दादा वाक्यं प्रमाणम्

दादा वाक्यं प्रमाणम्

Share this post on:

यशवंतराव चव्हाण यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आमच्या पुढार्‍यांना ‘नाही’ म्हणायची सवय नाही आणि आमच्या अधिकार्‍यांना ‘हो’ म्हणता येत नाही. सामान्य माणसाला त्याचं काम होईल असं सांगणारे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्याचे जे काम करणे शक्य होणार नाही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणारे नेते मला हवेेत.’’

यशवंतरावांना त्यांच्या हयातीत असे फार कमी पुढारी आणि थोडेच अधिकारी भेटले. आजच्या काळातही तीच परिस्थिती आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पंचवीस-तीस वर्षे अशाच पद्धतीने काम होणार असेल तर हो आणि नसेल तर नाही म्हणणारे अजित पवार नावाचे एक धाडसी नेतृत्व आहे. त्यांनी कधी कुणाला खोटी आश्वासने देत झुलवत ठेवलेय, असे ऐकिवात नाही.

कुणालाही चुकीची आशा लावत खेळवत ठेवण्याचा उद्योग अजितदादांनी कधीही केला नाही. त्यांच्या नेतृत्वाचा एक विलोभणीय गुण आहे. तो म्हणजे काम न करणार्‍या अधिकार्‍यांना, सतत नकार देणार्‍या अधिकार्‍यांना सामान्य माणसाची कामे करण्यासाठी होकार द्यायला लावायची धमक त्यांच्यात आहे. प्रशासनावर अशी जबरदस्त पकड असणारा दुसरा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. राजकारणातल्या माणसाला प्रसिद्धीचा सोस असतो. आपण सतत प्रसिद्धीच्या झोतात असावे असे त्याला वाटत असते. त्यासाठी आपल्या मुलाखती याव्यात, आपल्यावर चर्चा घडावी, आपल्यावर पुस्तके यावीत असे त्याला वाटत असते. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षाचे राजकारण पाहता अनेक नेत्यांनी त्यासाठी केलेली पेरणी दिसून येते. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे असे नेतेही यात मागे नव्हते. आपल्यावर चांगलं लिहिणारे लेखक, कवी, चांगलं बोलू शकतील असे पत्रकार शोधून त्यांना मदत करणं, त्यांना उपकृत करणं आणि त्यांना आपल्यावर लिहिण्यासाठी प्रवृत्त करणं हे सर्व काळात सर्व प्रकारचे राजकारणी करत असतात. याला अपवाद जर कोणी असेल तर तो म्हणजे अजित पवार.

त्यांना स्वतःला प्रसिद्धीची हाव नाही. कधी कोणी त्यांच्या दीर्घ मुलाखती घ्यायला गेलं नाही आणि त्यांनी कुणाला बोलवून अशा मुलाखती दिल्या नाहीत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत असूनही अजून त्यांच्यावर कोणी पुस्तक लिहिलं नाही. एवढी ताकत आणि सत्ता असताना त्यांनीही कधी असे प्रयत्न केले नाहीत. मला बोलायची आवश्यकता नाही, माझं काम बोलत राहील या पद्धतीनं काम करणारे जे अपवादात्मक नेते आहेत त्यात अजितदादा आहेत.

अजित पवार हे खर्‍याअर्थी कार्यकर्त्यांचे नेते आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देणे, त्यांची वैयक्तिक, कौटुंबीक कामे करणे आणि प्रसंगी त्यासाठी सगळ्या यंत्रणा पूर्ण ताकदीने वाकवणे यात त्यांचा हातखंडा आहे. वीस-वीस वर्षे एखाद्या नेत्यांकडं काम करणार्‍या, रोज त्याच्या दारात उभ्या असलेल्या कार्यकर्त्याचंही काम त्या नेत्याकडून होत नाही. एखाद्या पंचायत समिती सभापतीचं, जिल्हा परिषद सदस्यांचं काम वर्षानुवर्षे न करणारे आणि त्यांना झुलवत ठेवणारे अनेक मंत्री आपल्या मंत्रीमंडळात आहेत. मात्र ग्रामपंचायतीचाही सदस्य नसलेल्या छोट्या कार्यकर्त्याचं काम लक्षात ठेवून करायचं आणि तुझं काम केलंय म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा, एवढं करूनही त्याला प्रसिद्धी द्यायची नाही की ढोल पिटायचे नाहीत हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सातत्याने फक्त आणि फक्त अजित पवारच करत आहेत.

त्यांनी कधी विकासाच्या ब्लू प्रिंट काढल्या नाहीत. ‘मला विकास कसा पाहिजे’ हे सांगत बसले नाहीत. ‘सगळ्यांना हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय’ म्हणत त्यांनी सभा घेतल्या नाहीत की भाषणबाजी केली नाही. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या विकासात मात्र त्यांचा मोठा वाटा आहे हे निर्विवाद मान्य करायलाच हवे. या शहरांचा विकास करत असताना त्यांनी काय प्रयोग केलेत हे पिंपरी-चिंचवडला येऊन बघावं. दादांकडे आजवर अर्थखातं नव्हतं. ते हातात आल्यावर त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले आहेत. त्यांनी जलसंपदा खातं कसं सांभाळलं यावरून ज्यांना जी काही चर्चा करायची ती करू द्यात; परंतु जलसंपदा असेल किंवा त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलं त्यातील त्यांची प्रशासनावरील पकड सदैव चर्चेत राहिलेली आहे. 2014 ते 2019 दरम्यान ते मंत्री नव्हते. त्यांच्याकडं कोणतंही खातं नव्हतं. तरीही त्यांच्याकडे गेल्यावरच काम होईल असा विश्वास सामान्य माणसाला होता आणि तो त्यांनी सार्थ ठरवला. मंत्रीपद नसतानाही माणसांची इतकी वर्दळ ज्यांच्याकडे असते असे अजित पवार हे एकमेव नेते आहेत.

अजितदादांची भाषा हा अनेकदा लोकांच्या टिकेचा विषय होतो. तसं पाहिलं तर ते काही राजकारणी माणूस नाहीत. ओठात एक, पोटात दुसरे आणि कृतीत तिसरेच अशी सवय राजकारणात अनेकांना असते. असा दुर्गुण अजितदादांकडे नाही. त्यांच्या मनात जे आहे ते दादा बिनधास्त बोलतात. बोलताना शब्दांची कमतरता ते जाणवू देत नाहीत. जे मनात आहे ते लपवून ठेवायचं आणि कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी गोड गोड बोलायचं असं वागणं त्यांना जमत नाहीत. समोरच्या माणसानं त्रास दिल्यावर त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं असाही त्यांचा स्वभाव नाही. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं काही बांधकाम झाल्यावर अधिकारी त्यांना भेटायला बोलावतात आणि आल्यावर त्यातील कामाचा निकृष्ट दर्जा पाहून दादा विचारतात, कोणाला हे काम दिलं होतं? हे कंत्राटदार पोलिसांची कामं अशी करत असतील तर बाकीच्या सरकारी कामांची ते किती वाट लावत असतील? असं विचारत त्या बांधकामात कोणकोणत्या उणिवा आहेत हे ते सांगतात. एखाद्या नगरपालिकेत भेट द्यायला आल्यावर भिंतीवर जळमटं दिसली म्हणून सगळ्यांना फैलावर घेणारे अजितदादा आपण बघितले आहेत. आम्ही तुम्हाला अनेक योजनांसाठी कोट्यवधी रूपये देतो, तुम्ही साधी स्वच्छता ठेऊ शकत नाही का? म्हणत ते सर्वांना झापडतात. आपल्याला सन्मानानं बोलावलंय म्हणजे त्यांचं कौतुकच करायचं, असला काही प्रकार त्यांच्याकडे नसतो. अशा दिखावू सभ्यता त्यांच्याकडे नाहीत ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे.

अजितदादा हे चौथ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. प्रशासन म्हणून महाराष्ट्रासारखं राज्य त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वात असावं आणि राष्ट्रवादी काँगे्रसची धुराही त्यांनीच सांभाळावी ही काळाची गरज आहे. ते आता वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की पुढची दहा-पंधरा वर्षे ते आणखी सक्षमपणे काम करू शकतील. या काळात महाराष्ट्राला असं नेतृत्व लाभलं तर अनावश्यक गप्पा, बडबड न करता, ट्विटरवर टीवटीव न करता ते मोठं योगदान देऊ शकतील. ते समाजमाध्यमांवर काही वादग्रस्त पोस्ट करत नाहीत, लाखोंच्या सभा गाजवत नाहीत किंवा ‘ग्रेट भेट’ अथवा ‘माझा कट्टा’वर कुणाला मुलाखती देवून मिरवत नाहीत. त्यांच्यावर काही डॉक्युमेंटरी आल्यात असंही नाही. तरीही महाराष्ट्रातल्या गावागावात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. जो आपल्या कामातून बोलायची महत्त्वाकांक्षा बाळगतो असा महाराष्ट्राच्या राजकारणातला एकमेव चेहरा म्हणजे अजित पवार आहेत.

भविष्यात ज्यांना राजकारणात यायचंय, स्वतःची प्रतिमा निर्माण करायचीय त्यांनी अजित पवारांच्या राजकारणाचा सखोल आणि बारकाईने अभ्यास करावा. राजकारण म्हणजे गोड गोड बोलणं, भाषणबाजी करणं, फोटो-बॅनरबाजी करणं, सोशल मीडियावर सतत अभिव्यक्त होणं नाही! यालाच राजकारण म्हणतात, असं समजणार्‍या रोहित पवार, आदित्य ठाकरेंच्या पिढीनं हे समजून घ्यावं. फुले, शाहू, आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार पवार साहेब कायम मांडत असतात. तो विचार अजितदादा कायम पुढे नेताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची व्यापक आणि उदात्त संकल्पना त्यांना कळलेली आहे. कोणावर टीका-टिपण्णी करून, कुणाला नावं ठेवून, विरोध करून ते पुढे आलेले नाहीत. त्यांना राजकारणात जे मोठेपण मिळालंय ते त्यांच्या कर्तृत्वातून मिळालंय.

काकाच्या जिवावर जगण्याचं एक वय असतं, त्यानंतर स्वतःला सिद्ध करावं लागतं, असं त्यांना सांगणं सोपं असतं. मात्र दादांनी लोकांची जी कामं केलीत त्याच्या दहा टक्के कामंही त्यांना असे सल्ले देणार्‍यांकडून झाली नाहीत. काही बर्‍यावाईट प्रसंगी त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवली असेल पण आपल्या काकांशी बेईमानी करत त्यांनी ना कधी घर फोडले, ना आपला पक्ष! आजवर तरी त्यांनी त्यांच्या निष्ठा कायम सिद्ध केल्या आहेत.

मराठी मुलांना नोकर्‍या करा, व्यवसाय करा, आपापल्या कामात पुढे जा असा सल्ला भेटणार्‍या प्रत्येकाला ते देत असतात. फोन केल्यावर तुझं कसं चाललंय, माझं काय चाललंय अशी अनावश्यक बडबड न करता ‘मुद्याचं बोल आणि कामाशी गाठ घाल’ हा संदेश ते धाडसाने देत असतात. मुद्याचं बोलायचं आणि कामाशी गाठ घालायची असं राजकारण महाराष्ट्रात सध्या दुसरं कोणी करताना दिसत नाही. मोठमोठ्या प्रशासकीय अधिकार्‍यांनाही त्यांची भीती वाटते कारण राजकारणातले, प्रशासनातले खाचखळगे, बारकावे दादांना माहीत असतात. मनात आणलं तर दादा प्रशासकीय पातळीवर आपल्याला दणका देऊ शकतात हे अशा अधिकार्‍यांना माहीत असतं. त्यामुळं दादांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं वागणं हे प्रचलीत राजकारण्यांप्रमाणे नाही. सवंग लोकप्रियतेसाठी चुकीचे निर्णय घेणं, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वाटेल ती विधानं करणं हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यात नाही. गेली तीस वर्षे ते त्यांच्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असतील आणि अजूनही लोक तितक्याच उत्साहात, जिव्हाळ्यानं त्यांच्या मागे पळत असतील तर हे वेगळं रसायन आहे हे त्यांच्या विरोधकांनीही ध्यानात घ्यायला हवं.

अजित पवार सत्तेत असतात तेव्हा सगळ्या विचारधारेचे, सगळ्या पक्षांचे लोक त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. तेही त्यांची वैयक्तिक विचारपूस न करता कामे समजून घेतात. जी होणार आहेत ती लगेच हातावेगळी करतात. जे शक्य नाही त्याला तोंडावर तसे स्पष्टपणे सांगतात. राजकारण करतानाही दादा काही लपवाछपवी करत नाहीत. जे मनात आहे ते बिनधास्त जाहीरपणे सांगतात. ‘तुला मी पाडणार आहे, तू निवडून कसा येतो ते मी बघतोच’ असे पुरंदरच्या विजय शिवतारेंना किंवा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना ते सांगतात आणि त्याची अंमलबजावणीही करतात. जो विरोधात आला त्याला गाडला असं त्यांचं सूत्र असतं. एखाद्याला गाडायचं किंवा एखाद्याला उभं करायचं ही दोन्ही कामे दादांनी सातत्याने दाखवून दिली आहेत. तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसायचा अशी त्यांची कृती नाही, तसा त्यांचा व्यवहार नाही, तसं त्यांचं वागणंही नाही. मुळा-मुठा, कर्‍हा-भीमेच्या मातीतला हा रांगडा राजकारणी वाटत असला तरी त्यांचं वागणं नेहमी प्रामाणिक राहिलेलं आहे.

अजित पवारांच्या राजकारणातले आणि वागण्यातले मॅनर्स आणि एटीकेटस हे त्यांचे स्वतःचे आहेत. प्रेम केलं तर मनापासून करायचं आणि शिव्या दिल्या तरी त्या मोकळेपणाने द्यायच्या हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. काम होत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत करून घ्यायचं आणि शक्य नसेल तर पहिल्याच भेटीत त्याला स्पष्टपणे सांगायचं हे तसं सोपं नसतं.

अजितदादा कधीतरी दिल्लीत गेले आणि त्यांचा सुटाबुटातला फोटो व्हायरल झाला. एरवी ते कधी अशा पेहरावात दिसत नाहीत, जॅकेट घालत नाहीत वा कोणती टोपी घालत नाहीत. हा साधा गडी आहे आणि साध्या माणसासारखा साधेपणाने राहतो. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत त्या त्यांच्याकडे आहेत. आता फक्त काकांच्या सकारात्मक आणि होकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अजितदादांसारखा नेता पुढच्या एक-दोन वर्षासाठी नाही तर दहा-पंधरा वर्षांसाठी हवाय. तसं झालं तरच महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणार्‍या कंपन्या वाचतील, गुजरात आणि मध्यप्रदेशला पळवलं जाणारं आणि कृष्णा खोर्‍याचं कर्नाटकला जाणारं पाणी इथंच थांबेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी का होईना पण महाराष्ट्राला दादांसारखं नेतृत्व मिळावं ही दादांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा.

-घनश्याम पाटील
7057292092
(लेखक ‘चपराक प्रकाशन’चे संचालक आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

गरिबाच्या मुलाला नोकरी…

मंत्रालयासमोरील महिला मंडळाचे सभागृह. वेळ साधारण रात्री आठची. नानासाहेब पाटील यांच्या मुलीचा स्वागतसमारंभ. त्यासाठी अनेक बडेबडे लोक आलेले. त्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यांनतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपला खिसा तपासत होते. त्यांना नेण्यासाठी आलेली गाडी समोर येऊन थांबली पण त्यांच्या चेहर्‍यावर प्रचंड तगमग, शोधाशोध आणि अस्वस्थता.

शेवटी त्यांच्या एका सहकार्‍याने न राहवून विचारले, ‘‘दादा काय शोधताय?’’

त्यांनी सांगितले, ‘‘अरे, आज बारामतीहून एक गरीब पोरगं नोकरीसाठी आलं होतं. त्याला ज्याच्याकडे काम हवंय त्या कंपनीचा मालक आत रिसेप्शनला आलाय. इथेच त्यांच्याकडे त्या पोराचा कागद दिला तर काम होऊन जाईल. माझ्या मतदार संघातील मोलमजुरी करणार्‍या गरिबाघरचं ते पोर. आई-बापांनी दोनचार दिवसाचे मजुरीचे पैसे साठवून त्याला मुंबईला धाडलं असेलं. त्यांचे कष्ट वाया जायला नकोत. त्यामुळे त्याचे नाव लिहिलेला कागद शोधतोय.’’

एकदाचा त्यांनी तो कागद शोधला आणि पुन्हा आत गेले. त्या कंपनीच्या मालकाला भेटून सांगितले की, ‘‘हे माझ्या गावचं पोरगं आहे. गरीब असलं तरी हुशार आहे. त्याचं काम करा म्हणजे एक कुटुंब उभारेल. एका गरजूला खर्‍याअर्थी मदत होईल.’’ इतके बोलून ते तडक बाहेर पडले आणि समाधानाने गाडीत येऊन बसले.

या धडाडीच्या नेत्याला सामान्यांविषयी वाटणारी कळकळ आणि त्यांच्या नेतृत्वाचे असामान्यत्व सिद्ध करण्यासाठी आणखी काय हवंय…?

ताकद काकांच्या पाठीशी

अजितदादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. काही क्रीडा संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. या शिक्षण मंडळांचं आणि क्रीडा संस्थाचं कुशल प्रशासक म्हणून ते काम करताहेत. त्यांचं दुर्दैव इतकंच की ते एका खूप मोठ्या माणसाचे पुतणे आहेत. त्यांच्या कामाशी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी दादांची सदैव तुलना केली जाते. त्यामुळे दादांना अनेकदा दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं. दादांची आजवरची सगळी राजकीय ताकद काकांच्या पाठिशी उभे राहण्यात गेलीय. चिडले, संतापले तरी शेवटपर्यंत काकांसोबत राहणारे, त्यांच्यावर सर्व निष्ठा समर्पित करणारे अपवादात्मक नेतृत्व म्हणून दादांकडे पहावे लागेल.

‘तुला परत तुझ्या गावात आणलंय…’
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या एका कर्मचार्‍याने त्यांचा अनुभव सांगितला. त्यांची त्यांच्या गावातून बदली झाली. ते दादांना जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं, ‘‘दादा मी गावात शेतीकडेही लक्ष देतो. माझ्या मुली लहान आहेत. आई-वडिलांची काळजी घ्यावी लागते. ही बदली मला खूप गैरसोयीची आहे. त्यामुळे ती थांबवता येईल का?’’ दादांनी सगळी माहिती घेतली आणि सांगितलं, ‘‘मी सांगतोय म्हणून बदलीच्या ठिकाणी वर्षभर काम कर! पुन्हा तुझी गावात बदली करतो. त्यानंतर कायमस्वरूपी तू गावात असशील याची जबाबदारी माझी.’’ ते सद्गृहस्थ बदलीच्या ठिकाणी रूजू झाले. बरोबर वर्षभराने त्यांची बदली पुन्हा त्यांच्या गावात झाली. दादांनी स्वतःहून फोन केला आणि सांगितलं, ‘‘तुला परत तुझ्या गावात आणलंय. आता तू कायमस्वरूपी इथं असशील.’’ त्यानंतर खरोखरी ते निवृत्तीपर्यंत त्यांच्या गावातच कार्यरत होते.

शब्दाचे एकदम पक्के
कार्यकर्त्यांना कामाच्या बाबतीत दिलेला शब्द पाळायचा असतो, याचा अनेकांना, अनेकदा विसर पडतो. अजित पवार नेमके याच्या उलट वागतात. एखाद्याला शब्द दिला की तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालाच म्हणून समजा. दिलेला शब्द पाळायचा आणि जो शब्द पाळता येत नाही तो कुणाला द्यायचाच नाही असा त्यांचा फंडा आहे.

राजकारणातला ‘टग्या’
अजितदादा आपल्याला फार साहित्यिक, सांस्कृतिक गोष्टी कळतात असे दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपण सुसंस्कृत राजकारणी आहोत असाही त्यांचा दावा नाही. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते कोणत्याही उमेदवाराला पळवण्यापर्यंत जी टगेगिरी करावी लागते ती सगळी माझ्यात आहे, मी राजकारणातला ‘टग्या’ आहे असं आपल्या भाषणात जाहीरपणे सांगणारा हा प्रांजळ नेता आहे. स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या मागे न लागलेला हा साधा, सरळ नेता आहे.

विरोधकांवर सर्वाधिक दहशत
विधिमंडळाच्या कामकाजाची सर्वाधिक माहिती असलेला नेता म्हणून त्यांच्याकडं बघावं लागेल. सत्ता असताना किंवा नसतानाही प्रशासनावर आणि विरोधकांवर सर्वाधिक दहशत असलेला हा आमदार आहे. ‘दादा मला परदेशात सोबत नेत नाहीत’ असं गंमतीनं म्हटल्यावर ‘लेका तू तंबाखू खायचं आधी बंद कर. बाहेर नेल्यावर आमची अब्रू निघायची’ असं आर. आर. पाटलांना व्यासपीठावरून सांगण्याचं धाडस त्यांच्यात आहे. दादांचा हा सल्ला आबांनी ऐकला असता तर आबांसारखा एक सुसंस्कृत राजकारणी आज आपल्यात असता.

रांगडेपणा आपला वाटतो

राजकारणात लोक बरं बोलतात. महाराष्ट्राच्या पुढच्या काळातल्या राजकारणात बरं बोलणारे राजकारणी नकोत तर अजितदादांसारखे खरं बोलणारे राजकारणी हवेत. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ भविष्यात टिकवायची असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं ग्रामीण आणि शहरी असं वर्गीकरण केलं तर ग्रामीण महाराष्ट्राचं निर्विवाद नेतृत्व दादा करतात. मग तो चंद्रपुरातला चिमुर तालुका असेल, पुण्यातला बारामती तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला शिराळा तालुका असेल. दादांचं रांगडं बोलणं आणि वागणं सामान्य माणसाला आपल्यातलं वाटतं.

पिंपरी-चिंचवड मॉडेल
महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या लोकांनाही त्यांच्यासाठी ते काय करू शकतात हे पहायचं असेल तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या आजूबाजूचा नव्यानं विकसित झालेला भाग नक्की बघावा. हा फक्त पोपटपंची करणारा नाही तर काम करणारा नेता आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या विकासकामांचा संबंध ना आघाडी सरकारशी आहे, ना युती सरकारशी. विकास योजना हातात घ्यायच्या आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवत अहोरात्र परिश्रम घ्यायचे ही त्यांची कार्यपद्धती आहे.

गणेशभक्त दादा

दादा बोलताना, भाषण करताना वज्रासारखे कडक, फणसासारखे खडबडीत वाटतात पण त्यांचं मन गर्‍यासारख भावूक आहे. याबाबत त्यांचे स्नेही रवींद्र माळवदकर सांगतात, एकदा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून येत असताना अपोलो टॉकिजसमोर त्यांनी सांगितले की ‘याठिकाणी राहुल लॉज होता. लहानपणी वडील आम्हा भावंडांना पुण्यात गणपती बघायला घेऊन यायचे. त्यावेळी आम्ही या लॉजवर उतरत असू.’ ही आठवण सांगताना ते पूर्णपणे भूतकाळात हरवले होते. दादांनी त्यांच्या गावात बालगणेश मंडळ स्थापन केले होते. गणेशभक्त असलेले दादा त्यांच्या बालसवंगड्यासह मोठ्या उत्साहात गावात गणपती बसवायचे.

शैक्षणिक सोयी-सुविधांकडे लक्ष
पुणे जिल्हा शिक्षण मंंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक व अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यात सर्व महाविद्यालये व शाळांसाठी अद्ययावत सुविधा असणार्‍या व सुंदर दिसणार्‍या इमारती बांधण्याचे काम त्यांनी सर्वप्रथम हाती घेतले व पूर्ण केले. काही शाळांच्या इमारती अतिशय दयनीय अवस्थेत होत्या. पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीत बसून शिकणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय त्रासदायक असायचे. बर्‍याच ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधादेखील उपलब्ध नव्हत्या. हे केविलवाणे चित्र पाहून दादांनी समाजातील दानशूर व्यक्तिंना आवाहन केले आणि सर्व शाळा व महाविद्यालयाच्या नवीन इमारती तातडीने बांधून घेतल्या. अजितदादा जर संस्थेचे अध्यक्ष झाले नसते तर पुढील किमान पन्नास वर्षे तरी एवढे प्रचंड काम संस्थेला करता आले नसते.

दादा वाक्यं प्रमाणम्
राज्याचा गाडा हाकण्याबरोबरच प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे, यावर श्रद्धा असणारे आणि त्यादृष्टिने कार्यरत असणारे दादा हे खर्‍याअर्थी जनसेवक आहेत. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. ‘दादा वाक्यं प्रमाणम्’ अशी अवस्था आज महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे ती त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे! कोणतेही काम हे गुणवत्तापूर्ण आणि लोकांच्या भल्याचेच असले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष. त्यामुळेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे सर्वांनाच वाटते.

क्रिकेट, गोट्या नि पतंग

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वभावातील बिनधास्तपणा प्रत्येकाला जाणवतो. मात्र त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ. रजनी इंदुलकर म्हणतात, अजित प्रचंड लाजाळू होता. इतका की, बहिणींची ओळख करून द्यायलाही तो लाजायचा. त्याच्या या स्वभावाकडे पाहिले, तर भविष्यात तो नेता होईल असे अजिबातच वाटले नाही.

त्यांचं क्रीडाप्रेमही बालपणापासूनचंच. याविषयी रजनीताई सांगतात, अजितला खेळाची भारी हौस. कोणतीही क्रिकेटची मॅच तो चुकवायचा नाही. क्रिकेटच काय, तर पतंग उडविण्यात किंवा गोट्या खेळण्यातही तो खूप रमायचा. अभ्यासाचा ताण कधी त्याने मनावर घेतला नाही. शाळेत तो भरपूर मस्ती करायचा. त्याच्या क्रिकेटच्या वेडापायी मॅच बघण्यासाठी आम्ही अनेकदा मुंबईही गाठली.

भावूक अजितदादा
अजितदादा सहसा भावूक होत नाहीत. बारामती तालुक्यातील तीन हजार शालेय मुलींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमात मात्र त्यांना भरून आलं. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना अजितदादा म्हणाले, ‘‘आज कोजागरी पौर्णिमा. कोजागरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा. आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला.’’ काका शरद पवार आणि आजी शारदाताई पवार यांच्याविषयी बोलताना ते अत्यंत भावूक होतात.

सत्कारापेक्षा कामाला महत्त्व

राज्य सरकारने नुकताच गुंठेवारीचा विषय मंजूर केला. पुण्यात कौन्सिल हॉल येथे अजित पवार बैठकीसाठी आले होते. त्यावेळी काही गावकर्‍यांना घेऊन शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे अंकुश काकडे तिथे हजर झाले. त्यांना दादांचा सत्कार करायचा होता. दादांनी स्पष्ट नकार दिल्यावर काकडे म्हणाले, फक्त पाच मिनिट त्या. त्यासाठी लोक थांबलेत. त्यावर दादा चांगलेच संतापले. ‘‘मी काम करू की सत्कार स्वीकारू? केलं ना तुमचं काम? आता सत्कार कशाला? अशामुळेच तुम्ही लोक मागे राहता…’’ असं त्यांनी सुनावलं. एखादं काम निरपेक्षपणे केल्यावर साधा सत्कारही न स्वीकारणारा आणि कामालाच महत्त्व देणारा असा हा नेता आहे.

आत्मक्लेष करून घेणारा एकमेव नेता
इंदापूर येथील एका सभेत अजित पवारांनी एक वादग्रस्त विधान केले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर अजित पवारांनी थेट कराड गाठून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी एक दिवसाचे आत्मक्लेष उपोषण केले. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात जे काही घडले त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी आलोय, असे त्यांनी सांगितले. जो काम करतो तोच चुकतो. माझी चूक झाल्याने मी येथे प्रायश्चित घेण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले होते. आपल्या चुकीसाठी असा आत्मक्लेष करून घेणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे.

महाराष्ट्रात ‘दादापर्व’
अजित पवार यांनी अत्यंत परिश्रमाने महाराष्ट्रात ‘दादापर्व’ तयार केले. ते करताना त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. त्यासाठीची शिक्षाही त्यांना मिळाली आणि कौतुकही वाट्याला आले. सोन्यालाही त्याचे सोनेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा पुन्हा अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते, याची अजितदादांना कल्पना आहे. त्यामुळेच प्रत्येक संकट व अडचणींमधून त्यांनी स्वत:चे नेतृत्व लख्खपणे सिद्ध केले आहे. महाराष्ट्रतील सहकारी कारखानदारी, बँका, दूध संस्था, शेती, उद्योग, शिक्षण, बांधकाम, खेळ, वित्त, ऊर्जा, अर्थ या सर्व बाबींचा त्यांचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. ‘बोले तैसा चाले’ या उक्तिने ते कार्यरत असल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादापर्व’ निर्माण केले आहे.
– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

5 Comments

  1. रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर says:

    एक अतिशय सर्वसमावेशक आणि अजितदादांच्या समग्र व्यक्तिमत्व आणि वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारा वाचनीय आणि सर्वांग सुंदर लेख….
    घनश्यामदादा आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीला आणि व्यासंगी लेखनशैलीला लाख-लाख सलाम…!💐
    – रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर 9423090526

  2. अतिशय सुंदर लेख. “बोले तैसा चाले …” याचा प्रत्यय आला. दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

  3. अत्यंत सकारात्मक लेख…
    अजितदादांबद्दल असलेली अनेकांचु नकारात्मक भूमिका नक्कीच बदलेल.

  4. परखड व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारा लेख…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!