चपराकचा अनोखा अमृत महोत्सव

वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड सातत्याने सुरू असते. अशा वेगळ्या वाटा चालणा-या प्रकाशन संस्थे पैकी एक नामाकित संस्था म्हणजे चपराक प्रकाशन. चपराकने आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. नवोदिताना संधी देण्याबरोबर दर्जाशी तडजोड कधीच केलेली नाही.व्यवसाय करतानाही त्यांनी आपले सामाजिकभानही ढळू दिले नाही.आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून जोपसलेला वसा अत्यंत कौतूकास्पद आहे.आपल्या प्रत्येक कामात समाजाच्या भल्याचा विचार करणे, तत्वाशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करणे हे त्यांचे वैशिष्टये बनले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यांनी वर्षभरात मराठी साहित्याच्या विविध वाडःमयीन प्रकारचे 75 पुस्तके प्रकाशित करण्याचा केलेला संकल्प आणि त्यादृष्टीने टाकलेले पाऊल चपराकचे वेगळेपण बनते आणि राष्ट्र भक्तीचा साक्ष देते.
मराठवाडया सारख्या ग्रामीण आणि आर्थिक दृष्टया मागास असलेल्या प्रांतातून एखादा तरूण पुण्यासारख्या महानगरात येतो. खरंतर महानगरात रोज हजारो मुले येतात..आणि पुन्हा माघारीही फिरतात..काही स्थिरवतात..मात्र काही मुले महानगराच्या संस्कृती पटलावर आपल्या नावाचा ठसा उमटवितात.हा प्रवास तितकासा सोपा नाही.त्यात पुण्यासारख्या विद्येचे माहेर घर असलेल्या महानगरात नाव मिळविणे आणि तेथे प्रवास सुरू ठेवणे हे कठीण काम आहे. मात्र ते शिवधनुष्य घनश्याम पाटील यांनी लिलया पेलले. त्यांना महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील ओळखणारी माणसं अनेक आहे. एकच माणूस कितीतरी क्षेत्रात आपल्या कर्तृत्व सिध्द करतो त्याचे कौतूक वाटते.हा माणूस म्हणजे माणसांचे मोहळ असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील माणसांशी जोडलेले नाते आपण अनुभवले की सहजतेने लक्षात येते.त्यांचा महाराष्ट्राला परीचय जो आहे तो एक पत्रकार..स्तंभलेखक..प्रकाशक..संपादक आणि लेखक आणि जीवनावर निस्सिम प्रेम करणारा हा “ माणूस ” आहे,
एकच माणूस इतक्या विविध क्षेत्रात काम करतो हे महाराष्ट्रातील तरूणांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. काही माणसं अत्यंत मोहक असतात.अर्थात त्यांना पाहाता क्षणी त्यांच्या प्रेमात पडावे असे माणसं तशी कमीच. पण घनश्याम पाटील मात्र प्रेमात पडावे अशा व्यक्तीमत्वापैकी एक नाव.असेच एकदा संगमनेरच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. त्यांना घनश्याम पाटील यांचा फोन आला..संगमनेरला येतो आहे.त्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत आग्रहाचे निमंत्रण दिले. खरंतर तो फोनवरील संवाद होता..पण तरी सुध्दा त्यांचा स्वागताचा उत्साह खूप अंतरिक होता. तो त्यांच्या संवादात स्पष्टपणे जाणवत होता. ते पाटील यांच्या बददल भरभरून बोलले. त्यांनी जे म्हणून सांगितले ते ऐकल्यावर आपण त्यांना भेटावे अशी अंतरिक ओढ निर्माण होणे साहजिक होते.त्यामुळे आपण त्यांना भेटू. असे त्यांनी सूचविले. मलाही आनंद वाटला.कारण मलाही भेटण्याची अंतरिक ओढ होती. जेव्हा काही माणसांना भेटावे असे वाटते तेव्हा त्यांच्याशी अंतरिक हदयांशी नाते जोडलेले असते. ये हदयीचे ते हदयी घालीले असेच काहीसे ते असते. त्याप्रमाणे भेटण्याची मलाही उत्सुकता होती. ते आल्यावर चहापानासाठी एका हॉटेलमध्ये बसलो. तशी फारशी उंची नाही.अत्यंत प्रसन्न चेहरा,दाढी चेहे-याला शोभेल अशी वाढलेली.पॅन्ट,शर्ट आणि घातलेले सुंदर जॅकेट.मोहीत करणारे व्यक्तीमत्व असल्याचे सातत्याने जाणवत होते. चहापान सुरू असताना एकमेकाचा परिचय करून देण्यात आला.संवादाला सुरूवात झाली. गप्पांचा फड रंगत गेला. एक दोन तास कसे गेले कळाले नाही. हा माणूस शब्दांच्या प्रेमात आहे हे सतत जाणवत होते. गप्पामध्ये सामाजिक,राजकिय,शैक्षणिक,सांस्कृतिक असे सारेच विषय होते. हा माणूस माणसांशी अत्यंत प्रामाणिक आहे.पुण्यासारख्या शहरात राहूनही त्यांचे मातीशी असलेले नाते तुटलेले नाही.त्यांच्या घरात असलेली संत साहित्याची पंरपरा त्यांच्या हदयात कायम आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणाचे बीज हदयात आहे. गप्पांच्या ओघात विषय निघाला की संताचे अभंग,ओव्या अशा कितीतरी गोष्टी मुखोदगत असल्याचे जाणवत गेले. त्यांच्या मुखातून अनेक संतवचन बाहेर पडतात. शेकडो अभंगाचे प्रमाण ते सहजपणे सांगून जातात.आमच्यातील नाते पुढे घेऊन जाणारा तो एक समान धागा होता.संत विचाराची कास त्यांनी जीवन प्रवासातील महत्वाची मानली.त्यामुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायात असताना देखील त्यांनी चैतन्यमय साहित्याचा विचार कायम ठेवत अनेक उत्तम साहित्य वाचकांना देत गेल्याचे जाणवत राहते.
गप्पा सुरू झाल्यावर त्यातून जाणवले त्याच बरोबर त्यांनी केलेले स्तंभ लेखन, पुस्तकांचे लेखन वाचत गेल्यावर त्यांची काही विषयावरील मते अत्यंत ठाम आहेत हे सतत जाणवत गेले.ती मते म्हणजे प्रामाणिकपणाची साक्ष आहे.विचारांचे आणि कोणा व्यक्तींचे लागुनंचालन नाही.प्रत्येक मतामागे भूमिका आहे. “ दिली तर देऊ कासेची लंगोटी..नाठाळाच्या माथी हाणू काठी..” या न्यायाने ते विविध साहित्य,लेखन प्रकारातून व्यक्त होत होते.आपल्याला जे पटते तो विचार प्रामाणिकपणे मांडणे,त्या विचाराची कास धरत लिहित राहणे हा त्यांचा स्वभाव.त्यामुळे परखडपणा कायम राहिलेला दिसतो.अर्थात जी माणसं प्रामाणिक असतात ती परखड असतात .तो प्रामाणिक असल्याचा गुण आहे हे कसे नाकारणार ? त्या अर्थांने ते अत्यंत परखड असल्याचे त्यांच्या अभिव्यक्तीत सातत्याने दिसते. आजही अनेकदा त्यांच्यातील परखडपणा कायम जाणवत राहतो.मात्र त्या परखडपणात कोणाले दुःखावणे नाही तर भूमिका प्रामाणिकपणे मांडणे असते. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या माणसांचे प्रयत्न आणि भूमिका इतरांपेक्षा वेगळी असते. चपराक दिवाळी अंक हा त्यांचा अंक साता-याच्या विक्रेत्यांनी मागविला होता. दुस-या दिवशी ते अंक परदेशात पाठवायचे होते.कोणत्याही परीस्थितीत अंक पोहचावायले हवे शेवटी वाचक हा महत्वाचा आहे. त्यांनी सांयकाळी मोटारसायकल काढली आणि पुण्यातून साता-याला जाऊन मध्यरात्री दिवाळी अंक संबंधितांच्या हातात दिला. त्यावेळी पाऊसही होता. पण वाचकांशी प्रतारणा होता कामा नये. त्याला जे हवे ते मिळायला हवे ही त्यांची धारणा आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा दर्शित करते. वाचकांना जे जे हवे ते दिले पाहिजे.त्यासाठी आपल्याल कितीही कष्ट सोसावे लागले तरी चालेल पण, वाचकांना देत राहायचे.प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यावर त्यातून पैसा महत्वाचा नाही तर जे जे म्हणून चांगले आहे ते वाचकांच्या हाती मिळावे. नवोदितांना संधी मिळावी या विचाराने सुरू केलेले हे प्रकाशन आहे.खरतर अलिकडे या व्यवसायात देखील मोठया प्रमाणावर गैरप्रकार सुरू झालेले आहेत.अशा परीस्थितीत नवोदितांशी फसवणूक करणारे अनेक जण आहेत. मात्र चपराक सतत चांगले तेच देत गेल्याचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या व्यवसायात अनेक नवोदिताना प्रकाशाच्या वाटेवर आणले आहे. अनेकाचे हात लिहिते केले. अनेकांना आत्मविश्वास दिला. मात्र जे चांगले नाही त्यांना त्यांना नाकारण्याची हिम्मतही दाखविली. प्रकाशनाच्या व्यवसायात आपले माणूसपण आणि माणसांशी असलेले भावनिक नाते त्यांनी सतत जपले आहे. एका कवयत्रीने आपल्या कविता प्रकाशनासाठी त्यांना पाठविल्या होत्या.अनेकांचे कच्चे मसुदे येतात.त्यामुळे ते वाचने आणि गुणवत्तेच्या आधारे प्रकाशित करणे घडत होते. त्यासाठी काही काळ जावा लागतो. त्याच वेळी पहाटे अपरिचित असलेल्या एका कवयत्रीचा फोन आला. त्यांनी सांगितले की माझे वडील आता आय़सीयु मध्ये आहे.डॉक्टरांच्या मतानुसार ते फार काळाचे सोबती नाही.त्यांची एक अंतिम इच्छा होती.माझ्या मुलीची कविता संग्रह प्रकाशित व्हावा.पण आता ते जीवंत असे पर्यंत ते शक्य नाही.असं म्हणून त्या रडत होत्या. मी माझ्या कविता तुम्हाला पाठविल्या होत्या. प्रकाशक म्हणून त्यांनी सारे ऐकून घेतले.प्रकाशक म्हणून धंदा करायचा असता तर या घटनेचा फारसा परिणाम झाला नसता.मात्र त्यांनी सकाळीच काम सुरू केले आणि अवघ्या 24 तासात पुस्तक प्रकाशित करण्याचा विक्रम केला.त्यांनी पुन्हा दुस-या दिवशी सकाळी पुण्यातून बसमध्ये पार्सल टाकले आणि फोन करून पार्सल उतरून घेण्याची विनंती केली.खरतंर चोविस तासातत्यांनी आपल्याला कोणते पार्सल पाठविले असेल असा त्यांना प्रश्न पडला होता. सकाळी आपल्या गावी बस पोहचताच पार्सल सोडून घेतले आणि पाहतात तर काय ? चक्क त्यांचा कवितासंग्रह त्यात होता. वडीलांच्या हाती संग्रह ठेवला.त्यांनी डोळे भरून पाहिला.आपल्या मुलीचे पुस्तक पाहून त्यांना आनंद झाला होता.आपल्या व्यवसायाच्या पलिकडे जात ,नफा तोटा याचा विचार न करता नाते आणि भावना जोपासणारा प्रकाशक सापडणे दूर्मिळच म्हणायला हवा.
त्यांनी दरवर्षी चपराकच्या निमित्ताने दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्याचा केलेला विक्रम हाही मराठी प्रकाशन व्यवसायत चर्चेचा विषय आहे.लाखावर दिवाळी अंक विकला जाणे .मराठी रसिक जगाच्या पाठीवर जेथे जेथे असेल तेथे तेथे आपला अंक त्यानी मागणी केला की पोहचला पाहीजे.त्यात पैसा महत्वाचा नाही तर वाचकाची भूक भागणे महत्वाचे आहे.त्यामुळे त्यांनी चपराकचा केलेला विक्रम हा मराठी भाषेची चिंता करणा-यांना काहीसा दिलासा देणारा आहे.आपण चांगले काही दिले तर वाचक स्विकारतात ही त्यांची धारणा बरेच काही सांगून जाणारी आहे.चपराक मासिकही साततत्याने प्रकाशित करणे आणि वाचकांना नवनव काही देत राहणे ही सारेच कमाल करणार आहे.त्यांचे विविध वृतपत्रातील स्तंभ लेखन वाचताना अत्यंत सुस्पष्टता आणि परखडपणा जाणवतो.वाचक आणि राष्ट्रप्रेम यांच्याशी प्रतारणा करायची नाही हा त्यांचा स्वभाव लेखनातही कायम दिसतो.त्यामुळे चपराकचे प्रकाशन सातत्याने होते आहे.अलिकडच्या काळात त्यांनी बाल वाचकांच्या संगतीने काम करण्याच्या दृष्टीने लाडोबाचे प्रकाशन सुरू केले आहे.या वयात मुलांना आपण अधिक चांगले साहित्य निर्माण करून दिले पाहिजे.त्यात वाचनाचा संस्कार दडलेला आहे.ही त्यांची अंतिरक प्रेरणा मराठीबददल चिंता नाही तर त्यासाठीच आपण काही केले पाहीज ही धारणा आहे.बालसाहित्याच्या दृष्टीने अंक हाती देण्याबरोबर क्युआऱ कोडचा प्रयोगही त्यांनी करून गोष्टी वाचण्याबरोबर ऐकण्याचा आनंद बालवाचकांना दिला आहे.त्यांचे सारे प्रयत्न मराठी भाषेबददल चिंता करण्यापेक्षा आपणच प्रयत्न करण्याची गरज आहे.आपल्याला जे जे शक्य आहे ते करत राहावे ही त्यांची धारणा बरेच काही शिकवणारे आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्हा,विभाग स्तरावर संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भूषविलेले पदे..आणि तेथे केलेली भाषणे ही सकारात्मकतेने भरलेले दिसतात.त्यांच्या विचारात कोठेच नकारात्मकता भरलेली दिसत नाही.त्यामुळे त्यांच्या संवादात सतत एक उर्जा ठासून भरलेली दिसते.जगण्यावर निस्सिम प्रेम आणि त्यासाठीची वाट चालतानाचा प्रयत्न इतरांना प्रेरणा देऊन जाते.काम करण्याची शक्ती ठासून भरली आहे.माझ्या शिक्षणाचे पसायदान या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची त्यांना मी आदल्या दिवशी सांयकाळी विनंती केली .त्यांनी होकारही दिला आणि सकाळी सात वाजता प्रस्तावना पाठविली..आणि वाचा असे सांगितले.मला तर हा धक्काच होता.प्रस्तावना अत्यंत सुंदर झाली होती.वेगवेगळे संदर्भ होते आणि चित्ताची प्रसन्नता शब्दातून व्यक्त झाली होती.त्यांना मी विचारलेही तर ते म्हणाले सकाळी ४ वाजता कार्यालयात आलो आणि प्रथम पुस्तक वाचून काढले.यापूर्वी दोनदा वाचले होते आज तिस-यांदा वाचले..आणि लिहिता झालो.कामावर निष्ठा असेल तर काय घडते त्याचा हा पुरावा होता.रोजच रात्री उशिरा पर्यंत लिहिणे,वाचणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठणे हा त्यांचा नित्याचा परिपाठ अनेकासाठी आदर्शाची वाट ठरणारा आहे.खरंतर प्रेम असेल तर माणसं झपाटून काम करत राहातात.त्यासाठी त्यांना कशाचेही मोहिनी लागत नाही.
एका वर्षात पंच्याहत्तर पुस्तके प्रकाशित करून भारताचा अमृत महोत्सव साजरा करण्याची कल्पना हे राष्ट्रप्रेमच दर्शित करते.त्यांच्या या प्रयत्नाचा एक भाग म्हणून परवा काही पुस्तकांचे प्रकाशन होते आहे.त्यांच्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

– संदीप वाकचौरे

सदस्य, अभ्यासक्रम पुनर्रचना समिती, बालभारती

पूर्वप्रसिद्धी – दै. नायक , २३ ऑगस्ट २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “चपराकचा अनोखा अमृत महोत्सव”

  1. नागेश शेवाळकर, पुणे

    खूप छान लिहिले आहे.
    श्री घनश्यामजी यांच्याबद्दल लिहाल तेवढे थोडे आहे. अभिनंदन!

  2. Rakesh Shantilal Shete

    खरंय! चपराक प्रकाशन हे एक प्रकारचे उत्तम पुस्तक इंजिनच आहे.. घनश्याम पाटील यांच्या भगिरथ प्रयत्नांना यश मिळत आहे.
    सर्वांना खूप शुभेच्छा!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा