परिचारिका कधी तू वैद्य होऊनी
किती रुपात तू आलास सैन्य होऊनी
कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला
आज माणसामध्ये मी देव पाहिला
वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री पुरवून आपल्या घरातून शक्य होईल तितकी मदत करणारे सर्व या लढाईचे खरे योद्धे ठरले. कित्येकांच्या जीवावर बेतली तरीही ही सेवा अखंड सुरू राहिली. वर्षानुवर्षे वारकरी पांडुरंगांच्या दर्शनाला पायी जायचे पण या घरकोंडीच्या काळात त्याच्या भक्तांपायी स्वतः पांडुरंग वेगवेगळी रूपे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचला.
महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे वेगळेपणाचे वर्णन करताना अर्थातच पहिल्यांदा उल्लेख येईल तो पंढरीच्या वारीचा. वारी मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ज्याने कधीही ती केली नाही अगदी त्याच्याही. वारीने दिलेले ज्ञान आणि शिकवण आपल्या सर्वांच्याच जीवनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवास येते. मराठी माणसाच्या आयुष्याला तिचा परिसस्पर्श कधी ना कधीतरी होतोच.
भक्तियोगात लीन झालेल्या कर्मयोग्यांनी कित्येक शतके परकीय आक्रमणांना न जुमानता वारीची परंपरा जपली आणि या मंथनातून मिळालेल्या ज्ञानाचे अमृत तितकीच वर्षे आपल्या संतांनी , किर्तनकारांनी आम्हा सर्वांना पाजले.
स्वराज्यस्थापना, स्वराज्यरक्षण , भारताचा स्वातंत्र्यलढा, समाजसुधारणा , लोकजागरण या सर्वांमध्ये संतांनी दिलेले हे ज्ञान महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिले. हेच ज्ञान मार्ग शोधत मंदिरातील भजन, कीर्तन, पाठ्यपुस्तकं, कविता, अभंग, भक्तिगीतं, नाट्यगीतं अगदी चित्रपटगीतांद्वारे कुठल्या ना कुठल्या मार्गातून आमच्यापर्यंत पोहोचते. त्यातील एखादा समास, कडवे अचानक एखाद्या वेळेस एखाद्या मनाला स्पर्श करून जाते आणि उच्च अनुभूतीचा उमाळा फुटतो, अंतर्मनात एखाद्या संस्काराचे बीज पेरले जाते. जे कुठल्या ना कुठल्या प्रसंगात मार्गदर्शक आणि परिस्थितीत तारक ठरते. त्याक्षणी आत ईश्वराचा साक्षात्कार होतो.
भारतात ज्ञानार्जन करण्याआधी गुरूला शीर अर्पण करण्याची परंपरा आहे अर्थात आपला अहंकार गुरूच्या पायी ठेऊन मग ज्ञानार्जन करायचे, साधना करायची कारण अहंकार हा ज्ञानमार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. भक्तीमार्ग याच अहंकारास भेदण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. वारीमध्ये वारकरी जेव्हा एकमेकांच्या पाया पडतात तेव्हा अज्ञानातून जन्मलेल्या भेदाचे साखळदंड आपोआप गळून पडतात. जात-पात, जेष्ठ-लहान, श्रेष्ठ-कनिष्ठ सगळे द्वंद्व नष्ट होतात. मग अहंकार कसा राहील? कारण तो असायला भेद टिकावा लागतो. वारकरी मनाचा हा व्यायाम दरवर्षी करतो म्हणून त्याने ग्रहण केलेले ज्ञान स्थिर राहते. ते त्याच्या कृतीत उतरते. संसारात राहूनही विरक्तीचा भाव त्याच्यात जागतो आणि जिवंतपणीच मुक्तीचा, परमानंदाचा अनुभव तो घेत राहतो.
शेकडो वर्षांपूर्वी आमच्या संतांनी या भेदाला पायाखाली तुडवायचा हा वारीचा मार्ग दाखवला आहे. भवसागराशी एक होण्याची वाट सोपी केली आहे. कित्येक ‘प्रगत’ म्हणवल्या जाणाऱ्या देशांमध्ये तर वर्णभेद, गरीब श्रीमंत इ. ची मानसिक, वैचारिक दरी अजूनही आहे. पण आमचा विठुच जर काळा सावळा आणि सर्वसामान्य जीवन जगणारा आहे तर आमच्या मनात हे टिकेलच कसं ? आणि कधी मनात आलंच तर त्याला मुळापासून उपटून काढायला आमच्या संस्कृतीचे हे वैद्य शतकानुशतके वाऱ्या करून आम्हाला एकोप्याची आठवण करून देतच आहेत. चुकलेल्या वाटांवर आमच्या संतांचे साहित्य दीपस्तंभासारखे आम्हाला मार्गदर्शन करतच आहे. म्हणूनच या भारतवर्षाला कधीही बाहेरील समाजसुधारकांची गरज भासली नाही.
पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेल्या त्याच्या भक्तांची सेवा करणाऱ्यांना या भक्तांमध्ये पांडुरंग दिसतो. त्यांची नखे काढणे त्यांच्या हातापायाची, डोक्याची मालिश करणे त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय करणे अशा अनेक सेवा हे सेवेकरी वारकऱ्यांना पुरवतात. त्यावेळी त्यांच्या मनात कसलाही भेद नसतो. खरंतर मोठमोठया कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये विविधता आणि एकता (डायव्हरसीटी अँड इनक्लूजन) यावर महागड्या वक्त्यांचे महागडे व्याख्यान आयोजित करण्यापेक्षा आपल्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना एकदा तरी वारीला पाठवावे , निदान ती मनापासूम अभ्यासायला लावावी, संतसाहित्य वाचायला सांगावे म्हणजे त्यांच्यात एकोप्यासोबत निरंतर सेवाभावदेखील जागृत होईल आणि आजकाल जवळपास सर्व कंपन्यांना भेडसावणारी कर्मचारी न टिकण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे वारी फक्त जीवनमूल्ये नाही तर व्यवस्थापन देखील शिकवते तो अधिकचा फायदा. पूर्वापार चालत आलेले वेळेचे व्यवस्थापन ते अलीकडे वारीमार्गावर स्वछता व्यवस्थापनात झालेले बदल. याचे उत्तम उदाहरण आहे.
वरवर वारी म्हणजे फक्त टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठलवेड्या भक्तांचा पंढरपूरच्या मंदिरातील मूर्तीच्या दर्शनासाठी पायी जाणारा समूह दिसत असला तरी या वारीचा जनात दूरवर आणि मनात खोलवर सतत होत असलेला अदृश्य प्रभाव जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे जाणवणारा आहे. त्यासाठी फक्त आत्मभावाने या समाजसंस्काराकडे बघितले गेले पाहिजे. विठूची मूर्ती पहायला निघालेल्या या वारीमध्ये, वारी न करणाऱ्यांच्या आतला विठोबा सुदधा जागृत करण्याचे सामर्थ्य आहे आणि अशी जागृती अनुभवल्यावर प्रत्यक्ष वारी अनुभवायची ओढ आपोआपच लागते आणि प्रत्यक्ष अनुभवानंतर…
दिस दिस एकादशी मास आषाढ महिना
तुझ्या ध्यानात या मनी माझ्या आनंद माईना
मोह सुटला गा सारा अनुभवे आवडीने
सुटे संसाराची आस तुझा ध्यास तो जाईना
दाहीदिशा तुझे रूप झालो धन्य बा विठ्ठल
दिव्यदर्शन सोहळा अनुपम्य हा विठ्ठल
चराचरात या देवा तुझे देहू नि आळंदी
तुझ्या लेकरांची सेवा हेच पुण्य बा विठ्ठल
– ज्योती घनश्याम पाटील
८४३१७५४०२९
पूर्वप्रसिद्धी – दै. संचार १० जुलै २०२२