्व  ‘राजकीय मर्जी’ या सदरात मोडणार्‍या निर्लज्ज राजकीय औचित्यभंगाच्या घटना आहेत या. त्याला पटलं नाही आणि रागारागाने त्याने फोन बंद केला. आता हा सन्मान मिळाला काय आणि नाही काय, अटलबिहारी वाजपेयी त्याच्या पार पुढे निघून गेले आहेत. आपण आपली समजूत काढायची की, देर आये दुरूस्त आये!

मूळ प्रश्न हा की हा सन्मान आहे की पुरस्कार की पारितोषिक. आजवरच्या कामगिरीबद्दल भारतरत्न पारितोषिक देऊन वाजपेयी यांचा गौरव करण्यात येत आहे, असा उल्लेख एका प्रकाशवृत्त वाहिनीवर ऐकला म्हणून हा लेखनप्रपंच!

 

26 जानेवारी

भारतीय जनता पक्षप्रणीत केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नेते लालकृष्णजी अडवाणी यांना पद्म सन्मान जाहीर झाला. म्हणजे अडवाणी आता भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नसणार! ज्याच्या अंगा-खांद्यावर बसून मूल मोठं होतं, त्या मोठं करणार्‍यालाच ते मूल नियोजन- बद्धरित्या बाजूला कसं टाकतं त्याचं हे उत्तम उदाहरण! मुलगा कोण आहे तो, नाव काय त्या मुलग्याचे हे काय सांगायला हवंच का?

 

11 फेब्रुवारी

प्रत्यक्षात मात्र माणूस म्हणून नेमाडे यांचे पाय कसे मातीचेच आहेत हे विनय हर्डीकर आणि रवींद्र गोडबोले यांनी उघड केलेल्या एका पत्रव्यवहारातून समजलं. भालचंद्र नेमाडे-रा. ज. देशमुख यांच्यातील हा पत्रव्यवहार नुकताच वाचण्यात आला. (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकर र्ींळपरू.षीशशवेासारळश्र.लेा किंवा रवींद्र गोडबोले ीर्रींळपवीरसेवलेश्रशर्र्रिींरीर्ळीीींशलह.पशीं या मेलवर संपर्क साधावा). याशिवाय श्रीकांत उमरीकर यांनी लिहिलेला भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’ हा मजकूरही टोकदार आणि वाचनीय आहे. तो मजकूर

हीींिं://ीहीर्ळीाीळज्ञरी.लश्रेसीिेीं.ळप/2014/01/लश्रेस-िेीीं_27.हीांश्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वास्तव आणि सत्य याची बेमालूम एकरूपता करणारा कवी आणि माणूस असं मी कवी ग्रेस यांच्याबद्दल लिहिलं होतं; ते तंतोतंत नेमाडे यांनाही लागू होतं हे, हा पत्रव्यवहार आणि उमरीकर यांचा ब्लॉग वाचल्यावर पटलं. हे सगळं वाचल्यानं नेमाडे यांच्या लेखनाबद्दलचं माझं मत मुळीच बदलणार नाहीये; ते गारूड कायमच राहणार आहे. मात्र माणूस आणि त्यांचे कर्तृत्व हे वेगळे पैलू असतात. त्या दोन पैलूत सरमिसळ करायला नको. अशी सरमिसळ केली किंवा झाली की आभास निर्माण होतात आणि अनेकांचा गोंधळ उडतो; हे माझं म्हणणं नेहेमीच का असतं ते हे वाचल्यावर उमजणे सोपं जाईल.

 

20 फेब्रुवारी

भारताच्या न्युझीलंड दौर्‍यात बहुदा 1986 किंवा 87चा दौरा; सकाळी तीनच्या सुमारास सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरू व्हायचं. मी रात्री उशिरापर्यंत रिपोर्टिंगमध्ये तर अविनाश गुप्त वकिली केस स्टडीमध्ये मग्न असण्याचे ते दिवस होते. आम्ही दोघेही क्रिकेटवेडे. ठार वेडे. रात्री कितीही उशीर झाला झोपायला तरी सामन्याच्या दिवशी सकाळी तीनच्या आधीच एकमेकाला फोन करून आम्ही उठवायचो आणि मग तयार होऊन झोपाळल्या डोळ्यांनी क्रिकेट सामने बघत बसायचो. एखादी झपकी तर लांबच पेंगही मारली नाही कधी आम्ही! तेव्हा सेलफोन नव्हता. सकाळी सकाळी फोनच्या रिंगचा आवाज घरभर दुमदुमायचा; अशा वेळी फोन वाजला की धस्स व्हायचे दिवस होते ते.

चारी मुंड्या चीत होणे म्हणजे काय असते याचा अनुभव आज सकाळी इंग्लंडविरूद्ध न्युझीलंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामना बघताना आला. साऊदी नावाचा झंझावात आधी आला आणि तो कमी काय म्हणून ब्राड्नने फलंदाजी करताना त्सुनामी उठवली मैदानावर! त्सूनामी माणसांना नाचवते. आज ब्राड्न नावाच्या माणसाने त्सूनामीला नाचवले आणि इंग्लंड क्रिकेट पालापाचोळ्यासारखं उडून गेलं.

 

21 फेब्रुवारी

समाजात विखार वाढवणारे लोक आणि शस्त्रांचे कारखाने वाढत आहेत. ते विकणार्‍या दलालांची संख्या वाढतच चालली आहे. ही शस्त्रे बेभानपणे चालवणार्‍या धष्टपुष्टांचे कळप दिसामाजी विस्तारत असल्याचे भयकंपित करणारे वातावरण आहे. काही लोकांना हेच असेच हवेच आहे. आपण सावध राहिले पाहिजे!

 

26 फेब्रुवारी

एक आठवण अशी – मुंबई मराठी पत्रकार संघाचा ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार मला 2010 साली मिळाला. मुंबईत हा पुरस्कार प्रदान होताना इसाक मुजावर श्रोत्यात होते आणि मला ते ठाऊक नव्हतं पण व्यासपीठावरून बघताना समोर बसलेला एक इसम ‘आपला’ आहे असे तीव्र फिलिंग येत होते कायम. कार्यक्रम संपल्यावर ते भेटले. स्वत:ची ओळख सांगत ते म्हणाले, मला तुमचं लेखन खूप आवडते आणि ते सांगण्यासाठी मी इथे आलोय! मी स्तब्ध झालो… सद्गदित झालो. काय बोलावं ते सुचेना. त्यांना पायलागू केलं तर ‘अरेरे! हे काय करता’ म्हणत ते मागे सरकले… ते इसाक मुजावर होते!

 

24 मार्च

माझी वाचनाची शैली अजब आहे!

एकेकाळी घरी, कार, कार्यालयातलं केबिन तसंच प्रवासात, असं वाचन सुरू असे आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं पुस्तक.

भाषा : मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणतीही आणि विषय भलते-सलते म्हणजे वेगवेगळे; मात्र शिफ्ट होताना काहीच त्रास होत नसे. समोरचा कितीही बडबड करत असला तरी मी वाचन किंवा लेखन करू शकत असे/आजही करतो.

गेले ते दिन गेले…

वाचनाचा मातृसंस्कार, मग ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास आणि नंतर पत्रकारितेचा धबडगा यातून ही शैली विकसित झाली असणार.

एका नागपूर-मुंबई प्रवासात आस्मादिकांनी काहीही कारण नसतांना ‘ऋग्वेदीय अंत्येष्टिसंस्कार’ हे अफलातून पुस्तक हातावेगळं केलं. संपादक – नारायण अनंत सोमण / प्रकाशक – मीनल प्रकाशन कोल्हापूर.

अशात काही वर्षातला एक फंडा म्हणजे – वाचता वाचता मजकुरावर अलिखित संपादकीय संस्कार होतात. मंगला म्हणजे माझ्या बेगमला, दुपारी शब्दकोडी लिखित(च) सोडवायची असतात. त्यामुळे मी शब्दकोडी मनातल्या मनात सोडवतो!

असो, अशा गंमती-जमती बर्‍याच आहेत…

 

30 मार्च 

कंबरेला ‘परवाना असलेले’ रिव्हॉल्वर खोचून मूक आणि बधिरांच्या शाळेत खुलेआम जाणारे मंत्री थोर, त्या कृतीचे समर्थन करणारे मुख्यमंत्री थोर-थोर, त्यांचा पक्ष ‘डिफरंट’ कसा आहे हे यातून सिद्ध होणं म्हणजे खूपच थोर, तो पक्ष आणि त्याचे नेते-कार्यकर्ते यांचा हा ‘डिफरंट’पणाचा संस्कार आणि राजकीय विचार फारच थोर आणि आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळणं हे म्हणजे तर आणखीनच साक्षात थोर म्हणजे फारच थोर.

एकंदरीत आपलं जीवन थोर ठरावे यासाठी ‘ही’ राज्यकर्ते मंडळी घेत असलेले असलेल्या अति थोर कृतीला आमचे महाथोर सलाम, सलाम-सलाम-सलाम…

– प्रवीण बर्दापूरकर

संभाजीनगर । 9822055799

 

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा