अंतर्मुखता हे सामर्थ्य

त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’

आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य घटना. याचे हिरो आहेत विनोद श्रावणजी पंचभाई. 2006 साली त्यांनी ‘चपराक’मधून लेखनाला सुरूवात केली. आज त्यांची विविध साहित्यप्रकारातील अकरा पुस्तके आहेत. पोलीस खात्यात असूनही हा माणूस इतका निर्मळ, निर्व्याज आणि निरागस कसा? याचा मी शोध सुरू केला. मग लक्षात आलं की हे संस्काराचं बाळकडू त्यांच्यात त्यांच्या वडिलांकडून आलंय. त्यांचे वडील श्रावणजी पंचभाई हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी. त्यांना महाराजांचा सहवासही लाभला. त्यांची तुकडोजींवर इतकी भक्ती होती की त्याकाळी त्यांनी त्यांची जमीन विकून टाकली. त्यातून पैसे उभारून त्यांनी ग्रामगीतेच्या पंचवीस हजार प्रती छापल्या आणि लोककल्याणार्थ त्या मोफत वाटल्या. विदर्भात त्याचं मोठं वितरण करूनही काही प्रती उरल्या होत्या. त्यावेळी अण्णा हजारे नव्यानं समाजकारणात आले होते. नागपूरला त्यांचा एक कार्यक्रम होता. श्रावणजी पंचभाई यांनी उरलेल्या प्रती अण्णांकडे दिल्या आणि विनंती केली की ‘‘तुमच्या माध्यमातून ग्रामगीता महाराष्ट्रभर पोहचू द्या!”

मग त्यांचे सुपुत्र असलेल्या विनोदजींनी पोलीस खात्यात असूनही मांसाहार न करणं, मद्यपान न करणं, भ्रष्टाचार न करणं किंवा कोणतंही व्यसन जवळ न करणं यात आश्चर्य ते काय? ते गोंदियाला कर्तव्यावर असताना आम्ही ‘चपराक’तर्फे त्यांचं ‘थोडं मनातलं’ हे वैचारिक लेखांचं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर त्यांनी लेखनाचा जोरदार धडाका लावला. अनेक प्रस्थापित वृत्तपत्रांतून, मासिकातून, दिवाळी अंकातून त्यांचं नाव झळकू लागलं. पुढं विविध क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांच्या चरित्रावर आधारित असलेला ‘तीच्या मनातलं’ हा कथासंग्रह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील ‘आपले राष्ट्रसंत’ हे चरित्रात्मक पुस्तक, खास बालकुमारांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘मुलांच्या मनातलं’, ‘मेवाडनरेश महाराणा प्रताप’ ही चरित्रात्मक कादंबरी, नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित ‘हेच खरे जगज्जेते’ असा पुस्तकांचा धडाका त्यांनी लावला. ‘हॉटेल हवेली’ ही रहस्यकादंबरी, डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय ते रामनाथ कोविंद यांच्यावरील लेखांचे ‘आपले राष्ट्रपती’, ‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. आता त्यांची ‘सुगावा’ ही रहस्य कादंबरी वाचकांच्या भेटीस येत आहे.
खरंतर कोणत्याही लेखकाचं लेखन म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. तो कसा जगतोय हे त्यातून प्रतीत होत असतं. पंचभाईंचे लेख त्यांच्या चिंतनातून प्रकटलेत. व्यास-वाल्मिकीप्रमाणं त्यांचं लेखन अजरामर नाही पण आजच्या काळाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटतं. त्यांच्या लेखनात कधी त्यांच्यातील सुहृदयी देशभक्त डोकावतो, कधी प्रेमळ पिता दिसतो, कधी एखादा समाजसेवक तर कधी तत्त्ववेत्ता! प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधार्‍या राती गस्त घालणार्‍या जागल्याची भूमिका ते निभावतात. सामान्य माणसात देव शोधा हा संतविचार त्यांच्यात रूजलाय. कसदार धान्याची टपोरी कणसं देण्यासाठी आधी एखाद्या बीला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं हे जगरहाटीचं सूत्र त्यांना ठाऊक आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत उद्विग्न न होता सध्याच्या अराजकतेतून मार्ग काढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ते बाळगून आहेत आणि तसंच त्यांचं लेखन असतं.

पंचभाई त्यांच्या कामातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची लेखनाची वृत्ती आणि संकल्पबळ मात्र मजबूत आहे. झापडबंद आयुष्य जगणार्‍यांना भानावर आणावं यासाठी ते व्यक्त होतात. चांगुलपणावरील त्यांच्या श्रद्धा अढळ आहेत. त्यांचं वाचन सकस आहे. विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या प्रांतात नोकरी केल्यानं, समाजजीवन उघड्या डोळ्यांनी बघितल्यानं त्यांचं अनुभवविश्वही समृद्ध आहे. मोजक्या शब्दात पण जे मांडायचं ते थेटपणे असा त्यांचा खाक्या आहे. लेखनाच्या माध्यमातून फक्त प्रश्न न उपस्थित करता वाचकांना आयुष्याची उत्तरे शोधायला ते मित्रत्वाच्या नात्यानं मदत करतात. एका लेखकाचं यश यापेक्षा आणखी कशात सामावलेलं असू शकेल?

‘सत्य हे सौंदर्य आहे त्या सौंदर्यावर प्रेम करा’ हे महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान त्यांना आदर्शवत वाटतं. मराठी साहित्यविश्वाचा धांडोळा घेताना नामवंत लेखक अनेकांच्या लक्षात राहतात, मात्र विनोद पंचभाई यांच्यासारख्यांनी आपलं आयुष्य पणाला लावूनही त्यांची दखल घेतली जात नाही. महापुरूषांची उपेक्षा हा पिढ्या न पिढ्यांचा विषय असताना विनोद पंचभाई यांच्यासारख्यांची दखल न घेण्याचा करंटेपणा साहित्यविश्वाकडून व्हावा यात आश्चर्य ते काय? उत्तम कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार आणि बालसाहित्यिक असलेल्या पंचभाईंचे लेखन वाचकांना अंतर्मुख करायला लावणारे, त्यांचा संस्कारांचा पाया भक्कम करणारे आणि त्यांच्यातील ‘माणुस’पणाची साक्ष देणारे आहे. भविष्यात त्यांच्याकडून आणखी सकस, दर्जेदार आणि काळाच्या कसोटीवर टिकणारं लेखन व्हावं, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

-घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी ‘अक्षरयात्रा’ २२ मे २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

11 Thoughts to “अंतर्मुखता हे सामर्थ्य”

  1. Nagesh Shewalkar

    विनोदभाई, यांचा करुन दिलेला परिचय आवडला. शांत, मनमिळाऊ , संयमी हा परिचय सर्वदूर आहे. श्री पंचभाई आणि आपले दोघांचेही अभिनंदन!

  2. Pralhad Dudhal

    खूप छान, विनोदजींचा दमदार लेखन प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.भाईकाकाना खूप खूप शुभेच्छा. …

  3. सागर जाधव जोपुळकर

    विनोद पंचभाई अजब रसायन आहे..कधी एकदम सरळ सुटसुटीत तर कधी अगदी गूढ.. त्यांच्या लेखनातून ते आमच्यापर्यंत पोहोचले होतेच.. तुमच्या या लेखामुळे थोडे फार समजले देखील..

  4. Sarita kamalapur

    वा सर!! खूपच सुंदर लेख लिहिला आहे. अनेकदा प्रत्यक्ष भेटणाऱ्या ‘विनोद पंचभाई’ या एका सज्जन, सरळ आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व लाभलेल्या लेखक मित्राची अशी अक्षर ओळख वाचताना फार धन्य वाटलं. त्यांच्या ऋजु स्वभावामुळे न कळलेल्या त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांविषयीच्या काही रम्य गोष्टी नव्याने कळल्या. खूपच सुंदर🙏🙏🙏

  5. प्रकाश भास्करवार

    पाटील साहेब नमस्कार, तुम्ही विनोद पंचभाई यांचे बद्दल जे काही लिहिले आहे ते पूर्णपणे बरोबर आहे. त्यांना तुम्ही खूप चांगले ओळखले आहे. ती ओळख तुमच्या या लेखातुन सर्वांना दिली. धन्यवाद. पंचभाई माझे, आमच्या खात्यातील ऊत्तम सहकारी!
    लेखक म्हणून फार ऊशीरा ओळख झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी गमंत म्हणून लिहिलेली एक कथा तुमच्या सौजन्याने ” चपराक ” मधे प्रकाशित झाली. त्यामुळे मी आपल्या संपर्कात आलो. पंचभाईंंचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांचे कडुन अशीच लेखन सेवा घडो !!!

    1. Rakesh Shantilal Shete

      घनश्याम, हे म्हणजे कलियुगात सतयुगाचं दर्शन घडवले तुम्ही. सत्संग व संस्काराचा पाया भक्कम असल्यावर पोलिस दलात असणारी श्री. विनोद यांची ही उत्तम कामगिरी आणि त्यांची किमया दिसली. खूप धन्यवाद. शुभेच्छा!

  6. जयंत कुलकर्णी

    सत्शील, सद्वर्तनी, निर्व्यसनी, अशा जिव्हाळ्याच्या मित्रास खूप खूप शुभेच्छा! त्यांचे लेखन असेच बहरू दे आणि पुस्तकांची शंभरी होऊदे हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना!

    1. Nandkishor

      “विनोद पंचभाई” हेच खरे जगज्जेते !

  7. बाबासाहेब भोरकडे

    श्री.पंचभाईंचा खुप सुंदर जीवन परिचय करून दिला. धन्यवाद.पोलीस दलात नोकरी करत असतानाच त्यांनी चौफेर लिखान करून दर्जेदार साहित्य निर्मिती केली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

  8. रविंद्र कामठे

    भाईकाका हा तर चपराकने केलेला तुमचा जीवन गौरवच आहे. अतिशय योग्य व समर्पक शब्दांत घनश्यामसरांनी तुमचे योग्य असे कौतुक केले आहे. तुमचा अभिमान वाटतो भाई. मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐💐🙏

  9. Dattatray Waychal

    खूप छान.. विनोद पंचभाई यांना शुभेच्छा..
    दादा, सुंदर..!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा