लाख बोलक्याहूनि थोर…

लाख बोलक्याहूनि थोर...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार!’ असं असूनही आपल्याकडं बोलत सुटणार्‍यांची कमतरता नाही. असं म्हणतात की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बोलायला शिकायला काही दिवस जातात मात्र ‘काय बोलावं’ हे कळण्यासाठी सगळं आयुष्य निघून जातं. सध्या तरी समाजमाध्यमांमुळं प्रत्येक गोष्टीत माझी मतं मांडायलाच हवीत, कुणाला तरी समर्थन द्यायलाच हवं आणि कुणाला तरी विरोध करायलाच हवा अशी एक अहमहमिका लागलेली असते. यातून साध्य काय होणार याचाही कोणी विचार करत नाही.

गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रातील आदर्श मानावेत अशा अनेकांनी वाटेल ती बडबड करून त्यांची स्वतःचीच थोडीफार असलेली आणि नसलेली घालवलेली आहे. एखादा शब्द तोंडातून गेला तर त्याचे दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतात हे अजित पवार, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांसह अनेकांनी अनुभवले आहे. आपण काही चूक केलीय याची जाणीव झाल्यावर कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर नतमस्तक होत चिंतन करणारे अजित पवार यांच्यासारखे नेते दुर्मीळ आहेत. वय, पद, प्रतिष्ठा अशा कशाचाही विचार न करता अजितदादांचा हा आदर्श इतरांनी ठेवायला हवा. झालेल्या चुकांवर पांघरून न घालता स्वतःत काही बदल केले तर ते समाजाच्या दृष्टीने आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनेही सकारात्मक ठरेल.

एखादा विषय चर्चेेला आला की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजीराव भिडे गुरूजींसारखा कोणीतरी पुढे येतो. कधी तो म्हणतो की माझ्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलगाच होतो किंवा कधी म्हणतो, ज्याला करोना झाला ते जगण्याच्या लायकीचे नव्हते. या सगळ्या बेताल वक्तव्याचा समाजमनावर वाईट परिणाम होतो हे त्यांना कळत नाही असे नाही. मात्र इतर अनेक विषयांवर पडदा पाडण्यासाठी कदाचित अशी प्यादी ठरवून पुढे केली जात असावीत.

सध्याच्या करोनाच्या काळात गर्दी कमी करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. ते ऐकल्यावर अनेकजण राजकारण्यांनी केलेल्या गर्दीकडे अंगुलीनिर्देश करतात. त्यांच्या सभा-समारंभाना गर्दी चालते तर मग आम्ही मौजमस्ती केली तर बिघडले कुठे असा त्यांचा सवाल असतो. काहीजण तर करोना नावाचा आजार अस्तित्वातच नाही, पैसे लुटण्यासाठीचे हे जागतिक षढयंत्र आहे असे छातीठोकपणे सांगतात. आजूबाजूला मृत्युने थैमान घातलेले असताना आणि भल्याभल्यांचा थरकाप उडालेला असतानाही अशी विधाने पाहून, ऐकून आपल्या समाजमनाची कीव करावीशी वाटते. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होऊनही अशांना जाग येत नसेल तर सारेच व्यर्थ आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही वारी रद्द केल्याने अनेकजण चवताळले आहेत. वारकर्‍यांचे पुढारी असलेल्या बंडातात्या कराडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या बिजेला देहूत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नंतर ते वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत ठाण मांडून बसले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या. त्या कशा चुकीच्या आहेत यावर त्यांचे स्पष्टीकरणही आले. सगळे कयास अयशस्वी ठरल्यानंतर भाजपने आचार्य तुषार भोसलेसारखे काही प्यादे पुढे केले. त्यांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. विचारी आणि सध्याच्या काळात अनेक गंभीर परिणाम भोगणार्‍या सामान्य कुटुंबातील वारकर्‍यांनी त्यांना भीक घातली नाही. हे भावनांचे राजकारण अपुरे पडतेय म्हटल्यावर बंडातात्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आषाढीनिमित्त पंढरपुरच्या मंदिरात पूजेसाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. पांडुरंग तुम्हाला पावणार नाही, तो तुमची पूजा स्वीकारणार नाही, अशीही मखलाशी त्यांनी केली आहे. आजवर पंढरपुरला जायची परवानगी द्या म्हणून आकांडतांडव करणारे बंडातात्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यापासून थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो करताना जणू आपणच विठ्ठलाचे मालक आहोत असा त्यांचा आविर्भाव आहे.

‘पांडुरंग तुम्हाला पावणार नाही’ असं उद्धव ठाकरे यांना सांगताना त्यांनी लक्षात घ्यायला हवं की, त्याच्या पूजेला जाण्याच्या आधीच तो त्यांना पावलाय. काहीही न करता त्यांना राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे मिळालीत. त्यामुळे तो त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवेल की नाही याची चिंता बंडातात्यासारख्या कोणीही करू नये. डाऊ कंपनीच्या आंदोलनात लीड करणारे, महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आक्रमक पवित्रा घेणारे बंडातात्या वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत की एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत.

यू ट्युबसारख्या माध्यमावर आपण फक्त ‘मराठी कीर्तन’ असे सर्च केले तरी अनेकांचे एकपात्री कार्यक्रम येतात. त्यात स्त्री-पुरूष असा काहीही भेद दिसत नाही. लोकांची करमणूक करणे, त्यांचे मनोरंजन करणे इतकाच अशा ‘कमर्शिअल कीर्तनकारां’चा उद्देश दिसतो. अशी कीर्तने शिकण्यासाठी भरभक्कम शूल्क आकारले जाते. ‘अ‍ॅडिशनल करिअर’ म्हणून त्याची जाहिरातही केली जाते. हे असे वर्ग जोरात सुरू असतात आणि त्यातून थोडीफार माहिती घेऊन बाहेर पडलेले हे महाभाग समाजात कीर्तनकार म्हणून मिरवतात. कीर्तन या परंपरेलाच हरताळ फासणार्‍या या लोकांनी या धर्माचा धंदा करून ठेवलाय. मग यांनी तमाशाच्या फडाप्रमाणे कीर्तनाच्या सुपार्‍या घेऊन कार्यक्रम केले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. वैद्यकिय क्षेत्राचा त्यांचा अभ्यास कमालीचा होता. टिळकांना भेटून त्यांनी समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. टिळक महाराजांनी त्यांना सांगितलं की जनप्रबोधनासाठी तुम्ही कीर्तनाचे माध्यम घ्या. ते करताना कुणाकडून एक रूपयाही मानधन घेऊ नका. लोक स्वेच्छेने जे देतील त्यावर गुजराण करा. बुवांनी तो सल्ला त्यांच्या हयातभर अंमलात आणला. यशवंतराव चव्हाणांनी दिलेली मदतही स्वाभिमानाने नाकारली. असे कीर्तनकार सर्वस्व त्यागून समाजाच्या भल्यासाठी कार्यरत असताना समाजाकडून त्यांना काय अनुभव आले तेही विदारक आहेत. मात्र या कशाचीही पर्वा न करता त्यांनी हाती घेतलेलं व्रत प्रामाणिकपणे पार पाडलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनीही कीर्तनसेवेसाठी धन स्वीकारणार्‍याचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. आजच्या बदलत्या काळाचा विचार करता, उपजिविकेसाठी म्हणून कीर्तनकारांनी कीर्तनसेवेसाठी पैसे घेणे क्षम्य मानले तरी कीर्तनाचा मूळ उद्देश कितपत शिल्लक राहिलाय यावर विचार करण्याची वेळ आलीय. आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही हे सांगताना या परंपरेतील मूलभूत तत्त्व हरवले आहे काय? आजचे कीर्तनकार राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत काय?

काही वारकरी शिक्षण संस्था अजूनही प्रामाणिकपणे कार्यरत असताना असे भोंदू कीर्तनकार हे क्षेत्र बदनाम करत आहेत काय? एखादा कीर्तनकार गावात कीर्तनासाठी आल्यावर ज्याच्या घरी निवासासाठी उतरलाय तिथलीच बाई त्याने पळवून नेली किंवा बीडसारख्या जिल्ह्यातील एखादा तरूण कीर्तनकार मठपती असताना त्याने गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेल्याची बातमी आपण जेव्हा वाचतो तेव्हा या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कुठे असतात?

सगळ्या संतांनी जातीय सलोख्याचे, मानवता धर्माचे दर्शन घडविले असताना आज प्रत्येक संताला जाती-जातीत वाटून घेतले जात आहे. त्यांच्या त्यांच्या नावाने धर्मशाळा असतात, संस्था-संघटना असतात. या जातीय-धार्मिक कट्टरतावादाचे मूल्यमापन आपण कसे करणार आहोत? संत कुळाचे वंशज असल्याचे सांगत अनेक समित्यांवर, महामंडळावर जाणारे आणि समाजाची दिशाभूल करणारे विचारवंत आपल्याला नेमका कोणता संदेश देत आहेत? या सगळ्याचा गांभिर्याने विचार झाला नाही, कीर्तनकारांनी, वारकर्‍यांनी भक्तिमार्ग त्यागून राजकारणच केले तर भविष्यात संस्कार आणि संस्कृतीचे अवशेष दिसणार नाहीत. शेकडो वर्षे सहिष्णुतेचा संदेश देणार्‍या भक्तिसंप्रदायाचे, वारकरी पंथाचे, सनातन भागवत धर्माचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी कुण्या बोलक्या पोपटांची गरज नाही तर कर्तबगार आणि सामान्य माणसांविषयी हृदयात व्यापक कळवळा असलेल्या जिंदादिल माणसाची गरज आहे.

– घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी – दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 20 जुलै 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “लाख बोलक्याहूनि थोर…”

 1. Ravindrakamthe

  अतिशय दखलपात्र असा हा लेख आहे सर.

 2. मंगेश अशोकराव देशमुख, सोलापूर

  “ही ” शाब्दिक चपराक iतथाकथित कमर्शियल नवपिढी किर्तनकारांच्या” ध्यानात यावी म्हणजे.ह्या लेखाचा उद्देश सफल होईल .*

 3. Ashok Shripad Bhambure

  व्यापारीकरणाच्या या युगात त्यांनीही आपली दुकाने थाटून भरपूर मलिदा कमवत आहेत. अशा लोकांसाठी हा लेख मस्त चपराक आहे.

 4. जयंत कुलकर्णी

  डोळ्यात अंजन घालणारा सुंदर लेख. माझ्या माहितीतील एक ह.भ.प. कीर्तनकार ‘मी अमुक इतके पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करत नाही’ हे अभिमानाने सांगत! त्यांनी किमान विनामूल्य प्रबोधन करावे ही माफक अपेक्षा!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा